‘हिरो’ला ‘हिरोपण’ देणाऱ्या माणसांची गोष्ट
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • 'लक बाय चान्स'चं एक पोस्टर
  • Sat , 09 September 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar लक बाय चान्स Luck by chance फरहान अख्तर Farhan Akhtar कोंकणा सेन शर्मा Konkona Sen Sharma चल मेरी धन्नो Chal Meri Dhanno रोहित शेट्टी Rohit Shetty स्टंटमॅन Stuntman स्टंटवुमन Stuntwoman

'लक बाय चान्स' हा चित्रपट बॉलिवुडमधल्या स्ट्रग्लर्सच्या आयुष्यावर प्रकाश टाकतो. या चित्रपटातली दोन्ही मुख्य पात्रं अभिनयाच्या क्षेत्रात संघर्ष करत असतात. हा चित्रपट एकूणच बॉलिवुडमध्ये कसं काम चालतं, यावर खुसखुशीत भाष्य करतो. हे भाष्य करत असताना बॉलिवुडमधल्या अभिनय सोडून इतर क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यावसायिकांवरही प्रकाश टाकतो. नायिकेकडून एक अवघड ओळ म्हणून घेता घेता जेरीला आलेला अनुराग कश्यपचा चित्रपट लेखक, प्रचंड अंधश्रद्धाळू आणि मेंदूच्या जागी हृदयानं विचार करणारा ऋषी कपूरचा निर्माता, हिरो-हिरोईन बनण्यासाठी मुंबईत आलेल्या लोकांना काम मिळवून देणारा एजंट, असे अनेक अतरंगी नमुने या चित्रपटात आहेत.

या चित्रपटात एक सुंदर सीन आहे. विक्रम (फरहान) सोनाच्या (कोंकणा सेन) च्या घरी आलेला असतो. सोना बाहेर जाऊन कुठूनतरी दूध घेऊन येते. ‘इतका वेळ तू कुठे गायब होतीस?’ अशी विक्रम तिला विचारणा करतो. त्याच्या या साध्या प्रश्नाला सोना जे उत्तर देते, ते बॉलिवुडच्या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित पेशाकडे आपलं लक्ष वेधतं. सोना विक्रमला सांगते की, तिचा फ्रिज बिघडला असल्यामुळे ती शेजारच्या वर्मा आंटीच्या फ्रिजमध्ये दूध ठेवते, ते दूध घ्यायला ती गेली होती. विक्रमला इतकी चांगली शेजारीण सोनाला मिळाली आहे याबद्दल कौतुक वाटतं. पण लगेच सोना त्याला अपडेट करते, वर्मा आंटी याचे तिच्याकडून पैसे घेत असतात. थोडक्यात फ्रिज भाड्यानं देत असतात.

वर्मा आंटीची असं करण्यामागे काही कारणं असतात. त्यांचे पती एकेकाळी स्टंटमास्टर असतात. एका अवघड स्टंटचं शूटिंग करताना त्यांना मोठा अपघात होतो आणि ते अपंग होऊन अंथरुणाला खिळतात. "वर्मा आंटी को भी अपना घर चलाना है," असं सोना वर्मा आंटीच्या वागण्याचं स्पष्टीकरण देते. 'लक बाय चान्स'मधला हा सीन इंडस्ट्रीमधल्या सगळ्यात धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो लोकांच्या अवस्थेवर भाष्य करतो. स्टंटमॅन लोकांचं क्षेत्र. 

स्टंटमॅनचं काम या देशातले लाखो-करोडो लोक बघतात. पडद्यावर आपले आवडते नायक-महानायक जे अचाट कारनामे करत असतात, ते खरं तर स्टंटमॅन लोकांनी केलेले असतात. पण प्रेक्षकांच्या मनात कौतुकाचं भरत येतं ते आपल्या आवडत्या हिरोबद्दल. आज रजनीकांत, अभमिताभ बच्चन, सलमान खान अशा लोकांची जनमानसात ‘लार्जर दॅन लाईफ इमेज’ आहे, त्यामागे त्यांच्यासाठी जीवावर बेतणारे स्टंट करणाऱ्या शेकडो अनाम लोकांचा हातभार आहे. 

एक अतिशय धोकादायक पण थॅंकलेस काम ही स्टंटमॅन मंडळी करत असतात. त्यांच्या कामाला कोणी दाद देत नाही, त्यांच्यासाठी कुणाच्या डोळ्यात पाणी येत नाही, त्यांच्यासाठी कधी कौतुकाचे चार शब्द बोलले जात नाहीत.

देशात जे ढीगभर चित्रपट पुरस्कार सोहळे होतात, त्यांच्यात त्यांच्या कामासाठी पुरस्काराची श्रेणीच नसते. तरी पण कधी कामावरच्या प्रेमापोटी तर कधी पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाज म्हणून अनेक लोक स्टंटमॅन म्हणून कार्यरत आहेत. 'लक बाय चान्स'मधल्या वर्मा अंकलसारखे अनेक स्टंटमॅन आज पंगू होऊन घरी बसले आहेत आणि हजारो वर्मा आंटी फ्रिज भाड्यानं देणं आणि इतर फुटकळ पडेल ती कामं करून घर चालवत आहेत.

काही दिवसांपूर्वीच एका कन्नड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेलिकॉप्टरमधून नदीत उडी मारण्याचा अवघड स्टंट करताना दोन स्टंटमॅन मृत्युमुखी पडले. मुख्य अभिनेता दुनिया विजय थोडक्यात बचावला. हिरोसाठी जे सेफ्टी मेझर्स घेतले होते, ते या स्टंटमॅन लोकांसाठी घ्यावेत अशी निकडच कुणाला वाटली नाही. त्याची किंमत या दोन स्टंटमॅनला प्राणांची किंमत देऊन मोजावी लागली.

स्टंटमॅन लोकांना शूटिंगच्या प्रक्रियेत सतत गृहीत धरलं जातं. त्यांनी जीवाचा धोका पत्करून ज्या सिनेमामध्ये काम केलेलं असतं, ते सिनेमे शंभर कोटी क्लबमध्ये जातात. पण आठ तासाच्या एका शिफ्टचे या लोकांना फक्त साडेतीन हजार ते सहा हजार रुपये मिळतात. कामाचं स्वरूप खूप फिजिकल असल्यामुळे त्यांची कारकीर्द अल्प काळाची असते.

या स्टंटमॅन लोकांचा कुठलाही विमा उतरवलेला नसतो. त्यामुळे सेटवर काम करताना गंभीर दुखापत झाली किंवा मृत्यू आला तरी या लोकांना कुठलीही भरपाई दिली जात नाही. अनेकदा अशा स्टंटमॅन लोकांचे परिवार त्यांच्या अपघातानंतर उघड्यावर आल्याची उदाहरणं आहेत.

आपल्याकडे फिल्मफेअर, स्टारडस्ट, आयफा, झी सिने अवॉर्डस असे ढीगभर चित्रपटविषयक पुरस्कार आहेत. पण एकाही पुरस्कार समारंभात या पडद्यामागच्या नायकांना जागा नाही. स्टंटचं क्षेत्र फक्त पुरुषांचं आहे असा एक गैरसमज आहे. या क्षेत्रात अनेक स्त्रियाही आहेत. 'शोले'मधला तो हेमामालिनीचा 'चल मेरी धन्नो'वाला पाठलागाचा सीन आठवत असेल. त्या सीनमध्ये हेमामालिनीची बॉडी डबल म्हणून रेश्मा या स्टंटवूमननं काम केलं आहे. तो सीन करताना तिला बरंच खरचटलं होतं.

सध्या प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ यांच्यासारख्या आघाडीच्या हिरोईनसाठी स्टंट करणारी सनोबर पाडीवाल ही आघाडीची स्टंटवूमन आहे. या स्टंटवूमनच्या स्वतःच्या अनेक समस्या आहेत. 

या लोकांच्या समस्याबद्दल या इंडस्ट्रीमधल्या फारसं कुणी बोलताना दिसत नाही. अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि अजय देवगणचा अपवाद वगळता या विषयावर कुणी काही बोलल्याचं आठवत नाही. रोहित शेट्टी आणि अजय देवगणचे वडील स्वतः स्टंटमास्टर होते, म्हणून त्यांना या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबद्दल विशेष जिव्हाळा आहे. 

आपल्याकडे रोहित शेट्टी आणि त्याच्या सिनेमातल्या हवेत उडणाऱ्या गाड्या यांची टिंगल टवाळी नेहमी केली जाते. रोहित शेट्टीचे सिनेमे ज्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे, त्यात या हवेत उडणाऱ्या गाड्या हे एक महत्त्वाचं कारण आहे. किंबहुना रोहितच्या सिनेमात ही एकच गोष्ट गुरुत्वाकर्षणाचे नियम पाळते, असे विनोदही केले जातात. पण त्या गाड्या हवेत उडण्याचा जो काही सेकंदांचा सीन असतो, त्यासाठी त्या गाडीत बसणाऱ्या स्टंटमॅननं आपले प्राण पणाला लावलेले असतात.

रोहितनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, अशा अवघड स्टंट सीनमध्ये कितीही सेफ्टी मेझर्स घेतल्या तरी धोका पूर्णपणे टाळता येत नाही. असा सीन शूट करणं चालू असताना मी मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत असतो, असंही रोहितनं या मुलाखतीमध्ये म्हणाला होता.

रोहितच्या शूटिंगच्या सेटवर कायम स्टंटमॅन लोकांसाठी अॅम्ब्युलन्स तयार असते. 'चेन्नई एक्स्प्रेस'चं शूटिंग चालू असताना अशाच एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान कारमधून पेट्रोल लिक झालं आणि शंकर नावाचा स्टंटमॅन भाजून निघाला. त्यानं फायर सूट घातला होता. तरी उपयोग झाला नाही. रोहितनं शूट थांबवलं आणि स्वतः शंकरला हॉस्पिटलला घेऊन गेला. त्याच्याजवळ थांबला. दोन दिवस तो तिथंच होता. पण रोहितसारखी माणसं विरळा आहेत. एरवी स्टंटमॅनना वाऱ्यावर सोडून देण्यासाठीच बॉलिवुड इंडस्ट्री कुख्यात आहे.

याबाबतीत हॉलिवुडशी तुलना करण्याचा मोह टाळता येत नाही. तिथं स्टंटमॅनसाठी सर्वोच्च दर्ज्याचे सेफ्टी मेझर्स घेतले जातात. स्टंट मास्टरला शूटिंग सुरू होण्याच्या अगोदर बाउंड स्क्रिप्ट मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना विम्याचं संरक्षण आहे. भारतीय स्टंटमॅनना विम्याचं संरक्षण मिळावं म्हणून अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीसारखी मंडळी प्रयत्न करत आहेत, पण त्याला यश मिळत नाही. 

रोहित शेट्टीचे उडत्या गाड्यांचे सीन असणारे चित्रपट काही लोकांना न आवडणं एकदमच स्वाभाविक आहे किंवा पडद्यावर नायक अॅक्शन सीनच्या नावाखाली जे अतर्क्य काम करतात, ते पसंत न पडणंही समजू शकतो. काय आवडावं काय आणि काय आवडू नये हा शेवटी आपापल्या अभिरूचीचा भाग असतो. पण अशा प्रसंगाची खिल्ली उडवताना थोडं तारतम्य बाळगलं जावं असं वाटतं. कारण हे सीन पडद्यावर आपल्याला दिसावेत म्हणून अनेक अनाम स्टंटमॅन आणि स्टंटवूमन लोकांनी आपले जीव धोक्यात घातलेले असतात. 

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......