अजूनकाही
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील बहुसंख्य तथाकथित ‘लोकप्रिय’ राजकारण्यांची समाजमाध्यमांमधली लोकप्रियता बनावट आहे, हे ट्विटरच्या अहवालामुळे उघड झालं आहे. पंतप्रधान मोदी यांचे तब्बल ४५ टक्के म्हणजे जवळपास दीड कोटी फॉलोअर्स बोगस आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे तब्बल ६४ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे ७३ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरील ७१ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटरवरील ४९ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. काँग्रेस पक्षाचे ६९ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही केवळ २२ टक्के फॉलोअर्सच खरे असल्याची माहिती समोर आली आहे.
एकवेळ बनावट अकाउंट्सचं समजू शकतं, पण नेते बोगस असणं देशाला परवडणारं नाही. शिवाय, या महानुभावांचे जे ‘खरे’ अनुयायी आहेत, ते माणूस म्हणून किती बोगस आहेत, ते पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनानंतर सोशल मीडियावर जो ‘आनंदोत्सव’ साजरा होतोय, त्यावरून दिसून येतंच आहे. अर्थात, त्याचं आश्चर्य वाटून घेता कामा नये. महात्मा गांधींच्या खुनानंतर मिठाई वाटणाऱ्यांचा देश आहे हा. इथं बोगसपणाला सीमा नाही!
.............................................................................................................................................
२. म्यानमारमधून ८७ हजार रोहिंग्या मुस्लीम शरणार्थी बांगलादेशात आले आहेत. २५ ऑगस्टला म्यानमारमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर या शरणार्थींनी देशाबाहेर पलायन केलं. म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की यांनी या सगळ्या घडामोडींवर मौन पाळल्यानं संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. रोहिंग्या हे म्यानमारमधील मुस्लीम अल्पसंख्याक असून त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतो आहे.
आँग स्यान सू की यांच्यासारख्या शांततेचं नोबेल मिळवणाऱ्या नेत्याकडून जगानं बाळगलेल्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. शिवाय, आपला धर्म कसा शांतताप्रेमी, न्यायी, करुणामय आणि सहिष्णू आहे, असं सांगणाऱ्या सगळ्याच धर्माच्या अनुयायांच्या तोंडावर बूच मारणाऱ्या या घडामोडी आहेत (तरी त्यांची बडबड थांबण्याची शक्यता नाहीच.) ज्या बांगलादेशातून लोक जगायला भारतात घुसखोरी करतात, तिथं कुणी जगण्यासाठी आसरा घ्यावा, हीच मुळात करुण घटना आहे. यातून या उपखंडातील राजकारणी आणि नागरिक काही शिकतील, ही शक्यता मात्र शून्याच्याही खालीच आहे.
.............................................................................................................................................
३. नोटाबंदीच्या निर्णयामुळे नेमका किती काळा पैसा बाहेर आला याची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही, असा दावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) केला आहे. ५०० आणि एक १०००च्या नोटा बंद झाल्यानंतर आणि नव्या नोटा चलनात आल्यानंतर नेमका किती बेहिशोबी पैसा कायदेशीरीत्या चलनात आला हे सांगणंही कठीण असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं संसदीय समितीला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
तुम्ही काय सांगू शकत नाही, याची यादी फार मोठी आहे... कारण, मुळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे सूत्रधार ना तुम्ही आहात, ना अर्थमंत्री. आता तर गंगाधर ही शक्तिमान है! नोटाबंदी जाहीर करण्याआधी घाईमुळे एटीएम कॅलिब्रेट करता न आलेल्या यंत्रणेला आठ महिन्यांनंतर २०० रुपयांची नवी नोट आणतानाही मशीन कॅलिब्रेट करता येत नाहीत, हे पाहता तिच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? नोटांच्या गठ्ठ्याला ‘बंडल’ का म्हणतात, ते रिझर्व्ह बँकेच्या आताच्या पिळपिळीत आणि कणाहीन कारभाराला पाहिल्यावर समजतं.
.............................................................................................................................................
४. केरळमध्ये गोमांस सेवनावर बंदी नाही, केरळमधील नागरिक गोमांस सेवन करू शकतील, असं महत्त्वपूर्ण विधान नवनियुक्त केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांनी केलं आहे. गोमांस सेवनावर बंदी आहे, असं भाजपनं कधी म्हटलंच नव्हतं, असा दावाही त्यांनी केला आहे. ‘बुलडोझर मॅन’ अशी ओळख असलेल्या के. जे. अल्फोन्स यांच्याकडे पर्यटन खातं (स्वतंत्र कार्यभार) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती- तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप आणि ख्रिश्चन समाजात एक पूल म्हणून मी काम करणार असंही त्यांनी सांगितलं. भाजप हा ख्रिश्चनविरोधी पक्ष असल्याची भीती निर्माण केली जाते, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.
अल्फोन्सभाऊ, थोडा दम खाऊन मग बोला, म्हणजे सुसूत्रपणे तरी फेकता येईल (शिका जरा वरिष्ठांकडून.) एकीकडे म्हणताय, ख्रिश्चनविरोधी पक्ष असल्याची भीती निर्माण केली जातेय. ते खोटं असेल, तर तुमच्यासारख्या पुलाची काय गरज आहे? बाकी तुम्ही बुलडोझर घेऊन कुठे चंद्रावर वगैरे गेला होतात का? तिथूनच आल्यासारखं ‘भाजप कुणाच्या खाण्यापिण्यात दखल देऊ इच्छित नाही, गोमांससेवनावर बंदी नाहीच आहे,’ वगैरे काहीही काय बोलताय?
.............................................................................................................................................
५. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांना विविध प्रकारचे अनुदान सोडण्याचं आवाहन करत असताना त्यांच्या पक्षाचे लोक मात्र ‘विशेष सुविधा’ घेत असल्याचं समोर आलं आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीला शासनाची परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांसोबतच समाज कल्याण विभागाच्या सचिवांच्या मुलालादेखील शासकीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. राजकुमार बडोलेंची मुलगी श्रुती बडोलेला अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रॉफिजिक्स विषयांमध्ये पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यामुळे तिला इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठात तीन वर्षं शिक्षण घेता येईल. एका बाजूला नरेंद्र मोदी देशातील जनतेला गॅसवरील अनुदान सोडण्याचं आवाहन करत असताना त्यांच्याच पक्षातील नेते आर्थिक परिस्थिती चांगली असताना स्वत:च्याच खात्याचा ‘वापर’ करून योजनांचा लाभ उकळत आहेत.
बडोलेंचा दोष नाही, ते असेही ‘बडबोलें’च्या पक्षात आहेत. इथं फक्त मोठमोठ्या बाता मारायच्या असतात, जनतेला उदात्त शब्द आणि भावनांमध्ये गुंतवायचं असतं. त्याग वगैरे जनतेनं करायचा असतो. नेते कधी त्याग करतात का? ते जे काही करतात तोच त्याग असतो. मागासलेल्यांसाठीचे लाभ हे वृत्तीनं मागासलेल्यांसाठीही असतात, अशी त्यांची समजूत झाली असावी बहुतेक.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment