अजूनकाही
बंगळुरूच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची झालेली हत्या जेवढी मानवतेला काळिमा फासणारी आहे, त्यापेक्षा जास्त काळिमा फासणारं वर्तन त्या हत्येनंतर बहुसंख्य भारतीय समाजाकडून घडलेलं आहे. गौरी यांच्या रक्ताचे डाग सुकण्याआधीच ज्या टोकाच्या विखारी आणि धर्मांध प्रतिक्रिया दोन्ही बाजूंनी उमटल्या आहेत; त्यातून या समाजात सामुदायिक शहाणपण, सहिष्णुता आणि विवेक शिल्लक उरलेला आहे किंवा नाही, असा प्रश्न कुणाही संवेदनशील माणसाला पडावा अशी ही स्थिती आहे.
या हत्येच्या निमित्तानं प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमं आणि त्यावर व्यक्त होणारे कथित बुद्धिवंत, तसंच राजकीय नेत्यांचं वर्तन हे एकारल्या आणि विखारी कर्कश्शपणाचं उदाहरण आहे. ज्यांना (स्वघोषित) उजवे म्हणून संबोधले जातं, त्यांच्यातील अनेकांनी गौरी यांच्या हत्येचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन केलं. गौरी यांची जात काढली, त्यांचा विवाह कोणत्या धर्माच्या पुरुषाशी झालेला होता आणि तो त्यांनी कसा लपवून ठेवला याचा गौप्यस्फोट करण्यात आला. गौरी यांचा उल्लेख ‘कुत्री’ आणि आणखी बऱ्याच अश्लाघ्य अशा शब्दांत करण्यात आला.
ही हत्या आणि नंतर हे जे काही घडत होतं किंवा घडवून आणलं होतं, त्यातून एकदा सुसंस्कृत समाजावर पडलेला डाग म्हणून ज्याची लाज वाटायला हवी, अशा हत्येचा तो मांडलेला किळसवाणा उत्सव भासत होता. अशा नृशंस हत्येचं समर्थन करणारा आणि कोणतीही चौकशी होण्याआधीच बेजबाबदारपणाची सीमा गाठत त्या हत्येची जबाबदारी परस्पर कुणावर तरी ढकलून देणारा हा बहुसंख्य समाज सामुदायिक शहाणपणा, सहिष्णुता आणि विवेक याबाबतीत अश्मयुगापेक्षाही जास्त अप्रगत, असंस्कृत आणि महत्त्वाचं म्हणजे अमानवी असल्याचं मन विदीर्ण करणारं चित्र समोर आलेलं आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या विरोधात उभे टाकलेले बहुसंख्य (स्वघोषित) पुरोगामी आणि डावे किमान सुसंस्कृतपणानं व्यक्त झालेले नाहीत, हेही स्पष्टपणे सांगायला हवं. हत्येचा गुन्हा नोंदवला जाण्याआधीच ही हत्या करणारे कोण आहेत, हे त्यांनी जाहीर करून टाकलं! याचा अर्थ गौरी लंकेश यांची हत्या करणारे कोण आहेत, हे या बहुसंख्यांना माहिती होतं. मग प्रश्न उरतो की, तर मग या लोकांनी गौरी यांना संरक्षण पुरवण्याची संवेदनशीलता का दाखवली नाही? या डाव्या आणि पुरोगामी असलेल्या बहुसंख्य बुद्धिवाद्यांना कोणाची तरी हत्या झाल्यावरच जाग का येते? अशी हत्या झाल्यावर लगेच ते न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरून आरोपी जाहीर करण्याचा आक्रोश मांडतात. पण ज्यांना त्यांनी आरोपी ठरवलेलं आहे, त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे आजवर असे आरोप करणारांनी दिलेले नाहीत. संकेत आणि तर्क म्हणजे एखाद्याला गुन्हेगार म्हणून सिद्ध करण्याचे पुरावे नव्हेत, हे नीट उमजून घेण्याइतकंही भान त्यांना आलेलं नाहीये, असाच याचा अर्थ आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतरही नेमकं असंच घडलेलं आहे, हे विसरता येणार नाही.
समाजात झालेल्या अशा सर्वच हत्यांच्या बाबतीत ‘सिलेक्टिव्ह’ राहण्याचा संधीसाधूपणा आपण दाखवतो आहोत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या कथित पुरोगामी किंवा डाव्याची कथित हिंस्र उजव्यांनी केलेली हत्याच केवळ मानवतेला काळिमा फासणारी असते आणि आयुष्यभर सेवाभावानं काम करणाऱ्या कथित उजव्या आणि प्रतिगामी स्वयंसेवकाची डाव्यांकडून झालेल्या हत्या मात्र मानवतेला काळिमा फासणाऱ्या नसतात किंवा त्या हत्या झाल्यानं कुणाला दु:ख होत नाही; ही भूमिका संधिसाधुपणाची, दुटप्पीपणाची आहे. एकीकडे ‘ऑल आर इक्वल’ असा घोष करणाऱ्यांनीच ‘...बट ओन्ली वुई आर सेल्फ डिसायडेडली मोअर इक्वल’ असं वागणं कोणत्याही मानवतेत बसणारं नाहीच.
अशा काही घटना घडल्या की, एक मेणबत्ती पेटवून आणि/किंवा समाज माध्यमांवर एखादी (आक्रस्ताळी) प्रतिक्रिया टाकून मोकळं होण्याची वृत्ती बोकाळली आहे. सारासार विवेकानं मुळातून त्याकडे बघण्याची दृष्टी आपण अशा वेळी हरवून बसतो, हे चित्र जास्त चिंताजनक आहे. आज महाराष्ट्र आणि केंद्रात भाजप म्हणजे हिंदुत्ववाद्याचं सरकार आहे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं; तर केंद्रातही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मनमोहनसिंग पंतप्रधान असलेलं आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री, तर आर. आर. पाटील गृहमंत्री होते. हत्या होताच जी काही प्रारंभिक माहिती मिळाली असणार, त्याआधारे पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्या करणारे कोण असावेत यासंबधी काही स्फोटक संकेत स्पष्टपणे दिलेले होते. त्या दिशेनं तपास का झाला नाही? तसा तपास करून ‘त्यांच्या’ मुसक्या आवळण्याची कामगिरी का बजावली गेली नाही? ‘त्यांच्या’ तशा मुसक्या आवळण्यात कुणी आडकाठी आणली? का ते दिले गेलेले संकेत तपासाअंती साफ चुकीचे ठरले? या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कधीतरी राज्यकर्त्यांकडून मिळायला हवीत.
कलबुर्गी यांची हत्या झाली तेव्हा सिद्धरामय्या मुख्यमंत्री होते आणि आताही तेच मुख्यमंत्री आहेत. गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत, ते जाहीर करणाऱ्या राहुल गांधी यांच्याच काँग्रेसचे सिद्धरामय्या आहेत, ते भाजपचे नाहीत. कलबुर्गी यांच्या हत्येचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. अगदी दर दिवसाला तपासाचा काटेकोरपणे आढावा घेत, ते मारेकरी शोधून काढण्याची तसदी सिद्धरामय्या यांनी का घेतली नाही, हे कोडं कुठल्याही डाव्या आणि पुरोगाम्यांना पडत नाही. सिद्धरामय्या यांच्याही काही व्यवहारांची चौकशी गौरी लंकेश करत असल्याच्या वृत्तांकडे कानाडोळा करत सिद्धरामय्या यांनी गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला, याचं अप्रस्तुत कौतुक केलं जातंय.
डाव्यांचं सरकार राज्यात असतानाच केरळात रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या झालेल्या आहेत. याचा अर्थ कट्टरपंथीयांकडून कोणाचीही हत्या होते, तेव्हा सरकार कोणत्या पक्षाचं याच्याशी काहीही संबध नसतो. मात्र अशा हत्या झाल्या की, माणुसकीचा गळा घोटला गेल्याच्या आरोपांची राळ उडवण्या एकजात सर्व राजकीय पक्ष स्वत:ला ‘धन्य’ मानण्याचा ढोंगीपणा करण्यात आघाडीवर असतात. अशा हत्यांची पुनरावृत्ती घडली की, समाजातीलही अनेकांना खडबडून तात्पुरती जाग येते; मेणबत्त्या पेटवल्या जातात, परस्परांवर एकतर्फी दोषारोपण केलं जातं आणि खरं-खोटं यातील सीमारेषा पुसट करण्याची अहमिका दोन्ही बाजूंनी सुरू होते!
आपल्या देशात बाबा-महाराज यांची चलती असून त्यांच्यामार्फत हिंदुत्वाचं संघटन केलं जातंय आणि या बाबा-महाराजांना सरकारचं संरक्षण आहे, असा एक लोकप्रिय आरोप २०१४ नंतर कायमच बहरून आलेला आहे. सकृतदर्शनी त्यात तथ्य दिसतंही, पण ही वस्तुस्थिती नाही हे आपण कधी तरी लक्षात घेणार आहे की नाही?
हे बाबा, महाराज, त्यांचे मठ, पंथ काही २०१४ नंतर निर्माण झालेले नाहीत. हे सर्व ‘थोर’ महापुरुष आणि त्यांचे अड्डे २५-३० किंवा त्यापेक्षा जास्त वर्षं जुने आहेत; ते सुरू झाले तेव्हा देश व बहुसंख्य राज्यांत काँग्रेसची सरकारं होती. हे महापुरुष आणि त्यांचे अड्डे हे जर समाजाला लागलेली विषवल्ली आहेत, तर ती उखडून फेकण्याचा कणखरपणा तेव्हाच्या सरकारांनी दाखवला नाही. उलट बाबा आणि महाराजांच्या कच्छपी लागण्याची स्पर्धाच काँग्रेस नेत्यांत होती. धीरेंद्र ब्रह्मचारी, चंद्रास्वामी, भोंडशीबाबा ते अलिकडचे युवा राष्ट्रसंत, राष्ट्रसंत यांचं पीक काढणाऱ्यांत काँग्रेस नेत्यांचाच कायम पुढाकार राहिलेला आहे. या बाबा-महाराजांची बीजं काँग्रेस नेत्यांनीच रोवली आणि त्यांच्या सरकारांचंच कृपाछत्र या बाबा-महाराजांवर होतं. कारण त्यांच्या मठ आणि डेऱ्यांनी दिलेल्या ‘मताशीर्वादावर’ काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकांत विजय होत होता; हे मूलभूत वास्तव शहाणपण गहाण न टाकता समाजानं नीट समजून घेतलं पाहिजे. आता हे बहुसंख्य बाबा, महाराज आणि त्यांचे अड्डे-त्यांचे मठ भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत, ही अन्य राजकीय पक्षांची खरी पोटदुखी आहे हे ओळखता न येण्याईतपत विवेकी माणूस भाबडा नाही पाहिजे!
जे झालं, ते पुरे झालं. कोणाचीही असो, या अशा हत्या कलंक आहेत. त्याकडे एकांगी विखारी राजकीय विचारातून, हिंस्र जात्यंध व धर्मांध नजरेतून न बघता हे करणारी विषवल्ली मुळापासून उखडून टाकणारा विवेक समाजात निर्माण व्हायला हवा आहे. तरच अशा मानवतेला काळिमा फासणाऱ्या हिंस्रतेवर नियंत्रण मिळवता येईल. अन्यथा विखारी हत्यांचे असहिष्णु सोहोळे असेच होत राहतील...
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
abc abc
Sun , 10 September 2017
सर्वप्रथम प्ृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानमंडळातील उद्योगाचे स्मरण तुम्ही करून दिलेत याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन. कारण हा उल्लेख केला की हिंदुत्वाद्यांवर सवंग आरोप करण्यातली हवाच निघून जाते. आजवर काँग्रेसने नथुरामवरून संघ-जनसंघ-भाजपला गेली कित्येक दशके झोडण्याचे काम केलेले आहे, तेव्हा आताही असे बेछूट आरोप केल्याने त्यांना काही फरक पडत नाही, किंबहुना ती त्यांची पद्धतच आहे हे स्पष्ट व्हावे. वास्तविक दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांच्यात मला फारसा समान धागा दिसत नाही. विशेषत: पानसरे व दाभोळकर यांच्यात. पानसरे कम्युनिस्ट होते, त्यांनी तर शिवाजी कोण होता मध्ये शिवाजी कम्युनिस्ट होता एवढेच म्हणणे बाकी ठेवले होते. केवळ हत्या हे समान सूत्र बाळगत तुमचा लेख छापताना अक्षरनामाने गौरी लंकेश यांचा फोटो या त्रयीबरोबर छापण्याचे औधत्य केले आहे. असा खोडसाळपणा करणे हे त्या पोर्टलला नवे नाही. खोडसाळपणा म्हणायचे ते अशासाठी की गौरी लंकेश या कोणत्या प्रकारची म्हणजे पातळीची पत्रकारिता करत होत्या हे त्यांच्या विविध ट्विट्सवरून मीच दाखवलेले आहे. त्यांच्या काही फेसबुक पोस्टमधील मजकूर तर शेअरही करता येत नाही इतका भयानक आहे. तेव्हा हत्या निषेधार्हच, परंतु अशा टिनपाट म्हणजे एरवी कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या पत्रकाराला का व कोणी उचलून धरले असावे? या हत्येनंतर पत्रकार म्हणून असलेल्या त्यांच्या योग्यतेपेक्षा त्यांना कोणी मोठे केले असावे? तर त्या कम्युनिस्ट होत्या हे त्यामागचे कारण. कम्युनिस्टांचे नेटवर्क पाहता हे किती सोपे आहे हे लक्षात यावे. यापलीकडे जाऊन बिशप लोकांच्या राष्ट्रीय पातळीवरील संघाने या त्रयीसह गौरी यांचे नाव जोडून निषेधाचे पत्र जाहीर करण्याचा कांगावा केला. याच टिनपाट पत्रकाराच्या हत्येचा थेट अमेरिकेतून सरकारी पातळीवरून उल्लेख झाला. यामागे कोण असावे? हत्या झाल्याच्या काही तासांमध्येच युजुअल सस्पेक्ट्सनी संघाला दुषणे देऊन टाकली. एवढेच काय, पुरस्कारपरतीब्रिगेडफेम गणेश देवींसारखे महाभाग केवळ हत्येवरून नव्हे तर त्यामागे कोण आहे यावरून मोर्चा काढून मोकळे झाले. मारेकरी न सापडणे हे खरोखर समजण्यापलीकडचे आहे. हत्यांच्यावेळी केन्द्रात वा राज्यात कोणाचे सरकार होते यावरूनचा खेळ सोयीस्करपणे खेळला जातो. मात्र तरीदेखील कलबुर्गी व आताची हत्या या पूर्णपणे कर्नाटकमधील काँग्रेस सरकार असताना झालेल्या असूनही त्यांचा कसलाच सुगावा लागत नाही यामागचे कारण काय असेल याचा विचार करताना कोणी दिसते का? मुळात गौरी यांना संरक्षण न देण्याचा तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा किती जणानी आतापर्यंत उल्लेखला यावरूनही हे लक्षात यावे. संघाला दुषणे देणार्या राहूल गांधी यांना याबद्दल विचारणे कोणालाही महत्त्वाचे वाटले नाही. गौरी यांच्याबद्दल कुतिया म्हणणारे ट्विट करणार्या महाभागाला इंडियन एक्सप्रेसने सुरतमधून शोधून काढले. त्याला या असंवेदनशील भाषेत काही गैर वाटत नाही. अशी मानसिकता असलेले दोन्ही बाजूंचे लोक सर्रास सापडतात. तरीही या व्यक्तीच्या ट्विटचा केवढा गवगवा केला गेला हे आपण पाहिले. अशा लोकांना त्यांच्या पातळीवरून सोडून देऊन दुर्लक्ष करण्याऐवजी राजकारणीही त्यांना उचलून धरतात आणि आकाश कोसळल्याचा आभास निर्माण करतात. यावरून राजकारण्यांना म्ृत व्यक्तीशी काहीतरी घेणे आहे का व त्यांना नक्की काय हवे आहे हे कळू शकते. राहूल गांधी व येचुरींची नेहमीची प्रतिक्रिया तर व्यक्ती वा घटनेचे नाव बदलून तशीच्या तशी कॉपीपेस्ट करावी अशा प्रकारची असते यावरूनही हे कळते. बदनामीच्या खटल्यावरून राहूल गांधी यांचे हात पोळलेले आहेत, त्यामुळे ते संघाला थेट जबाबदार न धरता काठाकाठाने आरोप करताना दिसले. वर उल्लेखलेल्या त्रयीच्या हत्या व आताची गौरी यांची हत्या यांना एका सुत्रात बांधण्याचा मोह अनेकांना होतो. अक्षरनामा व बिशप संघाने तोच उद्योग केल्याचे वर म्हटलेच आहे. मात्र या लोकांना बिहारमधील पत्रकारांच्या हत्यांशी काही घेणेदेणे नसते. याचे कारणही माहित आहे. येचुरींनी वा राहूल गांधींनी शहाबुद्दीन-लालू संबंध उघड करणार्या पत्रकारांच्या हत्यांचे किंवा संघ-भाजपच्या कर्नाटकातील कार्यकर्त्यांच्या हत्यांचा उल्लेख जरी केला तरी यांना हवा तसा दुष्प्रचार करता येणार नाही हे यांचे दुखणे आहे. हिंदुत्वाला बदनाम करण्याचा आततायीपणा करणार्या कर्नाटकातील संघटनांचे कोणाला मारहाण कर किंवा इतर काही कर या उद्योगांचा केवढा मोठ्या प्रमाणावर निषेध केला जातो व त्याच कर्नाटकातील संघ-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या यांच्याकडून कशा दुर्लक्षिल्या जातात यावरूनही हे कळावे. पुण्यातील मुस्लिम तरूणाच्या हत्येचा म्हणा किंवा अखलाखच्या हत्येचा देशभर गवगवा होतो, याही हत्या निषेधार्हच आहेत, परंतु हेच बिहारमध्ये हत्या झालेल्या पत्रकारांच्या किंवा कर्नाटकमध्ये हत्या झालेल्या भाजप-संघ कार्यकर्त्यांच्या नशिबी का नसावे? एकूण राजकीय वातावरण किती दूषित झालेले आहे हे पाहता व माध्यमांचा त्यातील मोठा वाटा पाहता एखादी घटना झाल्यावर संयत विधाने केली जावीत व राज्य वा केन्द्र पातळीवरील पदाधिकार्यांच्या प्रतिक्रियाच ग्राह्य धरल्या जाव्यात, ट्विटर व फेसबुकवरील इतरांच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष केले जावे यासाठीचे आवाहन करताना कोणीच दिसत नाही हे पाहिले तर विखारी हत्यांचे असहिष्णु सोहळे कोणालाच नको आहेत असे नाही हे कळावे. तुम्ही उल्लेख केलेल्या बाबा-बुवांच्या संस्क्ृतीबरोबरच एकूणच राजकारणाचे गुन्हेगारीकरण अाणि माध्यमांमधील जीवघेणी स्पर्धा या गोष्टीदेखील या असहिष्णुपणाच्या मागे आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्यातल्या माध्यमांच्या क्रूरपणाबद्दल अनेकदा बोलले जाते. मात्र राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा सर्वमान्य झालेला मुद्दा सर्वांनी ग्ृहितच धरलेला आहे व त्याबाबत काही करता येण्यासारखे नाही असेच समजले जाताना दिसते. हेदेखील माझ्या द्ृष्टीने या असहिष्णुपणाचे कारण आहे. दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी मोजताना या वास्तवाकडे आपणा सर्वांचे दुर्लक्ष होते.