अजूनकाही
हल्लीच्या तरुण पिढीच्या संसारात 'इगो प्रॉब्लेम' नामक समस्येमुळे खूप प्रश्न निर्माण होतात. पती-पत्नी दोघंही नोकरीला असले आणि त्यांना एकमेकांसाठी वेळ देणं जमलं नाही की, त्यांच्या एकमेकांकडून असलेल्या छोट्या-छोट्या अपेक्षाही पूर्ण होत नाहीत. त्यातून 'इगो प्रॉब्लेम' निर्माण होऊन कधी कधी संसार मोडकळीस येऊ लागतो. अनेकदा याची परिणती पती-पत्नीच्या विभक्त होण्यात होते. त्यासाठी एकमेकांना समजून घेऊन मनातील गोष्टी कळण्यावर भर दिला, तर त्यामध्ये दोघांचंही हित आहे असं अनेकदा सांगितलं जातं.
दिग्दर्शिका स्वप्ना जोशी-वाघमारे यांचा 'तुला कळणार नाही' हा नवीन मराठी चित्रपट याच समस्येवर आधारित आहे. अलीकडे याच समस्येवर 'मला काही प्रॉब्लेम नाही' नावाचा चित्रपट येऊन गेला होता. त्यामध्ये फक्त 'प्रॉब्लेम' नीट मांडला होता, परंतु 'तोडगा' अधांतरी होता. 'तुला कळणार नाही' या चित्रपटातही 'प्रॉब्लेम' फक्त कळल्यासारखा भासतो, मात्र 'कळलं पण उमगत नाही' अशा स्वरूपाचं चित्रपटाचं एकंदर सादरीकरण आहे. त्यामुळे चित्रपट पहिल्याचा निखळ आनंद वा समाधान मिळत नाही.
'तुला कळणार नाही' ही राहुल-अंजली यांची एक चकचकीत रोमँटिक लव्ह स्टोरी आहे. राहुल एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरीला असतो, तर अंजली फॅशन फोटोग्राफर असते. दोघांनाही भरपूर पगार. त्यामुळे सुखासीन जगण्यात दोघंही मग्न. मात्र दोघंही एकमेकांच्या छोट्या-छोट्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडणं आणि पर्यायानं अबोला हे क्रमप्राप्त होतं. त्याला कंटाळून दोघं शेवटी घटस्फोटाची तयारी करतात.
मात्र एका प्रवासानिमित्त ते दोघं एकत्र येतात. (हा प्रवास सहजगत्या वा योगायोगानं होत नाही, तर तो दिग्दर्शिकेनं 'घडवून' आणला आहे असं जाणवतं.) आणि या प्रवासादरम्यान अशा काही घटना घडतात की, त्या दोघांचं (अपेक्षेप्रमाणे) मनोमीलन होतं. ते पुन्हा एकत्र येतात.
चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते मध्यंतरापर्यंत राहुल-अंजलीच्या संसारातील खटके छान रंगवले आहेत. त्यामध्ये किरकोळ आणि ऐकलेले विनोद असले तरी 'खटकेबाज' संवादामुळे ते सुसह्य झाले आहेत. मात्र मध्यंतरानंतर राहुल-अंजलीचा जेव्हा गोव्याला कारमधून प्रवास सुरू होतो, तेव्हा कथेची गाडी अचानक भरकटत जाते. त्यामुळे चित्रपटाची कथा सलग व प्रवाही न राहता तिला काही (अनावश्यक) 'ठिगळं' लावली आहेत, हे प्रकर्षानं जाणवतं.
बबडू नावाच्या एका प्रियकराची सापडलेली डायरी त्याच्या प्रेयसीला देणं हा खरा तर राहुलच्या गोवा-भेटीचा मुख्य हेतू असतो. (स्वतःचं लग्न मोडीत निघालेलं असताना हा उपदव्याप करणं म्हणजे एक विनोदच वाटतो.) मात्र अंजलीबरोबरच्या या प्रवासात राहुलला मेनका नावाची एक छम्मकछल्लो भेटते. ('वन नाईट स्टँड'साठी राहुलच्या मुंबईच्या मित्रानं राहुलसाठी तिला पाठवलेलं असतं म्हणे! हाही तसा एक विनोदच म्हटला पाहिजे.)
मेनकेनं एका गाण्याद्वारे केलेली राहुलशी 'जवळीक' अंजलीचा जळफळाट उत्पन्न करणारी असली तरी अंजली-राहुल दोघेही या मेनकेची तिच्या दुरावलेल्या प्रियकराशी भेट घडवून आणण्यात मदत करतात. (चित्रपटाची कथा दुरावत चालल्याचा पहिला पुरावा!) विशेष म्हणजे याच प्रवासात अंजलीला तिचं दुरावलेलं 'माहेर'ही (आई-वडील) परत मिळतं. (अंजली घरातून पळून गेलेली असते हेही रहस्य यानिमित्तानं पहिल्यांदाच कळतं!) आणि ज्या प्रेयसीसाठी डायरी लिहिलेली असते तो बबडू आणि त्याची प्रेयसी नंदिनी हे दोघं लग्नानिमित्त आधीच एकत्र आलेले असतात. त्यांना फक्त त्यांची 'दुरावलेली' डायरी राहुलमुळे परत मिळते. आता सगळीच दुरावलेली माणसं (आणि डायरीसारख्या वस्तू) एकत्र येऊ लागल्यानंतर राहुल-अंजली यांनी काय पाप केलं? म्हणून तेही शेवटी एकत्र येतात!
चित्रपटाची कथा सुरुवातीपासूनच राहुल-अंजली भोवती फिरते. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची 'राहुल-अंजली'ची रोमँटिक जोडी छान शोभून दिसली आहे. सुबोध भावेनं सांसारिक होरपळीत अडकलेल्या पतीच्या विविध भावमुद्रा वेगवेगळ्या प्रसंगात प्रभावीपणे प्रकट केल्या आहेत. सोनाली कुलकर्णीनंही अंजलीच्या 'इगो प्रॉब्लेम'चं वेळोवेळी छान दर्शन घडवलं आहे. राहुलच्या मित्राच्या भूमिकेत सुशांत शेलारही चमकून गेला आहे. उदय टिकेकर, नीता शेट्टी, जयंत वाडकर, अनुराधा राजाध्यक्ष यांच्याही भूमिका ठीक आहेत. प्रसाद भेंडे आणि संदीप धुमाळ यांच्या उत्तम छायाचित्रणामुळे चित्रपट चकचकीत होण्यास मदत झाली आहे.
या चित्रपटात 'तुला कळणार नाही' हे (पार्श्व) गाणं अधूनमधून वाजत राहतं. त्यावर साहजिकच 'कळलं, पण उमगत नाही' अशी चित्रपट पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया होते.
लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment