अजूनकाही
दीपावली
संस्थापक-संपादक असलेल्या दीनानाथ दलालांचा ‘दीपावली’ गेली ७१ वर्षं सातत्याने साहित्याची मेजवानी वाचकांना देतो आहे. यंदाचा ७२व्या वर्षांचा अंकही त्याला अपवाद नाही. ज्येष्ठ आणि नवोदित लेखकांच्या साहित्याचा समावेश असलेला हा अंक अथ ते इति वाचनीय आहे. मिलिंद बोकील यांची कथा संयत, पण धारदार आहे. विवेक गोविलकर, वैशाली चिटणीस, नील आर्ते या नवोदित कथाकारांच्या कथाही वेगळी अभिव्यक्ती मांडणाऱ्या आहेत. सालाबादप्रमाणे सुहास बहुळकरांचा चित्रकाराविषयीच्या लेखानं दीपावलीची सुरुवात होते. विजय पाडळकर यांचा चित्रपटाविषयीचा लेख त्यांचं लेखन आवडणाऱ्या वाचकांना आवडेल असाच आहे. अनिल अवचटांही लेख त्यांना काय शिकायला मिळालं हे सांगणारा असल्याने त्यापासून स्फूर्ती घेऊ इच्छिणाऱ्यांना आवडावा. हेमंत देसाई यांनी वाढत्या उजव्या उन्मादाच्या निमित्ताने मजहब आणि मतलबाची मांडणी केली आहे, तर नंदिनी आत्मसिद्ध यांनी जोश मलिहाबादी या उर्दू शायरावर लिहिलं आहे. ‘सेलिब्रेटींचं प्रस्थ : कोणामुळे? कशासाठी?’ या परिसंवादातील राजन खान, विक्रम गायकवाड, प्रवीण दवणे आणि भीष्मराज बाम यांचे लेख त्यांच्या लौकिकाला साजेसे आहेत. राजन खान यांच्या लेखाची सुरुवात अतिशय चांगली झाली आहे, पण तो टेम्पो नंतर राहिला नाही. भरगच्च कविता विभाग हे दीपावलीचं वैशिष्ट्य याही अंकात आहेच. दिवाळी अंकात सहसा लेखन न करणाऱ्या दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी पहिल्यांदाच दीपावलीमध्ये लिहिलं आहे. तेही पर्शियाविषयी. अतिशय घरंदाज, संयत, माफक उपरोध असलेली लेखनशैली असलेल्या खोपकरांचा हा लेख पर्शियाचं वेगळं दर्शन घडवतो.
सर्वोत्तम (लेख\कथा) – नेचर पार्क (मिलिंद बोकील), पशिर्यन मिनिएचर (अरुण खोपकर)
उत्तम मध्यम – टॅली हो (अंबरीश मिश्र), मस्तानी, मी आणि मार्क झकरबर्ग (वैशाली चिटणीस)
मध्यम मध्यम – सेलिब्रेटींचं प्रस्थ : कोणामुळे? कशासाठी? (परिसंवाद)
‘दीपावली’, संपादक अशोक केशव कोठावळे, पाने - २४८ , मूल्य – १८० रुपये.
......................
विशाखा
अलीकडच्या काळात विशाखाच्या दिवाळी अंकाचं पुढे पुस्तक करता येईल या हेतूने नियोजन केलं जातं. जास्त वाचकप्रिय विषयावर विशेष पुरवणी काढली जाते. तशी ती या वेळी नाना पाटेकर यांच्याविषयी आहे. नाट्यसमीक्षक वि.भा.देशपांडे, नाटककार प्रेमानंद गज्वी, नाट्यकर्मी विक्रम गोखले, मोहन आगाशे यांच्या लेखांचा त्यात समावेश आहे. ते लेख पाटेकरांच्या काही पैलूंचं दर्शन घडवतात. पण त्याहीपेक्षा त्यांच्याविषयीची उत्सूकता अजून वाढीला लावतात. या अंकातला दुसरा परिसंवाद मात्र लेखन-वाचन-प्रकाशन-पुस्तकविक्री यांच्याशी संबंधित लोकांनाच आवडेल असा आहे. तो आहे मराठीतील प्रकाशकांच्या आत्मचरित्रविषयक लेखांचा. या परिसंवादाचा बीजलेख नामवंत प्रकाशक-लेखक शरद गोगटे यांनी लिहिला आहे. त्यांच्या या लेखात इतर लेखकांकडून सुटलेले मुद्दे प्राधान्याने घेतले गेल्यामुळे तो नितांत वाचनीय झाला आहे. मात्र इतर लेखांमधून प्रकाशकांच्या आत्मकथनांचा केवळ पुस्तक परिचय करून देण्यापलीकडे फारसं काही साध्य झालेलं नाही. खरं तर आत्मकथनांतून संबंधित प्रकाशकाने प्रकाशनव्यवसायाचा कसा विचार केला, यावर भर द्यायला हवा होता. पण एखाददुसरा अपवाद वगळता तसं घडून आलं नाही. त्यामुळे या परिसवंदाला केवळ पुस्तक परीक्षणांचं स्वरूप आलं आहे. मात्र तरीही मराठी प्रकाशकांच्या आत्मकथनांचा अशा प्रकारे एकत्रित आढावा आजवर कुणी घेतलेला नाही. त्या तुलनेत या परिसंवादाला विशेष महत्त्व आहे. हे लेख वाचून नव्याने प्रकाशनव्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना काय करू नये हे जसं जाणून घेता येईल, तसंच या व्यवसायात असलेल्यांना अडचणींवर कशी मात करावी, याबाबतही काही मार्गदर्शन मिळू शकेल.
सर्वोत्तम (लेख\कथा) – प्रकाशकांच्या आत्मकथनांतून घडणारं प्रकाशन व्यवसायाचं दर्शन (शरद गोगटे)
उत्तम मध्यम – सलाम म्हात्रे (अरविंद गोखले)
मध्यम मध्यम – नाना पाटेकर (विशेष विभाग)
‘विशाखा’, संपादक अशोक ह.ल. निपुणगे, पाने - १८८ , मूल्य – १८० रुपये.
……………………………
चौफेर समाचार
सांगलीहून प्रकाशित झालेला हा दिवाळी अंक निर्मितीच्या बाजूने सर्वोत्तम म्हणावा असा आहे, त्यातील साहित्य मात्र उत्तम मध्यम आणि मध्यम मध्यम यांच्या सीमारेषेवरील आहे. मात्र मांडणी, सजावट यावर चांगली मेहनत घेतल्याने, त्याचा बारकाईने विचार केल्याने हा अंक प्रेक्षणीयही झाला आहे. बंगाली अनुवाद विलास गीते यांनी महाश्वेता देवी यांनी त्यांच्या वडिलांविषयी लिहिलेल्या लेखाचा अनुवाद केला आहे. नुकतंच महाश्वेता देवी यांचं निधन झालं. पण त्यांच्याविषयी लेख न लिहिता, अनुवादित करता त्यांच्याच एका लेखाचा अनुवाद करणं ही कल्पना स्तुत्य म्हणावी अशी आहे. संदीपा आणि चेतन हे मुंबईतील मध्यमवर्गीय दाम्पत्य स्वत:चं घर विकून आणि नोकरी सोडून जगप्रवासावर गेलेलं आहे. त्याविषयीचं त्यांचं लेखन महाराष्ट्र टाइम्स या दैनिकातून पाक्षिक स्वरूपात प्रकाशित होतंच आहे. त्यांचा या अंकातील लेखही वेगवेगळ्या देशातील चालीरीती, प्रथा-परंपरा यांचे अनुभव सांगणारा आहे. व्यंगचित्रकार प्रभाकर भाटलेकर यांनी स्वत:च्या कलाप्रवासाविषयी लिहिलेल्या लेखाला त्यांच्या भरपूर अर्कचित्रांची जोड दिल्याने तो वाचनीय आणि प्रेक्षणीय झाला आहे. शिल्पा केळकर-उपाध्ये या कामानिमित्ताने जगभरातील वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये २०हून अधिक वर्षं काम करणाऱ्या एनआरआयने आपला देश सोडून जाताना आणि गेल्यावर मानसिक पातळीवर कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, याचा मागोवा घेतला आहे. तो प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच वाचनीयही. भोजपुरी सिनेमा हा श्रमिकांचा, कष्टकरी-कामगारवर्गाच्या परवडेबल मनोरंजनाचं कसा साधन झाला आहे, याविषयी अमोल उदगीरकर यांनी लिहिलेला ‘श्रमिकांचा सिनेमा’ हा लेख अतिशय उदबोधक आणि उत्तम आहे. सुबोध नाईक यांनी विदुषी दुर्गा भागवत, कमला सोहोनी आणि त्यांचे वडील यांच्याविषयी लिहिलेला लेखही वाचनीय म्हणावा लागेल. निसर्गापासून प्रेरणा घेऊन निर्माण झालेल्या तंत्रज्ञानास ‘बायोनिक्स’ म्हणतात. त्याविषयी तरुण संशोधक-अभ्यासक प्रदीपकुमार माने यांनी लिहिलेला लेख छोटा असला तरी या अंकातला सर्वांत ‘मस्ट रीड’ लेख आहे. याशिवाय आनंद पाटील यांचा इंग्रजी लेखकांची गॉसिप्सविषयीचा, राजू परुळेकर यांचा जी.एं.विषयीचा लेखही आहे. भारत सासणे, वैशाली चिटणीस यांच्या कथाही वाचनीय आहेत.
सर्वोत्तम (लेख\कथा) – बायॉनिक्स : सजिवांचे तंत्रज्ञान (प्रदीपकुमार माने)
उत्तम मध्यम – श्रमिकांचा सिनेमा (अमोल उदगीरकर)
मध्यम मध्यम – राउंड द वर्ल्ड (संदीपा आणि चेतन)
‘चौफेर समाचार’, अतिथी संपादक अरुण नाईक, पाने – २०४, मूल्य – २०० रुपये.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment