अजूनकाही
रूढ चित्रपट परीक्षणांच्या वाटेला न जाता, रूढ टीकाखोरपणाच्या जंजाळात न फसता आणि चित्रपट रसग्रहणाच्या नावाखाली मूळ चित्रपटाचीच कथा देत न बसता, काही मोजकी निरीक्षणं नोंदवत, त्यातून योग्य तेच निष्कर्ष काढत ‘सिने-सौंदर्या’चा आस्वाद घेणारं नवं कोरं साप्ताहिक सदर...आजपासून दर शनिवारी
.............................................................................................................................................
२०१७ हे वर्ष छोट्या शहरातल्या सिनेमांसाठी कमालीचं यशस्वी ठरलंय! या वर्षाची सुरुवातच ‘दंगल’च्या प्रचंड यशानं झाली होती. पुढे झांसी, कोटात घडणाऱ्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’नं हृतिक आणि शाहरुखच्या सिनेमांइतकी कमाई केली. त्यानंतर ‘बेहेन होगी तेरी’, ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभमंगल सावधान’ असे एका मागोमाग एक सिनेमे येतच आहेत. हिंदी सिनेमासाठी तुलनेनं वाईट ठरलेल्या या वर्षात हे निमशहरी सिनेमे बराच बरा व्यवसाय करून जात आहेत. म्हणूनच त्याकडे वेगळा जॉनर म्हणून पाहावं इतपत ते महत्त्वाचे ठरलेत.
चकचकीत NRI सिनेमा आणि गुन्हेगारी Noir सिनेमा, या दोन्ही प्रकारच्या सिनेमातून काही गोष्टी घेत छोट्या शहरातल्या रोमँटिक कथांचा हा एक वेगळा जॉनर तयार झाला आहे. ज्याची सुरुवात साधारणतः हबीब फैजलच्या ‘दो दुनी चार’ (यात रोमान्स नाहीये तरी), इम्तियाजच्या ‘जब वी मेट’ आणि मनीष शर्माच्या ‘बँड बाजा बारात’मध्ये झाली होती. ‘इश्कजादे’मध्ये दिसणारी लोकेशन्स यशराजच्या एका व्यावसायिक सिनेमात पाहायला मिळतील, हे त्याआधी कोणाला खरं वाटलं नसतं. याउलट आज २०१६ मध्ये तीनही खानांनी केलेले सिनेमे पाहिले तर लक्षात येईल की, हे निमशहरी सिनेमे आज किती मुख्य प्रवाहात आले आहेत.
एकंदर उत्तर भारतस्थित कथांमध्ये कश्यप, दिबाकर, इम्तियाज, हबीब फैजल, मनीष शर्मा असे मोठे दिग्दर्शक काम करत आहेत. ही उदाहरणं ‘तितली’ (सारख्या डार्क कथेपासून) ‘मेरे डॅड की मारुती’पर्यंत कितीतरी वेगवेगळी आहेत. कॉमेडीमध्ये एकीकडे ‘पिपली लाईव्ह’, ‘खोसला का घोसला’ आहेत, तर दुसरीकडे नोयडातला ‘प्यार का पंचनामा’ आहे. रोमान्समध्येही ‘दम लगा के हैशा’पासून ‘मसान’पर्यंतची उदाहरणं आहेत. ‘NH10’पासून ‘गँग्स ऑफ वासेपूर’ अशा पश्चिमेला हरियाणा, पंजाबपासून पूर्वेला बिहारपर्यंत पसरलेल्या प्रदेशातल्या या सर्व कथा आहेत.
पण हे वर्ष ज्यांच्या नावे झालंय त्या सर्व उत्तर भारतीय निमशहरी रोमँटिक कथा आहेत. आणि या जॉनरचे प्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम समोर येतात आनंद एल. राय आणि त्यांच्या सिनेमाचे लेखक हिमांशू शर्मा.
म्हणूनच या लेखात विचार केला गेलाय ‘तनु वेड्स मनु’, ‘रांझना’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ आणि ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमांचा. (‘शुभमंगल सावधान’ राय-शर्मा या जोडीचा नसला तरी त्यांच्याच संस्थेतून आणि संस्कारातून येतो.)
यातला ‘शुभमंगल सावधान’ हा ‘कल्याणा समयाल साधम’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. जो मूळ तमिळ सिनेमाचे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनीच दिग्दर्शित केलाय. इथं त्याला समाविष्ट करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, मूळ कथा वेगळ्या इंडस्ट्रीतून आल्यानं हे कळायला मदत होईल की, या जॉनरमध्ये तीच कथा वेगळ्या प्रकारे कशी सांगण्यात आलीय. आणि त्यावरून या जॉनरचे किंवा राय यांच्या सिनेमाचे बारकावे लक्षात येतील.
सगळ्यात आधी पाहू राय-शर्मांच्या सर्व सिनेमांमध्ये वारंवार दिसणाऱ्या काही गोष्टी –
१. कथेत कायम लग्नं होत असतात. (आणि हिरो सिलेंडर उचलत असतात) किंवा तत्सम समारंभ सुरू असतात.
२. यातली कुटुंबं एकत्र राहत नसली तरी या सगळ्या समारंभांमुळे ती एकत्र येत राहतात. आणि गोंधळ तयार करण्यासाठी त्यांचा वापर करून घेतला जातो.
३. या समारंभांच्या निमित्तानं किंवा इतर कारणास्तव कथेतील पात्रं उत्तर भारतातली बरीच शहरं फिरत असतात. (हरिद्वार, वाराणसी, चंदीगड, कानपूर, लखनऊ, दिल्लीची उपनगरं) तसेच संवादांमध्ये शहरांचे, राहत्या ठिकाणांचे संदर्भ कायम दिले जातात.
४. हिंदीतील बोलींचा वापर होत असला तरी तो सगळ्यांना कळेल असा असतो. (त्या बोलींतील शिव्यांचाही माफक वापर असतो!) ही पात्रं हिंदी पट्ट्यातल्या शहरी भागात राहतात म्हणून हे असावं, पण त्या भागाप्रमाणे त्या बोली अचूक नाहीयेत. सरसकट सर्वांना कळेल अशा हिंदीचा (खडी बोलीचा) त्यावर पगडा आहे.
५. जुन्या सिनेमांचे त्यातील पात्रांचे संदर्भही परत परत येतात. जुन्या गाण्यांचा सढळ वापर केलेला असतो, कधी पार्श्वसंगीत म्हणून तर कधी पात्रं ही गाणी गायला लागतात.
६. मूळ पात्रांचे मित्र-मैत्रीण यांचा वापर सगळीकडे आढळेल आणि त्यांना प्रमुख पात्रांबद्दलचं आपलं आकलन वाढवण्यासाठी वापरलेलं असेल. (‘रांझना’मध्ये जोयाला असे मित्र किंवा मैत्रीण नाहीत आणि ते पात्र आपण कधीच पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही.)
यातल्या बऱ्याच गोष्टी आपण उत्तर भारतीय समाजजीवनाचा अविभाज्य घटक म्हणून पाहतो. पण याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीनं पाहिल्यास लक्षात येईल की, हे जितके त्या समाजाचे भाग आहेत, तितकेच ते कथारचनेचेही महत्त्वाचे घटक आहेत. कथा अधिक मनोरंजक करण्यात यांचा मुद्दामहून वापर करून घेतला जातोय.
‘एकतर समारंभ असतो किंवा खूप माणसं जमलेली असतात’... याचा वापर फिल्मचा मूड सेट करायला कसा करून घेतला जातो ते पाहू.
पहिल्या ‘तनु वेड्स मनू’मध्ये ‘तनुने मला रिजेक्ट केलंय’ हे मनू पप्पीला सांगतो. पण तो प्रसंग घडतो मातेच्या दर्शनाला जाताना. म्हणून मूळ पात्रांनाही संभाषणामध्येच इतरांसोबत ‘जय माता दी’ म्हणावं लागतं. त्यामुळे तो सीन मनूच्या दुःखाचा न राहता एक लाईट सीन होऊन जातो. किंवा रिटर्न्समध्ये मनुला त्याचे वडील लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल अत्यंत सिनिकल भाषेत समजावत असतात. ती वाक्यं एकंदर जीवनाबद्दलच अत्यंत निराशाजनक आहेत. पण मागे त्याची आई घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीवरून बडबडत आहे आणि तो साधा, शांत सीनही यामुळे मजेशीर होऊन जातो. (ज्याचा शेवट ट्युबलाईट फोडण्यात होतो.)
विशेष म्हणजे ही जी सीनला बाहेरून मदत करणारी पात्रं आहेत, ती बहुतेक वेळा आपापल्या कामातच असतात (कारण घरात समारंभ असतात) आणि त्यातून मूळ संभाषणात ते त्यांच्या मतांच्या पिंका टाकत राहतात. म्हणजे प्रसंगात मुख्य पात्रं बोलत असतात आणि भोवतालची पात्रं आपल्या कामात असूनही त्या संभाषणाचा भाग असतात. त्यांचं मध्ये बोलणं आणि त्यांचं काम या दोन्हीचा वापर गोंधळ वाढवण्यासाठी केला जातो.
जे सीन इतर सिनेमात दोघा किंवा तिघांत अत्यंत शांतपणे होऊ शकतात, तेच सीन आनंद राय-हिमांशू शर्मा (शुजीत सरकार – जुही चतुर्वेदी आणि दिबाकर– उर्मी जुवेकर यांच्यानंतर बॉलीवुडमध्ये एकत्र नावं घेतली जाणारी ही बहुधा तिसरी जोडी) इतर पात्रांनी होणारा गोंधळ वापरून त्याचा टोनच बदलून टाकतात. यासारखी कैक उदाहरणं त्यांच्या सिनेमांत सापडतील.
राय आणि शर्मा यांच्या सीनच्या रचनेतील आणखी एक महत्त्वाचा गाभा म्हणजे मूळ प्रसंगाच्या आधी आणि नंतर दोन छोटे घटक अडकवून ठेवलेले असणे. उदाहरणार्थ ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’च्या दुसऱ्याच प्रसंगात तनुजा पाप्पीला फोन करून सांगते की, मनु वेड्यांच्या इस्पितळात भरती झालाय त्याला सोडव. फोनवरचं हे एक साधं संभाषण. मूळ संवादात फक्त माहिती आहे (मजा नाही), पण या संभाषणात पूर्णवेळ पप्पी एका मुलीला नोट द्यायची थांबलाय. आणि ती त्या नोटेला लटकून त्याच्या मागे फिरतेय सगळीकडे. यातून आपलं लक्ष एका नाही तर दोन ठिकाणी ठेवलं जातं. ज्यामुळे कथेला पुढे नेणारा जो भाग आहे, तो थोडासा कच्चा असला तरी दिसून येत नाही आणि आपण प्रसंग पाहात राहतो, कारण आपली करमणूक होत असते.
अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर परत एक रिटर्न्समधीलच एक प्रसंग आहे. ज्यात मनु दत्तोला मागणी घालायला निघतो. हा सीन सुरू केला जातो पप्पीनं अर्धवट खालेल्या समोशापासून. ते दत्तोच्या घरी पोहोचतात तिथे पप्पीला समोसे खायला मिळतात. पण जेव्हा दत्तोचं लग्न आधीच दुसऱ्याशी ठरलंय हे त्याला कळतं आणि तो मनुजला सांगतो, त्याक्षणी उलटी होऊन सगळे समोसे बाहेर पडतात. म्हटलं तर ही खूप छोटी गोष्ट आहे. पण ती पूर्ण प्रसंगभर चालत राहते. ज्यानं आपलं लक्ष विभाजित राहतं, पात्रांच्या हेतूबद्दल शंका घ्यायला वेळच मिळत नाही. थोडक्यात एका समीक्षकानं राय यांच्या सिनेमाबद्दल म्हटल्याप्रमाणे काय चाललंय हे कधीकधी पटत नाही, कधी आवडतही नाही. पण त्यात इतकं काही चालू असतं की, आपण झपाटल्यासारखे पाहात राहतो.
आता याच रचनेचा तोटा कसा होतो ते पाहा. ‘शुभमंगल सावधान’मध्ये मुदीत सुगंधाला लग्नासाठी नकार द्यायला कॅफेमध्ये येतो, तो सीन आठवून पाहा. या सीनद्वारे म्हणायचं इतकंच आहे की, सुगंधा या प्रॉब्लेममुळे मुदीतला सोडून जाणार नाही. ती लग्न त्याच्याशीच करेल. आता या इतक्याशा प्रसंगाआधी दाखवलं जातं की, वरात निघालीय आणि मुदीत गायब आहे म्हणून त्याचे वडील गोंधळ घालत आहेत. इकडे कॅफेमधला सीन चालू होतो. त्यातही संभाषणात वेटरला ओढलं जातं. मूळ मुद्याचं संभाषण पूर्ण होतं, ज्याला खूप थोडा वेळ मिळतो. वरून आपण शेवट करायला परत वरातीकडे आणि वडलांच्या गोंधळाकडे येतो.
जर तुम्ही मूळ ‘कल्याणा समयाल साधम’ पाहिला असेल तर लक्षात येईल की, त्यातही समान सीन आहे. जो वरात, वेटर हे सगळं टाळून केला जातो. तो मेलोड्रामॅटिकही आहे. पण सुगंधाला जे म्हणायचंय ते थेटपणे प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यात तो अधिक यशस्वी होतो. कारण मेलोड्रामा असला तरी तो त्या दोघांचा आहे. त्यात लक्ष दुसरीकडे भरकटवण्याचा प्रयत्न नाहीये.
(‘कल्याणा’ आणि ‘शुभमंगल’ यांची तुलना केवळ तुलनात्मक अभ्यासासाठी. वैयक्तिकदृष्ट्या पाहता ‘कल्याणा’ मला खूपच उजवा वाटला.)
आनंद राय आणि हिमांशू शर्मा यांच्या प्रसंगांच्या रचनेचा अजून एक भाग म्हणजे दोन मोठे प्रसंग एकत्र आणून ते मोठे बनवणे. ज्याची दोन मोठी उदाहरणं म्हणजे ‘तनु वेड्स मनु’मध्ये दोन वराती एकत्र येतात आणि ‘रांझना’मध्ये जोया आणि कुंदन एकाच दिवशी लग्न करायचं ठरवतात. यातला पहिला हा फिल्मला क्लायमॅक्सपर्यंत घेऊन जातो, तर दुसरा इंटरव्हलला आणून सोडतो. पण हा दोन गोष्टी एकत्र आणण्याचा सोस इथंच संपत नाही. बऱ्याच ठिकाणी ते यातून वेगवेगळे गॅग तयार करतात. जसं की रिटर्न्समधला पंजाबी गरबा खेळत असतात, तो प्रसंग. त्यात अनेक पात्रं एकत्र येतात. डबल रोल आणि त्याची एकंदर कॉमेडी ऑफ एरर्स या एका अकरा मिनिटांच्या प्रसंगात चालते. आता याची कथेच्या गाभ्याला (रिटर्न्समध्ये तो सापडतच नाही हा भाग निराळा) कितपत गरज आहे. माहिती नाही. पण ते असे प्रसंग जुळवून आणण्याचे हरएक प्रयत्न करतात.
याचा सर्वांत मोठा तोटा मला दिसून आला, तो मात्र ‘शुभमंगल सावधान’मध्ये. केळीच्या झाडाशी लग्न हा मूळ तमिळ सिनेमात दोघांमध्ये येणारा एक मुद्दा आहे. मुलाच्या आईनं मुलीला लग्नाच्या पहिल्या रात्री पिल्स घ्यायला सांगणं, केळीच्या झाडाशी तिचं लग्न लावणं या सगळ्यामुळे लग्नाच्या गोंधळात दोघांचं भांडण होतं आणि दोघं मिळून ते सोडवतातही. ‘शुभमंगल सावधान’मध्ये मात्र त्यात मुदीतच्या जुन्या गर्लफ्रेंडला आणलं जातं. हे केळीच्या झाडाशी लग्न आणि मुदीतचं बाहेरख्याली वाटू शकेल असं वर्तन. हे दोन पूर्णतः वेगळे मुद्दे आहेत. त्यांना एकत्रित आणण्यामागचं उद्दिष्ट कधीच स्पष्ट होत नाही. मग त्यात मुदीतचं भाषण, सुगंधाचं रुसणं, त्यात गेस्ट अपियरन्स यातल्या कशावरच कथा केंद्रित होऊ शकत नाही. याला तिसरा अंक नाट्यमय करण्यात उडणारा गोंधळ असंही म्हणू शकतो. पण असे दोन मुद्दे एकत्र आणण्याचे प्रयत्न तिसऱ्या अंकाच्या आधीही यांच्या सिनेमात होतच असतात. म्हणून मी याला त्यांच्या क्राफ्टचा भाग पकडतो.
आनंद राय यांच्या दिग्दर्शनातील विशेष उल्लेख करावी अशी बाब म्हणजे संगीत आणि कथेचं उत्तम मिश्रण. त्यांचं गाणं सीनमध्ये पूर्ण मिसळलेलं असतं. जसं की ‘रांझना’च्या टायटल साँगच्या शेवटाच्या ठोक्यावर कुंदन जोयाचा हात पकडतो, ‘पिया मिलेंगे’ गाण्याचा सीनमधल्या इमोशन वाढवण्यासाठी केलेला वापर किंवा रिटर्न्समध्ये ‘मत जा रे’च्या बरोबर एका आवर्तनानंतर माधवनला रुमच्या आत खेचलं जाणं. केवळ गाणीच नव्हे तर पार्श्वसंगीतही ते याच बारकाईने वापरतात. (कारण मुळात कथेलाच सभोवतालचा परिसर तितका महत्त्वाचा आहे) जसं की, ‘शुभमंगल’मध्ये अस्वलाने पाय पकडल्यानंतर मुदीतचा क्लोजअप येतो, पण तरीही सीन संपेपर्यंत डमरूचा आवाज येतच राहतो. तो अस्वल बाहेरचा नसून, तो मुदीतच्या लाजण्यालाच दर्शवतो आहे, हे सांगण्यासाठी पार्श्वसंगीताचा केलेला हा वापर उत्तम आहे.
या जोडीच्या सिनेमात जुन्या हिंदी सिनेमातली गाणीही वारंवार येताना दिसतात. (जा जा जा बेवफा) त्यांचे संदर्भ पात्रांच्या बोलण्यात येत राहतात. त्यातून या दोघांवर असणारा त्या सिनेमांचा प्रभावही जाणवतो. दोन्ही ‘तनु वेड्स मनु’मध्ये जुळून येणारे प्रचंड मोठे योगायोग, भावनिक प्रसंगांना येणारी गाणी, लीड रोल मधल्या पात्राचं सुगंधासारखं नाव. (आपण सिनेमात शेवटचं हे नाव कधी ऐकलं होतं आठवणारही नाही.) ‘रांझना’सारखं अस्सल छोट्या शहरातून येणारं कथानक. हे सर्व त्यांच्या जुन्या हिंदी सिनेमाच्या आणि निमशहरी संस्कारातून आलेले वाटतात.
यामुळेच त्यांना भारताच्या छोट्या शहरातील तरुण वेगळ्या प्रकारे कळलाय असं वाटतं. आजकाल सिनेमा, वेब सिरीजमध्ये ‘युथ’ म्हटलं की लग्न करण्यात अजिबात रस नसणारे वगैरे दाखवले जातात. पण त्याच वेळी ‘शुभमंगल सावधान’मधल्या याच नवीन पिढीचं नेतृत्व करणाऱ्या सुगंधाला मात्र माझ्या नवऱ्यानं वरातीत नाचत आलं पाहिजे असं वाटतं. ती ही स्वतंत्र आहे, आपल्या गरजा, इच्छा अपेक्षा बोलून दाखवायला ती घाबरत नाही. पण त्यात हा रोमँटिसिझम मरत नाही. हे शहरी दिग्दर्शक समजून घेऊ शकतील का?
अर्थात या नाण्याची दुसरी बाजू अशी की, “दिल्ली सरकार हमारा कुछ बिगाड नहीं पाई, कुंदन बाबू. एक लडकी के चक्कर में मारे गए.” (अभय देओलचा रांझनामधला डायलॉग) असे अत्यंत वाईट संवादही यांच्याकडून येतात. तुमचं लग्न मोडणाऱ्या समोर बसून त्याच गोष्टीसाठी तुम्ही मुलीला जबाबदार धरता? हे भयंकर होतं. मुळात ‘रांझना’मध्ये मुलीचं पात्रच क्लुलेस होतं. पण या सर्व त्रुटींना कॉमेडीच्या मुलाम्याखाली गुंडाळण्याची कला त्यांच्यात आहे.
एकंदर चित्र पाहता, सिनेमा अधिक लोकल होण्याच्या या प्रवासात आनंद राय-हिमांशू शर्मा या जोडीनं आपल्याला आणखी थोडंसं पुढे आणून सोडलंय. आणि तेही उत्तम विनोदाच्या कोंदणात हे सगळं बसवत. म्हणूनच ‘रांझना’सारखी ट्रॅजेडी त्यांच्या हातात कॉमेडी सारखी भासते. आणि ‘शुभमंगल सावधान’सारखा लैंगिकतेशी संबंधित सिनेमाही कौटुंबिक सिनेमा होऊन जातो. म्हणूनच काही तक्रारी असल्या तरी अजून लोकल, हिंदीच्या अजून बोली वापरणारा, हिरिरीनं निमशहरी प्रश्न मांडणारा या जोडीचा करमणूकप्रधान सिनेमा परत पाहायला, मला आवडेल.
लेखक पुण्याच्या सिने क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
chavan.sudarshan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment