या तो गवाही दो, या हो जाओ गूंगे
संकीर्ण - श्रद्धांजली
गणेश विसपुते
  • चंद्रकांत देवताले ( ७ नोव्हेंबर १९३६ - १४ ऑगस्ट २०१७)
  • Wed , 06 September 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली चंद्रकांत देवताले Chandrakant Devtale गणेश विसपुते Ganesh Visputay

आपल्या आवडत्या कवीचा निकटचा संपर्क दीर्घकाळ राहाणं ही मोठी सुखावणारी गोष्ट असते. चंद्रकांत देवतालेंच्या कवितेतला थेट, काहीसा संतप्त, परखड आणि सच्चा स्वर त्यांची पहिली कविता वाचली तेव्हापासूनच भिडलेला होता. 'माणसाच्या मांसात जे जबडे। रुतवत आहेत दात। त्यांच्यावर केला जाणारा प्रहार असेल कविता। तर मी कवितेचा आभारी आहे।' असं नेमकेपणानं सांगणारी त्यांची कविता वाचत आलो होतो.

त्याच दरम्यान प्रगतीशील लेखक संघाच्या काही तरुण कवींशीही परिचय झाला होता. देवतालेंबद्दल ते सगळे आदरानं बोलत असत. स्वतः ते म्हणत की, मी कोणत्याच विचारधारेला बांधील नाही. पण मुक्तिबोधांच्या वाटेवरच त्यांची कविता होती हे उघड आहे. कॉलेजात दुसऱ्या-तिसऱ्या वर्षाला असताना ते कॉम्रेड होमीदांच्या सभांना जात, त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत निवडणूक प्रचार वगैरेही त्यांनी केला. पण तो त्यांचा पिंड नव्हता. त्यांची कविता मात्र त्यांचा वैचारिक कल कुठे आहे ते सांगत होती.

१९९०च्या सुरुवातीला पुण्यात कुठेतरी एका लहानशा समारंभात देवतालेंना पहिल्यांदा ऐकलं होतं. तिथंच विष्णू खरे आणि हिंदीतले आणखीही काही कवीही आलेले होते. या पिढीतल्या सगळ्यांच्या कविता मिळतील तिथून वाचत होतो. भारतीय भाषांमधले समकालीन आम्ही शोधून वाचत होतो. मी कवितांची भाषांतरं करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याच कविता भाषांतरित केल्या होत्या मराठीत. कधी तरी देवतालेंची समारंभातच भेट झाली होती. तेवढीच ओळख होती. ते मराठी उत्तम बोलत. मराठीतलं मिळवून वाचत असत-विशेषतः कविता. त्यांची प्रत्यक्ष भेट नंतर दोन-चार वर्षांनी झाली. मुंबईत कुठला तरी प्रकाशनसमारंभ होता. त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होतं. श्रोत्यात कुठे तरी बसलो होतो. त्यांच्या भाषणात अचानक ते म्हणाले, "यहां सामने गणेश विसपुते है, और उसकी कविताएं भी मैं बराबर पढ़ते रहता हूं। मुझे अच्छी लगती हैं।" मी चकित झालो. आपल्या अतिशय आवडत्या कवीनं केलेलं कौतुक कुणाला आवडणार नाही. त्यांनी कुठं वाचल्या, कोणत्या कविता वाचल्या अशी मला शंका वाटत होती. आडून आडून विचारल्यावर त्यांनी सांगितल्यावर बरं वाटलं होतं. मनात असेल ते त्या क्षणी बोलून टाकत. ते असेच होते. स्पष्ट-पारदर्शक.

नंतर दिलिप चित्रेंच्या घरी आमची भेट झाली. त्यांच्याकडे ते नियमित येत. पुण्यात आले की त्यांच्याकडे उतरत. मग फोन झाला की आम्ही सलग दोन-तीन दिवस भेटत असू. रात्री उशिरापर्यंत गप्पा चालत. चित्रे भोपाळला होते तेव्हा त्यांचा नियमित संपर्क होता. देवताले तेव्हा इंदोरच्या कॉलेजात शिकवत असत. चित्रे कुटुंबियांचा तेव्हा त्यांच्याशी नियमित संपर्क असावा. आशय त्यांना बाबा म्हणत असे. म्हणून मीही बाबा म्हणू लागलो. त्यांना ते आवडलं. पुढे मग फोन केला अन् मुद्याचं बोलायला लागल्यावर ‘तुने आज बाबा नहीं कहा’ म्हणून आठवण करून देत. त्यांचा फोन आला की, ‘अरे, मी बाबा बोलतोय,’ अशी मराठीतून सुरुवात करीत. इतका आरपार नितळ माणूस की, त्यांचं प्रेम, राग-रुसवा, काळजी आवाजातूनही कळायचं. वाक्याच्या टोकावर ह्यूमर अनेकदा तत्पर असे. अचानक फोन करून, आवाज बदलून "नमष्कार. मैं गणेश विसपुते की कविताओं पर पीएचडी करना चाहता हूं-" असं म्हणत फिरकी घेत.

इतक्या वर्षांत इतक्या ठिकाणच्या त्यांच्या आठवणी आहेत. त्यांनी लिहिलेली पत्रं, लिहून पाठवलेल्या कविता, चिठोऱ्यांवरचे निरोप आणि त्यांचे कवितासंग्रह. उशिरापर्यंत गप्पा, कवितांच्या. पुस्तकांच्या. दरवेळी माझ्यासाठी एक पुस्तक देत. मुली वाचताहेत म्हटल्यावर आजोबांसारखे खुश होत. पुण्यात एकदा राष्ट्रीय पुस्तक मेळ्याच्या निमित्तानं आले होते, तेव्हा आवर्जून घरी आले होते. तेव्हा पाचवीत असलेल्या माझ्या थोरल्या मुलीनं-राहीनं मुंबईच्या बॉम्बस्फोटावर कविता लिहिली होती. ती त्यांना इतकी आवडली की, त्यांनी ती परस्पर भोपाळच्या दैनिकात अनुवाद करून छापली होती.

त्यांना नाशिकचा कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला होता तेव्हा आम्हा मित्रांना खूप आनंद झाला होता. त्यावेळी 'प्रहार'मध्ये मी लेख लिहिला होता. तो त्यांना आवडला असावा. त्याआधी ‘इत्यादी’मध्ये हिंदी कवितेतल्या कवींवर वर्षभर स्तंभ लिहिला होता, त्यात सुरुवातीलाच त्यांच्यावर लिहिलं होतं.

तुकाराम, कबीर आणि मुक्तिबोध ही त्यांची लाडकी दैवतं होती. मुक्तिबोधांप्रमाणेच ते मराठी भाषेतल्या साहित्याशी निव्वळ परिचितच नव्हे तर मराठीत नवं काय लिहिलं जात आहे यावर त्यांचं लक्ष असे. भारतभरातल्या तरुण कवींच्या ते नित्य संपर्कात होते. त्यांनी लिहिलेलं वाचून खुलेपणानं त्यावर प्रतिक्रिया देत-चर्चा करत होते. दिलिप चित्रेंच्या कवितांचं त्यांनी भाषांतर केलेलं होतं.  अखेरच्या काळात त्यांनी तुकारामाच्या अभंगांचा अनुवाद करायचा ध्यास घेतला होता. दिलिप चित्रेंकडे ते नियमित येत असत. आणि तुकारामाची गाथा उघडून एकेका अभंगावर त्यांची आपापसात दिवसभर चर्चा चालत असे. संत नामदेवानं 'शतकोटी तुझे करीन अभंग' असं म्हणत शंभर कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला होता. तो पूर्ण झाला नाही तेव्हा त्यांनी तुकारामाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की, उरलेले अभंग तू पुरे कर (उरले शेवटी लावी तुका). देवताले म्हणत तुकारामानं मलाही स्वप्नात येऊन हे एक काम सांगितलेलं आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय मला मुक्ति नाही. त्यांनी अखेर ते काम पूर्ण केलं. तुका आणि नामदेव नावाची त्यांची एक कविता आहे ज्यात त्यांना त्या दोघांचा 'शिवरंजनी सुगंध जाणवत होता' आणि 'त्यांचं हस्ताक्षर आपल्या कवितेच्या पाठीवर आहे' असा त्यांना विश्वास होता. कवी असणं हे तुकारामानं विठोबाच्या आदेशाप्रमाणे जीवितकार्य मानलं होतं. शब्द हेच आपल्या जीवाचं जीवन म्हणत त्यांनी त्यांतून मानवी व्यवहाराचा व्यापक पट मांडला. तुकोबानं कवितेत केलेलं बंड हे देवतालेंसाठी ऊर्जास्रोत होता. त्यांनी एका कवितेत तुकोबाला विश्वास दिला होता-

बचपन से रहता हूं तुम्हारे जैसों की ही

आवाज़ों के घर में

भगोड़ा नहीं हो सकता

तुम्हें तो पता

चीखते रहना ही मेरी नियति।

देवतालेंच्या कवितेत वर्तमान आहे, तो 'आत्ता आणि इथे'चा काळ आहे. यात जे जे काही उपस्थित आहे, ते ते सगळं त्यांना कवितेत हवं आहे. आजचा समाज, राजकारण, विषमता, अन्याय आणि त्याविषयीचा कळवळा तर आहेच, पण सच्ची बांधिलकीही आहे. सर्वसामान्य माणूस, श्रमिक आणि स्त्रिया यांचं वास्तव आणि त्यांच्या संघर्षाशी त्यांची बांधिलकी आहे. जगण्यातले साधेसेच वाटतील असे प्रसंग आणि घटना त्यांच्या कवितेत अशा अद्भुत रीतीनं मांडले जातात आणि त्या बारीकीनं केलेल्या संवेदनशील मांडणीतून त्यांची भाषा चमकून जातेच, पण ती सांगत जाते की या मांडणीत तुम्हाला अर्थांची अनेक न सोललेली सालं उलगडायची आहेत. त्यामुळे त्या कविता प्रसंगांची केवळ प्रतिक्रिया म्हणून न उरता मानवी जगण्यातल्या पेचांवरचं सार्वकालिक भाष्य ठरतात. कवीची तीक्ष्ण नजर आणि तीव्र सामाजिक-राजकीय भान यामुळे हे शक्य होतं.

त्यांची पहिली कविता १९५४साली ‘नई दुनिया’त छापून आली, म्हणजे साठ वर्षांहूनही अधिक काळ ते कविता लिहित होते आणि अखेरपर्यंत त्यांची कविता ताजी राहिली. साठोत्तरी पिढीतल्या इतर भाषांमधल्या कवींशी-विशेषतः मराठीतील कवींशी त्यांचा निकटचा संपर्क अखेरपर्यंत होता. समाजातला तळातला शोषित आणि त्याचं अभावांनिशी जगणं, सामान्यातल्या सामान्य माणसाची माणूस म्हणून होणारी अवहेलना, त्याची वेदना हे तर त्यांच्या कवितेचा गाभा होताच, आणि त्याविषयीची चीड, संताप, त्या माणसातली खोलवरची आस्था त्यांच्या कवितेतल्या लहजावरूनही कळून येत असे, पण हा लहजा, हा आवाज त्या साधारण आणि सामान्य शोषिताच्या आवाजात मिसळून गेलेला होता. तो त्यांचाच स्वर बनला होता. त्यामुळे त्यांचं वैशिष्ट्य हे की त्यांच्या कवितेची भाषासुद्धा या सामान्य शोषितांच्या स्वरातून आलेली, बोल-चालीतली, सहज आणि संप्रेषणीय आहे. त्या कवितेत नकार आहे, नाराजी आहे, विद्रोह आहे, प्रखर आणि तीव्र निषेध आहे, पण तो सर्वसामान्यांच्या पीडेतून, आणि ती पीडा जगण्याच्या प्रत्यक्ष अनुभवातून आलेल्या आवाजातला आहे.

देवताले समग्रतेचे कवी होते. कुरूप आणि सरूप या दोन्हींच्या अस्तित्वाचा अर्थ  ते जाणत होते.  आत्मीय नात्यातलं सौंदर्य आणि त्यांच्या बळानं मिळणारं उच्चतर मानवी मूल्यांचं भान त्यांना होतं. हिंदी कवितेत स्त्रियांवर सर्वाधिक कविता त्यांनीच लिहिल्या असतील. स्त्री नसती तर 'भल्या गोष्टींच्या भानगडीत' पडताच आलं नसतं असं ते एका कवितेत म्हणतात. पत्नी, मुली, आई, वृद्धा अशा अनेक स्त्री-रूपांवरच्या त्यांच्या कविता लक्षणीय आहेत. यांतून त्यांना सकल स्त्रीरूपच मांडायचं होतं. 'बाई! दरद ले!' (बाई, वेणा दे!)  नावाची त्यांची कविता आहे, त्यात ते म्हणतात, ‘आकाश पाताळातही मावत नाही एवढं हे या स्त्रीजातीचं दुःख आहे आणि धरतीवरचं सगळं पाणीसुद्धा धुवून काढू शकत नाही इतक्या आहेत तिच्या आसवांच्या सुकलेल्या खुणा. (आकाश पाताल में भी अट नहीं सकता/इतना है औरत जात का दुख/धरती का सारा पानी भी/धो नहीं सकता/ इतने हैं आंसुओं के सुखे धब्बे)

देवतालेंची मुळं ग्रामीण वास्तवात, लहान गावातल्या सांस्कृतिक पर्यावरणात आहेत. गावाच्या आठवणींतून मिळणाऱ्या तिथल्या परंपरा आणि विश्वासाचं संचित ते प्रत्यक्ष वर्तमानाशी भिडवतात. त्यामुळे आपसूकच त्यांच्या कवितेची भाषा मोकळी-ढाकळी, थेट आणि वाचकाशी सहजसंवादी बनते. अनेकदा तिच्यात रांगडेपणाही दिसतो. बांधिलकीच्या तीव्र आस्थेतून आलेल्या कविता असोत की, कौटुंबिक-व्यक्तिगत अनुभवातल्या आप्त-स्वजनांविषयीच्या कविता असोत, त्यांच्या कवितेतून आपल्या एक प्रामाणिक, सच्चा सूर ऐकू येतो आणि त्यांची कविता कवीपेक्षा वेगळी उरत नाही. ती वाचकासाठीही पारदर्शक बनते. त्यातून लख्खपणे वेगळ्याच परिप्रेक्ष्यातल्या वास्तवाचं असं दर्शन घडतं की, संवेदनशील वाचकाला वाटत राहतं, अरे, हे मला कसं आधी सुचलं नाही? कसं आधी दिसलं नाही? असेच होते देवताले. थेट, सच्चे, निरागस, रुसणारे आणि संतापणारेही.

वरवर पाहता ते आसपासचंच जग साध्या माणसांमधून, साध्याशाच वाटणाऱ्या प्रसंगातून पाहत आहेत असं वाटतं. त्यातून ते बधिर झालेला दुतोंडी मध्यमवर्ग, शोषणाच्या नाड्यांनी बहुसंख्यांना नाडणारा उच्च-भांडवलदार वर्ग, तसेच आसपासच्या लोकांचे दैनंदिन व्यवहार, त्यातली हिंसा आणि क्रौर्य ते उघडकीस आणतात. एका लिंबासाठी मार खाणारी प्रौढा, देवी-वध, भाजीवाली, चहा मागणारी सफाई कामगार, बुटपॉलिश करणारी मुलं, बेरात्री घरातून हाकलून दिलेला वृद्ध पिता, कोळसा कामगार अशा व्यक्ती त्यांच्या कवितेतून भेटतात. त्यातून ते निर्भीडपणे समाजातला दांभिकपणा आणि क्रौर्य दाखवतात. ते करताना ते जो परिप्रेक्ष्य वापरतात, त्यामुळे त्यांच्या कवितेचा विस्तार विश्वातल्या तमाम घडामोडींशी जाऊन मिळतो.

देवतालेंमधला कवी त्यांना सतत कवित्वाच्या योग्य वाटेवर ठेवण्यासाठी प्रसंगी 'जीवाचा शत्रू' बनून टोकत राहिला, 'प्रॉम्प्टिंग' करत राहिला. सत्तेतल्या गुंडांविषयी, हिंसेविषयी, सत्तेला सतत प्रश्न विचारण्याविषयी त्यानं जागं ठेवलं. प्रतिष्ठित बदमाश व्यासपीठावर बसलेले असताना त्यांना माननीय वगैरे म्हणण्याऐवजी  ''तू कवी आहेस. या लबाडांसाठी त्यांची कुवत दाखवणारा योग्य शब्द शोध.' असं त्यांचं जागृत कवित्व त्यांनी अखेरपर्यंत सांभाळलं. कवी असण्याची जोखीम आणि जबाबदारी त्यांनी ओळखली होती. स्वतःचीही ते अनेकदा उलटतपासणी घेतात. स्वतःचं कवित्वच नव्हे तर कविकर्मावरच्या निष्ठेचीही ते परीक्षा घेतात. कवितेतून कवितानिर्मिती प्रक्रियेचा आणि कर्त्यांचाही ते सतत विचार करत आहेत असं त्यांच्या अनेक कवितांमधून आपल्याला दिसतं. समकालीन कवितेच्या बाजारूपणाविषयीही ते कडवट होतात आणि स्वतःवर निगराणी ठेवायला सांगतात. तात्कालिक प्रसिद्धीच्या मोहापायी भाषेशी दगाबाजी करू नका (चुटकी भर अमरता-ख़ातिर / विश्वासघात न हो जाये / अपनी भाषा, धरती और लोगों के साथ ) असं बजावतात.

माणूसपणाच्या सगळ्या आस्थांची रूपं कवितेत येणं हे चांगल्या कवितेची पूर्वअट असते. देवतालेंच्या कवितांमधूनही ते दिसतंच; पण जगण्याच्या समग्र पैलूंना ते आपल्या कवितेच्या परिघात आणतात. हरवत-नष्ट होत चाललेल्या, बरबाद झालेल्या मौलिक गोष्टींना, वारश्याला वाचवू न शकण्याची हताशा निर्मम आत्मताडनापर्यंत ते पोहचवतात. आणि या अकर्मण्यशीलतेला ते तीव्रतेनं फटकारतात -

शर्म आ रही मुझे डींगे हाँकने पर/कोशिश की होती तो हम बचा सकते थे

किन्तु इस ख़तरनाक मौसम में/ भुखमरी, ग़रीबी और अज्ञान की महामारी के

झोलाछाप डॉक्टरों की तरह / हम भाषा का धन्धा करते रहे...

किंवा-

कृपया शान्त रहें! /मुझे पता है इसमें आपको /कविता नहीं मिल रही

मिल भी नहीं सकती / आप वक़्त की सूखी नदी में /पानी ढूंढ रहे हैं

मैं जानता हूं आपकी ताक़त / फिर भी कृपया...

अंगावर काटा उभा राहातो. ते तुम्हाला तुमच्या असण्याच्या अर्थाचं भान आणतात. त्यांच्या कवितेतून आपल्या या भूमीवरचं, देशातलं, भाषेतलं जे जे चांगलं आहे, टिकून आहे ते वाचवण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. माणूस म्हणून अधिक चांगला माणूस होण्यासाठीचं बळ मिळतं. देवतालेंच्या कवितेचं मोठेपण हेच आहे.

माझ्या कवितासंग्रहासाठी त्यांनी ब्लर्ब लिहिला होता. त्याची सुरुवातच त्यांनी कवितेच्या ओळींनी केली होती -

जसे मरून गेल्यावरही
पूर्वज पुटपुटत देत राहातात शिकवण
आणि आपल्याला ऐकूही येत राहातो त्यांचा आवाज
जो कित्येकदा आसवांच्या थेंबांसारखा
झिरपतो आपल्या झोपेतसुद्धा.

पुस्तक छापून झालं होतं. मराठीत दूरसंचार यंत्रणा खूप प्रभावी असते. त्यांना पाठवायच्या आधीच त्यांना ते कळलं होतं. "क्यूं रे, क्या लिखा है ब्लर्ब पर?"मी सांगितलं, ‘वही, जो आपने लिखवाया.’ वाचून दाखवलं. विचारलं, ‘क्यूं, कुछ बदलवाना है? या फिर पुरी एडिशन पल्प कर दूं?’ तर ते हसले. संग्रहाची छापील प्रत मिळाल्यावर फोन करून कळवलं.

काही अडलं तर त्यांना मी फोन करत असे. अतुल पेठेच्या फिल्मचं स्क्रिप्ट इंग्रजीत करत होतो, तेव्हा कबीराचा एक दोहा मला अडला. तेव्हा त्यांना विचारल्यावर म्हटले, थांब, चार वाजता फोन करून सांगतो. मग तो दोहा सबदमध्ये आहे की कुठे ते सांगितलं. त्यावर बोलत राहिले. अनेक गोष्टी जाता-जाता सांगत. काय वाच हे सांगितलं. त्यांच्यामुळे अनेक लेखक-कवी वाचता आले. मुक्तिबोधांपर्यंत पोचण्याची वाट त्यांच्या पुस्तकांमुळेच सोपी झाली. अनेकदा अलीकडे म्हणत, ‘अबे, इतना मत पढ, कवि के लिए इतना पढ़ना अच्छा नहीं होता.’

त्यांनीच एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे ते घनघोर कुटुंबवत्सल गृहस्थ होते. अनेक गोष्टींत त्यांना कुतूहल असे. स्वयंपाक उत्तम करत. एक-दोनदा तर पाकस्पर्धेत त्यांनी बक्षीसही मिळवलं होतं. उज्जैनमधल्या घरात ते रमलेले होते. घराभोवतीची प्रेमानं वाढवलेली बाग, वेली, झाडं यात रमत. एक कुत्राही होता त्यांच्याकडे. त्याला ते ‘बकू पंडित’ म्हणत. भाजीबाजारात जायला खूप आवडत असे. कधीतरी समकालीनांविषयी, काही व्यक्तींविषयी आपल्याला माहीत नसलेले वेगळेच पैलू सांगत. त्यांच्यासोबतच्या विषादपूर्ण आठवणी सांगत. पण नंतर विषय बदलायला पुन्हा- ‘सुनो, मैं ने जो आम्र पायस की रेसिपी बनाई थी, उसे पुरस्कार मिला था.’ असं सांगून निर्व्याज हसत.

अलीकडेच त्यांचा फोन आला होता. नेहमीसारखीच 'बाबा बोलतोय, ओळखलंस ना?' अशी मराठीतून सुरुवात करत. 'सुना है, तू राजनांदगाव गया था, मुक्तिबोधपर तुने निबंध लिखा. मुझे प्रभात त्रिपाठी ने बताया.' मग रागावून झालं होतं. नियमित फोन होत नाहीत म्हणून. "अब शनिवार को चार बजे के बाद फोन करना मुझे." असं बोलून फोन ठेवला होता त्यांनी.

मी शनिवारी फोन केला नाही. आणि ते गेलेच.

त्याच्या कवितेत दुतोंडीपणा नव्हता. स्पष्टवक्तेपणा त्यांचा आणि त्यांच्या कवितेचा विशेष होता. कुठेतरी सातपुड्याच्या डोंगरांमधल्या जंगलांच्या मधोमध असलेल्या शेतात घालवलेलं बालपण आणि रांगडेपणा त्यांच्या आणि त्यांच्या कवितेतल्या भाषेतही होता. आपण एक सामान्य नागरिक आहोत, याचा त्यांना अभिमान वाटे. त्यांनी लिहिलंय-

यदि मेरी कविता साधारण हैं

तो साधारण लोगों के लिए भी

इसमें बुरा क्या,

मैं कौन ख़ास...!

पण कवीला सत्याचं साक्षीदार असावंच लागतं अशी त्यांची कविता अखेरपर्यंत सांगत राहिली होती -

यह वक़्त वक़्त नहीं

एक मुकदमा है या तो गवाही दो

या हो जाओ गूंगे

हमेशा-हमेशा के वास्ते...

दुर्दैवानं आज काळानं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आणली आहे.

.............................................................................................................................................

लेखक गणेश विसपुते मराठीमधील नामवंत कवी आणि अनुवादक आहेत.

bhasha.karm@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Praveen Bardapurkar

Wed , 06 September 2017

प्रिय गणेश , लेख चांगला उतरलाय . देवताले कसे land झालेले आहेत तुझ्या मनात ते नेमकेपणानं आलंय .


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......