अजूनकाही
मराठी साहित्य महामंडळाच्या नव्या कारभारी 'मंडळीं'नी आगामी अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी पळी-पंचपात्र वा भिक्षापात्र (त्यांचा कटोरा वा वाडगा नसतो) घेऊन सरकारकडे न जाता, जनतेत जाण्याची ‘सात्त्विक’ डरकाळी फोडली. अनेकांनी ज्याची अपेक्षा केलेली नसावी ते महामंडळानं सहजसाध्य करून दाखवलं आहे!! परिवर्तनाची पोपटपंची करणारी मंडळी आता साक्षात ‘शुका’ची दास होणार आहेत!!!
व्वा, साहित्य आणि धर्म, वाङमय आणि अध्यात्म, संस्कृती आणि विकृती यांचा महान संगम घडवण्याचं काय हे नवं पाऊल! मराठी सारस्वताच्या जीवनात (आणि जेवणात) गेली काही दशकं जी कोंडी निर्माण झाली होती, तिला भेदण्याचा केवढा हा अभिनव मार्ग!
आजवरच्या चाकोरीवर लाथ मारून मराठी साहित्यविश्वात मुलखावेगळी वाट शोधण्याचा (आणि त्या विश्वाची उरलीसुरली वाट लावण्याचा) किती हा धाडसी प्रयोग. धन्य हो!
रसिकांनो, वाङ्मयप्रेमींनो इथून पुढे कोणत्याही काळी, कुठल्याही प्रसंगी मराठी साहित्य संमेलनाला कसलीच अडचण येणार नाही अशी तरतूद आता केली गेली आहे. केवढा हा दुर्दर्शीपणा! केवढी ही स्वार्थपरायणता!! कशाला हवा आता तो स्वावलंबी होण्याचा कोटी-कोटी फंड?
बंडखोर-प्रगतिशील-परिवर्तनवादी अशा तत्त्वनिष्ठ साहित्यिक प्रवाहांचा अपवाद वगळता इथले तथाकथित मुख्य प्रवाही, 'तटस्थ' वगैरे साहित्यिक आपल्या महान परंपरेला आता पुन्हा एकदा जागतील. सामाजिक तणावाचे प्रश्न वा आधुनिक मूल्याधारित निर्णय घेण्याचे प्रसंग समोर येताच कातडीबचाऊ वा शेपूटघालू भूमिका घेण्याचं महान कर्तव्य ते याही वेळी पार पाडतील. किंवा नेहमीप्रमाणे तोंडात मिठाची गुळणी धरून बसतील.
त्यांना खात्री आहे की, शुकदास आपल्याला उत्तम जेऊखाऊ घालतील. ज्या मंडळींना दिवसभराच्या साहित्य-काव्य-विनोद आदी मेहनतीनं थकवा येतो, त्यांना सायंकाळी शुकदास खास ‘तीर्थ’ उपलब्ध करून देतील. साहित्यिकांना कथा-काव्य संचार-विहारासाठी नवीनवी बीजं मिळावीत म्हणून आपल्या रासलीलांची रसभरीत वर्णनं ऐकवतील. कुंथणाऱ्या-खंगलेल्या तोंडाची चव गमावून बसलेल्या साहित्यिकांवर खुद्द शुकदास महाराज वैद्यकीय उपचार करून त्यांना वळणावर आणतील. लेखणी खुडूक झालेल्यांची प्रतिभा जागी करतील. मग अर्थातच महाराष्ट्राचे महान मुलाखतकार शुकदासांची मसालेदार मुलाखत घेतील. अनेक साहित्यिकांना शुकदास होण्याची स्वप्नं पडू लागतील आणि अशा रीतीनं मराठी ‘मुख्य प्रवाही’ साहित्यात सर्वत्र ‘शुक’शुकाट पसरेल!
शुकदासाच्या हिवरा आश्रमनंतर पुढचं अखिल भारतीय संमेलन थेट उत्तरेत सिरसा इथं बाबा राम-रहिमच्या डेऱ्यात घेण्याचंही नियोजन करता येईल. अनायासे तिथं भुयारासह सर्व संरचनात्मक सुविधा (मराठीत इन्फ्रास्ट्रक्चर) उपलब्ध आहेतच! जिथं तीन-पाच कोटी रुपये हे बाबासाठी फक्त दंगल घडवण्यावर खर्च केले जातात, तिथं साहित्यिकांच्या सरबराईसाठी कोटीच्या-कोटी उड्डाणं केली जातील यात काय शंका? शिवाय साहित्य संमेलनात केवळ हिंदी-मराठी अभिनेते बोलवण्याचा अलीकडचा संकुचितपणाही यानिमित्तानं मोडता येईल. गुर्मीत असलेला बाबा राम रहीम हा महान पंजाबी भाषक रॉकस्टार, फिल्मवाला, अभिनेता उदघाटनापासून संमेलनाचं सूप वाजवण्यापर्यंत सर्व कार्यक्रम एकहाती पार पाडेल. त्यामुळे मराठी मुख्य प्रवाही साहित्य संमेलनाद्वारा जी राष्ट्रीय एकात्मता साधली जाईल, त्यावर ‘खट्टर’लेल्या मुख्यमंत्र्यापासून ते मोडीत निघणाऱ्या प्रधानसेवकांपर्यंत सारेजण लट्टू होऊन जातील.
या महान संत व साहित्यिक समागमाचं (उत्तरेत आधुनिक 'संत' जेव्हा मेळावे भरवतात व भक्तांना भेटतात तेव्हा त्याला ‘समागम’ म्हणतात हे वाचक जाणतच असतील. कृपया गैरसमज नसावा.) वर्णन करण्यासाठी प्रसिद्धीपराङमुख म्हणून प्रसिद्ध पावलेल्या आणि साहित्यिक नसलेल्या पण काहीबाही लिहू शकणाऱ्या काही माजी साहित्य संमेलन अध्यक्षांना पाचारण करता येईल!
संमेलनाची पुढची बारी अर्थातच सर्वोच्च न्यायालयाला धाब्यावर बसवण्याच्या लीला करून यमुनातीरी गोकुळ भरवणाऱ्या श्रीश्रींच्या चरणी घडवता येईल. त्यानंतरचं साहित्य-समागम थेट हिमालयाच्या पायथ्याशी बसलेल्या रामदेव बाबाच्या पायाशी घेता येईल. आणि मग, विश्व मराठी संमेलन घ्यायचं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महेश योगी वगैरे मंडळी आहेतच!!!
काय हा साहित्य आणि अध्यात्माचा अलौकिक संगम! धर्माच्या तद्दन भ्रष्ट, अनैतिक आणि हिंसक अंगाला साहित्यानं दिलेलं काय हे गोड अलिंगन!! धर्मसंकटात सापडलेल्या बुवा-महाराज-बाबांना देऊ केलेलं काय हे सुंदर संरक्षण!!! अहो, काय हा योगायोग. पहा ना, इकडे अखिल भारतीय आखाड्यानं चौदा स्वामी-बाबा-महाराजांना ‘चौदावं रत्न’ दाखवलं आणि भ्रष्टतेची अगदी हद्द झाली म्हणून चक्क बहिष्कृत केलं. बिचारे स्वामी-बाबा-महाराज उघड्यावरच पडणार होते. अहो, त्यांची धर्माची कवचकुंडलं काढून घेतलं तर दुसरं होणार हो काय? तशी ही सर्व मंडळी गेली काही दशकं आटापिटा करून बेगडी विज्ञानाची कवचकुंडलं मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, पण त्यात मर्यादितच यशच येत राहिलं. पण आता मात्र काही चिंता नाही. अखिल भारतीय हिंदू आखाड्याच्या तोंडात मारत साक्षात अखिल भारतीय मराठी साहित्य आखाड्यानं आता स्वामी-बाबा-महाराजांना साहित्याचं सरंक्षक छत्र देऊ केलं आहे. धर्माची चिकट कोळिष्टकं आणि विज्ञानाचे बोचणारे काटे, यात हवाच की थोडा बदल! साहित्याच्या नावानं मृदू, मुलायम पांघरूण मिळालं तर उत्तमच.
मराठी वाचकहो, पण लक्षात ठेवा, मराठी साहित्य आता केवळ ‘अक्षर’ वाङमय नव्हे तर धार्मिक -आध्यात्मिक अर्थानंही ‘अमर’ वाङमय बनावं, याजसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं केला हा अट्टहास!
लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.
dattakdesai@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment