अजूनकाही
काही वर्षांपूर्वी, अगदी स्पेसिफिकली सांगायचं झाल्यास पाच वर्षांपूर्वीपर्यंत आयुष्मान खुराना मला माहीत नव्हता. एमटीव्हीशी एक प्रेक्षक म्हणून तसा काही संबंध नव्हता. शिवाय, क्रिकेटमध्ये तसूभरही रस नसल्यानं क्रिकेट मॅचेस पाहण्याचंही कारण नव्हतंच. त्यामुळे 'आयपीएल' नामक क्रिकेट लीग आणि त्यातील काही भागांचं अँकरिंग करणाऱ्या आयुष्मान खुरानाशीही काहीच संबंध नव्हता. तो माहीत झाला ते २०१२ मधील ‘विकी डोनर’मधून.
तसं पाहायला गेल्यास आयुष्मानचा इथपर्यंतचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथानकाहून वेगळा नाही. चंदिगढमधून पत्रकारितेत ग्रॅज्युएशन आणि पुढे मास्टर्स पूर्ण केलेला हा तरुण पुढे अनेक नाट्यचळवळींचा भाग बनला. नाट्यचळवळींमध्ये स्वतःहून सहभागी होणारा मुलगा महत्त्वाकांक्षी नसता तरच नवल.
आयुष्मान चंदिगढमध्ये सक्रिय असलेल्या 'आग़ाज' आणि 'मंचतंत्र' या डीएव्ही कॉलेजच्या नाटक गटांच्या संस्थापकांपैकी एक आहे. या काळात त्यानं जवळपास पाच वर्षं थिएटर केलं. शिवाय, धर्मवीर भारतींच्या 'अंधयुग' नाटकातील त्याची अश्वत्थाम्याची भूमिकाही त्या वेळी बरीच गाजली होती. त्यासाठी त्याला बरेच पुरस्कारही मिळाले आहेत.
२००२ मध्ये चॅनेल 'व्ही'च्या पॉपस्टार्स नामक कुठल्यातरी रिअॅलिटी शोमधून आयुष्मान समोर आला. मग पुढे ‘रोडीज २’ मध्ये दिसलाच नाही तर या सीझनमध्ये तो जिंकलादेखील. पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर त्यानं दिल्लीमध्ये बिग एफमध्ये रेडिओ जॉकी म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यानंतर एमटीव्हीच्या काही रिअॅलिटी शोजचं अँकरिंग केलं. पुढे कलर्सच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चाही तो अँकर होता. याच वर्षअखेरीस तो स्टार प्लसच्या एका गाण्याच्या रिअॅलिटी शोचा अँकर म्हणून दिसला. शिवाय, त्यानं म्हणे या काळात एमटीव्हीच्या 'फुल्ली फालतू' नावाच्या चित्रपटांचं विडंबन करणाऱ्या सिरीजमध्येही काम केलं होतं.
थोडक्यात टीव्हीवर तो चांगलाच रमला होता. शिवाय एकापाठोपाठ एक वेगवेगळे शो आणि संधी चालून येत होत्या. २०११ पर्यंत तो एमटीव्ही, कलर्स, चॅनेल व्ही, स्टार प्लस वगैरे चॅनेलवर दिसत होता. शिवाय २०१० मध्ये आयपीएलच्या तिसऱ्या सीझनचा सादरकर्ता म्हणून दिसला.
२०१२ मध्ये त्याच्या हातात जरा अनपेक्षितपणेच 'विकी डोनर'ची स्क्रिप्ट आली. खरं तर या सिनेमासाठी विवेक ओबेरॉयला घेण्यात येणार होतं, शिवाय तो हा चित्रपट प्रोड्युसदेखील करणार होता. मात्र ऐनवेळी रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाच्या निर्मात्यानं या कास्टिंगवर शंका उपस्थित केली. मग हा चित्रपट शर्मन जोशीला ऑफर झाला. पण त्यानंही स्क्रिप्ट नाकारली. शेवटी ती आली आयुष्मानकडे. 'जस्ट डान्स' या शोमुळे ओळख झालेल्या शूजित सरकारला आयुष्मानच विकी म्हणून योग्य वाटला. हा चित्रपट अनपेक्षितरीत्या सुपरहिट झाला. शिवाय, यातील त्याचं गाणंही बरंच प्रसिद्ध झालं. आणि बॉलिवुडला एक नवा चेहरा गवसला.
तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक नकारांनंतर आयुष्यमानचं चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. यापूर्वी सलग पाच वर्षं तो चित्रपटांमध्ये कुठेतरी छोटीशी भूमिका का होईना करण्याकरिता उत्सुक होता. 'तीन दि भाई' आणि 'आय हेट लव्ह स्टोरीज'सारख्या चित्रपटांमध्ये त्याला तशा भूमिकाही नाकारल्या गेल्या होत्या.
‘विकी डोनर’मधील आईवर प्रेम करणारा, खट्याळ असा विकी ते त्याच चित्रपटात पुढे कमालीचा भावनिक आवाहन करणारा, अक्षरशः रडवणारा विकी अशा दोन टोकाच्या भूमिका कराव्यात त्या त्यानंच.
नंतर आला 'नौटंकी साला'. त्यातील राम परमार ऊर्फ आरपी (आणि कुणाल रॉय कपूर मंदार लेलेची) ही भूमिका तो अक्षरशः जगला आहे. कुणालला ‘विकी डोनर’ हा त्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपट वाटतो. पण मला तरी ‘नौटंकी साला’मधील त्याचा आरपी जास्त आवडतो.
मग २०१४ ला आला 'बेवकुफियाँ'. चित्रपट कथानक आणि इतर गोष्टी पाहता विशेष नसला तरी आयुष्मान आणि ऋषी कपूरमधील जुगलबंदी मात्र हमखास लक्षात राहते.
आणि त्याचा 'दम लगा के हैश्शा' कोण विसरू शकेल? हवाईजादाच्या अपयशानंतर त्याच्या करिअरसाठी गरजेचा असलेला 'हिट' त्याला याच चित्रपटानं मिळवून दिला. शिवाय भूमी पेडणेकर हा नवीन आणि आश्वासक चेहरा बॉलिवुडला दिला.
बाकी आठेक वर्षाचं अँकरिंग, रेडिओ जॉकी, व्हिडिओ जॉकी यातील करिअर, दहा वर्षांचा स्ट्रगल आणि प्रतीक्षा यानंतर तग धरून राहणं आणि चित्रपट मिळवणं म्हणजे कमालच. पण अखेर त्याला चित्रपट मिळाला. उशिरा का होईना पण नियतीनं त्याच्या पदरी दान टाकलं. ज्या पंजाबी लहेजामुळे त्याला भूमिका नाकारल्या जात होत्या, तोच लहेजा असलेलं पात्र पडद्यावर साकारत त्यानं रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
यानंतर दरवर्षी त्याचा एकतरी आणि दर्जेदार (२०१६चा अपवाद वगळता) असा चित्रपट येत आहेच.
या वर्षी त्याचे तीन चित्रपट आले आहेत. ‘बरेली की बर्फी’ आणि ‘शुभमंगल सावधान’ तर अलीकडेच प्रदर्शित झाले आहेत. ‘मेरी प्यारी बिंदू’च्या अपयशानंतर 'बरेली की बर्फी' आणि 'शुभमंगल सावधान'च्या रूपानं त्याला चांगलेच हिट चित्रपट मिळाले आहेत. त्याच्यामध्ये उत्तम अभिनय गुण आहेत हे तर नक्कीच. आजकाल 'अभिनय' करता येणाऱ्या अभिनेत्यांना चांगले दिवस आले आहेत!
वरवर पाहता आयुष्मान पूर्णतः चकचकीत असे व्यावसायिक चित्रपट करणारा अभिनेता वाटतो. पण मुळात तसं नाहीये. त्याचे बहुतेक चित्रपट व्यावसायिक म्हणता येणार नाहीत. ते कुठे ना कुठेतरी पारंपरिक अभिनेत्याच्या प्रतिमेला आणि एकूणच चित्रपटसृष्टीच्या जुन्या नियमांना छेद देणारे आहेत. ‘विकी डोनर’ यशस्वी झाला तो त्याचा अभिनय, शूजितचं दिग्दर्शन आणि ऑफबीट कथानकामुळे. 'दम लगा के हैश्शा'देखील हिट झाला तो त्यातील विषय आणि मांडणीमुळे. तर ‘नौटंकी साला’मधील महत्त्वाची गोष्ट होती त्याची आणि कुणालमधील ट्युनिंग.
निव्वळ त्याचे काही चित्रपट हिट होत आहेत, म्हणून त्याला सरसकट इतर व्यावसायिक अभिनेत्यांच्या भाऊगर्दीत बसवणं, योग्य वाटत नाही. शिवाय, तोदेखील या गर्दीत स्वतःचा असा वेगळा मार्ग पकडून आहेच.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment