शिक्षक दिन ते मास्तरडे (मास्तर-डे!) – एक शोकांतिक प्रवास (भाग तिसरा)
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 07 September 2017
  • पडघम सांस्कृतिक शिक्षक दिन Teachers' Day मास्तर डे ५ सप्टेंबर 5 September

५ सप्टेंबर हा भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र अलीकडच्या काळात ‘भारतीय शिक्षक दिन’ दोन चेहऱ्यांच्या कात्रीत सापडला आहे. ‘शिक्षक दिन’ या शिक्षकांच्या सणाला ‘मास्तर-डे’ असे स्वरूप आलेले आहे. त्याचा शोध या लेखमालिकेत घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ही लेखमालिका पाच भागात प्रकाशित होईल. आजचा हा तिसरा भाग.

.............................................................................................................................................

भारतीय शिक्षक दिन

भारताचे पहिले उपराष्ट्रपती (१९५२-१९६२) आणि दुसरे राष्ट्रपती (१९६२-१९६७) डॅा. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ०५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचा जन्मदिन हाच ‘भारतीय शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो. डॅा. राधाकृष्णन यांची १९६२ साली राष्ट्रपतीपदी निवड झाली, त्यावेळी ते ७४ वर्षांचे होते. म. गांधींजींच्या सत्याग्रही चळवळीचा मोठा दबदबा जगात होता. पं. नेहरूंची वैज्ञानिकता आणि विज्ञानेप्रम यांची मोठी कदर केली जात होती. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाने राधाकृष्णन यांची ‘देशाचा प्रथम नागरिक’ म्हणून निवड केली होती. व्यक्तिगत पातळीवर राधाकृष्णन यांच्या जागतिक कीर्तीचा सुगंध एक उत्तम शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, कुशल नैतिक प्रशासक आणि तत्त्वज्ञ, विशेषत: भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचा सुयोग्य मेळ साधणारा भारतीय तत्त्वचिंतक म्हणून पसरला होता. केवळ ‘देशाचा प्रथम नागरिक’ या प्रतिमेपेक्षाही राधाकृष्णन यांची ‘सुसंस्कृत देदिप्यमान भारताचा चेहरा’ ही जागतिक प्रतिमा जास्त उजळ व प्रभावी होती. १९५४ ला ‘भारतरत्न’ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

राधाकृष्णन यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर त्यांचे काही विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ व मित्र यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली. त्या वेळी त्यांना राधाकृष्णन यांनी ‘मी मूलत: शिक्षक आहे. माझा वाढदिवस असा खासगीरीत्या साजरा करण्यापेक्षा, एका शिक्षकाचा बहुमान म्हणून सर्वत्र तो ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा झाला, तर मला जास्त आनंद वाटेल’ असे सांगितले. तेव्हापासून ०५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ मानला जातो. एका राष्ट्रपतींचा वाढदिवस तो मूलत: शिक्षक असल्यामुळे ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो, ही भारतातील फारच सुसंस्कृत व दर्जेदार घटना मानली पाहिजे. 

शिक्षकांना फुले देणे, पुष्पगुच्छ देणे ही परंपरा. काही वेळेस शिक्षक निवृत्त होत असताना त्यांना मानपत्रही दिले जात असे. पूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी ‘एक दिवसाचा शिक्षक’ बनून हा दिन साजरा होई. आजही काही ठिकाणी या प्रकारे आदरभाव व्यक्त होतो. गेल्या काही वर्षात शुभेच्छा पत्रे देण्याची प्रथाही सुरू झाली. आज ई-मेल आणि एसएमएस तसेच ई-पत्रे देणे ही आधुनिक रित बनली आहे.

जागतिक शिक्षक दिन

अर्थात जगातील प्रत्येक देश आपापला दिवस किंवा ‘शिक्षक दिन’ साजरा करतातच; पण ०५ ऑक्टोबर हा दिवस जगातील किमान शंभर देशांमध्ये ‘जागतिक शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो. युनेस्को (NESCO)आणि एज्युकेशन इंटरनॅशनल या सहभागी संस्थेने १९९४ पासून ही प्रथा सुरू केली. जगात सर्वत्र शांतता प्रस्थापित करणे, गरिबी नष्ट करणे, चिरस्थायी विकास साधणे आणि शिक्षण, विज्ञान, संस्कृती, जनसंवाद आणि माहिती या माध्यमांद्वारे बौद्धिक संवाद घडवून आणणे, हा युनेस्कोचा हेतू आहे. सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि जीवनशिक्षण आणखी एक हेतू युनेस्कोने नंतर विकसित केला. या हेतूंच्या पूर्तीचा एक भाग म्हणून शिक्षण आणि विकास या क्षेत्रात शिक्षकवर्ग बजावत असलेल्या मूलभूत गाभ्याच्या योगदानाची दखल घेतली जावी, यासाठी हा दिवस मुक्रर करण्यात आला. एज्युकेशन इंटरनॅशनलने ‘जागतिक शिक्षक दिन’चा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी व्यापक प्रयत्न केले. त्यासाठी या संस्थेने विशेष संकेतस्थळही सुरू केले आहे. सुमारे ४०० देश एज्युकेशन इंटरनॅशलनचे सदस्य आहेत.  

पॅरिसला युनेस्को आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने ‘शिक्षकांची समाजातील प्रतिष्ठा’ (The Status of Teachers) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद १९६६च्या ऑक्टोबर महिन्यात आयोजित केली होती. तिची सांगता ०५ ऑक्टोबर रोजी झाली. या परिषदेत ‘शिक्षकांच्या प्रतिष्ठसंबंधीच्या शिफारशी’ (Recommendation concerning the Status of Teachers) निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर १२ ऑक्टोबर १९९७ रोजी युनेस्कोची जागतिक परिषद झाली. त्यात ११ नोव्हेंबर रोजी ‘उच्चशिक्षण क्षेत्रातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेसंबंधी शिफारशी’ (Recommendation concerning the Status of Higher Education Teaching Personnel) स्वीकारण्यात आल्या. तथापि दरम्यानच्या काळात ५ ऑक्टोबर १९९४ रोजी पहिला ‘जागतिक शिक्षक दिन’ भरवण्यात आला (म्हणजे साजरा करण्यात आला. ) त्यामुळेच युनेस्कोने ०५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक शिक्षक दिन’ म्हणून निवडला. अर्थात युनेस्कोची रचना, इतर जागतिक संस्थांचा सहभाग युनेस्कोला लाभणे आणि त्या सर्वांची एकत्रित भूमिका तयार होणे यात बरीच वर्षे गेली.  

युनेस्कोने २०१२चे निश्चित केलेले घोषवाक्य आहे - ‘शिक्षकांबाबत निश्चित भूमिका घ्या’ (Take a stand for Teachers!). निश्चित भूमिका का घ्यावी? म्हणजे नेमके काय करावे? तर त्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे, व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि शिक्षकांच्या हक्कांच्या संरक्षणाची हमी द्यावी! बरं, का निश्चित भूमिका घ्यावी? कारण, जगात बहुतेक ठिकाणी या व्यवसायाची अवनती होत आहे, प्रतिष्ठा खालावत आहे. पर्यायाने शिक्षणाचीच हेळसांड होत आहे. भावी पिढी बरबादीकडे जात आहे. म्हणून केवळ शिक्षकवर्ग आणि विद्यार्थीवर्ग यांचेच नव्हे तर एकूण समाजबांधणी व रचना करणाऱ्या, भविष्य निर्माण करणाऱ्या या विश्वकर्मांकडे आणि त्यांच्या व्यवसायाकडे समाजाने (म्हणजे सर्व सरकारांनी) लक्ष द्यावे, यासाठी हे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे.

म्हणूनच ‘समाजातील उच्च गुणवत्ताधारक तसेच बुद्धिमान विद्यार्थ्यांनी शिक्षकीपेशाकडे वळावे आणि या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवावी’, असे आवाहन पॅरिस येथे २०१२ साली भरलेल्या परिषदेत युनेस्कोने केले. सक्षम आणि ध्येयनिष्ठ बुद्धिमान शिक्षकांशिवाय गुणवत्तायुक्त शिक्षण शक्य होणार नाही, याच मुद्दयावर युनेस्काने भर दिलेला आहे.

भारताची भूमिका

जागतिक पातळीवर ही चळवळ चालू असताना भारताची भूमिका कोणती होती? ती दोन प्रकारची दिसते. जागतिकीकरणपूर्व आणि जागतिकीकरणोत्तर. परंपरा म्हणून डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होत होता, तो काळ जागतिकीकरणपूर्व आणि नव्वदीच्या दशकानंतरचा काळ म्हणजे जागतिकीकरणोत्तर. पण या दोनही कालखंडात भारतीय शिक्षक कधीही आदरणीय नव्हता.

जागतिकीकरणपूर्व कालखंड अगदी महाभारत-रामायण काळापर्यंत मागे नेला तरी तेव्हापासून शिक्षक नाममात्र आदरणीय होता, खरा आदरणीय नव्हताच. याचे कारण असे की ‘राजघराण्यातील शिक्षकाला\गुरूला मिळणाऱ्या ‘अ’ दर्जाच्या वागणुकीवरून सामान्य शिक्षकालाही तशीच त्याच दर्जाची वागणूक, मानसन्मान मिळत होता’ असा निष्कर्ष काढणे हा तर्कदोष आहे. याची दोन कारणे आहेत.

पहिले असे की, मुळात गुरू-शिष्य परंपरा ही वर्णजाती आणि लिंगभेदाच्या भीषण विळख्यात अडकलेली होती. (याची अनेक उदाहरणे आहेत- द्रोण, शंबूक, कर्ण, एकलव्य, अंबा इत्यादी). दुसरे कारण असे की, सामान्य जाती-जमातीतील शिक्षक आणि त्यातही स्त्री-शिक्षक म्हणजे शिक्षिका, या नावाची वास्तव घटना ही केवळ विसाव्या शतकापासून सुरू झाली. या सामान्य शिक्षकासाठी ‘शिक्षक दिन’ आहे. तोच नीट साजरा होत नाही आणि इथेच तर गोची आहे.

‘शिक्षक’ नावाची जात आणि ‘शिक्षक-धर्म’

गुरू-शिष्य परंपरा ही वर्णजाती आणि लिंगभेदग्रस्त होती, याचा अर्थच असा की, शिक्षकपदी उच्चवर्णीय वगळता दुसरा कोणी येऊ शकत नाही. आणि गोची अशी की, आधुनिक लोकशाही सर्वांना शिक्षक होण्याची संधी देते. म्हणजे परंपरेनुसार शिक्षक होण्याचा अधिकार काहीजणांनाच असताना तो सर्वांना मिळतो, म्हणून सर्वच शिक्षकांना धडा शिकवणारी संस्कृती भारतात विकसित झाली. परिणामी एक नाटक  म्हणून ‘शिक्षक दिन’ साजरा होतो. तो खऱ्या अर्थाने साजरा केला तर सर्व जातींना शिकवण्याचा परवाना दिल्यासारखे होते. आणि तो तर द्यायचा नाही. ‘शिकायला या पण शिकवायला येऊ नका’ असा हा कुरूप चेहरा आहे.

यातही दुसरी गोची झाली. जसजसा शिक्षणाचा प्रसार झाला तशी ‘शिक्षक’ नावाची जातच विकसित झाली. लोकशाहीमुळे शिक्षणाचा व्यापक प्रसार व प्रचार होऊन शिक्षकांची संख्या वाढली, याचा अर्थ या जातीचे सदस्य वाढले. त्यात पहिल्या टप्प्यात सवर्ण होते. दुसऱ्या टप्प्यात सर्वच जातीचे सदस्य आले. एवढेच नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन याही धर्माचे सदस्य आले. (आणखी वाईट म्हणजे, या धर्माचे लोक तर मुळात खालच्याच जातीचे होते.). परंपरेनेच सामान्य जगाचे ज्ञान देणाऱ्या, समाज शहाणा करणाऱ्या ‘शिक्षक’ या जातीला खालचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे ब्राह्मण-सवर्ण जातीच्या शिक्षकांसह सर्व जातीचे शिक्षक केवळ ‘शिक्षक’ बनले. परिणामी सर्व जातीधर्माचे सर्वच  शिक्षक एकूण भारतीय शोषणव्यवस्थेचे बळी ठरले. त्यामुळे सर्व जातीधर्माला दोन चेहरे, असे मी म्हणतो.

इथे ‘जात’ ही संज्ञा मी पारंपरिक पद्धतीने उपयोगात नाही, तर वेगळ्या अर्थाने वापरतो आहे. परंपरेनुसार जात ही जन्माने मिळते. तसे शिक्षकपण जन्माने मिळत नाही, तर ती व्यक्तीची खासगी निवड असते. ती व्यक्ती मग कोणत्याही जातीधर्माची असेना, एकदा तिने शिक्षकी पेशा निवडला की, ती तातडीने ‘शिक्षक’ या जातीची बनते. मग ती शोषणाला स्वत:हून सिद्ध होते. ‘नीतीचे गाढव’ होण्यास तयार होते. यातून ब्राह्मण जातीचे शिक्षकही सुटले नाहीत. त्यांच्यावरही अन्याय झाले, त्यांचेही शोषण झाले. कारण ते ब्राह्मण असले तरी ‘शिक्षक’ या खालच्या जातीत गेले. बाय चॉईस! जसे ब्राह्मणांमधील किरवंत ही जात अस्पृश्य जात आहे, तशी ब्राह्मण-शिक्षक ही ब्राह्मणांमधील अस्पृश्य जात आहे. आणि ‘एकूण जातिव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी काही ब्राह्मणांचा बळी गेला तरी काही बिघडत नाही. उलट आमच्याही लोकांना तुमच्यासारखेच दु:ख भोगावे लागते. तेव्हा तुम्ही कांगावा करू नका. तुम्ही निवडलेला शिक्षकी व्यवसाय असाच आहे’, अशी मखलाशी करता येते. दुसरे म्हणजे बळी देणे. त्यातही नरबळी देणे ही प्राचीन वैदिक परंपरा आहे. खरे तर वर्णजातीव्यवस्थेची निर्मितीच मुळात विराटपुरुषाला बळी देण्यातून झाली आहे. (पुरुषसुक्त)

‘शिक्षक’ ही जात आणि ‘बाई’ ही जात या रचनेच्या दृष्टिकोनातून साधारणत: एकसारख्याच असतात. ‘बाई’ नावाची जात नसते. पण प्रत्यक्षात ती अनुभवाला येते. बाईजात मुख्यत: बाईपणाचे दु:ख व्यक्त करते आणि नंतर जातीचे दु:ख व्यक्त करते. ‘बाईच्या जातीने पायरी ओळखून वागावे’, ‘बाईच्या जातीला हे शोभत नाही’, इत्यादी विधानेच बाई नावाची जात जन्माला घालतात. ‘स्त्रीधर्म’ हीसुद्धा घटना आहे. खास स्त्रीसाठी धर्म असा काही अस्तित्वात नसतो. पण तो अमल गाजवतो. तसे ‘शिक्षक’ या व्यक्तीबाबत घडते.

व्यवहारात शिक्षक नावाची जात भाषेच्या पातळीवर अस्तित्वात आलेली नाही. म्हणजे ‘शिक्षकाच्या जातीने पायरी ओळखून वागावे’, ‘शिक्षकाच्या जातीला हे शोभत नाही’, अशी वाक्ये प्रचलित नाहीत, हे खरे; पण ‘शिक्षक-धर्म’ मात्र अस्तित्वात आलेला आहे आणि तो फारच जोरकसपणे काम करतो. आता धर्म असला तरी प्रत्यक्षात शोषण प्रक्रियेत ‘जात’ म्हणून काम करतो. एकदा कुणी शिक्षक झाला की, तो ‘शिक्षक’ या जातीत जातो आणि मग तातडीने ‘शिक्षक-धर्म’ नावाचे जू त्याच्या मानेवर जणू काही वेल्डिंग करून बसवले जाते. शिक्षक झाल्यावरच हे जू मानेवर बसते असे नव्हे, तर नुसती डी.एड., बी़एड.ला अ‍ॅडमिशन घेतली तरी हे जू तेथे ट्राय केले जाते. ‘जगाला प्रेम अर्पावे’पासून ‘शिक्षक-धर्म’ सुरू होतो.

थोडक्यात, शोषणासाठी ‘शिक्षक’ हा वर्ग ‘जात’ बनतो, तर ‘कर्तव्यपूर्ती’, ‘नीतीचे गाढव’ यासाठी आणि तत्सम कामासाठी हा वर्ग ‘शिक्षक-धर्म’ बनतो. म्हणजे शिक्षक हा नवा ‘धर्मवीर’ बनतो. ही पवित्र वैदिक परंपरा द्रोण, कृपाचार्य, सांदिपनी इत्यादींपासून आहे.

आता, शिक्षक होणे ही अशी धार्मिक  बाब असेल तर स्त्री-शिक्षक किंवा शिक्षिका होणे महाधार्मिक घटना आहे. शिक्षिकेला ‘बाई’ म्हणण्यापासूनच शिक्षिकेचा आधी स्त्री-धर्म सुरू होतो आणि ‘शिक्षक-धर्म + स्त्री-धर्म = शिक्षिका-धर्म’ नावाचा शोषणाचे टोक गाठणारा नवा धर्म जन्माला येतो. ‘शिक्षिका-धर्म’ या धर्माचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी स्वतंत्र लेखन आवश्यक आहे.

सक्तीचा निष्काम कर्मयोगी

‘धर्म’ ही संस्था विविध अर्थाने राबवली जाते. पण शिक्षक आणि स्त्री यांच्यात बाबत ती केवळ ‘कर्तव्य’ या संदर्भातच राबवली जाते. एका अर्थाने ‘श्रीमद्भगवतगीता’ या बहुआदरणीय ग्रंथातील तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत शिक्षकांवर सक्तीने ‘निष्काम कर्मयोग’ किंवा गांधींवादी परिभाषेत ‘अनासक्तियोग’ लादला जातो. शिक्षकांनी केवळ शिकवण्याचे कर्तव्य करावे. फलाची अपेक्षा धरू नये. शुद्ध निष्काम योगाने राहावे, ही समाजाची अपेक्षा असते आणि सरकार तिला खतपाणी घालते. शिक्षणक्षेत्र हा या देशात ‘सक्तीने कर्मयोगी’ तयार करण्याचा कारखाना बनला आहे. शिक्षणशास्त्र महाविद्यालये हे त्याचे स्थूल स्वरूप आहे.

थोर सिद्धहस्त लेखक पु.ल. देशपांडे यांच्या ‘एका मोर्चाची गोष्ट’ या कथेतील शिक्षकांची नावे  पाहिली तर माझा मुद्दा सहज लक्षात येईल. ती कथा पुढे देत आहे.

जागतिकीकरणपूर्व

जागतिकीकरणपूर्व काळात एकीकडे शिक्षकांना नैतिक प्रशासकाचा आणि नैतिक अनुशासकाचा दर्जा होता. सामाजिक नीतिमत्तेचा ठेका जबदस्तीने त्यांना दिला गेला होता. पण दुसरीकडे  शिक्षकांना कोणतीही प्रतिष्ठा, दर्जा नव्हता. या आजच्या आधुनिक भाषेत ‘पत’ (Credit) म्हणता येईल, ती बाजारू पत तर नव्हतीच नव्हती. एकतर शिक्षक-प्राध्यापकांच्या स्वतंत्र पतसंस्था नव्हत्या, असल्याच काही तुरळक तरी त्या दयनीय, दरिद्री होत्या. कारण शिक्षकांची अवस्थाच दयनीय, जवळपास ‘भिकारी’ दर्जाची होती. बँका तर शिक्षकांना दारातही उभ्या करत नसत. बहुतेक शिक्षक मंडळी घर बांधण्यासाठी निवृत्त होण्याची वाट बघत. कारण कसकसल्या फंडांचे पैसे तेव्हाच एकदाच (आणि एकदाचे) मिळत. म्हणजे आयुष्य संपत आल्याशिवाय घर बांधणे शक्यच होत नसे. पण सामाजिक नीतीचा पहाड छताडावर उभा असे. त्या काळातील वेतन आयोगाचे आकडे पाहिले म्हणजे शिक्षकवर्ग भारतीय अर्थव्यवस्थेत भिकाऱ्यांच्या किंचित वर असलेला वर्ग होता, हेच अधोरेखित होते. 

पु.ल.देशपांडे यांची ‘एका मोर्चाची गोष्ट’ नावाची कथा आहे. पुलं लिहितात -

‘‘मला कधी क्रांती, मोर्चे घेऊन- फलक घेऊन येते असं वाटत नाही. किंबहुना, मी कधी मोर्चातून घोषणा देत किंवा ओरडत गेलो नाही. मुंबईत मी असंख्य मिरवणुका पाहिल्या आहेत. अगदी एकतीसाच्या चळवळीपासून ते आजतागायत. माझी पुष्कळदा त्या मोर्चेवाल्यांच्या मागण्यांशी संपूर्ण सहानुभूती असते. पण मला रस्त्यातून माणसं अशी ओरडत निघाली की गलबलतं. मोर्चे हे एक तंत्र झालंय असंही म्हणतात. असेलही. पुढारीपण हा धंदा झाल्यावर मोर्चे-घोषणा ही धंद्याच्या जाहिरातीची तंत्रं होणं साहाजिक आहे. पण या मोर्चाने मात्र मी अगदी आतून हलून गेलो होतो. त्या मोर्चाच्या अग्रभागी चांगले वयोवृद्ध लोक होते. चारी वर्णांचे लोक दिसत होते. बायका होत्या. कामगार स्त्रिया वाटत नव्हत्या, पण फार सुशिक्षितही दिसत नव्हत्या. बऱ्याचशा पांढऱ्या पोशाखांत होत्या. पण नर्सेस नव्हत्या. आणि आश्चर्य म्हणजे त्या मोर्चात मुलं अजिबात नव्हती. मी हा मोर्चा अगदी काही खेड्यांत पाहिला नाही. पण मोर्चातली माणसं शहराशी फार रुळलेली दिसत नव्हती. एका जिल्ह्माच्या गावाला पाह्मला होता. मी सायकलीवरून उतरलो आणि विचारलं,

'कुणाचा मोर्चा आहे हो हा?'

'शाळामास्तरांचा- '

एक चमत्कारिक लज्जा, असहायता, संतापापेक्षाही कारुण्य, यापूर्वी- आम्ही असे कधीही हिंडलो नव्हतो... असा प्रसंग आमच्यावर येईल असं वाटलं नव्हतं असं न सांगता न बोलता नुसतं चेहऱ्यावर अदृश्य अक्षरांनी लिहून तो मोर्चा चालला होता. सर्वांत पुढे फलक होता. तो वाचायला मिळाला नाही. कुणी कुणाचा जयजयकार करीत नव्हतं. कुणी बोलत नव्हतं. मुठी वळत नव्हत्या. त्वेष नव्हता. आवेश नव्हता. आजवर आवरून धरलेली एक अब्रू परिस्थितीच्या तडाख्याने फुटली होती आणि रस्त्यांतून सांडत चालली होती. माझ्या कानी शब्द आले... ‘अय्या, त्या बघ आपल्या दामलेबाई’ एक पेन्शनीला आलेली विधवा वृद्धादेखील पोटाला दोन वेळचं मिळत नाही, हे यापूर्वी पोटात दडवून ठेवलेलं वाक्य न बोलता सांगत निघाली होती. दामलेबाईंची नजर त्या पोरींच्यावर गेली. पोरी तोंडावर हात घेऊन लाजल्या. आपल्या दामलेबाई, पुढे कुठे बॅंड नाही- घरात नाही- तरीसुद्धा भर शाळेच्या वेळी अशा कुठे रांगेतून चालल्या आहेत, हे त्या पोरींना कळत नव्हतं.

पण दामलेबाईंनी ज्या अनोळखी नजरेनं त्या पोरींच्याकडे पाहिलं, ती नजर त्या पोरींना नवी होती. ज्या बाईंना फुलं नेऊन दिल्यावर कौतुकाचा गालगुच्चा घेतात, त्या आपल्या दामलेबाईंची नजर अशी परकी? पोरी बावरल्या. ह्मा दामलेबाई अशा काय निराळ्या दिसताहेत? आपल्या बरोबर गाणी म्हणणाऱ्या, कधी कधीसुद्धा छडी न मारणाऱ्या दामलेबाईच ना त्या? दामलेबाईंनी कष्टाने सावरून धरलेले ते तोंडावरचे ‘शिक्षिकेने प्रेमळ असावे’चे कवच कशामुळे तरी फुटले होते. नुसत्या दामलेबाईंचेच नाही- सावंतबाई, साठेबाई, गुंजाळबाई, लोकरेबाई, शेखबाई, थोरात गुरुजी, भांगले गुरुजी, दाढे गुरुजी, तांबे गुरुजी, कुलकर्णी, देशपांडे, तांबट, कोष्टी, पागे, माने, साटम, काळे सगळ्या सगळ्या गुरुजींना जो प्रसंग कधी कधी यायला नको होता, तो आला होता. शिक्षकांचा मोर्चा नावाची एक फार मोठी क्रांती झाली होती. पूर्वी शिक्षक मोर्चात गेले होते. गांधींच्या मागून मुलांना राष्ट्रीयत्वाचे धडे देण्यापूर्वी आपण शुद्ध होऊन येऊ या म्हणून. हा मोर्चा निराळा होता. हा पुकारा भावनेचा नव्हता. साधा, भूक नावाच्या प्राथमिक गरजेपोटी प्राथमिक शिक्षक प्रथम रस्त्यात आपले लक्तर मोकळे टाकून आला होता. मी त्या मोर्चामागून चालत गेलो, हे तो मोर्चा चौकात आला त्या वेळी कळले. पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशाला? शंभर उंदीर एकदम कुचकुचले म्हणून काय एका डरकाळीइतका तरी आवाज थोडाच होणार आहे? कोणीतरी बसा बसा म्हणू लागलं. मैदानात मोर्चा बसला. मीदेखील सायकल झाडाला टेकून बसलो. एक शिक्षक उभे राहिले. दुरून मला ते थोडेसे हरी नारायण आपट्यांसारखे वाटले. रुमाल बांधलेले असे ते एकटेच होते. शुद्धलेखन घालावं तसं ते बोलत होते. त्यांची लहान लहान वाक्यं एकेका शब्दावर जोर देऊन येत होती.

“शिक्षक बंधुभिगनींनो, व्यवसायाची पुण्याई संपली. समाजाने अंत पाहिला. सरकारने कशाला म्हणू? सरकार आपले आले काय, परक्याचे काय, आपले दुबळे हात पोहोचण्याच्या पलिकडले. पण समाजाने कातडे ओढले स्वत:च्या डोळ्यावर. ‘मास्तर, देन वेळेची चूल पेटते ना हो?’ असं विचारणारं इतक्या वर्षात कोणी भेटलं नाही. दडपलं होतं. पण आज आपल्या भुकेचं बेंड रस्त्यात फुटलं. आता सभ्यतेचा बुरखा कशाला ठेवू? हा माझा कोट. पंधरा वर्षांपूर्वी लग्नात मिळाला होता. सद्राही होता. तो फाटला, नवा शिवायचा संकल्प सोडत होतो. नाही परवडलं. खोटं नाही सांगत. हे पाहा." असं म्हणून त्यांनी स्टेजवर कोट काढला आणि आतला अस्थिपंजर डोळ्यावर भयानक आघात करून गेला. "आता रस्त्यात आलो. इच्छा नव्हती पण गत्यंतर नव्हतं. आता आत शर्ट नसतो. एका फुकट मिळालेल्या कोटावर व्यवसायाची प्रतिष्ठा सांभाळीत होतो हे गुपित उघडं केलं. माझी काय सगळ्यांची गोष्ट एकच! व्यवसायाची पुण्याई संपली. आमची एकच विनंती. उपाशी ठेवून ‘गुरुजी’ वगैरे नका म्हणू. नवरा-बायको आणि दोन-चार अर्भकांच्या भुकेच्या वेळा साजऱ्या होतील एवढं द्या आणि मग शाळा खात्यातले मजूर म्हणा आणि एज्युकेशन आक्टऐवजी फ्याक्टरी आक्ट लावा."

काढलेला कोट खांद्यावर घेऊन मास्तर खाली उतरले. माणसं भाषण संपल्यानंतरच्या टाळ्या वाजवायला विसरली होती. कारण त्या सर्व स्त्री-पुरुषांचे हात डोळे पुसण्यात गुंतले होते. माझ्या मनात घर करून राहिलेला हा एकच मोर्चा आणि मोर्चातले ते एकच भाषण आणि दामलेबाईंनी त्या पोरींकडे फेकलेली ती एकच अनोळखी नजर!”      

पुलंनी ‘धरती’ मासिकाच्या दिवाळी अंकात १९६७ साली ही कथा लिहिली. जी.ए. कुलकर्णींच्या काही कथांमध्ये शिक्षकांच्या दीनवाणेपणाचे यापेक्षाही भेदक वर्णन आहे. त्या तर आणखी जुन्या आहेत. फारच जुनी कथा महाभारतातील कौरवांचे मास्तर द्रोणाचार्यांच्या दारिद्र्याची आणि विकलांगतेची आहे. 

अभिताभ-शशी कपूरच्या ‘दीवार’ (१९७५) मधील शशी कपूरने (सब-इन्स्पेक्टर रवी चोप्रा) एका शाळकरी मुलाला (सिनेमातील मुलाचे नाव चंदर) गोळी घालण्याचा सीन आठवा. त्या मुलाने चोरलेली वस्तू म्हणजे पाव आहे, हे कळाल्यानंतर शशी कपूर त्याच्या घरी जातो. जाताना तो काही भाकरी घेऊन जातो. झोपडपट्टीत ते घर असते. अठराविश्वे दारिद्रयाच्या खुणा असलेल्या त्या घरातील एकमेव समृद्धी म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची तस्बीर! त्या मुलाचे वडील (ए.के. हंगल) हे निवृत्त शिक्षक असतात. घरात अन्नाचा कणही नसल्याने मुलगा आई-बापांसाठी पाव चोरतो, हे सत्य शशी कपूरला उमगते. घरी आलेला पोलिस अधिकारी हाच आपल्या मुलाला गोळी घालणारा पोलिस अधिकारी आहे, हे समजल्यानंतर मुलाची आई त्याला दूषणे देते, हाकलून देते. पण वडील मात्र कसलेही दूषण न देता उलट चोराला शिक्षा करणे आवश्यक आहे, असे सांगतात. भुकेल्या आई-बापासाठी चोरी करणे हा नियम होऊ शकत नाही, भारतात लाखो लोक भुकेले आहेत, उलट शशी कपूरने केले ते योग्य केले असे ते म्हणतात. यावेळी त्यांच्यात जो काही अप्रतिम डॉयलॉग होतो, त्यातून शशी कपूरला असा काही धडा मिळतो की तो म्हणतो, ‘इतनी बडी शिक्षा किसी टीचर के घरसे ही मिल सकती थी!’ 

‘अधर्म करणाऱ्या नालायक नातेवाईकाला शिक्षा करावी की नाही’ या प्राचीन धर्मसंकटात पडलेल्या शशी कपूरला मार्ग सापडतो आणि स्मगलर भावाला, विजय चोप्राला (अभिताभला) पकडण्याच्या मोहिमेवर तो निघतो. धर्मसंकटात पडलेल्यांकडून श्रीमद्भगवतगीतासुद्धा जे निष्काम कर्म करवून घेण्यास फारशी समर्थ ठरत नाही, ते काम एक शिक्षक सहज करून जातो, हे भेदक सत्य चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि संवाद लेखक सलीम-जावेद सहजपणे लक्षात आणून देतात. शिक्षक दरिद्री असला तरी नीतीचे पाठ देण्याची सामाजिक समृद्धी केवळ त्याच्याच ठायी असते, हे लक्षात घेतले पाहिजे. (अर्थात सक्षम व संवेदनशील विद्यार्थी ही अट गृहीत धरावी लागते.) हा एकूण प्रसंग, त्यातही अन्नचोर बालकाच्या वडलांचे निवृत्त शिक्षक असणे, यातून सत्तरच्या दशकातील शिक्षकांची अवस्था कशी दरिद्री होती, हे अधोरेखित होतेच; पण सामाजिक आणि व्यक्तिगत नैतिकतेच्या ओझ्याखाली वाकलेला वर्ग हा मुख्यत: शिक्षकवर्गच होता, हे जास्त अधोरेखित होते.

नीती आणि अनीती यातील संघर्ष खरा दाखवला आहे तो मराठील जब्बार पटेल निर्मित-दिग्दर्शित ‘सामना’मध्ये. सरपंच निळू फुले आणि मास्तर श्रीराम लागू यांची नैतिकतेची जुगलबंदी त्या दशकात मोठी वादग्रस्त ठरली. यातील मास्तर हा खराच मास्तर असतो की, नाही, हे सरपंचालाही माहिती नसते. पण त्याची सचोटी पाहून सरपंच त्याला ‘मास्तर’ म्हणू लागतो. दुसरे नाव पटकथा लेखकाला का सुचले नाही? सुतार, मुकादम, बारक्या, पाटील, रावसाहेब, भाऊसाहेब इत्यादी काहीही चालले असते. पण ‘मास्तर’ हेच नाव लेखकाला सुचले. कारण ‘मास्तर’ या नावातच एक नैतिक दबदबा आहे. (उलट दादा, पाटील, रावसाहेब, भाऊसाहेब ही सरकारी कचेऱ्यातील नावे मुजोरपणा आणि नैतिक अध:पतनाशी लगडलेली आणि लडबडलेली असतात.)

तीच गोष्ट शांतारामबापूंच्या ‘पिंजरा’तील मास्तराची (श्रीराम लागू). समाजातील नैतिक अध:पतनाची नीचतम पातळी गाठण्याची परवानगी राजकारण्यांना आणि इतर सर्वसामान्यांनासुद्धा आहे. पण ही परवानगी मास्तरला नसते. म्हणून तर ‘पिंजरा’तील मास्तर शोकांत नायक बनू शकतो, असा नायक बनण्याचे पोटेन्शियल त्याच्यात असते. कारण नीतीची जबाबदारी मुख्यत: शिक्षकांवरच असते.  

पण दुदैवाने या समस्त शिक्षकवर्गाच्या उच्च नैतिकतेचे रूपांतर (किंवा उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत नैतिकतेचे भाषांतर) त्यांच्या उच्च आर्थिक दर्जात होत नव्हते, त्यांच्याबाबतीत कसलेही पॉझिटिव्ह डिकन्स्ट्रक्शन होतच नव्हते. नीतीच्या भाराखाली दबलेला हा ‘गाढव-माणूस’ समाज आणि शासनाकडून ‘माणूस’ या पदाकडे उन्नत होत नव्हता. तो ‘नैतिकतेचा गाढव’ या पदवीला पात्र ठरत होता. परिणामी ‘शिक्षक दिन’ हा ‘शिक्षक दीन’ आहे‚ हेच सिद्ध होते.

लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......