दिल्ली ‘व्हेंटिलेटर’वर
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • इंडिया गेटसमोरील हवेतील प्रदूषण
  • Mon , 07 November 2016
  • संपादकीय अक्षरनामा

नुकताच महाराष्ट्रात ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी चित्रपट प्रसारित झाला आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रसारित झाला आणि रविवारी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मराठ्यांच्या बाईक रॅलीने मुंबईचं ट्रॅफिक काही काळ व्हेंटिलेटरवर नेलं. मराठ्यांच्या मोर्चांना दिवसेंदिवस मिळणारा प्रतिसाद पाहता महाराष्ट्रही लवकरच व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईत ‘एक मराठा, लाख मराठा’ हा नारा सुरू असताना तिकडं देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ‘राईट टू ब्रीथ’चा नारा जंतरमंतरवर घुमत होता. कारण गेल्या काही दिवसांतल्या वायूदुर्घटनेमुळे संबंध दिल्ली शहरच व्हेंटिलेटरवर गेलं आहे. ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमात हिंदीतील प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचीही भूमिका आहे. ‘सरकारनामा’ या १८-१९ वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटात गोवारीकर यांनी भूमिका केली होती. त्यानंतर मात्र त्यांनी अभिनयाकडे सरळ पाठ फिरवून दिग्दर्शनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यामुळे इतक्या प्रदीर्घ काळानंतर त्यांनी ‘व्हेंटिलेटर’मध्ये केलेली भूमिका फारशी सुसह्य होत नाही. तसंच काहीसं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचंही झालं आहे. एरवी भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याविरोधात सतत दंड थोपटून उभ्या राहणाऱ्या केजरीवाल यांची दिल्ली व्हेंटिलेटरवर गेल्यामुळे भंबेरी उडाली आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीतील वायूदुर्घटनेला ते सोडून इतर कसे जबाबदार आहेत, याचा पाठ अळवण्याचा प्रयत्न केला आहे. पण धूर त्यांच्याही नाका-तोंडात शिरू लागल्याने आणि दिल्लीकरांचा संयम तुटू लागल्याने त्यांनी काल तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. त्यात त्यांच्या नेहमीच्या धडाडीने काही आकर्षक निर्णय घेतले. दिल्लीतील रस्ते व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ करणं, धुवून काढणं, पुढचे पाच दिवस दिल्लीतील बांधकामे बंद ठेवणं, डिझेलवर चालणारे जनरेटर अत्यावश्यक सेवा वगळता पुढचे दहा दिवस बंद ठेवणं, तितकेच दिवस बदरपूरमधील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद ठेवणं, तीन दिवस शाळा बंद ठेवणं, ऑफिसेस बंद ठेवणं, असा सारा ‘बंदी’नामा केजरीवालांनी जाहीर केला आहे. आधीच केंद्र सरकार एनडीटीव्हीवरील एक दिवसीय बंदीमुळे टीकेच्या भोवऱ्यात सापडलेले असताना केजरीवाल यांनाही हा बंदीनामा जाहीर करावा लागावा? पण तो खरोखरच दिल्लीच्या हिताचा आहे. त्यामुळे त्याबाबत दुमत नको.

आज केजरीवाल उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहेत. कारण दिल्लीतली वायूदुर्घटना या तिन्ही राज्यांकडून दिल्लीच्या सीमेवर केल्या जाणाऱ्या प्रदूषणांमुळे घडली आहे, असा त्यांचा वहीम आहे. केजरीवाल यांची पुरती वायूकोंडी झाल्याने ते त्याचं खापर इतरांवर फोडू पाहत आहेत. त्यातून तेही इतर राजकीय पक्षांसारखेच कसलेले राजकारणी आहेत, एवढंच फार तर सिद्ध शकतं. कारण दीर्घकालीन समस्येचं गांभीर्य त्यांना परिस्थिती इतकी बिकट झाल्यावरही आलेलं नाही किंवा कुणी करून दिलेलं नाही. पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत ‘जगातील सर्वाधिक हरित राजधानी’ असा लौकिक असलेलं दिल्ली शहर या अवस्थेला का आणि कसं गेलं, त्यावर आवश्यक ती उपाययोजना का केली गेली नाही, याविषयी चकार शब्द न काढता, इतरांवर आरोप करून आपली शुचिर्भूतता सिद्ध करण्याची हातोटी केजरीवाल यांच्याकडे नक्कीच आहे. चीनची राजधानी बिजिंग हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर मानलं जातं. त्याच्याबरोबरीला आता भारताची राजधानी गेली आहे. इतर कशात आपल्या देशाला चीनची बरोबरी करता येवो न येवो, पण आपल्या देशाच्या राजधानीने चीनच्या राजधानीची वायूदुर्घटनेच्या बाबतीत तरी बरोबरी केली आहे, हेही काही कमी नाही!

दिल्ली शहर हे तसंही उग्र प्रकृतीचं आहे. तेथील सर्वच ऋतु तीव्र असतात. त्या तीव्रतेचा वसा दिल्लीतल्या वायूप्रदूषणानंही घ्यावा यात काही नवल नाही. देशाची सारी सूत्रं दिल्लीतून हलवली जातात. तिथं दररोज वेगवेगळी कटकारस्थानं शिजतात. (हल्ली त्यांचं प्रमाणही खूप वाढलंय!) देशाच्या भल्याबुऱ्याचा विचार केला जातो. त्यामुळे दिल्ली सर्वांना आपली वाटते, पण दिल्लीचा कुणीही वाली नसतो. प्रत्येकाला आपल्या मतलबापुरतीच दिल्ली हवी असते. त्यामुळे गेल्या सहा-सात वर्षांतच दिल्ली ‘जगातील सर्वाधिक हरित राजधानी’च्या अग्रक्रमावरून गडगडत सर्वाधिक प्रदूषित शहरापर्यंत खाली आली आहे. आता दिल्लीमध्ये फिरणं, ऑफिसला जाणं कठीण होऊन बसलं, तेव्हा दिल्ली सरकारला जाग आली. दिल्लीची सत्ता तर हवी, पण जबाबदारी नको, या शहाजोगपणाचं दर्शन केजरीवालांनी कालच्या त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही घडवलं आहे. इतरांवर आरोप करून आपली जबाबदारी झटकता येत नाही, याचं साधं भानही त्यांना राखता आलेलं नाही, हे जास्त दुर्दैवी आहे.

या वायूदुर्घटनेचा निषेध करण्यासाठी काल शालेय मुलं आणि त्यांच्या पालकांनी जंतरमंतरवर मास्क लावून निदर्शनं केली आणि लवकरात लवकर या समस्येवर उपाय शोधला जावा अशीही इच्छा व्यक्त केली. ते बरोबरच आहे, कारण रविवारी सकाळी दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक ९९९वर पोहचला होता. जो सर्वाधिक धोकादायक मानला जातो. सर्वसाधारणपणे ० ते ५० पर्यंतचा निर्देशांक चांगला मानला जातो. ५१ ते १०० पर्यंतचा निर्देशांकही आरोग्यासाठी फारसा हानीकारक मानला जात नाही. पण त्यापेक्षा जवळपास ९ पटीने जास्त असलेलं वायूप्रदूषण निश्चितच हानीकारक मानलं जातं. तसं तर गेल्या काही वर्षांत दिल्लीतील हवा सातत्यानं बिघडत चालली आहे. त्याविषयी सुनीता नारायण यांच्यासारख्या पर्यावरणतज्ज्ञाने अनेकवार सांगितलंही आहे. पण त्याकडे ना आधी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारनं लक्ष दिलं, ना काँग्रेसचा धुव्वा उडून सत्तेत आलेल्या केजरीवाल सरकारनं. गेल्या पंधरवड्यात दिल्लीतील हवा सातत्यानं खराब होत होती. त्याच्या बातम्या आधी विदेशी वर्तमानपत्रांनी दिल्या. तेव्हा कुठे भारतीय माध्यमांना जाग आली. अर्थात भारतीय प्रसारमाध्यमं ज्या गोष्टीच्या मागे लागतात, ती आणखीनच बिघडत जाते, हाही इतिहास आहे! त्याला दिल्लीची हवा तरी कशी अपवाद ठरणार!

दिल्ली व्हेंटिलेटरवर जाण्याला फक्त केजरीवाल सरकार कारणीभूत आहे, असं मानायचं अजिबात कारण नाही. ते सध्या सत्तेत आहे, त्यामुळे सध्या त्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. खरी गोष्ट अशी आहे की, दिल्लीला व्हेंटिलेटरपर्यंत पोहचवण्यात सर्व राजकीय पक्षांनी जसा हातभार लावला आहे, तसा तो दिल्लीकरांनीही लावला आहे. त्यामुळे आता त्यांना केवळ केजरीवाल सरकारला दोष देऊन चालणार नाही. प्रदूषित हवेमुळे मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे. शालेय मुलं, कामगार यांची अवस्था सर्वाधिक वाईट झाली आहे. दिल्लीच्या या अवस्थेवर ट्विटरवर चर्चा चालू झाली असून त्यात नेहमीप्रमाणे उपरोध, विनोद, टीका यांचा समावेश आहे. ‘व्हेंटिलेटर’ सिनेमात जसे ‘व्हेंटिलेटर म्हणजे काय’ या प्रश्नाला दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरातून विनोद घडत जातात, तसंच कुठल्याही समस्येवर विनोद करणं हाच सोशल मीडियावरील काहींचा छंद असतो. त्यातही दिल्लीकर मागे राहिले नाहीत एवढंच. मात्र काही शहाणे दिल्लीकर वेगवेगळे पर्यायही सूचवत आहेत.  दिल्लीला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी कडक नियमांची आवश्यकता आहे, या जंतरमंतरवरील दिल्लीकरांच्या म्हणण्याला कुणीही दुजोरा देईल. पण हा पर्याय या दिल्लीकरांना नाका-तोंडात धूर जाऊ लागल्यावरच का सुचावा? त्याआधी का सुचला नाही? ९० टक्के लोकांना श्वासोच्छवास घ्यायला त्रास व्हायला लागल्यानंतर जाग यावी? गेला सबंध आठवडा दिल्लीला वायूप्रदूषणाने वेढून टाकलं आहे. आठवडाभराने दिल्ली सरकार आणि दिल्लीकर यांचे डोळे उघडले आहेत. ‘व्हेंटिलेटर सिनेमा’ आणि ‘व्हेंटिलेटर’ दिल्ली यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे कुठल्याही जादुई शक्तीनं दिल्लीची ही अवस्था जाणार नाही. त्यासाठी दिल्ली सरकार आणि दिल्लीकरांनाच नियोजनपूर्वक प्रयत्न करावे लागतील.

आपण या साऱ्या प्रकारातून एवढाच बोध घ्यायला हवा की, आज दिल्लीची जी अवस्था आहे, ती उद्या-परवा आपल्या शहराचीही होऊ शकते. तेव्हा होशियार, केवळ रात्रच वैऱ्याची असते असं नाहीतर दिवसही वैऱ्याचा असू शकतो! व्हेंटिलेटरवर गेलेल्या दिल्लीपासून एवढा बोध तरी आपल्याला नक्कीच घेतो येईल.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......