द वर्ल्ड इज अॅन इव्हिल प्लेस
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘बिफोर द डेव्हिल नोज यू आर डेड’ची पोस्टर्स
  • Mon , 18 September 2017
  • इंग्रजी सिनेमा न-क्लासिक बिफोर द डेव्हिल नोज यू आर डेड Before the Devil Knows You're Dead सिडनी ल्यूमेट Sidney Lumet

वयाच्या ८४व्या वर्षी माणसानं काय करणं अपेक्षित असतं? नातवंडांमध्ये रमावं... अगदीच भाग्यवान असला तर पतवंडांना खेळवावं... गतआयुष्याचा जमाखर्च मांडण्याचा प्रयत्न करावा... घरातल्या तरुण पिढीला चार युक्तीच्या गोष्टी (त्यांची ऐकण्याची तयारी असेल तर) सांगाव्यात.

सिडनी ल्यूमेटला मात्र हे मान्य नसावं. अन्यथा वयाच्या ८४व्या वर्षी तो सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या कुठल्याही यादीत ऐसपैस बसेल, असा चित्रपट करून या जगाचा निरोप घेता ना. आयुष्यभर हा माणूस आपल्या चित्रपटांमधून नैतिकतेवर भाष्य करत राहिला आणि तरीही मनोरंजनाची कास त्यानं सोडली नाही. बहुदा म्हणूनच फेलिनी, गोदार्द, बर्गमन, कुरोसावा, रे यांच्या यादीत त्याला कधी बसवलं गेलं नाही. आपल्या चित्रपटातून सोशल कमेंट्री करत असला म्हणून काय झालं? हॉलिवुडची मुख्य चौकट तोडायचं धाडस त्यानं कुठे दाखवलं? लोकप्रिय कलाकारांना न घेता चित्रपट कुठे केले? त्यातच त्यानं आपल्या बहुतांश चित्रपटांत क्राइमची पार्श्वभूमी वापरली आणि आवरण थ्रिलरचं घातलं. ही तर सवंगपणाची हद्द झाली!

असला सवंगपणा करतच ल्यूमेटनं सकस चित्रपटांची रांग उभी केली. ५० वर्षांच्या कारकीर्दीत ४४ चित्रपट. त्यातले काही फसलेही; पण ‘१२ अँग्री मेन’, ‘नेटवर्क’, ‘सर्पिको’, ‘डॉग्ज डे आफ्टरनून’, ‘द व्हर्डिक्ट’, ‘फेल सेफ’ यातल्या एकेका चित्रपटावर आपल्याकडच्या असंख्य दिग्दर्शकांनी अख्खी हयात काढली असती. अशा या देदीप्यमान कारकिर्दीचा अखेर ‘बिफोर द डेव्हिल नोज यू आर डेड’सारख्या उत्तुंग कलाकृतीनं होणं संयुक्तिक होतं.

मुळात वयाच्या ८४व्या वर्षीही चित्रपट काढावासा वाटणं, त्यासाठी डिजिटलसारखं आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणं, या वयातही निर्मात्यानं त्यांच्यावर विश्वास दाखवणं हाच एक चमत्कार होता. कण्हत कुंथत आले दिवस कसेबसे ढकलत काढायच्या या दिवसांमध्ये ल्यूमेट रूपेरी पडद्यावर माणसांच्या स्खलनशील वृत्तीची सालटी काढत बसला होता. ल्यूमेटनं आपल्या चित्रपटांमधून समाजाच्या नैतिकतेचे विविध पदर दाखवले, समाजातल्या अपप्रवृत्तींवर बोट ठेवलं. ‘बिफोर द डेव्हिल...’मधलं एक नगण्य पात्रदेखील ‘द वर्ल्ड इज अॅन इव्हिल प्लेस, चार्ली’ या शब्दांत ल्यूमेटचं तत्त्वज्ञान ऐकवतो.

‘बिफोर द डेव्हिल नोज यू आर डेड’ ही कोणा एकाची गोष्ट नाही. ती अँडी हॅनसनची (फिलिप स्यूमॉर हॉफमन) आहे, त्याचा भाऊ हँकची (एथन हॉक) आहे, त्यांचे वडील चार्ल्सची (आल्बर्ट फिनी) आहे, आई नॅनेटची (रोजमेरी हॅरिस) आहे. पण त्याच्याही पलिकडे ही गोष्ट हाव, नात्यांपेक्षा पैशाला आलेलं महत्त्व, नीतीमूल्यांचा ऱ्हास यांची आहे. या सगळ्याची सांगड कोसळलेल्या कुटुंबव्यवस्थेशी घालत ल्यूमेट आधुनिक समाजाचं एक विषण्ण करणारं चित्र आपल्यासमोर मांडतो. इथं कुठलीही दयामाया नाही, पलायनवाद नाही, प्रेक्षकाला बरं वाटावं म्हणून खोटा आशावाद नाही.

अँडी हॅनसन हा एका रिअल इस्टेट फर्ममध्ये सहा आकडी गलेलठ्ठ पगारावर मोठ्या पदावर आहे. पण ड्रग्जचं व्यसन आणि न संपणाऱ्या गरजा यामुळे त्याचं पगारात भागत नाही. त्यामुळे तो कंपनीच्या व्यवहारांमध्ये गडबड करतो. आता ऑडिट तोंडावर आलंय, त्यामुळे चोरी पकडली जाण्याची त्याला भीती आहे. त्यामुळे ऑडिटपूर्वी त्याला पैशांची नितांत गरज आहे. त्याचा भाऊ हँक. अँडीच्या अगदी विरुद्ध. परिस्थितीनं गांजलेला. पैशांची नेहमीच चणचण. विभक्त झालेल्या पत्नीला आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी द्यावे लागणारे पैसेही त्याच्याकडे नाहीत. त्यामुळे येता-जाता सतत तो या घटस्फोटीत पत्नीकडून अपमानास्पद बोलणी खात असतो. पण आपल्या मुलीवर त्याचं नितांत प्रेम आहे. त्यालाही भरपूर पैशांची तातडीची निकड आहे. अमेरिकन कुटुंबव्यवस्थेनुसार अँडी त्याच्या विश्वात आहे, हँक त्याच्या विश्वात आणि त्यांचे वृद्ध आई-वडील मुख्य शहरापासून दूर असलेल्या एका उपनगरात आहेत. तिथल्या मॉलमध्ये त्यांचं ज्वेलरीचं दुकान आहे.

एक दिवस ध्यानीमनी नसताना अँडी हँकला भेटायला बोलावतो. तुझ्या एका होकारानं आपल्या दोघांचीही पैशांची चणचण दूर होईल, असं त्याला सांगतो. हो, ना करता करता हँक तयार होतो. मग अँडी त्याला आपली योजना सांगतो. वडलांचं ज्वेलरीचं दुकान लुटायचं. आपण त्या दुकानात काम केलंय, तिथल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तिथल्या वाटा, कुठल्या वेळी कोण असतं, सिक्युरिटी अलार्म कुठे आहे, वगैरे वगैरे... फक्त पाच मिनिटांचं काम आहे. एकही गोळी चालणार नाही, बंदुकीचं काही कामंच नाही. त्यामुळे कोणाला इजा होण्याचाही प्रश्न नाही. वडलांचंही काही नुकसान नाही, कारण त्यांना इन्श्युरन्सचे पैसे मिळतील. एकदम फुलप्रूफ आणि अगदीच हार्मलेस प्लॅन.

पण अशा दरोड्याच्या असंख्य चित्रपटांमध्ये दाखवतात तसं हा फुलप्रूफ आणि हार्मलेस प्लॅन प्रत्यक्ष दरोड्याच्या वेळी तसा राहात नाही. ऐनवेळी काहीतरी गडबड होतेच. बंदुका चालतात, रक्तपात होतो, माणसं मरतात. तसंच इथेही होतं. फक्त त्यानंतर जे होतं, ते अन्य गुन्हेगारी मारधाडपटांप्रमाणे होत नाही आणि त्यामुळेच हा चित्रपट निव्वळ वेगवान गुन्हेगारीपट न राहता ढासळत्या नैतिकतेचा आणि कोसळत्या कुटुंबव्यवस्थेचा भयावह आलेख बनतो. या एका घटनेचा तिच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर काय काय परिणाम होतो, ते त्या त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतं. तेच तेच प्रसंग पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनातून ल्यूमेट आपल्याला दाखवतो. त्यामुळे त्या घटनेचे परिणाम ३६० अंशात आपल्यासमोर उलगडतात. आधी अँडी, मग हँक, मग त्यांचे वडील चार्ल्स, पुन्हा अँडी, मध्येच पुन्हा हँक, मग अँडीची पत्नी गिना, पुन्हा चार्ल्स असा सतत कथानकाचा झोत फिरत राहातो आणि या फिरत्या झोतात या व्यक्तिरेखांवर दरोड्याच्या घटनेचे झालेले परिणाम आणि त्यातून त्यांची झालेली घसरण आपल्याला दिसत राहाते.

हे सरळसोट, एकरेषीय पद्धतीनं दाखवता नसतं आलं का? कदाचित दाखवता आलं असतं; पण मग त्या घटनेचा परिणाम जसा चहूअंगानं आपल्याला येऊन भिडतो, तसं झालं नसतं. व्यक्तिरेखांची अधोगती आणि कुटुंबाची धूळधाण उडताना बघताना आपल्याला अक्षरश: घुसमटायला होतं. त्यामुळे तीच तीच दृश्यं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून (पॉइंट ऑफ व्ह्यू) पुन्हा पुन्हा दाखवणं ही केवळ क्लृप्ती म्हणून ल्यूमेट वापरत नाही. त्याला प्रेक्षकांना व्यक्तिरेखांच्या ऱ्हासाचा केवळ साक्षीदारच करायचं नाही, तर आपलं बखोट धरून तो आपल्याला त्या परिणामांच्या भट्टीत फेकून देतो.

हॉलिवुडमध्ये हाइस्ट फिल्म्सचा जो ज्यॉनर आहे, त्यात दरोड्याची मुख्य घटना फसल्यानंतरचा जो घटनाक्रम असतो, त्यात मुख्यत: थ्रिलरचा घटक अधिक असतो. प्रेक्षकांना थराराची अनुभूती देण्याकडे दिग्दर्शकाचा जास्त कल असतो. ‘बिफोर द डेव्हिल नोज यू आर डेड’ वेगळा ठरतो तो इथं. यात दरोड्याच्या घटनेनंतरचा जो परिणाम आहे, त्याला इतका भक्कम भावनिक पैलू आहे की, थ्रिलरचा पैलू जवळपास दुर्लक्षित राहतो. या चित्रपटाच्या ज्यॉनरचं अधिकृत वर्णन ‘क्राइम, ड्रामा, थ्रिलर’ असं करण्यात आलंय. त्याप्रमाणे खरोखरंच थ्रिलरच्या पैलूला तिय्यम स्थान आहे. सुरुवातीला क्राइम घडतो आणि त्यानंतर जो ड्रामा उलगडतो, त्यावर सगळा भर आहे. कारण त्या व्यक्तिरेखांच्या भावनिक विश्वाशी तुम्हाला जोडणं आणि तुमच्यासमोर समाजाचा आरसा धरणं, हाच दिग्दर्शकाचा उद्देश आहे. तुमच्या रंध्रांना थराराची अनुभूती देणं हा नव्हे.

या कामी ल्यूमेटला कलाकारांनी भक्कम साथ दिली आहे. ल्यूमेटच्या चित्रपटांचं हे आणखी एक ठळक वैशिष्ट्य. त्याच्या चित्रपटांमध्ये चमत्कृतीपूर्ण क्लृप्त्या, तांत्रिक झगमगाट असं काही नसतं. एक भक्कम गोष्ट असते, ठसठशीत व्यक्तिरेखा असतात आणि त्या व्यक्तिरेखांमध्ये तो अव्वल कलाकारांना ढकलून त्यांच्यातले ताणेबाणे टिपण्याचं काम करतो. त्यामुळेच त्याच्या चित्रपटांमध्ये कसलेल्या कलाकारांची जुगलबंदी अनुभवण्याची वेगळीच किक आहे. ‘बिफोर...’मध्ये फिलिप स्यूमॉर हॉफमन, एथन हॉक, आल्बर्ट फिनी, मरिसा टॉमी हे प्रमुख कलाकार प्रेक्षकाला त्याचं बोट धरून आपल्या व्यक्तिरेखांच्या अधोविश्वात घेऊन जातात. एखाद-दोन प्रसंगांसाठी पडद्यावर येऊन जाणारे दुय्यम कलाकारही त्या प्रसंगांना उठाव देऊन जातात.

आल्बर्ट फिनीचा चार्ल्स तर निव्वळ अविस्मरणीय आहे. बायकोच्या अचानक जाण्यानं आंतर्बाह्य हललेल्या या म्हाताऱ्याचं हादरलेपण फिनीच्या चेहऱ्यावरील रेषेरेषेतून दिसतं. सूक्ष्मात हरवलेले त्याचे डोळेही विलक्षण बोलतात.

फिलिम स्यूमॉर हॉफमन या भन्नाट कलाकारानं अँडीच्या भूमिकेत गहिरे रंग भरलेत. वास्तव आयुष्यात ड्रग्जच्या ओव्हरडोसनं अकाली निधन पावलेल्या हॉफमनला पडद्यावर तशीच व्यक्तिरेखा साकारताना बघून कससंच होतं. पण व्यक्तिरेखेचा खोलात जाऊन अभ्यास कसा करावा आणि त्यानंतर ती पडद्यावर कशी जिवंत करावी, याचं हॉफमनची अँडी ही व्यक्तिरेखा उत्तम उदाहरण आहे. आपल्या धाकट्या भावावर (हँक) सतत मोठेपणाची अरेरावी गाजवणाऱ्या अँडीच्या देहबोलीत न्यूयॉर्कसारख्या शहरात सहा आकडी पगार कमावणाऱ्या यशस्वी माणसाचा तंतोतंत माज आहे. आपला पैसा, आपले प्रॉब्लेम्स याच्या पलिकडे त्याला बाकी कसलीच फिकीर नाही. आपल्या योजनेमुळे आपल्या आईवडलांवर जी आपत्ती आलीय, त्याचीही त्याला कसलीही टोचणी नाही. या सगळ्याचे धागेदोरे आपल्यापर्यंत तर येणार नाहीत ना, याचीच चिंता त्याला कुरतडत राहते. सुरुवातीला अगदी सोपं वाटणारं हे साहस आता आपल्या चांगल्याच गळ्याशी आलंय, हे जाणवल्यानंतरही त्याचा तोरा फारसा कमी होत नाही. शेवटी शेवटी तर परिस्थिती एवढी हाताबाहेर जाते की, त्याचं स्वत:वरील नियंत्रणही सुटतं आणि तरीही प्रेक्षकांच्या नजरेतून अँडी फारसा नकारात्मक होत नाही, ही हॉफमनची किमया आहे. एक बारिकशी चूक अश्वत्थाम्याच्या कपाळावरील भळभळत्या जखमेसारखी घेऊन तो आपल्या अटळ शेवटाकडे प्रवास करत राहतो.

ल्यूमेटला त्याच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत पाच वेळा ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं. चार वेळा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (१२ अँग्री मेन, डॉग्ज डे आफ्टरनून, नेटवर्क, द व्हर्डिक्ट) म्हणून आणि एकदा ‘प्रिन्स ऑफ द सिटी’साठी सर्वोत्कृष्ट पटकथाकार म्हणून. प्रत्येक वेळी ऑस्करनं त्याला हुलकावणी दिली.

अखेरीस स्वत:चीच शरम वाटून की, काय ऑस्कर अकॅडमीनं त्याला २००५ साली जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. जणू ऑस्करच्या लेखी ल्यूमेट आता संपला होता. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत त्याने ‘बिफोर द डेव्हिल नोज...’सारखी कलाकृती पेश करून ऑस्करला सणसणीत चपराक दिली! आपण अजून संपलेलो नाही, हेच त्याला सांगायचं होतं. अर्थात ऑस्करनं त्याच्या म्हणण्याची दखल घेतली नाहीच. २००८च्या ऑस्कर सोहळ्यात ‘बिफोर द डेव्हिल..’ला एकही नॉमिनेशन नव्हतं. कदाचित आपल्या समाजाचं इतकं भेसूर चित्र ऑस्करलाही झेपलं नसावं!!

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......