क्रिकेटमधील बेटिंग आणि फिक्सिंगच्या काळ्या बाजूवर झगझगीत प्रकाशझोत टाकणाऱ्या प्रख्यात शोधपत्रकार शंतनु गुहा राय यांच्या ‘फिक्स्ड् - कॅश अँड करप्शन इन क्रिकेट’ या बहुचर्चित पुस्तकाचा मराठी अनुवाद इंद्रायणी साहित्य प्रकाशनानं नुकताच प्रकाशित केला आहे. मुकेश माचकर यांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकातील एक थरारक अंश...
.............................................................................................................................................
तो दिवस होता १७ मार्च २००७. विश्वचषकाचं नववं पर्व सुरू होऊन तीन दिवस झाले होते. इंझमाम उल हकच्या नेतृत्वात खेळणारा पाकिस्तानी संघ आरामात विजयी होईल, या आशेनं अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाहून आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी किंग्स्टन, जमैका येथील सबिना पार्क क्रिकेट मैदानाचे सगळे स्टँड भरले होते. दक्षिण आशियातल्या या बलाढ्य संघाला कॅरिबियन बेटांवर या सामन्यापर्यंत निराशेचाच सामना करायला लागला होता. त्याच मैदानावर १३ मार्च रोजी यजमान वेस्ट इंडिजबरोबर झालेला उद्घाटनपर सामना त्यांनी गमावला होता. जिंकायला २४२ धावा करायच्या असताना ते सर्वबाद १८७ अशा दयनीय स्कोअरवर उन्मळून पडले होते.
साहजिकच हा सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा होता. प्रतिस्पर्धी होता क्रिकेटमध्ये तोवर लिंबूटिंबूच गणला जाणारा आयर्लंडचा संघ. सेंट पॅट्रिक या आयर्लंडच्या राष्ट्रीय संताच्या जन्मदिवशी, आयर्लंडमधल्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी, ढगाळ आकाशाखाली हिरव्या जर्सींची ही लढाई झाली. आयरिश खेळाडूही क्रिकेटच्या परिभाषेत हिरवे-कच्चेच होते. तरीही त्या काळात एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगात चौथ्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान त्या दिवशी त्यांच्याकडूनही हरला. प्रथम फलंदाजी करताना हा संघ लागोपाठ विकेट फेकत फक्त १३२ धावांवर गुंडाळला गेला. आयरिश संघानं क्षेत्ररक्षणात कमाल केली. तब्बल २३ वाइड बॉल्सची खिरापत ही त्यांची एकमात्र मोठी गफलत होती. बाकी सगळी पाकिस्तानी हाराकिरीच होती.
पहिल्या षटकात डेव्ह लाँगफर्ड-स्मिथने मोहम्मद हाफीजला टाकलेला अफलातून चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला, ती आयर्लंडसाठी आनंदसोहळ्याची पहिली संधी होती. बॉयड रॅनकिननं युनूस खानला भोपळाही न फोडता स्लिपमध्ये झेलबाद करवलं, तेव्हा पाकिस्तान १५-२ अशा धावसंख्येवर अडखळत होता. त्या संघाचे चाहते संतप्त झाले होते. काहींनी पाण्याच्या बाटल्या आणि बीयरचे रिकामे कॅन मैदानात फेकायला सुरुवात केली होती. त्यांना पोलिसांनी आवर घातला.
इम्रान नझीर आणि मोहम्मद युसूफ यांनी प्रयत्नांची शिकस्त करून बोर्डावर आणखी ४१ धावा जोडल्या. पण, मग युसूफला ट्रेन्ट जॉन्सनचा वाइड बॉल पॉइंटच्या हातात ड्राइव्ह करण्याची दुर्बुद्धी झाली. पाठोपाठ इंझमामनं खेळीतल्या तिसऱ्याच बॉलला बॅटची कड लावून तो एकमात्र स्लिपच्या हातात पाठवला. आयरिश चाहते संख्येनं कमी होते, पण, त्यांचा उत्साह दुणावला होता. त्यांच्यातल्या काहीजणांच्या शरीरांमधली अल्कोहोलची पातळी उंचावली होती. त्यांनी बॅरिकेडवर चढून उड्या टाकून गोलंदाजाचं अभिनंदन करण्यासाठी मैदानात धाव घेतली.
या उत्साहामुळे आत्मविश्वासात भर पडलेल्या आंद्रे बोथा याने (आठ षटकांत २-५) खतरनाक इनस्विंगर टाकायला सुरुवात केली आणि नझीरसाठी परिस्थिती बिकट बनवली. अखेर बोथानं त्याला २४ धावांवर झेलबाद करवलंच. नझीरच्या गच्छंतीनं पाकिस्तानची मृत्युघंटा वाजवली. कामरान अकमल, मोहम्मद सामी आणि नवव्या विकेटसाठी २५ धावांची जिगरबाज खेळी करणारा इफ्तिकार अंजूम यांच्या प्रयत्नांच्या शर्थीनंतरही विकेट एकापाठोपाठ एक कोसळत राहिल्या. पाकिस्तानची इनिंग्ज ४६ षटकांत आटोपली.
त्यानंतर आयर्लंडच्या खेळाडूंनी बेहतरीन कामगिरी केली. विकेटकीपर फलंदाज निआल ओब्रायनच्या अप्रतिम नेतृत्वाखाली त्यांनी पावसामुळे १२८ धावांवर आलेलं लक्ष्य जवळपास संपूर्ण अंधार झालेला असतानाही तीन गडी राखून पार केलं.
या पराभवानं पाकिस्तान आयसीसी वर्ल्ड कपच्या स्पर्धेतूनच बाहेर फेकला गेला होता. त्याक्षणी मैदानात मौजूद असलेल्या आणि जगभरात विखुरलेल्या पाकिस्तानी चाहत्यांसाठी ही सर्वांत दु:खदायक गोष्ट होती. नाराज चाहत्यांनी कराची, लाहोर आणि रावळपिंडीमध्ये मोटारींवर दगडफेक केली आणि दुकानं बळजबरीनं बंद करवली. इकडे मैदानात घुसलेल्या चाहत्यांनी ड्रेसिंग रूमचा रस्ता अडवून क्रिकेटपटूंनी आपल्याशी बोलावं, अशी मागणी केली. अखेर दंगलनियंत्रक पोलिसांना भोवती कडं करून खेळाडूंना संघाच्या बसकडे न्यावं लागलं.
पाकिस्तानी संघाचा भाग असलेल्या, पण, खेळाडू नसलेल्या एका माणसाला या प्रकारानं प्राणांतिक धक्का बसला होता. ते होते प्रशिक्षक बॉब वुल्मर. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यातल्या पराभवानंतरच त्यांची हकालपट्टी झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. भारत आणि पाकिस्तानातल्या उपद्रवी वार्ताहरांनी या अफवांच्या शिडांमध्ये हवा भरली होती. आयर्लंडनं दिलेल्या झटक्यानंतर या अफवा आणखी वेगानं पसरू लागल्या. पाकिस्तानच्या कामगिरीने वुल्मर हताश झाले होते. 'आमच्यासाठी वर्ल्ड कप संपला आहे. मला आज रात्री झोप येणार नाही. आम्ही पुरेशी धावसंख्या का उभारू शकलो नाही हे मला समजू शकत नाही,' असं या सामन्यानंतर निराशेच्या गर्तेत कोसळलेले वुल्मर म्हणाले.
त्यानंतर ते पत्रकार परिषदेतून बाहेर निघून गेले. ग्रेहाऊंड बस सुटण्याची वेळ झाली होती. सगळे खेळाडू दगडी चेहऱ्यानं वाट पाहात होते.
जमैकाच्या पेगासस हॉटेलात पोहोचल्यानंतर वुल्मर यांनी त्यांची खोली सोडलीच नाही. सामन्याबद्दल चर्चा करण्यासाठी काही खेळाडू त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चर्चा करूयात असं सांगितलं. त्यानंतर जे घडलं त्यानं क्रिकेटजगतात प्रचंड उलथापालथ होणार होती. बॉब वुल्मर पहाटेच्या वेळी त्यांच्या खोलीच्या प्रसाधनगृहात मृतावस्थेत सापडले.
तिथं पोहोचलेल्या पोलिसांनीच खेळाडूंना या भयंकर घटनेची माहिती दिली. काही खेळाडूंना तर झोपेतून उठवलं गेलं. हा खूनच असल्याचं सूचित करणाऱ्या बातम्यांचा महापूर आला. दोन सामन्यांमधली पाकिस्तानची दळभद्री कामगिरी, कॅरिबियन बेटांवर बुकींची मोठ्या संख्येनं उपस्थिती, आशियाई बेटिंग सिंडिकेट्समध्ये झालेलं संगनमत आणि जगभरातल्या क्रिकेटपटूंबरोबर त्यांनी साधलेलं संधान हे सगळं मिळून आता एका रक्तरंजित वळणावर येऊन पोहोचलं होतं. ही बातमी फुटली तेव्हा हॉटेलच्या लॉबीमध्ये बुकींची गर्दी झाली होती. भारत आणि पाकिस्तानातून आलेल्या पत्रकारांबरोबर ते सतत बोलत होते. पण, या पत्रकारांनी काय ऐकलं किंवा एकमेकांमध्ये कशाची चर्चा केली, हे एकाही पत्रकारानं सांगितलं नाही.
त्यामुळे कोणापाशीही निश्चित उत्तर नव्हतं. जे घडलं ते का, कधी, कसं घडलं हे जाणून घ्यायला प्रत्येकजण उत्सुक होता. पोलिसांनी एकच धोशा लावला होता, वुल्मर यांचा मृतदेह प्रसाधनगृहात सापडला. पत्रकारांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांवर एकच स्टँडर्ड उत्तर दिलं जात होतं : तपास चालू आहे. कोणाची चौकशी होईल का, या अगतिकतेनं विचारल्या गेलेल्या प्रश्नावर पोलिसांनी उत्तर द्यायला नकार दिला.
या घटनाक्रमामुळे हॉटेलचे कर्मचारी चिंतित आणि अस्वस्थ दिसत होते. सगळेजण शंका व्यक्त करत होते, या मृत्यूला हत्या म्हणत होते, पण कोणीही कसलाही दुवा पुरवू शकत नव्हतं. हॉटेलचा बार आणि कॉफी शॉप यांच्यात पुढे अनेक दिवस वर्दळ राहिली. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असायचा : पाकिस्तानी प्रशिक्षकाची हत्या कोणी केली?
रविवार, १८ मार्च रोजी हॉटेलच्या १२व्या मजल्यावरील ३७४ क्रमांकाच्या खोलीच्या बाथरूममधल्या पांढऱ्या टाइल्सवर वुल्मर यांचा देह सापडला होता. ते नग्नावस्थेत पाय फाकवलेल्या स्थितीत पाठीवर पडलेले होते. त्यांच्या तोंडातून रक्ताचे ओघळ आले होते आणि भिंती उलटीनं माखल्या होत्या. ते भयंकर दृश्य होतं. क्रिकेटपटू, समालोचक आणि प्रशिक्षक म्हणून गाजवलेल्या सुरेख कारकीर्दीचा तो भयानक शेवट होता.
वुल्मर हे मधुमेही होते. त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ येत असे. पाकिस्तानी संघाच्या सदस्यांनी सुरुवातीला वुल्मर यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं जाहीर केलं होतं. नंतर त्यांनी हे निवेदन बदलून आत्महत्येची शक्यता वर्तवली. मात्र, यात काही कारस्थान असल्याच्या आशंकेचं सावट सगळ्या तपासावर दाटलं होतं; त्यामुळे तेव्हा सुरू असलेली विश्वचषक मालिकाही संशयाच्या गर्तेत सापडली.
वर्ल्ड कपनंतर आपण पाकिस्तानी संघाच्या कप्तानपदावरून पायउतार होणार आहोत आणि एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहोत, अशी घोषणा इंझमाम उल हकनं वुल्मर यांच्या मृत्युनंतर काही तासांतच केली, तिने तणाव वाढला. इंझमामनं कारकीर्दीतला सर्वांत वाईट निर्णय चुकीच्या टायमिंगनं जाहीर केला, अशी टीकेची फैर पाकिस्तानातल्या माजी खेळाडूंनी तात्काळ झाडली. इंझमामवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही, आपला निर्णय अंतिम आणि अपरिवर्तनीय आहे, याचा त्यानं पुनरुच्चार केला. टीकाकारांची आपण पर्वा करत नाही- 'माझ्या संपूर्ण आयुष्यात त्यांना काही स्थान नाही'- असं तो म्हणाला.
पाकिस्तानी संघ पुन्हा क्रिकेट खेळू लागला. २१ मार्च रोजी त्यांच्या विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात या संघानं झिम्बाब्वेचा ९३ धावांनी पराभव केला आणि तो विजय त्यांनी दिवंगत प्रशिक्षकाला अर्पण केला. अर्थात तो सामना खिजगणतीत धरण्याजोगा नव्हता.
त्यानंतर एकाच दिवसाच्या अंतरानं धक्कादायक अधिकृत घोषणा झाली… वुल्मर यांचा खरोखरच खून झाला होता. तपासकार्याचं नेतृत्त्व करणारे जमैका कॉन्स्टॅब्युलरी फोर्सचे पोलिस उपायुक्त मार्क शील्ड्स यांनी एका पत्रकार परिषदेत 'अज्ञात व्यक्तीनं गळा आवळल्यानं श्वास गुदमरणं' हे मृत्यूचं कारण असल्याचं घोषित केलं. पाकिस्तानी खेळाडूंना मोठा धक्का बसला. त्यांची भीती खरी ठरली होती. काही तरुण खेळाडू रडत होते. त्यांचे सीनियर समजूत काढत होते आणि पत्रकारांना अधिकृतपणे मांडल्या गेलेल्या तथ्यांनाच चिकटून राहण्याची तसंच अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती करत होते.
एखाद्या फिल्मस्टारसारखे देखणे आणि उत्कृष्ट फिटिंगचा सूट परिधान केलेले मार्क शील्ड्स हे स्कॉटलंड यार्डच्या तरबेज, आत्मविश्वासपूर्ण इंग्लिश डिटेक्टिव्हसारखेच दिसत होते. कारकीर्दीत ते जिथं जिथं गेले, तिथं तिथं त्यांनी चांगली छाप पाडली होती. त्यांचं काम त्यांना उत्तम प्रकारे कळत होतं. त्यांची लक्षणीय कारकीर्द अनेक देशांमधल्या कामगिऱ्यांनी भरलेली होती. सहा फूट सात इंचांची तगडी उंची लाभलेल्या या घटस्फोटित पोलिस अधिकाऱ्यानं जगभ्रमंती करून गुन्हेगारांचा छडा लावून धडा शिकवण्याची हेवा वाटावा अशी ग्लॅमरस कारकीर्द उपभोगली होती. पण, एका वयोवृद्ध क्रिकेट प्रशिक्षकाच्या हत्येची ही केस कठीण होती. शील्ड्स यांनी ही आयुष्यातील सर्वांत मोठी कामगिरी असल्याचं सांगितलं होतं.
मार्क शील्ड्स कामात गर्क झाले होते. ही कामगिरी स्वीकारल्यानंतर काही तासांतच त्यांचा पहिला अहवाल आला. सुरे आणि बंदुका खेळवणारे जमैकन गँगस्टर वुल्मर यांच्या हत्येला जबाबदार नाहीत, असा आपला विश्वास आहे, असं त्यांनी स्थानिक पोलिस आणि प्रसारमाध्यमांना सांगितलं. वुल्मर यांचा गळा आवळण्यासाठी एक टॉवेल वापरला गेल्याची शक्यता सर्वाधिक आहे, असं ते म्हणाले. आशियातील माफिया-संचालित, बेकायदा पण शक्तिशाली क्रिकेट बेटिंग सिंडिकेटकडे त्यांचा अंगुलीनिर्देश होता. मात्र, त्यांना कोणताही ठोस दुवा सापडला नाही. हॉटेलच्या सुरक्षाव्यवस्थेत कसलीही त्रुटी असल्याचा पेगाससच्या अधिकाऱ्यांनी इन्कार केला.
पाकिस्तानी संघात चालणाऱ्या रोखीच्या व्यवहारांचा गौप्यस्फोट करण्याची धमकी वुल्मर यांनी दिल्याची अफवा होती; त्यांचा आवाज शांत करण्याची ही सुपारी होती का? वुल्मर यांनी लाहोरमधील मुक्कामात आणि रावळपिंडी, मुलतान आणि कराची येथील प्रवासात पाकिस्तानातल्या कुख्यात माफियांबद्दल बरीच माहिती गोळा केली होती, असा काही पाकिस्तानी पत्रकारांचा दावा होता. तरीही किंग्स्टनमध्ये कोणीही ठोस दुवा देऊ शकलं नाही. त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर दोन दिवसांनी तिकडे दूर नवी दिल्लीमध्ये पोलिसांना सजगतेचा इशारा दिला गेला आणि काही दुवे मिळवण्यासाठी भारताच्या या राजधानीत बेटिंगच्या काही अड्ड्यांवर छापे मारून त्यांनी काहीजणांना अटक केली.
या खुनाशी भारताचा काय संबंध होता? भारताचा बांगलादेशानं केलेला पराभवही इंटरपोलच्या स्कॅनरखाली आला होता आणि त्यांनी बेकायदा बेटिंग सिंडिकेट चालणाऱ्या अनेक देशांना सजगतेचा इशारा दिला होता. भारतातील काही शहरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रोख रकमांची देवाणघेवाण झाल्याचं ब्रिटिश आणि भारतीय गुप्तचरांच्या लक्षात आलं होतं. दोन्ही सामन्यांवर (भारताचा बांगलादेशाकडून पराभव आणि पाकिस्तानचा आयर्लंडकडून पराभव) मोठ्या बेट लागल्या असाव्यात, याच्या पुरेशा सूचना मिळाल्या होत्या, हे दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्यांनी मान्य केलं; मात्र संशयितांवर गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसा प्रबळ पुरावा काही त्यांना मिळाला नाही.
इकडे जमैकामध्ये पाकिस्तानी संघासाठी परिस्थिती आणखी अवघड झाली होती. पंटरांशी हातमिळवणी करून संघसदस्यांनीच वुल्मर यांचा आवाज कायमचा बंद केल्याचा अनेकांचा संशय होता. २४ मार्च रोजी घटनास्थळापासून ३० मैलांवर असलेल्या माँटेगो बे इथून लंडनचं विमान पकडण्यासाठी पाकिस्तानी संघाचे सदस्य तयार होत होते. त्यावेळी त्यांना गाठून पोलिसांनी संघनायक इंझमाम उल हक, सहाय्यक प्रशिक्षक मुश्ताक अहमद आणि व्यवस्थापक तलत अली यांची चौकशी केली. त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटमधल्या कथित संदिग्धतेबद्दल ही चौकशी होत होती. इंझमाम आणि वुल्मर यांच्यात धर्म या विषयावरून संघर्ष असल्याचं अनेक लोकांना माहिती होतं. पाकिस्तानी संघ त्यांच्या कप्तानाच्या नेतृत्वातला भाविक खेळाडूंचा संघ होता आणि हे सगळे खेळण्यापेक्षा जास्त वेळ प्रार्थना करण्यात घालवतात, अशी वुल्मर यांची तक्रार होती. यासंदर्भात इंझमामचे प्रशिक्षकाबरोबर खूप वेळा वाद झाले होते.
चौकशीनंतर बाहेर पडल्यानंतर पत्रकार ओरडत होते, 'इंझी, वुल्मरला कोणी ठार मारलं? तू मारलंस का वुल्मरला?' इंझमामनं पत्रकारांकडे संतापानं पाहिलं, पण तो शांत राहिला आणि त्याची वाट पाहात थांबलेल्या संघाच्या बसमध्ये जाऊन बसला.
वुल्मर यांचे घरगुती मित्र, दक्षिण आफ्रिकेचे पत्रकार नील मॅनथॉर्प नंतर म्हणाले की, जेव्हा त्यांनी वुल्मर यांच्या मृत्युबद्दल ऐकलं तेव्हा सगळ्यात आधी हे धार्मिक कट्टरपंथीयांचं कृत्य असणार, अशी शंका त्यांना आली होती. भारत आणि पाकिस्तानातल्या मॅचफिक्सिंगबद्दल सगळं काही उघडकीस आणणारं पुस्तक प्रकाशित करायचं वुल्मर यांनी ठरवलं होतं आणि ही योजना पत्नीला सांगितली होती; त्यामुळे बहुदा किंग्स्टनमधील अल कायदाशी संबंधित पाकिस्तानी गँगस्टर त्यांचा काटा काढू इच्छित होते, असा काहीजणांचा होरा होता. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अस्वस्थ चाहत्यांनी वुल्मर यांच्यावर निशाणा साधल्याच्याही कहाण्या सांगोवांगीत चर्चिल्या जात होत्या.
पण, यापैकी कशालाही कसलाही दुजोरा नव्हता.
प्रसारमाध्यमांत आणि क्रिकेटजगतात तर्कवितर्क लढवले गेले. काळ्या पैशाचा क्रिकेटवर अवांच्छित पगडा असल्याचं आयसीसीमधल्या अनेकांनी कबूल केलं.
या सगळ्या गदारोळात कॅरिबियन बेटांवर आयसीसी वर्ल्ड कपचे सामने सुरू राहिले. वुल्मर यांना गळा आवळून ठार मारलं असावं, अशी शक्यता २२ मार्च २००७ रोजी दोन आघाडीच्या जमैकन वर्तमानपत्रांनी अनाम पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वर्तवली होती. शनिवारची रात्र आणि रविवारची सकाळ यामधल्या काळात केव्हातरी वुल्मर यांच्या खोलीत त्यांचा गळा आवळला गेला होता, असं सुचवणारा ताजा पुरावा पुढे आल्याचं एका 'उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यानं' सांगितल्याची बातमी जमैका ग्लीनरनं दिली होती. 'वुल्मर यांच्या मानेतील एक हाड ग्रंथींजवळ मोडलं आहे. कोणीतरी त्यावर दाब दिला होता, हे त्यातून सूचित होतं,' असं हा अधिकारी त्या वर्तमानपत्राला म्हणाला होता.
'आम्ही हे हत्येचं प्रकरण म्हणूनच पाहात आहोत,' असं जमैका ऑब्झर्व्हरला निनावी माहिती देणाऱ्यांनी म्हटलं होतं. वुल्मर यांच्या चेहऱ्याच्या खालच्या भागातील हाडे मोडली होती, त्यातून त्यांचा गळा आवळल्याचं सूचित होत होतं, असा या व्यक्तीचा दावा होता.
जमैकामधील विश्वचषक सुरक्षाप्रमुख सहायक पोलिस आयुक्त ओवेन एलिंग्टन यांनी मात्र या दाव्याला दुजोरा द्यायला नकार दिला, असं ग्लीनरनं म्हटलं होतं. सरकारी पॅथॉलॉजिस्टनं वुल्मर यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं होतं. त्यातून या 'संशयास्पद' मृत्यूच्या कारणाविषयी ठोस काही निष्पन्न झालं नव्हतं, असं शील्ड्स म्हणाले. वुल्मर यांच्या पेशींच्या सॅम्पलच्या टॉक्सिकॉलॉजी आणि हिस्टॉलॉजी चाचणीच्या निष्कर्षांची पोलिस वाट पाहात होते.
शील्ड्स हे चौकशीच्या बाबतीत खुलं धोरण ठेवून होते, हे लक्षणीय होतं. वुल्मर यांच्या मृत्यूच्या चौकशीकाळात तरुण इन्स्पेक्टरांना जी काही माहिती मिळायची, तिचे तपशील ते पत्रकारांना देऊ करायचे. शील्ड्स यांना हे तरुण अधिकारी आवडायचे आणि त्यांना ते 'प्रामाणिक पोलिस अधिकारी' म्हणायचे. त्यांनी अनेक रोचक तपशील गोळा केले होते : पराभवाच्या रात्री वुल्मर यांच्या खोलीत एका व्यक्तीच्या उपस्थितीची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केली होती. हे होते संघ व्यवस्थापक तलत अली. वुल्मर यांच्या निधनानंतर पेगाससमध्ये त्यांनी आश्चर्यकारकरित्या आणि अचानक खोटं नाव धारण केलं होतं. मुश्ताक अहमदच्या चेहऱ्यावर ओरखड्याच्या खुणा होत्या. त्यांचं काही स्पष्टीकरण नव्हतं. वुल्मर यांच्या नाकाच्या हाडाखाली कापल्याच्या खुणा होत्या. क्रिकेटमधील अत्यंत हुशार आणि कल्पक माणसांमध्ये गणल्या जाणाऱ्या वुल्मर यांची अत्यंत अस्वस्थताकारक अखेर झाल्याचंच या सगळ्यातून सूचित होत होतं.
आणखीही अनेक कहाण्या चर्चेत आल्या. आयर्लंडबरोबरच्या सामन्यातील पराभवानंतर वुल्मर यांना भेटलेल्या माणसांनी सांगितलं की, वुल्मर 'अतिशय निराश' दिसत होते आणि त्यांना घरी जाण्याची ओढ लागली होती. वुल्मर यांनी एका ईमेलमध्ये ही निराशा व्यक्त केली होती, तेच त्यांचे मृत्यूपूर्वीचे अखेरचे शब्द असावेत.
पत्नी जिल हिला लिहिलेलं हे ईमेल वुल्मर यांच्या हत्येच्या खटल्याच्या वेळी ज्युरीच्या सदस्यांना वाचून दाखवण्यात आलं. 'हाय डार्लिंग, सध्या थोडा निराश झालो आहे, याची तूही कल्पना करू शकतेस,' अशी त्या ईमेलची सुरुवात होती, 'अधिक वाईट काय आहे- एजबॅस्टन येथे उपांत्यपूर्व सामना हरणं की, आता पहिल्याच फेरीत बाद होणं, हेच मला कळत नाहीये. आमच्या फलंदाजांची कामगिरी ढिसाळ होती आणि मला जी भयंकर भीती वाटत होती ती खरी ठरली… खेळाडू काही कारणानं स्वत:मध्ये खेळण्याची आग निर्माण करू शकत नाहीत, हे मला दिसत होतं.'
काय होतं ते कारण? कसली भीती वाटत होती त्यांना?
या चौकशीत आणखी खोल उतरून ती व्यापक करण्यासाठी तपासकर्त्यांना पुरेसे दुवे मिळाले होते. मात्र अचानकपणे, जवळपास प्रत्येक संबंधित माणसानं शील्ड्स यांच्याविषयीच शंका व्यक्त करायला सुरुवात केली. किंग्स्टनमध्ये अतिशय उत्तम तपासकार्य करणाऱ्या माणसाबद्दलची ही कोलांटउडी विचित्र आणि अस्वस्थ करणारी होती. पाकिस्तानी संघ मायदेशी परतल्यानंतर दोन दिवसांनी झालेल्या वार्ताहर बैठकीत नव्या वार्ताहरांचा एक चमू शील्ड्स यांनी तपास केलेल्या प्रत्येक केसबद्दल आणि त्यातल्या आरोपनिश्चितीबद्दल शंका घेण्याचं प्रात्यक्षिक दाखवायला उतावळा असल्यासारखा वागत होता. किंग्स्टनमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले शील्ड्स आता एकटे पडत चालले होते आणि हरतही चालले होते. आपल्या आधीच्या कामगिरींबद्दलचा आपलाही विश्वास हरवत चालला होता, अशी कबुली त्यांनी मित्रांना दिली.
ही सगळी उलटापालटी कशातून होत होती? शील्ड्स यांनी काही मित्रांना हा प्रश्न विचारला. कोणाकडेही त्याचं उत्तर नव्हतं. सगळं काही बासनात बंद करण्यासाठी एक गट सक्रीय झाला होता, हे स्पष्ट होतं. पण, उलटी गंगा वाहवण्याचा उद्योग कोणी सुरू केला होता? शील्ड्स यांनी पुन्हा विचारलं. त्यांचे वरिष्ठ किंवा विश्वासातले अधिकारी यांच्यापैकी कोणीही त्यांना याबाबतीत मदत करू शकलं नाही.
शील्ड्स एकटे होते. किंग्स्टनमध्ये आता खुनाच्या थियरीबद्दल खात्री नसलेल्या जमैकन डिटेक्टिव्हजचा सुळसुळाट झाला होता. ते आधी म्हणाले की वुल्मर यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. मधुमेही व्यक्तीच्या संदर्भात ते नैसर्गिक होतं. नंतर त्यांनी असं सांगितलं की, वुल्मर यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा नव्हत्या, त्यांची कोणाशी झटापट झाल्याचीही चिन्हं नव्हती. जमैकन पोलिस आपल्या आधीच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका मांडायचा प्रयत्न करत होते. ज्या तरुण अधिकाऱ्यांनी अतिशय नेटानं तपासकार्य केलं होतं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज, पुरावे गोळा केले होते, त्यांचे निष्कर्ष त्यांच्या वरिष्ठांनी साफ नाकारले होते. जुनाट फोरेन्सिक उपकरणं आणि तंत्रांच्या साह्यानं आपल्या कामात ढवळाढवळ करून ते मातीत घातलं जात आहे, हे शील्ड्स भयव्याकुळ होऊन पाहात होते.
दरम्यानच्या काळात किंग्स्टनमध्ये रंगसफेदीचा कार्यक्रम सुरू होता. शील्ड्स यांनाही जाहीरपणे हेच म्हणायला आवडलं असतं. नव्या तपासकर्त्यांच्या एका पथकातले काहीजण शील्ड्स यांना नियमित ब्रीफिंग करत होते. संशयास्पद मृत्यूच्या ठिकाणी पाळायचे संकेत पायदळी तुडवून पाकिस्तानी संघातले सहा खेळाडू खुनानंतर त्या खोलीत कसे गेले होते, याची माहिती त्यांना दिली गेली. हे माझ्यापासून का लपवलं गेलं? शील्ड्स यांना प्रश्न पडला. नव्या पथकातल्या त्यांच्या खबऱ्यांनी अशीही माहिती दिली की, वुल्मर यांचा मृतदेह शवागारात न ठेवता अंत्यसंस्कारांच्या विभागात ठेवला गेला होता. हा खूनच आहे हे त्यांचं अंतर्मन सांगत होतं, पण, शील्ड्स यांनी त्यासाठी पुरावा देणं आवश्यक होतं.
त्यांनी आपले विचार आपल्यापाशीच ठेवले.
.............................................................................................................................................
‘फिक्स्ड् - मॅच-फिक्सिंगचा पर्दाफाश!’ - शंतनु गुहा राय
अनुवाद - मुकेश माचकर, इंद्रायणी साहित्य, पुणे,
पाने - २०८, मूल्य - २०० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4032
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment