टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अशोक चव्हाण, राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी, नारायण राणे, सुब्रमण्यम स्वामी आणि अमित शहा
  • Tue , 19 September 2017
  • विनोदनामा टपल्या अशोक चव्हाण Ashok Chavan राजनाथ सिंग Rajnath Singh नरेंद्र मोदी Narendra Modi नारायण राणे Narayan Rane सुब्रमण्यम स्वामी Subramanian Swamy अमित शहा Amit Shah

१. आदर्श प्रकरणात राज्यपालांनी राजकीय हेतूने सीबीआयला आपल्याविरोधात खटला दाखल करण्यास परवानगी दिली, असा आरोप काँग्रेस नेते आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी हा आरोप केला. चव्हाण यांनी राज्यपालांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. २०१३ मध्ये राज्यपालांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटल्याची परवानगी दिली नव्हती. मात्र यानंतर सीबीआयनं पुन्हा अर्ज केला आणि नवीन पुरावेदेखील सादर केल्याचं त्यांनी सांगितलं. फेब्रुवारी २०१६ मध्ये राज्यपाल सी. विद्यासागर यांनी नवीन पुरावे मिळाल्यामुळे नव्हे, तर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे चव्हाण यांच्या विरोधात खटल्याची परवानगी दिली, असा आरोप चव्हाण यांच्या वकिलांनी केला. राज्यपालांनी दिलेले आदेश राजकीय हेतूने प्रेरित आणि एकतर्फी होते, असं त्यांनी म्हटलं आहे.

राजकीय प्यादी राज्यपालपदावरच नव्हे, तर राष्ट्रपतीपदावरही बसतात. सर्व राज्यकर्त्यांना आपल्या सोयीचा रबर स्टँप उच्चपदावर लागतो. देशाच्या राजकारणातल्या अनेक कुप्रथांप्रमाणे याचीही सुरुवात, चव्हाण यांना आठवत असेल तर, काँग्रेसच्या, खासकरून इंदिरा गांधींच्या काळातच झाली. त्यांनी तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदीही दिल्लीचे आदेश निमूट झेलणारे बाहुले आणून बसवले होते. काँग्रेसच्या ज्या धोरणाचा खुद्द चव्हाणांना राजकीय कारकिर्दीत फायदा झाला, त्यांचा फटकाही सोसायला हवाच ना. यात राजकारण आहे, म्हणून रडण्यात अर्थ काय?

.............................................................................................................................................

२. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करण्यात आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. एका बिल्डरकडे इकबाल कासकरनं खंडणी मागितली होती. नंतर या बिल्डरनं पोलिसांकडे तक्रार केली. याच प्रकरणी इक्बाल कासकरला अटक करण्यात आली.

हा इक्बाल कासकर वाजत गाजत भारतात आला, तेव्हा दाऊदला केवढा मोठा फटका म्हणून गाजावाजा झाला होता. पण, प्रत्यक्षात त्याच्यावर एकही गुन्हा शाबित झाला नाही. त्यानं खंडणी मागितल्याचा हा पहिला प्रकार असणं अशक्य आहे. एकंदर घटनाक्रम पाहता विरोधी टोळ्यांकडून संरक्षण देण्याचा किंवा दाऊदविरोधातला फास ढिला करण्यासाठी छोट्या प्याद्याची तात्कालिक आहुती देण्याचा हा शुद्ध सेटिंगचा प्रयोग वाटतो. पोलिस दलात मुरब्बी माणसांची कमतरता नाही!

.............................................................................................................................................

३. ‘अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश राज्यात काँग्रेस संपवत असून त्यांनी मी काय आहे हे अजून समजलंच नाही. मला डिवचलं की, माझी ताकद दुप्पट होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार,’ असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सोमवारी सांगितलं. ‘मी खूप पुढे आलोय, फक्त आता तुम्ही साथ सोडू नका’ असं भावनिक आवाहन त्यांनी समर्थकांना केलं. भाजपच्या वाटेवर असलेल्या राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सदस्यांचा स्वतंत्र गट म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केल्याचं समोर आलं होतं. यानंतर काँग्रेसनं शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय नियमबाह्य असून माझ्या संमतीशिवाय प्रदेश काँग्रेस निर्णय घेऊ शकत नाही, असं राणेंनी म्हटलं आहे.

कुणीतरी एखादा मोठा बॉम्ब वाजणार असं सांगावं, सगळ्या राज्याचं लक्ष वेधून घ्यावं, वातही पेटवावी आणि मग अनेक महिने नुसती वातच सुरसुरत चालली आहे... बॉम्ब अजून काही किलोमीटर लांब आहे आणि तोही उन्हापावसात भिजतो आहे... अशी काहीतरी अजब फार्सिकल सिच्युएशन बनून बसली आहे ही... फायरब्रँड नेता या राणे यांच्या ओळखीच्या अतिशय विपरीत पद्धतीनं त्यांचा असा खेळ करून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी त्यांना त्यांचं महत्त्व कमी झाल्याचे संकेत दिले आहेत, त्यांना हास्यविषय बनवून ठेवलं आहे.

.............................................................................................................................................

४. व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी सोशल नेटवर्किंग साईट्सवर समाजविघातक संदेश पसरवले जात आहेत. अशा संदेशांवर लगेच विश्वास ठेवू नका. खात्री न करताच असे संदेश इतरांना फॉरवर्ड करू नका, असा सावधानतेचा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना दिला आहे. सोशल मीडियावर काँग्रेसकडून भाजपविरोधी प्रचार करण्यात येत आहे. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नागरिकांना केलं होतं. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर भाजपविरोधी प्रचार करणारे संदेश पसरवले जात आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका. या संदेशांची आधी खात्री करा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. गुजरातमध्ये भाजप सत्तेत येण्याआधी राज्याची काय अवस्था होती आणि भाजप सत्तेत आल्यानंतरची सध्याची परिस्थिती काय आहे, याचं विश्लेषण करा, असं शहा म्हणाले होते. विशेष म्हणजे शहांनी केलेल्या आवाहनानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री सिंह यांनी व्हॉट्सअॅपवर आलेले संदेश खात्री न करताच फॉरवर्ड करू नका, असं आवाहन नागरिकांना केलं आहे.

भाजपने पोसलेले भस्मासुर उलटू लागले आहेत, याचीच ही चिन्हं आहेत. या दोन नेत्यांनी सोशल मीडियावरच्या अपप्रचाराबद्दल बोलणं म्हणजे रावणानं रामकथा सांगण्यासारखं आहे. २०१४च्या निवडणुकीत याच हत्याराचा प्रच्छन्न वापर करून लोकांचा बुद्धिभेद केला गेला होता. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिमाहननात यांच्या ट्रोलांनी आपले ‘संस्कार’ही दाखवून दिले होते. आता गुजरातेत एकहाती सत्ता येईल, असं वातावरण असताना, ते पालटून एकदम ‘विकास गांडो थयो’ म्हणजे ‘विकास वेडा झाला आहे’, या प्रचारवाक्यानं जोर पकडला आहे. आपल्या लोकांवर कशाचीही चिकित्सा करण्याचा, काही पाखडून घेण्याचा संस्कारच नाही, याचा आपल्या फायद्यासाठी वापर करून झाल्यानंतर ही उपरती हास्यास्पद आहे... अब भुगतो.

.............................................................................................................................................

५. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याप्रकरणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसचे सरचिटणीस मनीष तिवारी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. मनीष तिवारी हे एक समजूतदार व्यक्ती म्हणून ओळखले जातात. परंतु, त्यांना राहुल गांधींसारख्या अर्धशिक्षित व्यक्तीचे आदेश मिळाल्यामुळे ते असं करत असतील, असा टोला लगावला आहे. तिवारींनी पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये राष्ट्रगीत सुरू असताना ते चालताना दिसत आहेत. त्यावर दीपक कुमार सिंह नावाच्या व्यक्तीनं तुम्ही त्यांना देशभक्ती शिकवू नका, असं उत्तर दिलं. त्यानंतर त्याचं उत्तर देताना तिवारी यांनी आक्षेपार्ह शब्दांत एक ट्विट केलं. महात्मा गांधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभक्ती शिकवू शकत नाहीत, असं उत्तर दिलं होतं. राहुल गांधी यांच्या आदेशानंतर ‘माकडा’प्रमाणे वर्तणूक करावी लागते, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांची स्थिती आणखी कमकुवत आणि कमजोर होते. त्यांची प्रतिमा आणखी खराब होते, असं स्वामी म्हणाले.

स्वामी यांना आपल्या शिक्षणाचा फार टेंभा आहे. शिक्षणानं माणूस सुशिक्षित आणि सुसंस्कृत होतो, या समजुतीला खुद्द त्यांच्याच रूपानं छेद मिळालेला आहे, हे त्यांच्या लक्षात येत नसावं. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही नानातऱ्हेच्या कोलांटउड्या आणि माकडचेष्टांनी भरलेली आहे. आपले चाळे स्वयंस्फूर्तीनं होतात आणि त्यामुळे ते समर्थनीय ठरतात, अशी त्यांची समजूत दिसते. भाजपमध्ये राहून त्यांनी किमान अर्धशिक्षित नेत्यांबद्दल बोलू नये, उगाच गैरअर्थ निघू शकतील.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......