अजूनकाही
सध्या राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव, वाढती महागाई, वाढते कर आणि नारायण राणेंची नाराजी, तर सेनेचा अल्टिमेटम अशा विविध बातम्यांनी माध्यमांचं चर्चाविश्व व्यापलंय.
या गदारोळात एक छोटेखानी बातमीकडे अनेकांचं दुर्लक्ष झालेलं दिसतं. मुळातली ही पहिल्या पानावरची बातमी आता आतल्या पानात गेलीय. वर्तमानपत्रात आतल्या पानात गेलेली बातमी, वृत्तवाहिन्यांवर दिसणं दुर्लभ.
२९ ऑगस्ट रोजी पडलेल्या पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे व मुंबईचे प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमरापूरकर यांचा साचलेल्या पाण्यातून पाच मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या घराकडे जाताना उघड्या गटारात पडून करुण अंत झाला. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह वरळीला सापडला. उद्धव ठाकरे यांनी आठ-नऊ फुटांचा ढग मुंबईवरून गेला आणि झाली त्यापेक्षा मोठी हानी होण्यापासून मुंबई वाचली आणि २९-२९-३० ऑगस्ट रोजी जे घडलं ते नैसगिर्क आपत्ती या सदराखाली दप्तरबंद केलं. पालिका आयुक्तांनी त्यांना साथ दिली. राज्य सरकारनं आपत्ती निवारणाचं नैमित्तिक सोपस्कार पार पाडले. सेना-भाजपनं आपापली पक्षीय गरळ ओकून घेतली.
मुंबईनं एक मोठा आणि तुलनेनं तरुण तज्ज्ञ डॉक्टर गमावल्यानं डॉ. अमरापूरकर यांच्या बेपत्ता होण्याची बातमी दोन दिवस प्रसारमाध्यमांत ठळकपणे येत राहिली. अनेक तर्क-वितर्क आणि चमत्कारांच्या भाबड्या आशेला दोन दिवसांनी पूर्णविराम मिळाला, जेव्हा वरळीला त्यांचा मृतदेह सापडला.
घरी जाण्यासाठी स्वत:च्या वाहनातून उतरून डॉक्टर निघाले ती जागा आणि नंतर सापडलेला त्यांचा मृतदेह यातून उघड्या मेनहोलमध्ये पडून प्रचंड पाण्याच्या ओघात डॉ. अमरापूरकर वाहून गेले आणि त्यांचा करुण अंत झाला हे स्पष्ट झालं. काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. सरकारनं मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष पथक, समिती गठित केली. त्याच्याही बातम्या आल्या.
१९ सप्टेंबरच्या वर्तमानपत्रात या चौकशीची बातमी जी आतल्या पानात आलीय, ती वेगानं तपास केल्याबद्दल अभिनंदनीय आहे. पण त्याचवेळी त्यातल्या सामाजिक वास्तवानं हादरवणारी आहे. शिवाय व्यवस्थेची तत्परता ‘नाही रे’ वर्गाच्या मुसक्या आवळण्यात किती प्राधान्यानं धडपड करते हे दिसून येतं.
बातमीप्रमाणे पोलिसांनी त्या जागेजवळील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, पण काही हाती लागलं नाही. मग पोलिसांनी आजूबाजूचे नागरिक, खबरे यांच्याकडून माहिती जमवायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांना तपासाचा पुढचा धागा मिळाला. तो धागा असा होता – घटनास्थळापासून जवळच कामगारनगर नावाची रस्त्यावरची वसाहत आहे. किती जुनी माहीत नाही. पण इथं पाणी साचतं आणि ते पाणी कामगारनगराच्या घरांत शिरतं. पूर्वी काही ठराविक सखल भागात पाणी तुंबायचं. यंदाच्या पावसात ठाण्या-मुंबईच्या नवीन कॉम्प्लेक्समध्येही पाणी शिरलं. असं पाणी शिरलं की, माणसं बादल्या, मिळेल ते सामान घेऊन पाणी बाहेर काढतात. ज्यांना परवडतं ते पंप लावून काढतात. साध्या झोपडीधारकांचंही १०-२० हजारांचं नुकसान सहज होतं.
कामगारनगरात पाणी साचणं हा नित्यनेम. पण म्हणून आहे ती घरं सोडून कुठे जाणार? नेहमीच्या या आजारावर तिथल्या मुलांनी आपल्या पद्धतीनं एक प्रथमोपचार शोधून काढला. तो म्हणजे पाणी साचलं की, गटाराचं झाकण काढायचं. हा प्रथमोपचार लागू पडायचा आणि झाकण काढलं की पाणी ओसरून जायचं. २९ ऑगस्टलाही त्यांनी हेच केलं, पण नैसर्गिक आपत्तीच एवढी मोठी होती की, पाणी ओसरण्याऐवजी वाढलं. ते एवढं वाढलं की रस्ता कुठे, गटार कुठे हे कळणं अशक्य होऊन गेलं. दुर्दैवानं डॉ. अमरापूरकर त्या उघड्या गटारात पडले आणि वाहून गेले. कामगारनगरचा प्रथमोपचार डॉ. अमरापूरकरांसाठी जीवघेणा ठरला.
गटाराचं झाकण काढल्याची बातमी तपासात मिळताच पोलिसांनी कामगारनगरातून सिद्धेश भेसलेकर, राकेश कदम, नीलेश कदम (हे दोघेही भाऊ भाऊ), दिवार पवार या चौघांना अटक केली. त्यांचे दोन साथीदार (!) फरार आहेत. त्यांचा शोध चालू आहे असं बातमी सांगते. पण या बातमीतील सर्वांत धक्कादायक व खळबळजनक बाब म्हणजे पोलिसांनी या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय!
पोलिसांची ही तत्परता डॉ. खोलेबाईंची तक्रार घेताना दिसून आलीच होती. पण वस्तीतल्या या पोरांवर थेट सदोष मनुष्यवधाचंच कलम काय म्हणून लावलं? आणि जे तर स्पष्ट झालं तर मग रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यासाठी कंत्राटदार, पालिका, आयुक्त, वार्ड ऑफिसर यांपैकी किती जणांवर आजपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावलाय?
सिंधुदुर्गातला आंबेडकरी आणि सांस्कृतिक चळवळीतला उत्तम पवार नावाचा तरुण कार्यकर्ता वर्षभरापूर्वी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे स्वत:चा जीव गमावून बसला. संतप्त गावकरी व कार्यकर्ते अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते. सार्वजनिक बांधकाम खातं व संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय. पण पोलिसांनी उत्तमच्या पत्नीवर (जी पोलिस दलातच कार्यरत आहे) परिस्थितीजन्य दबाव आणून, गुन्हा दाखल न करताच अंत्यसंस्कार करायला भाग पाडलं. उत्तमच्या आधीही तिथं दोघाजणांना जीव गमवावा लागला होता.
कोकणातच सावित्री नदीवरचा पूल पडला. अनेकांना जलसमाधी मिळाली. डॉ. अमरापूरकरांचा देह तरी मिळाला, त्या अपघातात तर आठ दिवस वाट पाहून नातेवाईकांनी नदी किनारा साश्रु नयनांनी सोडला.
सावित्री नदीवर विक्रमी वेळात नवा पूल बांधूनही झाला, त्याचा लोकार्पण सोहळा झाला. पण जे गेले त्यांच्या मरणाबद्दल कुणाकुणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय?
कामगारनगरातल्या चार मुलांनी गटाराचं झाकण काढणं, गटार उघडं ठेवणं, तिथं कसलीही धोक्याची सूचना न ठेवणं हा अक्षम्य अपराधच आहे. त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवीच. पण थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा?
हे करताना त्यांनी काही डॉक्टरांच्या मागावर राहून ते त्या गटारात पडतील अशी काही योजना आखली होती का? डॉ. अमरापूरकरांच्या ऐवजी कामगारनगरातीलच कुणी म्हातारा, लहान मूल वाहून गेलं असतं तर?
भांडवलशाही विकासात जे विविध वर्ग तयार होतात, ते एकमेकांना परस्परपूरक असतात. जे टॉवर उभे राहतात, त्याच्या शेजारच्या एसआरए इमारतीतून पेपरवाला, कामवाली, गाडी धुणारे, प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांचा पुरवठा होत असतो. शहराकडून शहराकडे स्थलांतरित होणारा शिक्षित, उच्चवर्ग असतो, तसा खेड्याकडून शहराकडे स्थलांतरित होणारा मजूर वर्ग असतो. मतांच्या राजकारणात त्यांच्या वस्त्या वसवल्या जातात. त्यांना वीज, पाणी आणि स्थानिक गुंडांचं सशुल्क संरक्षण देण्यात येतं. पोलिसांचीही हप्तेबाजी चालू राहते. ‘जीवो जीवस्य जीवनम’ या न्यायानं व ‘बळी तो कान पिळी’ या वृत्तीनं ही शहराच्या काखा-जांघातलं बांडगुळं इथली व्यवस्थाच वाढवत असते. आणि मग शेणातला किडा जसा त्यातही जगण्याचे मार्ग शोधतो, तसे या वस्त्या जगण्याचे मार्ग शोधतात.
पोलिस चौकशीत हे स्पष्ट झालंय की, याआधीही पाणी तुंबलं की गटाराची झाकणं काढून आपली घरं वाचवणं हा या वस्तीचा नित्यनेम होता. याचा अर्थ जगण्याचं रूपक म्हणून सांगितली जाणारी माकडीण व तिच्या पिलाची गोष्ट आणि या मुलांनी गटाराची झाकणं काढणं यात मूल्यात्मक फरक काय? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर नक्की दाखल करायला हवा?
महापालिका स्तरावर जे आरोप-प्रत्यारोप चालू होते, त्यात एक गोष्ट सांगितली जात होती सतत की, गटाराच्या तोंडाशी झाकणाखाली लोखंडी जाळी हवी. कारण अनेकदा सफाई कामगारांना किंवा अशा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी ही झाकणं काढावी लागतात. अनेकदा झाकण काढल्यावर तिथं धोक्याचा बावटा लावला जातो. काही वेळा राहून जातो. व्यवस्थापन, प्रत्यक्ष अमलबजावणी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा हा सरकारी गटार, रस्ते, पाईपलाईन, इस्पितळ अगदी स्मशानातही आढळतो. नाशिकच्या बालमृत्यूंसाठी कुणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच रस्ते अपघाताची आकडेवारी जाहीर केली, त्यातील रस्ते व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे किती, याचा तपशील त्यांनी जाहीर केला असता तर बरं झालं असतं.
डॉ. अमरापूरकरांचा मृत्यू चटका लावणारा आहेच, पण त्यासाठी केवळ गटाराचं झाकण काढणारे चार-सहा तरुण पकडून त्यांना मनुष्यवधाचं कलम लावणार? त्याच पावसात आणखी काही जण वाहून गेले असतील ज्यांची नोंदच नाही. त्यांचं काय करणार?
त्या मुलांना सोडून द्या, त्यांना शिक्षा नको, ती रस्त्यावर राहतात, गरीब आहेत अशा ढाली यानिमित्तानं पुढे करायच्या नाहीत. पण त्यांनी झाकणं काढलं नसतं आणि वस्तीच, आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला असता तर?
मागे अंधेरी स्टेशनजवळ एक पाईपलाईन फुटून बाजूंच्या वस्तीतील मुलं वाहून गेली होती. वस्ती पातळीवर होणाऱ्या अशा नैसर्गिक आपत्तीची नोंद झाली तर झाली, नाही तर ‘दर्या में खसखस’ सारखं शहर चालू राहतं.
शेवटी एकच वाटतं, या सहा पोरांच्या बचावासाठी दिल्लीहून अॅड. हरिश साळवे येण्याची शक्यता नाही. ज्यांनी सलमानला तासात जामीन मिळवून दिला होता. आणि त्या आधी तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल नव्हता केला. तो नंतर माध्यमांच्या दबावानंतर दाखल केला गेला. पुढे त्या प्रकरणात काय व कसं घडत गेलं आपण पाहिलंच.
राजेश खन्नाचा एक प्रसिद्ध संवाद आहे – “वो भी एक दौर था, ये बी एक दौर है.”
त्याच लयीत म्हणता येईल – “तोही एक सदोष मनुष्यवध होता, हाही एक सदोष मनुष्यवध आहे.”
देखते हैं आगे आगे होता है क्या…
लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment