अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या ‘स्वामीनाथन - भूकमुक्तीचा ध्यास’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज सायंकाळी पुण्यात होत आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन, विख्यात पत्रकार व शेतीशास्त्रज्ञ डॉ. देवेंद्र शर्मा आणि आणि शेतकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांच्या उपस्थितीत प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाला देऊळगावकर यांनी नव्याने प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
येतो उर का भरून, जाती आतडी तुटून
कुणी कुणाचा, लागून नाही जर?
नाही कोणी का कुणाचा,
बाप-लेक, मामा-भाचा,
मग अर्थ काय बेंबीचा, विश्वचक्री?
हिरोशिमा व धार्मिक दंग्यांमधील रक्ताची थारोळी पाहून मर्ढेकर कळवळून विचारत होते, माणुसकीचा शोध ते घेत होते. तेव्हा साने गुरुजी खरा धर्म दाखवत होते. “अज्ञानाचा व अनारोग्याचा अंधार दूर करून प्रत्येक दु:खिताच्या चेहऱ्यावर हास्य आणता आले, तरच महात्म्याला अभिप्रेत अर्थ स्वातंत्र्याला प्राप्त होईल,” असं भान पं. नेहरू आणत होते. या काळात गांधी आणि नेहरू यांच्या विचारांमुळे कुटुंब, नातीगोती, जात आणि धर्म या संकुचिततेपलीकडे जाऊन माणुसकीचं नातं निर्माण करणारी पिढी देशभर तयार झाली. तेव्हाच प्रो. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांनी ‘आर्थिक शिडीच्या तळाशी असणाऱ्या अंतिम माणसाचा उदय’ हे व्रत स्वीकारलं. हरित क्रांती ते शेतकरी आयोग- अशी गेली ६३ वर्षं अनेक आघाड्यांवर अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या स्वामीनाथन यांची वाटचाल अथक चालू आहे. ७ ऑगस्ट २०१७ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षात प्रवेश केलेल्या स्वामीनाथन यांच्या गुडघ्यांनी असहकार पुकारल्यानंतर आलेल्या चाकाच्या खुर्चीमुळे त्यांच्या प्रवासावर काही बंधनं आली आहेत, एवढंच. परंतु, या वयातही त्यांचा आशावाद व सकारात्मक वृत्ती तसूभरही कमी झालेली नाही. त्यांच्या लेखी कुणीही शत्रू नाही. त्यांचा संघर्ष गरिबीशी आहे, कोणत्याही व्यक्तीशी नाही.
गरिबांचं कल्याण व भूकमुक्ती हा त्यांचा अविरत ध्यास आहे. या व्यापक उद्देशाकरिता ते कुणाशीही, कधीही भेटायला आणि सोबत काम करायला तयार असतात. कंठाळी व कर्कश वातावरणात मंद्र व आर्त स्वर ऐकू येणं अशक्य असतं. आत्मप्रेम, आत्मप्रक्षेपण व आत्मविक्री या मायाबाजारात ‘एकला चलो’ ही वृत्ती घेऊन जगाला प्रेम अर्पण करणारा हा करुणामयी शास्त्रज्ञ आहे.
आजपर्यंत देशात अनेक राजकीय पक्ष सत्तेवर येऊन गेले. त्यांचे आपापसात अनेक मतभेद होते, परंतु त्यांना स्वामीनाथन यांच्यासमवेत काम करताना यत्किंचित अडचण आली नाही. इंदिरा गांधी व मोरारजी देसाई, चरणसिंह व चंद्रशेखर, करुणानिधी व जयललिता हे एकमेकांचे कडवे विरोधक असूनही स्वामीनाथन यांची क्षमता, निष्ठा व ध्येय याविषयी या सर्वांना आदर होता. जनता पक्षाच्या काळात “ते इंदिरा गांधी यांच्या जवळचे आहेत, त्यांना दूर ठेवा.” असा हेका धरणाऱ्या सहकाऱ्यांना जयप्रकाश नारायण व मोरारजी दोघांनीही, “ते कोणाही व्यक्तीचे नसून देशाचे आहेत”, अशी कडक समज दिली होती. सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांनी स्वामीनाथन यांचा वेळोवेळी शाब्दिक गौरव करत शेतकरी आयोगाच्या अहवालाची उपेक्षा केली, तर त्यांच्या अनेक संकल्पनांच्या आकर्षक घोषणा करून अंमलबजावणी बाजूला सारत नरेंद्र मोदी यांनी फसवणूक केली. तरीही, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एखादे छोटे पाऊलसुद्धा पुरेसे आहे, असं मानणाऱ्या स्वामीनाथन यांच्या अथक प्रयत्नांत खंड पडत नाही.
७ ऑगस्ट २०१४. चेन्नईच्या एम. एस. स्वामीनाथन रीसर्च फाउंडेशनमध्ये जगातील शेतीक्षेत्रात काम करणाऱ्यांची मांदियाळी दाटली होती. नेपाळ, बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव, म्यानमार, मंगोलिया, श्रीलंका, फिलिपाइन्स, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, चीन, सिरिया, इटली, कॅनडा व अमेरिका या देशांतील कृषिमंत्री, शास्त्रज्ञ, स्वयंसेवी संस्था चार दिवस एकत्र आल्या होत्या. सगळे जण म्हणत होते, “एवढ्या मोठ्या संख्येनं जग एकवटवू शकणारं एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रो. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन!” आंतरराष्ट्रीय पातळीवर शास्त्रज्ञांच्या परिषदांची प्राधान्यता ठरवून कृतिप्रवण करण्यासाठी अथक झटणारे स्वामीनाथन यांनी नव्वदीत प्रवेश करत असताना ‘पारिवारिक शेती आणि भूकमुक्ती’ या विषयावर परिषद घेतली होती. ‘फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’, ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’, ‘इंटरनॅशनल फंड फॉर अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट’ या जागतिक संघटनांनी पुढाकार घेऊन स्वामीनाथन यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली होती. लेबेनॉन येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर अॅग्रिकल्चरल रीसर्च इन ड्राय लँड एरियाज’ (‘इकार्डा’) या संस्थेचे महासंचालक डॉ. मोहम्मद सोल हे प्रस्तुत लेखकाला म्हणाले, “संयुक्त राष्ट्रसंघाला एखाद्या वर्षाचं अथवा दशकाचं अग्रिम ठरवून देणं, त्यामधील संशोधन व कृती ठरवणं, शास्त्रज्ञ-नेते-अधिकारी व चळवळीतील कार्यकर्ते या सर्वांना कृती देणं, हे ऐतिहासिक कार्य गेल्या साठ वर्षांपासून प्रो. स्वामीनाथन करत आहेत. एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या आमंत्रणाला मान देऊन इतके लोक एकत्र येतील, असं वाटत नाही.” असा सन्मान संपूर्ण जगातील ‘शास्त्रज्ञांचे तत्त्वज्ञ’ प्रो. स्वामीनाथन’ यांच्यासारख्या अतिशय दुर्मिळ व्यक्तींनाच लाभतो.
गुरुदेव रवींद्रनाथ, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यानंतर अवघ्या जगावर विचार आणि कृती यातून आपली छाप पाडणारे स्वामीनाथन हे विश्वमानव आहेत.
स्वामीनाथन यांनी आयुष्यभर माणुसकी, सामाजिक न्याय, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता ही उच्च नैतिक मूल्यं जपली. वैयक्तिकतेपेक्षा सामूहिक सहभागाला प्राधान्य दिलं. छोटा वा मोठा असा भेद न करता सर्वांना तेवढ्याच आपुलकीनं आपलंसं केलं. शासकीय संस्था असो वा स्वयंसेवी, त्यांची वागणूक ही गांधीजींच्या विश्वस्त वृत्तीनुसारच होती. या गुणांच्या असामान्य दर्शनामुळे त्यांना ठिकठिकाणी नेतृत्व करताना कुठलीही अडचण आली नाही. तिथं अजिबात तडजोड केली नाही. आता राष्ट्रहित ही ‘बोलाचीच कढी’ झाली आहे. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात पीएच.डी. चे संशोधन १९५३ मध्ये चालू असतानाच तेथील ‘रेड डॉट पोटॅटो चीप कंपनी’मध्ये रुजू होण्यास सुचवलं होतं. काही दिवसांत विस्कॉन्सिन विद्यापीठानंच जनुकशास्त्र विभागात अध्यापन व संशोधनाकरिता विचारणा केली होती. या दोन्ही संधी सोडून त्यांनी मायदेशी धाव घेतली होती.
फिलिपाइन्सच्या ‘इंटरनॅशनल राईस रीसर्च इन्स्टिट्यूट’चे महासंचालक असताना स्वामीनाथन यांनी (१९८२ ते १९८८) चीन, व्हिएतनाम, कांपुचिया, थायलंड, मलेशिया, उत्तर कोरिया, टांझानिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, नेपाळ, इराण, इजिप्त, बांगलादेश आणि पाकिस्तानाला भेट देऊन त्या देशांमधील तांदूळ-संशोधनाला मदत केली. शेतकऱ्यांचं प्रशिक्षण घडवलं. त्या वेळची आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती कमालीची बिकट होती. व्हिएतनामला, उत्तर कोरियाला सहकार्य करणं म्हणजे अमेरिकेचा संताप ओढवून घेणं होतं; तर पाकिस्तानला साह्य हा तर देशद्रोह मानला जात असे. पण स्वामीनाथन यांनी भूकमुक्तीचा वसा सोडला नाही. संशोधनातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानी शास्त्रज्ञांना मदत केली. पाकिस्तानबद्दल यत्किंचितही आकस न ठेवता खुल्या दिलानं दिलेली वागणूक पाकिस्तानी नेत्यांची व जनतेची मनं जिंकून गेली. पाकिस्तानचं भात उत्पादन उंचावल्याबद्दल, कृषिमंत्री अॅडमिरल जुनेजा, परराष्ट्रमंत्री सरताज अझीझ आणि अध्यक्ष झिरा उल हक यांनी जाहीर भाषणांतून स्वामीनाथन यांच्याविषयी १९८६मध्ये कृतज्ञता व्यक्त केली, तेव्हा भारतातील वैज्ञानिक चकित झाले होते.
जगातील बहुतेक राष्ट्रांनी स्वामीनाथन यांच्या कार्याचा सन्मान केला आहे, तर कित्येक देशांनी सर्वोच्च बहुमान बहाल केले आहेत. त्यांच्या कन्या डॉ. नित्या म्हणतात, “त्यांना पुरस्काराची आस अजिबात नाही. स्तुती आणि निंदा, गौरव अणि नालस्ती अशा दोन्ही प्रसंगी ते अविचलित असतात.” स्वामीनाथन यांना देशभरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचं प्रेम व जिव्हाळा लाभला. अतिशय आस्थेनं त्यांना हातानं केलेले पदार्थ देतात. जेवणातील घास देतात. “शेतकऱ्यांची आपुलकी हाच माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा पुरस्कार आहे” असं ते म्हणतात.
भारतात ५० वर्षांपूर्वी गव्हाची क्रांती झाली, तेव्हा जगात व देशात आशेचं वातावरण होतं. गांधी व नेहरू यांच्या विचारांनी भारावलेल्या असंख्य व्यक्ती देशभर होत्या. त्या काळात पं. नेहरू हे वारंवार सांगत, “असंख्य भाषा, जाती व गटांत विखुरलेल्या आपल्या समाजातील अंधश्रद्धा, रूढी व पूर्वग्रह हे विकासामधील अडथळे आहेत. समाजामध्ये वैज्ञानिक वृत्ती रुजली, तरच सामाजिक आणि आर्थिक विकास होऊ शकेल. त्यासाठी या नव्या संस्थांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.” ‘नेहरू यांची वैज्ञानिक वृत्ती’ या लेखात स्वामीनाथन म्हणतात, ‘पं. नेहरू यांच्या उक्ती आणि कृती यात अजिबात फरक नव्हता. त्यांनी कुठल्याही कामासाठी कधीही मुहूर्त पाहिला नाही. त्यांनतरचे पंतप्रधान वैज्ञानिक वृत्तीची महती सांगत ज्योतिषी व बुवा-बाबांकडून मार्गदर्शन घेत असत.’ आता तर क्षेपणास्र सोडण्याआधी अवकाश संशोधन केंद्राचे वैज्ञानिक तिरुपतीच्या बालाजीला नवस करतात, तर चेन्नई आयआयटीचा पदवीदान समारंभ राहूकाळ पाहून ठरवला जातो!
नेहरू यांच्या विचारांमुळे अनेक संस्था व तिथली कार्यसंस्कृती घडत गेली. संस्थांमध्ये कार्य करण्यास अनुकूल साहचर्य तयार झालं. गावापासून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शासकीय, अशासकीय व सार्वजनिक संस्था गरिबांकरिता कार्य करण्यात गुंतून गेल्या. या वातावरणाशी एकरूप झालेले चाळिशीमधील स्वामीनाथन यांनी भारतीय शेती संशोधन संस्थेला आकार दिला व तिचा कायापालट केला. त्यांनी १९५५ मध्ये शेती संशोधन करताना विकिरणांच्या साह्यानं उत्परिवर्तन (म्युटेशन) घडवण्यास आरंभ करून विकिरण जीवशास्त्र (रॅडिएशन बारॉलॉजी) विभाग स्थापन केला. तुर्भे येथील अणु तंत्रज्ञान संस्थेमध्ये जाऊन क्ष-किरण, गॅमा किरण व न्यूट्रॉन यांचा उपयोग करून नवं बियाणं निर्माण करण्यासाठी मदत घेतली. अणुऊर्जेचा शेतीसाठी उपयोग पाहून डॉ. होमी भाभा थक्क झाले. त्यामुळेच त्यांनी स्वामीनाथन यांना १९५८ मध्ये जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या, ‘अणुऊर्जेचा शांततेसाठी उपयोग’ या जागतिक परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं. १९६८ च्या सुमारास अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांना सांगून उपग्रहातून छायाचित्रांचा उपयोग शेतीवरील किडीचा प्रसार पाहण्यासाठी केला.
असा ५० वर्षांपूर्वी कामाचा झपाटा दाखवणाऱ्या देशातील अनेक सार्वजनिक संस्था आज नावापुरत्या वा शोभेपुरत्या उरल्या आहेत. अनेक उच्चपदस्थांना काम न करण्यासाठी, संशोधन रोखण्यासाठी भरपूर ‘मोबदला’ मिळतो. नंदा खरे यांनी ‘उद्या’ या कादंबरीतून वर्तमान व भविष्याचा देशासमोर आरसा धरला आहे. “भारत सरकारच्या कार्यालयातील साठ-सत्तर टक्के लोक थेट किंवा आडून ‘भरोसा’ वा ‘विकास’चे लाभार्थी असतात. सरकारी खाती आणि कॉर्पोरेशन्स यांच्यात फिरते दरवाजे आहेत. आज संरक्षण खात्रातील सहसचिव उद्या ‘विकासहांडा’त दक्षिण आशियाचा निदेशक होतो. आज भरोसा जनरल मोटर्सचा डेव्हलपमेंट मॅनेजर उद्या गृहसचिव होऊ शकतो. भाषा असो वा विज्ञान, मानव्यशास्त्र असो वा खगोलशास्त्र; सर्व क्षेत्यांतील बुद्धिवंत त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. देश-परदेशातील विविध कार्यशाळा ‘तेच’ घडवून आणतात,” अशी वास्तव अवस्था दाखवली आहे. (त्यानंतर वर्षभरातच रिलायन्सचे अधिकारी उर्जित शहा हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले!) जोसेफ स्टिगलिट्झ यांनी ‘विषमतेची किंमत’ ही मीमांसा करताना केवळ १०,००० अतिश्रीमंतांच्या मर्जीनुसार ७५० कोटींचं जग चालतं, हे गुपित उघड केलं. या काळात जागतिक वा राष्ट्रीय संस्थांकडून समाजोपयोगी कार्याची अपेक्षा करता येईल?
व्यक्ती व नाती दोन्हींचं वस्तूकरण झाल्यामुळे आपल्याला कुणाशीही जोडून घेण्यासाठी (कनेक्ट) उपयोगिता हा एकमेव निकष झाला आहे. बाजारपेठेत आपल्या ‘मूल्यात’ वृद्धी कशी होईल, या काळजीनं सगळे ग्रासून गेले आहेत. घरापासून दारापर्यंत, संस्थेपासून यंत्रणेपर्यंत उदारतेची हेटाळणी, सहिष्णुतेची नालस्ती व करुणेची अवहेलना वृद्धिंगत होत आहे. जिव्हाळा आटत जाऊन वरचेवर परिपूर्ण शुष्क (सॅच्युरेटेड ड्रायनेस) होत चाललेल्या वातावरणात संवेदनशीलतेची ससेहोलपट होत आहे. अशा वातावरणातही सुमारे ५० कोटी शेतकऱ्यांचं आयुष्य सुखी करण्यासाठी सदाहरित क्रांती घडवण्याचं ९२ वर्षांच्या स्वामीनाथन यांचं स्वप्न आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रत्येक संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करण्याचा त्यांना आजही ध्यास आहे. त्यांनी माहिती तंत्रज्ञान, “मोबाईल हा संकटकाळात बाहेर पडण्याचा मार्ग ठरू शकतो”, हे सुचवलं. ‘क्वॅलकॉम’ , ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’, राष्ट्रीय सागरी माहिती यंत्रणा आणि एम. एस. स्वामीनाथन रीसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘कोळी मित्र मोबाईल’ हे अफलातून जीवरक्षक उपकरण तयार झालं आहे. अँड्रॉइड प्रणालीवर चालणारा हा मोबाइल तमिळ, तेलुगू व इंग्रजी भाषेत चालतो. पाऊस, तापमान, ही हवामानाची माहिती, भरती-ओहोटीच्या वेळा, चक्रीवादळाचा अंदाज त्यावर समजतो. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत असल्याचा इशारा मिळतो. भौगोलिक स्थान निचित रंत्रणा (जीपीएस) उपलब्ध असल्यामुळे अद्यावत मोटारीप्रमाणे नावाड्यांना नावेचं मार्गक्रमण समजतं. पाण्याची खोली, खडक अथवा बुडालेली नाव असल्याची माहिती मिळते. अडचण अथवा आणीबाणीच्या प्रसंगी हेल्पलाइनशी संपर्क होऊन संकटाची माहिती थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच स्वामीनाथन फाउंडेशनपर्यंत पोहोचते. ८००० किमी लांबीच्या सागरकिनाऱ्यावरील सुमारे ५० लाख लोकांचा उदरनिर्वाह मासेमारीवर होत असून त्यापैकी 60 टक्के जनता ही दारिद्रयरेषेखालील आयुष्य जगते. सध्या हा बहुगुणी मोबाईल ५०० खेड्यांमधील कोळ्यांचा खरा साथी झाला आहे. ‘वंचितांपर्यंत पोहोचतं तेच खरं तंत्रज्ञान’ ही उक्ती पुन्हा एकदा प्रत्यक्षात उतरवण्याची किमया स्वामीनाथन यांनी साधून दाखवली आहे. आयटी तंत्रज्ञांनी याची नोंद घ्यावी.
आज आपल्यापुढे विज्ञान-तंत्रज्ञान व त्यासाठी आर्थिक पाठबळ हात जोडून उभं आहे; प्रश्न आहे तो राजकीय इच्छाशक्तीचा! त्यासाठी तात्कालिक राजकीय फायद्यांपलीकडे जाण्यासाठी समाज दबाव आणणार आहे काय? मुळात आत्मप्रेमी व तुच्छतावादी मध्यमवर्ग स्वत:बाहेर डोकावेल काय? अशी कटू प्रश्नांना घेऊन ही तिसरी आवृत्ती येत आहे.
‘स्वामीनाथन - भूकमुक्तीचा ध्यास’- अतुल देऊळगावकर
साधना प्रकाशन, पुणे
पाने - २७०, मूल्य - २५० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4031
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment