अजूनकाही
आपल्या ‘गौरी लंकेश पत्रिके’ नावाच्या साप्ताहिकातून कट्टरतावाद्यांवर जहाल टीका करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरू येथे काल त्यांच्या राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि देशभरात शोकसंतापाची लाट उसळली. त्यांचे साप्ताहिक १६ पानांचे होते. १३ सप्टेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंकासाठी गौरी यांनी लिहिलेला संपादकीय लेख त्यांचा अखेरचा लेख ठरला. या अंकाच्या तिसऱ्या पानावर 'कंडा हागे' नावाने गौरी संपादकीय लेख लिहीत असत. ‘कंडा हागे’ याचा अर्थ 'मी जसं बघितलं तसं'. या अंकातले संपादकीय फेक न्यूज या विषयावर होते. शीर्षक होते ‘फेक न्यूजच्या काळात’ अशा अर्थाचे.
ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी त्यांच्या एका कन्नड जाणणाऱ्या मित्रांच्या मदतीने या लेखाचा हिंदी अनुवाद केला. हेतू हा की, गौरी लंकेश यांच्या लेखणीला किती धार होती याची कल्पना देशभरातील जनतेला यावी. या लेखाचा मराठी अनुवाद…
.............................................................................................................................................
फेक न्यूजच्या काळात...
या आठवड्याच्या अंकात माझे मित्र डॉ. वासु यांनी गोबल्सच्या धर्तीवर भारतातल्या फेक न्यूज तयार करणाऱ्या कारखान्यांबद्दल लिहिले आहे. असत्याचे हे कारखाने बहुतकरून मोदी भक्तच चालवत आहेत. या असत्याच्या कारखान्यांमुळे जे नुकसान होत आहे, त्याबाबत या संपादकीयाद्वारे सांगण्याचा प्रयत्न मी करेन. नुकतीच गणेश चतुर्थी झाली. त्या दिवशी सोशल मीडियावर एक अफवा पसरवण्यात आली. पसरवणारे संघाचे लोक होते. काय होती ती अफवा? ती बातमी अशी होती की, कर्नाटक सरकार सांगेल त्या ठिकाणीच गणेशमूर्तीची स्थापना करावी लागेल, त्यासाठी अगोदर दहा लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल, मूर्तीची उंची किती असावी याबद्दल सरकारची परवानगी घ्यावी लागेल, दुसऱ्या धर्मांचे लोक राहतात त्या भागात विसर्जनासाठी मूर्ती नेण्याची परवानगी नाही, फटाके लावण्याची परवानगी नाही. संघाच्या लोकांनी हे असत्य जोरात पसरवले. ही खोटी माहिती इतकी पसरली की, कर्नाटक सरकारने असे कोणतेही नियम केलेले नाहीत, हे सगळे खोटे आहे हे सांगण्यासाठी अखेर कर्नाटकचे पोलिस प्रमुख आर. के. दत्ता यांना पत्रकार परिषद बोलवावी लागली.
या असत्याचा स्रोत जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला, तेव्हा POSTCARD.IN नावाच्या एका वेबसाइटवर जाऊन पोहोचलो. ही वेबसाइट कट्टर हिंदुत्ववाद्यांची आहे. त्यांचे कामच दररोज खोट्या बातम्या तयार करून त्या सोशल मीडियावर पसरवणे हे आहे. ११ ऑगस्टला या वेबसाइटवर हेडलाइन होती- कर्नाटकमध्ये तालिबान सरकार. या मथळ्याच्या आधारे राज्यभर असत्य पसरवण्याचा प्रयत्न झाला आणि संघाचे लोक यात यशस्वीही झाले. जे लोक या ना त्या कारणाने सिद्धरामय्या सरकारवर नाराज होते त्यांनी या खोट्या बातमीचा वापर शस्त्रासारखा केला. सर्वांत आश्चर्याची आणि खेदाची बाब म्हणजे लोकांनीही काहीही विचार न करता ही माहिती खरी मानली. स्वत:चे डोके अजिबात न वापरता.
गेल्या आठवड्यात न्यायालयाने राम रहीम नावाच्या एका ढोंगी बाबाला बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावली तेव्हा त्याचे भाजप नेत्यांसोबतचे कितीतरी फोटो सोशल मीडियावर पसरले होते. या ढोंगी बाबासोबतच्या मोदींच्या फोटोसह हरयाणातील अनेक भाजप आमदारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे भाजप आणि संघ परिवार सैरभैर झाला आणि त्याला उत्तर म्हणून गुरमीत बाबाच्या शेजारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई बसले आहेत, असा फोटो त्यांनी सर्वत्र पसरवला. हा फोटो फोटोशॉपमध्ये तयार केलेला होता. खरे तर त्या फोटोत काँग्रेस नेते ओमेन चांडी बसलेले आहेत पण त्यांच्या धडावर विजयन यांचे डोके चिकटवण्यात आले आणि हा बनावट फोटो सोशल मीडियावर पसरवण्यात आला. नशीब संघाचा हा उद्योग यशस्वी झाला नाही. कारण, काही लोकांनी त्वरित मूळ फोटो समोर आणला आणि सोशल मीडियाद्वारेच सत्य काय आहे ते दाखवून दिले.
खरे म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या फेक न्यूज पसरवण्याच्या उद्योगांची पोलखोल करणारे कोणीच नव्हते. आता खूप लोक या कामाला लागले आहेत, हे चांगलेच झाले. अगोदर नुसत्याच अफवा पसरत राहायच्या. आता या अफवा आहेत हे स्पष्ट करणाऱ्या सत्य बातम्याही लगेच येऊ लागतात आणि लोक त्याही वाचतात.
उदाहरणार्थ, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण दिले, त्याचे एक विश्लेषण १७ ऑगस्टला सर्वत्र पसरले. ध्रुव राठीने केलेले ते विश्लेषण होते. राठी दिसायला कोणत्याही कॉलेजविद्यार्थ्यासारखाच आहे, पण गेले काही महिने तो मोदींच्या असत्य वचनांचे कुभांड सोशल मीडियावर फोडण्याचे काम करत आहे. पूर्वी हे व्हिडिओ आमच्यासारख्यांपर्यंतच पोहोचत होते, सामान्य माणसापर्यंत पोहोचत नव्हते, पण १७ ऑगस्टचा तो व्हिडिओ एक लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला. (गौरी लंकेश मोदींचा उल्लेख नेहमी ‘बूसी बसिया’ असा करत असत. याचा अर्थ ‘तोंड उघडले खोटेच बोलणार’!) राठीने सांगितले की, राज्यसभेत 'बूसी बसियां'नी ३३ लाख नवीन करदाते आल्याचे महिन्याभरापूर्वीच म्हटले आहे. त्याहीपूर्वी अर्थमंत्री जेटली यांनी ९१ लाख नवीन करदात्यांची भर पडल्याचे सांगितले होते. शेवटी आर्थिक सर्वेक्षणात दिसले की, केवळ पाच लाख ४० हजार नवीन करदात्यांची भर पडली आहे. मग यातील कोणता आकडा खरा, असा प्रश्न त्याने व्हिडिओत विचारला आहे.
आज मुख्य प्रवाहातील माध्यमेही केंद्र सरकार आणि भाजपने दिलेली आकडेवारी वेदवाक्य असल्यासारखी प्रसिद्ध करत आहे. या माध्यमांसाठी सरकारचे वक्तव्य म्हणजे वेदवाक्यच. यामध्ये टीव्ही वाहिन्या दहा पावले पुढे आहेत. उदाहरणार्थ, रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली तेव्हा एका तासात राष्ट्रपती कोविंद यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या ३० लाख झाली अशी बातमी इंग्रजी टीव्ही वाहिन्यांनी चालवली. ओरडत होते नुसते, ३० लाख वाढले म्हणून. कोविंद यांना किती लोकांचा पाठिंबा आहे बघा, हे त्यांना सांगायचे होते. बहुतेक टीव्ही वाहिन्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या टीम्स असल्यासारख्या काम करत आहेत. संघाचेच काम करत आहेत ते. सत्य असे होते की त्याच दिवशी मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सरकारी ट्विटर अकाउंट कोविंद यांच्या नावावर झाले आणि हा बदल केल्यामुळे राष्ट्रपती भवनाचे सगळे फॉलोअर आपोआपच कोविंद यांचे फॉलोअर झाले. लक्षात घेण्याजोगी बाब ही की, प्रणव मुखर्जी यांनाही ३० लाखांहून अधिक लोक ट्विटरवर फॉलो करत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे अशा प्रकारे पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूजमागील सत्य समोर आणण्यासाठी आता खूप लोक कामाला लागले आहेत. राठी व्हिडिओच्या माध्यमातून हे काम करत आहे. प्रतीक सिन्हा altnews.in नावाच्या वेबसाइटवरून हे काम करत आहे. होक्स स्लेयर, बूम आणि फॅक्ट चेक नावाच्या वेबसाइट्सही हेच काम करत आहेत. शिवाय thewire.in, SCROLL.IN, NEWSLAUNDRY.COM, THEQUINT.COM या वेबसाइट्सही कार्यरत आहेत. मी आत्ता जी नावे घेतली त्यापैकी सर्वांनी अलीकडेच अनेक फेक न्यूजमागील सत्य समोर आणले आहे. त्यामुळे संघाचे लोक वैतागले आहेत. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोक पैसे घेऊन काम करणारे नाहीत. फॅसिस्ट लोकांचा असत्याचा कारखाना लोकांसमोर आणणे या ध्यासाने ते काम करत आहेत.
काही आठवड्यांपूर्वी बेंगळुरूमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यावेळी संघाच्या लोकांनी एक फोटो व्हायरल केला. नासाने मंगळावर लोक चालत आहेत असा फोटो प्रसिद्ध केला आहे, अशी कॅप्शन त्या फोटोला होती. यावर मग बेंगळुरूच्या महापालिकेने स्पष्टीकरण दिले की, हा फोटो मंगळ ग्रहाचा नाही. बेंगळुरूला मंगळ ग्रह म्हणून टिंगल करणे हा संघाचा उद्देश होता. जेणेकरून लोकांना वाटावे की, सिद्धरामय्या सरकारने कसे काहीच काम केलेले नाही, रस्ते कसे खराब झाले आहेत. असा प्रचार करून खोट्या बातम्या पसरवण्याचा हा उद्योग त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. कारण हा फोटो बेंगळुरूचा नव्हे, तर महाराष्ट्रातील होता हे लवकरच स्पष्ट झाले आणि महाराष्ट्रात तर भाजपचेच सरकार आहे.
अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये दंगली झाल्या तेव्हाही आरएसएसने दोन पोस्टर्स प्रसिद्ध केली होती. एका पोस्टरला कॅप्शन होती- बंगाल जळतोय, ज्यात मालमत्ता जळत असल्याचा फोटो होता. दुस-या फोटोत एका स्त्रीची साडी फेडली जात होती आणि कॅप्शन होती की, हिंदू महिलांवर होत आहेत अत्याचार. या फोटोंचे सत्यही लवकरच समोर आले. पहिला फोटो २००२ मध्ये गुजरातेत झालेल्या दंगलींदरम्यानचा होता, जिथे त्यावेळी नरेंद्र मोदीच मुख्यमंत्री होते. दुसरा फोटो म्हणजे एका भोजपुरी चित्रपटातील दृष्य होते.
केवळ आरएसएसच नाही, तर भाजपचे केंद्रीयमंत्रीही अशा खोट्या बातम्या पसरवण्यात पारंगत आहेत. उदाहरणार्थ, काही लोक तिरंग्याला आग लावत आहेत, असा फोटो केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शेअर केला होता आणि कॅप्शन होती- प्रजासत्ताकदिनी हैदराबादमध्ये तिरंगा जाळता जात आहे. गूगल इमेज सर्चमध्ये एक नवीन अॅप्लिकेशन आले आहे, ज्यामध्ये कोणताही फोटो टाकून आपण तो कधीचा आणि कुठला आहे हे शोधू शकतो. प्रतीक सिन्हाने या अॅप्लिकेशनच्या मदतीने शोधून काढले की, हा फोटो हैदराबादचा नाही, तर पाकिस्तानातील आहे. पाकिस्तानात एका कट्टरपंथीय संघटनेने भारताच्या निषेधार्थ तिरंगा जाळला होता.
एका टीव्ही वाहिनीवर चाललेल्या चर्चेदरम्यान भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, सीमेवर इतक्या अडचणी असूनही सैनिक तिरंगा फडकावतात, तर जेएनयूमध्ये तिरंगा फडकावण्यात काय अडचण आहे? हा प्रश्न विचारून पात्रा यांनी एक फोटो दाखवला. नंतर कळले की हा फोटो प्रसिद्ध आहे पण यातील सैनिक भारतीय नाहीत, अमेरिकी आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकी सैन्याने जपानचे एक बेट ताब्यात घेतल्यानंतर तिथे आपला झेंडा फडकावला होता. फोटोशॉपचा उपयोग करून पात्रा सर्वांना गंडवत होते. अर्थात त्यांना ते महागात पडले. कारण ट्विटरवर त्यांची यथेच्छ चेष्टा झाली.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही अलीकडेच एक फोटो शेअर केला होता. भारतात ५०,००० किलोमीटर रस्त्यांवर एलईडी बल्ब्ज लावले गेले आहेत असे त्याखाली लिहिले होते. मात्र, त्यांनी शेअर केलेला फोटो भारताचा नव्हे, तर जपानचा २००९ मधील फोटो निघाला. यापूर्वीही कोळशाच्या पुरवठ्यामध्ये सरकारने २५,९०० कोटी रुपयांची बचत केल्याचे ट्विट त्यांनी केले होते. या ट्विटला जोडलेला फोटोही खोटा निघाला.
छत्तीसगडचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेश मूणत यांनी एका पुलाचा फोटा त्यांच्या सरकारचे यश म्हणून शेअर केला. या ट्विटला २,००० लाइक्स मिळाले. मग कळले की हा फोटो छत्तीसगडचा नाही, तर व्हिएटनामचा आहे.
खोट्या बातम्या पसरवण्यात आमच्या कर्नाटकातील आरएसएस आणि भाजप नेतेही मागे नाहीत. कर्नाटकातील खासदार प्रताप सिम्हा यांनी एक रिपोर्ट शेअर करून म्हटले होते की तो ‘टाइम्स ऑफ इंडिया’त प्रसिद्ध झाला आहे. मथळा होता, हिंदू मुलीची मुसलमानाने चाकू मारून हत्या केली. सगळ्या जगाला नैतिकतेचे धडे देणाऱ्या प्रताप सिम्हा यांनी सत्य जाणण्याचा जराही प्रयत्न केला नाही. ही बातमी कोणत्याही वृत्तपत्राने प्रसिद्ध केली नव्हती. फोटोशॉपचा वाप करून एका दुस-याच बातमीचा मथळा या बातमीला लावून हिंदू-मुस्लिम रंग देण्यात आला होता. यात ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे नाव वापरण्यात आले होते. गदारोळ झाल्यानंतर खासदारांनी बातमी डिलिट केली पण माफी मात्र मागितली नाही.
माझे मित्र वासु यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे की, त्यांनीही एक फेक न्यूज न लक्षात आल्यामुळे शेअर केली होती. गेल्या रविवारी पाटण्यातील रॅलीचा फोटो लालू यादव यांनी फोटोशॉप करून शेअर केला होता. थोड्या वेळात ही फेक न्यूज असल्याचे कळले आणि त्यांनी लगेच तो फोटो काढून माफी मागितली.
शेवटी, फेक न्यूजचा बुरखा फाडण्याचे काम करणाऱ्या सर्वांना सलाम. मला मनापासून वाटते की त्यांची संख्या वाढावी.
.............................................................................................................................................
http://www.bigul.co.in वरून साभार
.............................................................................................................................................
मराठी अनुवाद – सायली परांजपे
अनुवादिका www.bigul.co.inच्या कार्यकारी संपादिका आहेत.
sayalee.paranjape@gmail.com
.............................................................................................................................................
मूळ हिंदी अनुवाद वाचण्यासाठी क्लिक करा -
http://naisadak.org/last-editorial-of-gauri-lankesh/
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment