अजूनकाही
स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमधील धर्म परिषदेत केलेल्या भाषणाला काल १२५ वर्षं झाली. ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांनी हे भाषण केलं. या भाषणानं त्यांना आणि भारतालाही एक वेगळी ओळख मिळवून दिली. स्वामी विवेकानंदांचं ते भाषण...
.............................................................................................................................................
आपल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागतानं माझं हृदय भरून आलं आहे. या स्वागताबद्दल मी जगातील सर्वांत प्राचीन परंपरेच्या वतीनं आपले आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो, करोडो हिदूंच्या वतीनं आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. पूर्वेकडील देशांकडून सहिष्णूतेचा विचार जगाला मिळाला आहे.
जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्माचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णूतेवरच विश्वासच ठेवतो असं नाही, तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील आणि धर्मांतील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या राष्ट्राचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. रोमन हल्लेखोरांनी ज्यांच्या धर्मस्थळांची तोडफोड केली, त्या इस्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात आजही जपून ठेवल्या आहेत. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या आणि आजही त्यांचं पालन-पोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे.
बंधूंनो, लहानपणापासून मी ऐकलेल्या आणि मुखोदगत केलेल्या एका श्लोकाच्या ओळी आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. कोट्यवधी लोक आजही या ओळींचं पारायण करतात- 'ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे-तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात.
आजची ही पवित्र परिषद ‘भगवद्गगीते’मधील पुढील सिद्धान्ताचाच पुरावा आहे. तो असा - 'जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याचा स्वीकार करतो. कुणी कुठलाही मार्ग निवडो, अखेरीस माझ्यापर्यंतच येतो.’
सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेनं बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकलं आहे. या साऱ्यांनी पृथ्वीला हिंसाचारानं माखून टाकलं आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्तानं लाल केली आहे. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर मानवसमाज आज कितीतरी विकसित झाला असता. मात्र, आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे ही परिषद सर्व प्रकारची धर्मांधता, सर्व प्रकारच्या वेदना (मग त्या तलवारीच्या असोत की लेखणीच्या) आणि माणसा-माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल.
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment