अजूनकाही
१. अनेक विरोधांना सामोरे गेल्यानंतर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ चित्रपटाला भारतात प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटाला नॉर्वे येथील बॉलिवुड फेस्टिव्हलमध्ये सन्मानित करण्यात आलं आहे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मधुर भांडारकर यांना मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
वाद घडवण्याचा इतका प्रयत्न करूनही या सिनेमाला भारतात काही प्रतिसाद मिळाला नाही. भक्तमंडळींसाठी तो पाहणं आणि ट्रोलमंडळींसाठी त्यावर लिहिणं सक्तीचं केलं असतं, तर काही फरक पडला असता. निदान नॉर्वेमध्ये तरी तो सिनेमा, भले बॉलिवुड फेस्टिवलमध्ये का होईना, कोणीतरी पाहिला आणि त्याला पुरस्कारही मिळाला (कोण रे, कोण तो विचारतोय स्पर्धेत इतर कोणते सिनेमे होते?) ही आनंदाचीच गोष्ट आहे.
.............................................................................................................................................
२. देशाची राज्यघटना भारतीय मनोधारणा लक्षात घेऊन बनवलेली असली, तरी तिचा पाया परदेशी आहे. तो बदलून राज्यघटना भारतीय मूल्यव्यवस्थेवर आधारायला हवी. त्या दिशेनं देशात चर्चा व्हायला हवी आणि त्यातून सर्वसहमतीनं बदल व्हायला हवेत, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. राज्याची न्यायव्यवस्थाही भारतीय न्यायसंकल्पनेवर आधारली जावी, असे ते म्हणाले.
भारतीय न्याय संकल्पना आणि मूल्यसारणी म्हणजे काय? हिंदू मूल्यव्यवस्था का? त्यांची संख्या जास्त आहे म्हणून? तेही गृहीत धरलं तरी कोणत्या हिंदूंची मूल्यव्यवस्था प्रमाण मानायची? सवर्णांची की दलितांची? शाकाहारी हिंदूंची की मांसाहारी हिंदूंची? गाईला माता मानणाऱ्या हिंदूंची की गायीचं मांस रुचकर लागतं असं मानणाऱ्या हिंदूंची? आडवं गंधवाले की उजवं गंधवाले? शैव की वैष्णव? याचा निकाल लागेपर्यंत हजारेक वर्षं जातील... त्यानंतर पाहू या.
.............................................................................................................................................
३. इंटरनेटवरून होणाऱ्या ट्रोलिंगचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थन करत नाही. ट्रोलिंग करणं दर्जाहीन असल्याचं मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ट्रोलिंग करणं दर्जाहीन आहे. आम्ही अशा पद्धतीनं आक्रमक पवित्रा स्वीकारणाऱ्या लोकांचं समर्थन करत नाही. आम्ही इंटरनेटवर अशा प्रकारच्या कृत्याचं समर्थन कधीच करत नाही, असं भागवत म्हणाले. आरएसएस कोणाबरोबर भेदभाव करण्यावर विश्वास ठेवत नाही. भेदभावरहित समाज, देशाच्या एकतेबरोबरच संपूर्ण विश्वाच्या एकतेचं आमचं लक्ष्य आहे.
अरे बापरे, सगळं विश्व चळचळा कापायला लागेल एकत्वाच्या कल्पनेनं. मुळात भागवतांनी हा खुलासा करायचं काही कारणच नव्हतं. संघाच्या संस्कारी स्वयंसेवकांकडून हे असले प्रकार होऊच शकत नाहीत. त्यांच्याकडे वेगळे मार्ग नाहीत का? लोक काहीही समजू देत. गलिच्छ, कुसंस्कारी ट्रोलिंग करणारे, गोरक्षणाच्या नावाखाली हैदोस घालणारे, सनातनी पत्रावळ्यांमधून पिपाण्या वाजवणारे, उच्चवर्णीयांच्या वर्चस्वाच्या तुताऱ्या फुंकणारे या सगळ्यांशी संघाचा काहीएक संबंध नसतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे... दुर्दैवानं त्यावर कुणाचा विश्वास बसत नाही, हा एक छोटासा प्रॉब्लेम आहे.
.............................................................................................................................................
४. उत्तर प्रदेशातील शाळांमधील अभ्यासक्रम लवकरच बदलण्यात येणार आहे. मुघल आपले पूर्वज नव्हते, तर ते लुटारू होते. त्यामुळे आता नवीन इतिहास लिहिला जाईल, असं विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केलं आहे. लखनऊमध्ये शर्मा म्हणाले, भारताच्या इतिहासात मोगलांची कोणतीच भूमिका नाही. उलट त्यांनी देशाची संपत्ती लुटण्याचं काम केलं आहे. उत्तर प्रदेशात प्रत्येक धर्माला समान आदर दिला जातो. पण पाकिस्तानी-तालिबानी संस्कृतीला इथं थारा नाही, अशा प्रकारची संस्कृती स्वीकारली जाणार नाही, असं ते म्हणाले.
यांच्या पक्षातल्या या बोलभांडांकडे कुठल्याही औपचारिक शिक्षणाची, अस्सल डिग्री असो-नसो, जो तो आपल्या सोयीच्या इतिहासाचा मात्र तज्ज्ञच आहे. काही वेगळीच परीक्षा वगैरे घेतात का? तालिबानी संस्कृती चालणार नाही, हे वाक्य यांच्या तोंडी खास शोभून दिसतं मात्र. ते आर्य वगैरे भारतात ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा’ म्हणून युगुलगीत गाण्यासाठीच आले होते का हो शर्मा काका? त्यांची संस्कृती स्वीकारायची की फेकून द्यायची? दिनेश शर्मा यांचे पूर्वज लखनऊचे नवाब होते आणि वाजीद अली शाह त्यांच्या दरबारात नृत्यगायन करायचे, अशा स्वरूपाचा खरा इतिहास वाचावा लागणार वाटतं आता यूपीच्या पोराटोरांना. आईबापांच्या कर्माची केवढी ही सजा!
.............................................................................................................................................
५. संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर निर्मला सीतारामन या तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत दररोज सकाळी बैठक घेणार आहेत. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या बाबींवर जलदगतीनं निर्णय व्हावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण सामग्रीच्या खरेदीसंबंधी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेची (डीएसी) आता प्रत्येक १५ दिवसांनंतर एकदा बैठक होणार आहे. यामुळे संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या प्रस्तावांना वेळेवर मंजुरी देता येणार आहे. त्याचबरोबर संरक्षण सचिवांसोबतही दररोज वेगळी बैठक संरक्षणमंत्री घेणार आहेत.
या अशा घडामोडी सुरू झाल्या की, भक्तमंडळींना, मोठ्या युद्धाची तयारी सुरू आहे, सगळे जिझिया कर-अधिभार लावणं सुरू आहे ते त्यासाठीच, पाहा सगळ्या पैशांचा देशासाठीच कसा विनियोग होतो ते, अशा आतल्या गोटांतल्या खबरींच्या वार्ता पसरवता येतात. सैन्यदलांचे प्रमुख संरक्षणमंत्र्यांना उत्तरदायी असले तरी त्यांनी रोज ब्रीफिंग द्यायला भेटल्यासारखं भेटणं हे त्यांच्या पदांचं महत्त्व जाणीवपूर्वक कमी करण्यासारखंच आहे. तो अधिकार सर्वोच्च सेनाप्रमुख असलेल्या राष्ट्रपतींचाच असू शकतो. संरक्षणमंत्री तर पंतप्रधानांच्याही बरोबरीचे नाहीत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment