पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बहादूर शहाची अपुरी इच्छा पूर्ण करायला हवी
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • बहादूर शहा जफर आणि त्याच्या म्यानमारमधील कबीर फुलं वाहताना नरेंद्र मोदी
  • Thu , 14 September 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar बहादूर शहा जफर नरेंद्र मोदी म्यानमार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या दौऱ्यात बहादूर शहा जफर यांच्या रंगून येथील कबरीवर फुलं अर्पून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या बातमीनं अनेकांना आश्चर्य वाटलं, पण त्यावर फारशी चर्चा झाली नाही. बहादूर शहा जफर हा भारताचा शेवटचा मुघल बादशहा. १८५७ च्या इंग्रजविरोधी देशव्यापी उठावाचं नेतृत्व हिंदू-मुस्लीम-शीख राजे-सरदार आणि सामान्य हिंदुस्तानी माणसांनी बहादूर शहाकडे दिलं. मनोभावे त्याला नेता मानलं. दिल्लीची गादी त्याच्याकडे सोपवली. 

त्या पूर्वीच्या बादशहा घराण्याच्या सत्तेच्या परंपरेतून वारशानं नेमले जात होते. हा एकमेव बादशहा आहे की, त्याला लोकांनी बादशाही बहाल केली. या अर्थानं हा ‘लोकांचा बादशहा’ ठरला. सर्व जाती, भाषा, धर्म, विभागाची त्याला मान्यता होती. मराठे, जाट, रजपूत, शीख, आदिवासी अशा विविध गटांनी त्याला आपला मानला. या अर्थानं तो ‘सेक्युलर बादशहा’ म्हणता येईल. इंग्रजांविरोधातल्या बंडाचा नेता असलेला हा बादशहा नुसता राजा नव्हता, तर कवी होता. त्याचे वडील म्हणत ‘अरे, हा पोरगा कवी मनाचा आहे, मनकवडा आहे. याला राजगादीवर बसवणं चुकीचं होईल.’ बापाचा विरोध असला तरी परिस्थितीनं त्याला राजा बनवलं. ते लोकांनीही स्वीकारलं.  

हिंदुस्तानच्या एकीला इंग्रज थरथर कापत. १८५७चं एकीतून उफाळलेलं बंड आपल्याला जाळून टाकेल हे इंग्रजांना माहीत होतं. पुन्हा या बंडाचा नेता मुस्लीम बादशहा. परत हा माणूस विद्वान, कवी, शायर, संत प्रवृत्तीचा. इंग्रजांचं डोकं भडकलं. त्यांनी कपटकारस्थान करून बंड मोडलं. बहादूर शहाला पकडून म्यानमार (तेव्हाचा ब्रह्मदेश)च्या रंगून तुरुंगात ठेवलं. इंग्रज या राज्याला एवढे घाबरत की, त्यांनी त्याला कविता लिहण्यासाठी तुरुंगात लेखणी द्यायला बंदी घातली. बहादूर शहाचं लेखनीवाचून अडलं नाही. तो विझलेल्या काड्या वापरून तुरुंगाच्या भिंतीवर कविता लिहीत असे. तुरुंगात मृत्यूची चाहूल लागली तेव्हा त्याने शेर लिहिला -

कितना बदनसीब है जफर दफ्न के लिए,

दो गज जमीं भी न मिली कू-ए-यार में

हिंदुस्तानचा शेवटचा बादशहा असलेल्या या माणसाचा मृत्यू ७ नोव्हेंबर १८६२ ला तुरुंगातच झाला. त्याला शंका होती तशी खरोखर इंग्रजांनी दफन करायला हिंदुस्तानात जागा मिळू दिली नाही. रंगूनमध्येच ब्रिटिशांनी घाईघाईनं त्याचं दफन केलं. ‘आपलं दफन दिल्लीत महरौली परिसरात व्हावं,’ ही त्याची इच्छा होती. इंग्रजांनी ती पूर्ण होऊ दिली नाही. हिंदुस्तानी जनतेच्या एकीचं आणि बंडाचं प्रतीक बनलेल्या या राजाची इंग्रजांनी एवढी धास्ती घेतली होती की, दफन केल्यानंतर त्याची कबर कुठे आहे, हे कळू नये म्हणून त्यांनी ती सपाट करून नामोनिशान मिटवलं. त्याच्या मृत्यूनंतर १३२ वर्षांनी ती कबर खोदकामात सापडली. तिथं दर्गा बनवला गेला आणि तो आता जगातला एक प्रसिद्ध दर्गा आहे. 

पंतप्रधान मोदींनी बहादूर शहाच्या कबरीवर फुलं वाहून हा इतिहास जागवला. म्यानमारमध्ये त्यांनी भाषण केलं. भारत आणि म्यानमार हे दोन देश फक्त सीमांनीच जोडलेले आहेत, असं नव्हे तर भावनांनीही बांधलेले आहेत. पंतप्रधानांनी भारत-म्यानमारचं भावबंधन अचूक हेरलं. या भावबंधनात बहादूर शहा यांच्या स्मृतींना अढळ स्थान आहे. 

पंतप्रधानांनी बहादूर शहाला श्रद्धांजली वाहिली यावर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारात मौन बाळगण्यात आलंय. भाजप, संघ परिवाराला मुघल बादशहाचं वावडं आहे, हे वास्तव आता लपून राहिलेलं नाही. भाजपच्या राज्य सरकारांनी पाठ्यपुस्तकातून मुघलांना कसं हाकलून लावलं, हे राजस्थान आणि महाराष्ट्रात दिसून आलंय. 

राजस्थानात वसुंधरा राजे शिंदे यांच्या सरकारनं बहादूर शहाचे वंशज सम्राट अकबर महान की, राणा प्रताप हा वाद उभा केला. राजस्थानात हल्दी घाटीच्या युद्धात सम्राट अकबर आणि राणा प्रताप दोघेही प्राणपणानं लढले. पण या युद्धात ना अकबर जिंकला, ना राणा प्रताप. दोघेही आपापल्या जागी थोर होते. महान योद्धे होते असा इतिहास आहे. तो बदलून राजस्थान शिक्षण बोर्डानं नवा इतिहास लिहिला. त्यात या युद्धात अकबराची सेना राणा प्रतापाला घाबरून माघारी पळाली आणि राणा प्रताप जिंकला, असं जाहीर करून पाठ्यपुस्तकात नोंदवलं. 

महाराष्ट्रात भाजप सरकारनं पाठ्यपुस्तकातून मुघल राजांना हद्दपार करवून त्यांचा नामोल्लेखही टाळला. ताजमहल, लाल किल्ला, कुतुबमिनार या देशाला अभिमान वाटणाऱ्या महान, ऐतिहासिक ठेवा असलेल्या, जगभरात कुतूहल असलेल्या वास्तू कुणी बांधल्या ही माहिती देण्याचं टाळलं. 

भाजपनं दिल्लीत सत्ता मिळवल्यानंतर तातडीनं दिल्लीत औरंगजेबाचं नाव रस्त्याला नको म्हणून ते बदललं. अकबर, औरंगजेब हे बहादूर शहाचे पूर्वज. त्यांचा इतिहास हे भारतीय वास्तव आहे. ते आपल्याला जसंच्या तसं स्वीकारलं पाहिजे. भाजप परिवाराला मात्र हे पटत नाही. त्यामुळे त्यांची सोयीचा इतिहास मांडण्याची धडपड चालू असते. त्यातून वाद उदभवतात. पण हे वाद संघ परिवाराला हवेच असतात. बहादूर शहाबद्दल संघ परिवाराचं काय म्हणणं आहे, हे अजून कुणी पुढे येऊन स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे ते कळायला मार्ग नाही. पण मोदींनी ज्या मनोभावे बहादूर शहाच्या कबरीवर श्रद्धांजली वाहिली, ते पाहता मोदीजींना या शेवटच्या मुघल बादशहाबद्दल आदर आहे, असं म्हणता येईल.

बहादूर शहाबद्द्ल फक्त भारतातच आदर, प्रेम आहे असं नव्हे तर म्यानमारमध्येही त्याला लोक मानतात. म्यानमारमधल्या भारतीयांना तर बहादूर शहाबद्दल खूप भक्ती आहे. त्याच्या कविता त्यांना तोंडपाठ असतात. बांग्लादेशात जुन्या ढाक्का शहरात व्हिक्टोरिया पार्कचं नाव बदलून बहादूर शहा जफर पार्क असं तिथल्या सरकारनं नामकरण केलंय. जफरचं नाव द्यावं, अशी लोकांची मागणी होती हे विशेष. पाकिस्तानातही लाहोरमधल्या रस्त्याला जफर यांचं नाव आहे. हिंदू-मुस्लीम एकतेचं प्रतीक असलेल्या या राजाच्या नावाला पाकमधल्या कुणाचा आक्षेप दिसत नाही. म्हणजे म्यानमार, भारत, बांग्लादेश, पाकिस्तान अशा चारही देशातल्या लोकांच्या भावनांशी जोडलेला राजा म्हणून बहादूर शहाचं स्थान आहे. 

लोकांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आणि ब्रिटिशांची साम्राज्यशाही हटवलीच पाहिजे. सर्व जाती, धर्म, भाषा यांचं ऐक्य झालंच पाहिजे, या विचाराचं प्रतीक म्हणून बहादूर शहा यांची लढाई, जीवन आपल्या पुढे येत राहतं. आजच्या काळात त्याचं महत्त्व खूपच आहे. त्यामुळे मोदींनी बहादूर शहाला श्रद्धांजली वाहणं खूपच आश्वासक आहे. यानिमित्तानं बहादूर शहाच्या प्रेरणादायी इतिहासाची चर्चा झाली पाहिजे. तुरुंगात ८९ व्या वर्षीही हिंदुस्तानी स्वातंत्र्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या महान राजाचा परिचय नव्या पिढीला झाला पाहिजे. 

मोदींनी या निमित्तानं बहादूर शहा यांच्या मनातली अपुरी इच्छाही पूर्ण करायला हवी. मायभूमीत दफन करण्याची बहादूर शहाची इच्छा इंग्रजांनी पूर्ण होऊ दिली नाही. पण दिल्लीत महरौलीत स्मारक असावं, अशी बहादूर शहाची इच्छा होती. ती मोदींना पूर्ण करता येऊ शकेल. म्यानमारमधील बहादूर शहाची कबर भारतात दिल्लीत आणावी, अशी बहादूर शहा प्रेमी भारतीयांची मागणी आहे. ती लक्षात घेऊन मोदींनी बहादूर शहाची कबर भारतात आणण्यासाठी पुढाकार घेतला, तर त्या कवी मनाच्या राजाचं आपल्या मायभूमीत विसावण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तुरुंगात खितपत पडलेल्या ८९ वर्षाच्या म्हाताऱ्या बहादूर शहाचं मायभूमीवर प्रेम किती होतं? तो तुरुंगात देह झिजवून मेला. पण कपटी इंग्रजांशी तडजोड करायला, मायभूमीशी गद्दारी करायला तयार झाला नाही. त्या महान देशप्रेमाला, देशभक्तीला सलाम म्हणून मोदींनी बहादूर शहाची कबर भारतात आणायला हवी. भावी पिढ्यांना ती कबर स्वातंत्र्य, देशप्रेम आणि ऐक्याची प्रेरणा देत राहील!

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Girish

Mon , 18 September 2017

अभ्यास वाढवा,1 शीख 1857 च्या बंडात सामील नव्हते 2 कुतुब मिनार मुघलांनी बांधला नाही या ढोबळ चुका प्रथमदर्शनी


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......