आरेसेसच्या ‘गोळवलकरवादा’ची सूक्ष्मदर्शीय उलटतपासणी
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
राहुल माने
  • ‘गोळवलकरवाद - एक अभ्यास’ आणि ‘आरेसेस’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 15 September 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो गोळवलकरवाद - एक अभ्यास GOLWALKAR’S We OR Our Nationhood Defined शम्सूल इस्लाम Shamsul Islam आरेसेस RSS जयदेव डोळे Jaydev Dole

राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि सडक नाटक चळवळीतले एक कार्यकर्ते प्रा. शम्सूल इस्लाम यांच्या ‘GOLWALKAR’S We OR Our Nationhood Defined’ या मूळ इंग्रजी पुस्तकाची मराठी संक्षिप्त आवृत्ती ‘गोळवलकरवाद - एक अभ्यास’ या नावानं प्रकाशित झाली आहे, तर एप्रिल महिन्यात पत्रकार-प्राध्यापक जयदेव डोळे यांच्या ‘आरेसेस’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ही दोन्ही पुस्तकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारसरणीचा इतिहास, या संघटनेची कार्यपद्धती आणि सामाजिक-सांस्कृतिक विश्वामधील तिचे डावपेच, या सर्वांचा खुलासा करतात आणि त्याचा चिकित्सक आढावाही घेतात.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील अनेक पिढ्यांना ‘एक देश-एक धर्म-एक भाषा’ आणि ‘एक ध्वज-एक नेता-एक विचारसरणी’ या त्रिसूत्रींवर आधारित (अखंड) हिंदुस्तान निर्माण करण्याचं स्वप्न हिंदू महासभा, संघ, भारतीय जनसंघ व त्यांच्या इतर अनेक भगिनी-संस्थांनी दाखवलं. हे स्वप्न, त्यामागची राजकीय विचारधारा आणि त्यासाठी जनमत संघटित करण्यासाठी घडवायचा सांस्कृतिक अधिवास (Cultural Ecosystem) यामागे एक दूरदृष्टीचा विचार असावा लागतो. तसंच या सर्वांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संघ-परिवाराच्या कार्यकर्त्याला मार्गदर्शक अशी बौद्धिक व्यूहरचना कशी असते, संघटना कशी चालवावी आणि जनतेमध्ये हा विचार प्रसारित कसा करावा, या संघाच्या धोरणाची चिकित्साही या दोन्ही पुस्तकांमध्ये करण्यात आली आहे.

‘We or Our Nationhood Defined’ (१९३८) या गोळवलकर गुरुजी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या विश्लेषणासह शम्सूल यांचं पुस्तक आहे. सावरकरांनी १९२३ मध्ये लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ या पुस्तकानं प्रेरित होऊन गोळवलकर गुरुजी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. सर्वाधिक काळ (१९४०-१९७३) संघाचे सरसंघचालक राहिलेल्या गोळवलकर गुरुजी यांचं ‘Bunch of Thought's’ (विचारधन) हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. या पुस्तकांचा, तसंच गोळवलकर गुरुजी यांचे संग्रहित लेख-भाषणं, यांचा अभ्यास करून शम्सूल यांनी संघाची वाटचाल ही कशी गोळवलकर गुरुजींच्या वैचारिक वारशानं झाली आहे, याची नेमकी मांडणी केली आहे.

हेडगेवारांशिवाय संघाच्या सात दशकांच्या प्रवासामध्ये वि. दा. सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, मदनमोहन मालवीय, दीनदयाळ उपाध्याय, याबरोबरच गोळवलकरांच्या महत्त्वाकांक्षी विचारधारेचा प्रभाव आहे. भारत एक शक्तिशाली हिंदुत्ववादी राष्ट्र बनण्यासाठी या सांस्कृतिक-राजकीय वाटचालीला देशाच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीनं निश्चितच महत्त्व आहे. शम्सूल यांनी मांडल्याप्रमाणे त्या राजकीय विचारधारेच्या अजेंड्यातील काही महत्त्वाचे कार्यक्रम असे आहेत-

१. अल्पसंख्याकांचं येनकेनप्रकारेण हिंदुत्वीकरण करणं.

२. अल्पसंख्याकांची वांशिक हत्या घडवून आणणं.

३. अल्पसंख्याक हे मूळचे विदेशी निवासी नागरिक असून ते आपल्या देशामध्ये बहुसंख्याक हिंदूंच्या मेहेरबानीनं राहत आहेत, या (चुकीच्या) समजुतीचा प्रसार करणं.

४. अल्पसंख्याकांना विशेष सुविधा, अधिकार व संरक्षण देणाऱ्या धोरणांना/विचारांना/कायद्यांना विरोध करणं.

५. अल्पसंख्याक हे राष्ट्रवादी असू शकतात किंवा आहेत हा दावा खोडून काढणं.

गोळवलकर गुरुजींचं ‘विचारधन’ फक्त धार्मिक-संस्कृती-वांशिक राष्ट्रवादाची हाक देत नाही, तर त्यासाठी एक वैचारिक अंमलबजावणी कार्यक्रम तयार करण्याचं भावनिक आवाहनही करतं. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रा. नितीश नवसागरे आणि लेखक-पत्रकार विनय हर्डीकर यांनी गोळवलकर गुरुजींच्या विचारांची राजकीय-सामाजिक इतिहासाच्या अंगानं समीक्षा केली आणि तो कोणत्याही अर्थानं एक बौद्धिक पातळीवर विकसित झालेला ‘ism’ (विचारप्रणाली) नाही यावर एकमत व्यक्त केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार गांधी-आंबेडकर यांच्याप्रमाणे गोळवलकर गुरुजी स्वतंत्र राजकीय विचार देऊ शकले नाहीत. जे काही त्यांनी दिलं, तो जमातवादानं (धर्मवाद) भारलेला एक राष्ट्रवादाचा आक्रमक रोडमॅप होता. ती परिपक्व विचारधारा निश्चितच नाही, असं मत नवसागरे आणि हर्डीकर यांनी व्यक्त केलं.

गोळवलकर गुरुजी हे रामकृष्ण मिशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आर्य समाज या तिन्ही सांस्कृतिक संघटनांमधील तत्त्वांचं साररूपानं मिश्रण असलेले एक राजकीय संघटनकौशल्यनिपुण सांस्कृतिक ध्रुव होते. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संघानं समरसता मंच या व्यासपीठावरून एक महा-अभियान सुरू केलं होतं. त्यामागील उद्दिष्ट हे हिंदू धर्मातील सर्व जाती-समाज-समुदाय यांना हिंदू-हिंदुस्तान-हिंदुत्वाच्या विशाल राजकीय तत्त्वज्ञानाच्या प्रवाहात सामील करून घेणं हा होता. या जन्मशताब्दीचा उद्देश हा हिंदू राष्ट्रवादाचं आक्रमक मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यासाठी आपल्या सांस्कृतिक सह-जीवनातील सर्वच परिघांना स्पर्श करणं हासुद्धा होता.

गोळवलकर गुरुजी यांचं हिंदू-राष्ट्रवादाचं आख्यान हे सर्वसत्तावाद, जातिवाद, हिंदुकरण, वांशिक नैतिकता (Eugenics), अल्पसंख्याकांना विरोध, लोकशाही-घटनेवर नसलेला विश्वास या खंडांमधून पुढे जातं. त्यातील एक महत्त्वाचा घटक आपण पाहू.

काळाबरोबर संघामध्ये काय बदल होतात, हे सांगताना विलास वाघ (प्रकाशक) म्हणाले की, ‘संघाची मूलतत्त्वं बदलत नाहीत पण स्ट्रॅटेजी निश्चित बदलते’. हे समजावून घेण्यासाठी या पुस्तकातील काही ओळी पाहु. शस्सूल एके ठिकाणी म्हणतात- “गोळवलकर यांनी संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे अशी मांडणी केली. भारतामध्ये तमिळ आणि मल्याळम या भाषा संस्कृतपेक्षाही जुन्या आहेत. या भाषांना महान साहित्यिक वारसा लाभला आहे. याखेरीज शेकडो द्रविड, बोलीभाषा व आदिवासी भाषा संस्कृतपेक्षा प्राचीन आहेत. संस्कृत न बोलणाऱ्या बऱ्याच मोठ्या वर्गाला गोळवलकर बाहेर ठेवत होते. हे संघाच्या लक्षात आल्यानंतर संस्कृतच्या जागी हिंदीचा आग्रह धरला जाऊ लागला. पुढे याविषयीही नवीन प्रश्न निर्माण झाले.” (पान १७)

गोळवलकर गुरुजी यांनी विविध विषयांवरील संकल्पनांची हिंदुत्वाच्या दृष्टीनं विशाल (परंतु भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून संकुचित) अशा दृष्टिकोनात मांडणी केली. त्या मांडणीला एक बौद्धिक अधिष्ठान दिलं. त्यामुळे ते पुढे स्वत: हिंदुत्वाचे एक प्रमुख विचारवंत बनले (पान ३१).

या पुस्तकातील काही महत्त्वाच्या प्रकरणांकडे नामनिर्देश करावासा वाटतो, जेणेकरून शम्सूल इस्लाम यांनी कोणत्या अंगानं मांडणी केली आहे, हे लक्षात येईल.

- स्वातंत्र्यलढ्याशी फितुरी

- हुतात्म्यांच्या परंपरेचा उपहास

- स्वातंत्र्यानंतरही धर्मशाही जातीवाद आणि हुकूमशाहीचे गुणगान

- जातीवाद आणि मनुस्मृतीवर सनातन विश्वास

अशा प्रकारे राष्ट्रवादाच्या आध्यात्मिक प्रेरणा, सामाजिक संवेदनांशी त्यांचा संबंध आणि गोळवलकरांना राष्ट्र-ध्येयाकडे वाटचाल कशी व्हावीशी वाटते, हे जाणून घेण्यासाठी ‘गोळवलकरवाद -एक अभ्यास’ हे एक महत्त्वपूर्ण संदर्भपुस्तक आहे.  

अलीकडेच प्राध्यापकपदाच्या कारकिर्दीतून सेवानिवृत्त झालेल्या जयदेव डोळे यांचं ‘आरेसेस’ हे पुस्तक त्यांनी लिहिलेल्या लेखमालिकेतील (‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकातून प्रकाशित झालेल्या बहुतांशी लेखांचा या पुस्तकात समावेश आहे.) लेखांचं निवडक संकलन आहे. डोळे यांनी संघाचे वेगवेगळे मुखवटे, तसंच दुहेरी मापदंड असलेल्या अनेक हरकतींचा पर्दाफाश करणारं धारदार लेखन केलं आहे. जनतेचा ‘सांस्कृतिक बुद्धिभेद’ करून ‘धार्मिक राष्ट्रवादाची’ मूर्तीमंत उभारणी करण्याचा ध्येयवाद दैनंदिन कामकाजामध्ये संघ कशा यशस्वीपणे रुजवतो, कोणत्याही घटनात्मक संकेताशिवाय-जबाबदारीशिवाय, लोकशाही परंपरेशिवाय आणि तर्कनिष्ठ विवेकाच्या वारशाशिवाय कसं लोकांच्या व युवकांच्या मनात हे स्वप्न पेरत आहे, इत्यादींचा संघाच्या कार्यपद्धतीच्या मुळाशी जाऊन वेध घेणारं हे पुस्तक अत्यंत समयोचित आहे.

त्याशिवाय आपल्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाच्या अशा सांस्कृतिक संस्थेच्या अंतरंगातील गुप्त-रहस्यमय वातावरणाला समजून घेण्यासाठीसुद्धा हे पुस्तक महत्त्वाचं आहे. संघाच्या राजकीय घडामोडींचा अचूक अर्थ लावण्यासाठी ‘एखाद्या खगोलीय दुर्बिणीनं आपल्याला शनी ग्रहाच्या फिरत्या उपग्रह-तबकड्या दाखवाव्यात’ त्याप्रमाणे संघाबद्दलच्या संदर्भविश्वाची या पुस्तकामधून नव्यानं ओळख होते.

गोळवलकर गुरुजी यांच्या संदर्भानं डोळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांस्कृतिक संघटना असण्याचे दावे उघड करतात. १९४८-४९ च्या काळात सरकारी बंदीमधून बाहेर येण्यासाठी संघ प्रयत्न करत होता, तेव्हा ‘आम्ही फक्त सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करतो’, असं त्यानं जाहीर केलं होतं. हा प्रवास नंतर इतका पुढे जातो की, २०१४ नंतर आलेल्या सरकारचे मंत्री सरसंघचालकांना आपल्या कामगिरीचा अहवाल देण्यासाठी संघ मुख्यालयामध्ये जातात.  एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेला हा संघाचा प्रवास डोळे अचूक निरीक्षणांसह विश्लेषण करत सांगतात.

गोळवलकर गुरुजी ज्या काळामध्ये सक्रिय होते (१९४०-१९७३ सरसंघचालक), त्या काळामधील त्यांच्या भूमिकेविषयी डोळे अतिशय स्पष्ट शब्दांत म्हणतात- “राजकारणात प्रत्यक्ष न उतरता राजकीय परिस्थितीचे वाईट चित्रण करून आपली पोळी भाजून घेणे यात गुरुजींचे (गोळवलकर) कौशल्य चांगले दिसले, हेही एक प्रकारचे राजकारणच. संघाचे राजकारण नेहमी समांतरच राहिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांवर आधारलेल्यांचे राजकारण संघ सदैव झुगारत राहिला. त्या जागी आपले एक धर्मीय, एक राष्ट्रीय, एकचालकानुवर्ती, विषमता पूजक राजकारण तो जोपासत राहिला. तरीही तो वाढला, त्यामुळेच तो वाढला.” (मनोगत, पान क्र.११)

डोळे यांची एक महत्त्वाची खंत आहे. ती म्हणजे संघ कितीही वाढला, सत्तेमध्ये बसू लागला तरी रावसाहेब कसबे यांनी जशी ‘झोत’ (१९७७) मधून संघाची मीमांसा केली, तशी ती क्वचितच पुढे झाली. ते असंही म्हणतात की, संघाचं अंतरंग उलगडून दाखवणारं समाजशास्त्रीय-राज्यशास्त्रीय संशोधनही फारसं झालं नाही. संघाचा अभ्यास करून त्यास अटकाव करण्यासाठी अनेक मुद्दे इतिहासात आहेत, परंतु पुरोगामी परंपरा असलेल्या महाराष्ट्राने हे केलं नाही असं डोळे म्हणतात. “संघ नेहमी परखड अन कठोर परीक्षणांतून सुटत राहिला ते शिस्त, संघटन आणि अराजकीय वर्तन याचा भडीमार झाल्यामुळे. माध्यमांनी आणि विचारकांनी कायमच संघाचे संरक्षक म्हणून भूमिका बजावली”, याकडेही डोळे लक्ष वेधतात.

या पुस्तकाद्वारे डोळे संघाचा विविध अंगांनी अभ्यास करण्याची मोहीम काढण्याचे विचारवंत\लेखकांना कळकळीचं आवाहन करतात. संघाचा अभ्यास समाजशास्त्रीय, धर्मशास्त्रीय, जातीव्यवस्थात्मक, राजकीय, मानसशास्त्रीय, ऐतिहासिक असा अनेक बाजूंनी करता येतो आणि तो केला गेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघाच्या वाढीमध्ये आणि त्याच्या महत्त्वाकांक्षी विस्तारामध्ये पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षांचासुद्धा वाटा आहे, असं भेदक निरीक्षण डोळे नोंदवतात. ‘शंकासमाधान@शाखा’ (पान क्र.२०) या प्रकरणात डोळे म्हणतात,

“भारतीय माणूस अनुभव किंवा ठोस निष्कर्ष याकडे कधीही पाहत नाही. सांगणाऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा, पोच, नाते, अनुभव, सत्ता, वय, जात, पैसा, हतबलता पाहून आपले नागरिक निर्णय घेतात. विवेक, विज्ञान, तर्क, शिक्षण याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. म्हणूनच आपण फसवणुकीच्या, शोषणाच्या, अन्यायाच्या, पिळवणुकीच्या, छळाच्या, गांजवणुकीच्या बातम्या वाचतो, ऐकतो.”

अविवेकी समाजाच्या भावनाशील वर्तणुकीचा संघ फायदा उचलतो आणि त्यामुळे घटनाविरोधी प्रवृत्ती बळावतात, याचे अनेक दाखले डोळे यांनी या पुस्तकात ठिकठिकाणी दिले आहेत.

सत्ता कुठल्याही पक्षाची असो, सरकारमध्ये आपले कार्यक्रम करणारे, ते पुढे रेटणारे असावेत हे संघानं-सर्वच राजकीय पक्षांबाबत शक्य करून दाखवलं, हे डोळे यांचं निरीक्षण सरसकटरीत्या बरोबर नसलं तरी संघाच्या सांस्कृतिक प्रभावाची पाळेमुळे आपल्या बहुजन समाजाच्या सर्व समाजव्यवहारामध्ये घुसली असल्यामुळे तो कधी ‘सदाहरित सत्ताधारी’ झाला, हे बहुजनांचं राजकारण करणाऱ्या भल्याभल्यांना कळलं नाही, असं डोळे यांच्या एकूण मार्मिक विश्लेषणावरून सूचित होतं.

सरसंघचालकानी देशाच्या आर्थिक धोरणावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही (अपवाद अर्थातच संकुचित स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या संघ-परिवारातील संस्थांचा). अतिरेकी राष्ट्रवाद हा कट्टर भांडवलशाहीचा समर्थक असतो, असं म्हणण्यास वाव आहे, हे आधीच्या आणि आत्ताच्या भाजप सरकारच्या वाटचालीवरून दिसून येतं, हा निष्कर्ष डोळे यांचं निरीक्षण वाचल्यावर समजतो. आर्थिक प्रगती होण्यामध्ये काही अडचण नाही, पण ती जर राष्ट्रवादाची नशा आणि चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रवादी सापळ्यासकट येणार असेल, तर नको अशी आर्थिक प्रगती, असं म्हणायची वेळ यावी, अशी काही पावलं राष्ट्रवादी भांडवलशाहीच्या अलीकडच्या काही पाउलखुणावरून येते.

डोळे ज्योतिर्मय शर्मा या राजकीय तत्त्वज्ञानाच्या लेखकाचा हवाला देऊन सांगतात की, “गोळवलकर यांच्या लिखाणात हिंदू पुराणे, ग्रंथ, प्रतिमा आणि संज्ञा यांमधून ध्वनित होणाऱ्या नवजागरणवाद, राष्ट्रवाद व कल्पनारम्यवाद व्यक्त होतो. संघाची संपूर्ण राजकीय विचारसरणी या वैशिष्ट्यांनी भरलेली आहे.” म्हणूनच गोळवलकर गुरुजी आणि त्यांच्या पश्चात संघाचा राष्ट्रवाद हा रोमँटिक राष्ट्र्वादच आहे असे डोळे (पान क्र. ७८) सांगतात. गोळवलकर गुरुजी स्वत: विज्ञानाचे पदवीधर होते, परंतु त्यांच्या बोलण्यातून कधी वैज्ञानिक दृष्टिकोन आला नाही, असं विधान डोळे अप्रत्यक्षरीत्या करतात.

“हिंदुत्व हे शिक्षणामधून प्रकट झाले पाहिजे, हे ते (गोळवलकर) येथे स्पष्टपणे सांगून टाकतात. ते करताना त्यांना शूद्रांना नाकारलेलं शिक्षण, स्त्रियांना मिळालेला नकार व शिक्षणावरचा ब्राह्मणांचा एकाधिकार दिसत कसा नाही?” (पान क्र.९७) यांसारखी अनेक उत्तरेयुक्त प्रश्न आणि प्रश्नयुक्त उत्तरे शम्सूल इस्लाम आणि जयदेव डोळे यांच्या पुस्तकांनी आपल्यासमोर ठेवली आहेत. ती आपल्या ‘धर्मांतरित’ झालेल्या लोकशाही राजकारणाला समजावून घेण्यासाठी मार्गदर्शक आहेत.

……………………………………………………………………………………………

गोळवलकरवाद - एक अभ्यास - शम्सूल इस्लाम

अनुवाद मीना शेटे-शंभू, सुगावा प्रकाशन, पुणे

पाने - १६०, मूल्य - १५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4035

……………………………………………………………………………………………

आरेसेस - जयदेव डोळे 

लोकवाङ्मय गृह, मुंबई, पाने -१९३ , मूल्य - १५० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4034

……………………………………………………………………………………………

लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणेचे सदस्य आहेत.

creativityindian@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 06 April 2019

जयदेव डोळे म्हणतात की >> संघ नेहमी परखड अन कठोर परीक्षणांतून सुटत राहिला ... >>. ठीके. युक्तिवादापुरतं खरं धरूया. मात्र याचं कारण स्वत: डावे विचारवंतच आहेत. त्यांनी कधीही डाव्या विचारसरणीचं भारतीय दृष्टीकोनातनं मूल्यमापन व/वा चिकित्सा केली नाही. हे सत्य आहे. नेमका हाच मुद्दा रावसाहेब कसब्यांनी त्यांच्या 'झोत' या पुस्तकात मांडला आहे. तेव्हा स्वत:च्या आळशीपणाचं खापर संघावर जरूर फोडावे ही विनंती. अशाने आमचं चांगलंच मनोरंजन होतं. असो. बाकी, गोळवलकरांनी जे लिहिलंय त्याची प्रचीती त्यांच्या मृत्युपश्चात २०- २५ वर्षांनी येतेय. त्यांच्या पुस्तकातली अनेकविध भाकिते व निरीक्षणे त्यांच्या मृत्युनंतर कित्येक दशकांनी प्रत्ययास आली. उदाहरणार्थ : बाल्कन (पूर्वाश्रमीचा युगोस्लाव्हिया, मासेडोनिया, कोसोव्हो), इंडोनेशिया (पूर्व तिमूर), स्पेन (क्याटेलन बास्क), इत्यादि लोकसमूह व राष्ट्रिके. यावरून गोळवलकर नामे मनुष्य काय योग्यतेचा विद्वान आहे ते माझ्यासारखे लोकं छानपैकी जाणून आहेत. सांगायचा मुद्दा काये की, खिशातली फुटकी कवडी सांभाळायची अक्कल नसलेल्यांनी आर्थिक नियोजनाच्या गप्पा मारायच्या नसतात. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......