अजूनकाही
संजय पवार यांनी हवामानशास्त्रज्ञ डॉ. मेधा खोले बाई आणि बंडखोर पत्रकार गौरी लंकेश यांच्यात केलेली तुलना ‘ ‘कळ'फलक’वर वाचली. खरं म्हणजे तुलना गौरी लंकेश आणि सुधा मूर्ती यांच्यातही व्हायला हवी. कारण दोघींमध्ये इंग्रजी-कन्नड भाषेतलं लिखाण आणि समाजकार्य हा धागा आहे.
गौरी लंकेश यांना आपल्या लिखाणासाठी जीव गमवावा लागला. सुधा मूर्तींचं सोशल मीडियात अमाप कौतुक चालतं. त्या कसं साधं जीवन जगतात, त्यांनी कशी अनेक वर्षांपासून साडी विकत घेतलेली नाही, त्यांचं सामाजिक काम, त्यांची पुस्तकं किती खपतात वगैरे. कॉर्पोरेट जगतात असूनही त्यांचा साधेपणा वाखाणायलाच हवा.
मात्र त्यांच्या लिखाणाची अजून तरी कुणी चिकित्सा केलेली दिसत नाही. कदाचित समीक्षकांना त्यात अर्थकारण-समाजकारणाची गहन चर्चा दिसत नाही म्हणून, कोणतंही राजकीय भाष्य त्यात नसतं म्हणून, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असेल.
अनेक मम्मी-पप्पा लोक आपल्या चिंटू-पिंटूवर काही 'संस्कार' व्हावेत आणि हल्ली ते इंग्रजीतूनच केले जाऊ शकतात म्हणून सुधा मूर्तींची पुस्तकं त्यांना विकत घेऊन देतात, कारण इंग्रजीचं बाळकडू मुलांना पाजू शकणाऱ्या मम्मी-पप्पांकडेच पुस्तकं विकत घेण्याची क्षमता असते. आणि सुधा मूर्तींच्या पुस्तकांत तर संस्कारांचा भला मोठा डोस असतो! (विचार करू नका- संस्कार घ्या!)
उगाच डोक्याचा भुगा करणाऱ्या सामाजिक न्यायाच्या, जातीय-धार्मिक विद्वेषाच्या, कॉर्पोरेट्स आणि फॅसिस्ट शक्तींच्या एकत्र येण्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक असंतोषाच्या गोष्टी नसतात. शेतकरी, विद्यार्थी यांच्यावर लादलेल्या आत्महत्यांची कारणमीमांसा नसते. म्हणूनही समीक्षकांना सुधा मूर्ती यांच्या लेखनाकडे दुर्लक्ष करावंसं वाटत असावं.
पण परदेशात स्थायिक करण्यासाठीच मुलं शिकवणाऱ्या, हल्ली संस्कृतीचं भान आलेल्या अन म्हणून पुन्हा आई-बाबा झालेल्यांनी आयटी क्षेत्रासाठी बारा-चौदा तास मान मोडून काम करू शकणारा मजूर पुरवठा करण्याचा ठेकाच घेतलेला असतो. अशांसाठी सुधा मूर्तींचं लिखाण आवश्यक असतं, कारण ते IMF, WTO, वर्ल्ड बँक यांच्या धोरणांबद्दल प्रश्न न विचारणाऱ्या, भारतीय संस्कारी आयटी मजुरांबद्दल एक ‘गुडविल’ तयार करतं. त्यामुळेही गौरी लंकेश आणि सुधा मूर्ती या कन्नड लेखिकांमध्ये कुणाला तुलना करावीशी वाटत नसेल.
गौरीचं लिखाण कन्नड भाषेत असल्यामुळे त्या लेखिका म्हणून जोखीम घेत होत्या. कारण मातृभाषेत सांगितलेलं तथ्य अधिक धारदार, अस्वस्थ करणारं असतं. त्या नक्षलवाद्यांनी मुख्य धारेत यावं म्हणून प्रयत्न करत होत्या. त्यांचं सामाजिक कार्य सुधा मूर्तींसारखं वरवरचं नव्हतं. त्या संबंधितांशी थेट खेटे घेत होत्या.
सुधा मूर्तींच्या इन्फोसिसनं मात्र १५०० हेक्टर जमीन घेऊन ठेवलेली आहे. आयटी कंपनी चालवायला इतक्या जमिनीची काय गरज असते? सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स जमिनीवर उगवतात का? भूखंडांना mortgage करून बँका या कॉर्पोरेट कंपन्यांना लोन का देतात? बँकेचं लोन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मात्र ती जमीन ओलिताची का कोरडवाहू, ज्वारी का संत्री वगैरे असे अनेक निकष असतात. अशा भेदभावपूर्ण निकषांबद्दल सुधा मूर्तींनी सरकारची कानउघाडणी केल्याचं अजून तरी वाचनात आलेलं नाही.
नक्षलवादी हिंसेचा निषेध करत असतानाच नक्षलवाद्यांची निर्मिती करणाऱ्या या जल-जंगल-जमीन हडपाऊ कॉर्पोरेट कंपन्यांचा आणि त्यांच्या दबेल सरकारचा समाचार सुधा मूर्ती कधी घेतील का?
लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
prajwalat2@rediffmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vilas Kolape
Thu , 01 February 2018
नमस्कार, मी सुधामुर्ती यांचा भक्त आहे.पण भक्त होणं कसं घातक आहे ते या लेखानं ते अधोरेखित केलं.
Gautam D
Mon , 30 October 2017
सुधा मुर्तींचे साहित्य हे कन्नड़ व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. संजय पवारांना कन्नड भाषा येत नसेल. व त्यांचे इंग्रजीचे ज्ञानही कदाचित यथातथाच असण्याची शक्यता आहे ( याबद्दल तेच नक्की सांगू शकतील, आम्ही फक्त possibility व्यक्त करत आहोत). त्यामुळे त्यांना कदाचित सुद्धा मूर्तींबद्दल माहित नसावे.