शिक्षक दिन ते मास्तरडे (मास्तर-डे!) – एक शोकांतिक प्रवास (भाग दुसरा)
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 06 September 2017
  • पडघम सांस्कृतिक शिक्षक दिन Teachers' Day मास्तर डे ५ सप्टेंबर 5 September

५ सप्टेंबर हा भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र अलीकडच्या काळात ‘भारतीय शिक्षक दिन’ दोन चेहऱ्यांच्या कात्रीत सापडला आहे. ‘शिक्षक दिन’ या शिक्षकांच्या सणाला ‘मास्तर-डे’ असे स्वरूप आलेले आहे. त्याचा शोध या लेखमालिकेत घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आजच्या या दुसऱ्या भागात लॉर्ड फ्रान्सिस बेकन, अरबी व इस्लामी विचारविश्वात The Second Teacher’ (‘दुसरा गुरू’) म्हणून ओळखला जाणारा तत्त्ववेत्ता अल् फराबी यांची माहिती तसेच ‘आचार्य’ ही संकल्पना व भारतीय आचार्य परंपरा, Professor, Associate Professor, Assistant Professor, Emeritus Professor, Principal, Sir या संकल्पनांचे मूळ अर्थ स्पष्ट केले आहेत.

ही लेखमालिका पाच भागात प्रकाशित होईल. आजचा हा दुसरा भाग.

.............................................................................................................................................

बेकन प्रसिद्धी आणि सत्तेसाठी नेहमीच हपापलेला असे. अशी एक कथा आहे की, प्राचीन काळी होऊन गेलेल्या सेंट जर्मेन या संताचा पुनरावतार म्हणून तो प्रगट झाला. सेंट जर्मेन हा प्राचीन काळी ईश्वराचा प्रेषित या अर्थाने ‘पुनर्अवतरित मास्टर’ म्हणून ख्रिश्चन परंपरेत ओळखला जातो. बेकनला किमयाशास्त्र अवगत होते. या किमयेचा वापर करून तो गायब झाला आणि प्रगट होऊन स्वत:ला ईश्वराचे प्रेषित म्हणून ‘पुनर्अवतरित मास्टर’ म्हणून आणि अमर असल्याचे घोषित केले. अर्थात या कथेबद्दल संशय आहे. शुद्ध वैज्ञानिक ज्ञानाचा आणि वैज्ञानिक पद्धतीचा पाया रचणारा बेकन मायावी किमयाशास्त्राचा आधार घेईल, असे वाटत नाही.

त्याला स्वत:बद्दल खूप प्रौढी व अभिमान वाटत असे. त्याला त्याचा आनंद वाटे. तो म्हणत असे, ‘‘तत्त्वज्ञानाच्या अत्यंत गूढतम प्रांतात मी प्रकाश टाकला आहे. मी मेल्यानंतर अनेक शतकानंतरच लोकांना माझे महत्त्व कळेल. थडगी उभारून, नाट्यगृहे बांधून, मंदिरे व प्रतिष्ठाने स्थापन करून, माझ्या नावाचे पुरस्कार सुरू करून आणि माझ्या नावे संस्था स्थापन करून लोक माझी स्मृती जतन करतील, माझा जयजयकार करतील. मी काही माणसाच्या अहंकराचे मनोरे बांधीत नाही; तर मी या जगाच्या रूपातील पवित्र मंदिराच्या मानवी आकलनाचा पाया रचतो आहे.”   

बेकनची ग्रंथसंपदा

बेकन ज्यामुळे Master समजला जातो, ते त्याचे मुख्य लेखन वैज्ञानिक स्वरूपाचे आहे. पण त्याने सर्वच क्षेत्रात प्रचंड लेखन केले. त्याच्या लेखनावरून त्याच्या व्यापक व मूलगामी आकलनक्षमतेचा आवाका अवाक् करणारा आहे. अ‍ॅरिस्टॉटल आणि इतर पोथीपंडितांचा धिक्कार करून तो त्यांना मानवी प्रगतीच्या आड आल्याबद्दल दोषी ठरवितो. मुळापासून साऱ्या ज्ञानाची नव्याने रचना करणे आणि विज्ञानाची पुनर्रचना करणे यावर तो भर देतो. विज्ञान, कला, साहित्य व सारे मानवी ज्ञान रचण्याचा त्याचा प्रयत्न म्हणजे Instauratio Magna (The Great Instauration) ही त्याची महत्त्वाकांक्षी योजना होय. त्याने प्रत्यक्ष अनुभव व निरीक्षण या निकषांवर वैज्ञानिक पद्धती तयार केली. तिला ‘विगामी पद्धती’ (Indudctive method)  किंवा ‘बेकनची पद्धती’  म्हणतात. या योजनेचाच एक भाग म्हणून बेकनने New Method (Novum Organum :The New Organon)  हा ग्रंथ लिहिला. त्याचे मूळ लॅटीन नाव Novum Organum Scientiarum या ग्रंथातूनच त्याने अ‍ॅरिस्टॉटलचे खंडन करून स्वत:ची वैज्ञानिक पद्धती मांडली.

बेकनचे आयुष्य वादग्रस्त, अतिशय वादळी गेले. त्याला यश मिळत गेले, देशाचे सर्वोच्च पद मुख्य न्यायाधीशपद ही त्याला लाभले. इंग्लंडचा तो अ‍ॅटर्नी जनरल आणि लॉर्ड चॅन्सलर होता. पण तो बराच राजकारणी, धूर्त आणि कावेबाज होता. त्याची विवेकबुद्धी लवचीक आणि लाचार होती. न्यायाधीशपदी असताना त्याला लाच घेतल्यामुळे सर्व पदांवरून बडतर्फ होऊन नंतर मानहानीचे आयुष्य जगावे लागले. त्याला लाच घेतल्याबद्दल ४०,००० (चाळीस हजार) पौंड दंडही झाला. अलेक्झांडर पोप (१६४६-१७१७) हा इंग्लीश कवी बेकनविषयी म्हणतो, ‘‘वैश्विक शहाणपाणमुळे त्याच्या काळातील सर्वांत शहाणा, स्वत:ची सामर्थ्यशाली बुद्धी आणि निबंधलेखनाची कला असल्यामुळे अत्यंत बुद्धीमान पण दुष्ट चारित्र्यामुळे अतिशय क्षुद्र माणूस!’’ अर्थात बेकनवर इतका दुष्टपणाचा आरोप करता येणार नाही, तसे पुरावे नाहीत; असे कोपल्स्टन हा तत्त्वज्ञानाचा इतिहासकार म्हणतो.

मांस बर्फात ठेवले असता ते कसे टिकू शकेल याबाबतचे संशोधन करीत असताना बेकनला न्यूमोनिया झाला. तो बरा होऊ शकला नाही. ६ (किंवा ९) एप्रिल १६२६ रोजी बेकनचा अंत झाला. बेकनच्या व्यक्तिगत जीवनातील त्रुटी अन् कसरी लक्षात घेऊनही त्याचे स्थान अतिशय उच्च दर्जाचे आहे. तो संपूर्ण विश्वाचा अ‍ॅरिस्टॉटलपेक्षा प्रगत Master आहे. त्याने म्हटल्यानुसार आज त्याच्या नावाचे शेकडो पुरस्कार दिले जातात आणि त्याच्या नावाने जगात अनेक संशोधन संस्था कार्यरत आहेत. 

Organon : Master (key)चा निकष

अ‍ॅरिस्टॉटललने जसा Organon हा महाग्रंथ लिहिला तसा आणि त्या तोडीचा ग्रंथ लिहिणे हा ग्रीक-युरोपीय परंपरेत ज्ञानाचा, नव्या शोधाचा निकष मानला गेला होता. असा ग्रंथ लिहिणे ही काही सोपी गोष्ट निश्चितच नव्हती आणि नाही. अ‍ॅरिस्टॉटलचे खंडन करून बेकनने ‘The New Organon’ आणि हनिमानने  ‘The Organon of the Healing Art’ लिहून मात्र आपापल्या क्षेत्रात संपूर्ण क्रांती केली. त्यामुळे या अ‍ॅरिस्टॉटलनंतर बेकन आणि हनिमान या दोघांना आणि अशा रीतीने तिघांन Master मानले जाते. 

आचार्य

Masterचे योग्य भाषांतर संस्कृतमध्ये ‘आचार्य’ असे करता येईल. भारतात सनातन आचार्य परंपरा आहे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे  आणि भगवतगीता या तीन ग्रंथाना वैदिक हिंदू तत्त्वज्ञानात सर्वोच्च महत्त्वाचे स्थान आहे. साऱ्या वेदांत विचारांचा किंबहुना भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास या तीन ग्रंथापासून सुरू होतो. म्हणून या ग्रंथाना वेदांत तत्त्वज्ञानाची ‘प्रस्थानत्रयी’ म्हणतात. प्रस्थान म्हणजे या ठिकाणाहून निघायचे ते ठिकाण किंवा उगम. त्रयी म्हणजे तीन. या प्रस्थानत्रयीवर वेगवेगळ्या आचार्यांनी भाष्ये केली. प्रस्थानत्रयीवर स्वतंत्रपणे भाष्य करणारा तोच आचार्य समजला जातो.

तथापि खऱ्या अर्थाने ज्यांना आचार्य मानले जाते ते केवळ आदि शंकराचार्य यांनाच. त्यांच्यानंतर हा मान शंकराचार्यांना मानणाऱ्या शिष्यांना दिला जातो. ते असे :

 अं.न.

 नाव

 काळ

 मताचे नाव

 १.

 शंकराचार्य

 इ.स.   ७८८ ते ८२०

 केवलाद्वैतवाद

 २.

 रामानुजाचार्य

 इ.स. १०५६ ते ११३७

 विशिष्टाद्वैतवाद

 ३.

 मध्वाचार्य

 इ.स. ११९९ ते १२७८

 द्वैतवाद

 ४.

 निबांर्काचार्य

 १३ वे शतक

 द्वैताद्वैत (भेदाभेद)वाद

 ५.

 वल्लभाचार्य

 इ.स. १४८१ ते १५३३

 शुद्धाद्वैतवाद

विसाव्या शतकात थोर जागतिक प्रवचनकार ओशो रजनीशांनी स्वत:ला Master आणि आचार्य म्हणवून घेतले!

शंकराचार्य

केरळातील ‘कालडी’ या गावी आठव्या शतकात इ.स. ७८८ साली आदि शंकराचार्यांचा जन्म झाला व त्यांचा मृत्यु इ.स. ८२० मध्ये झाला. या अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात शंकराचार्यांनी केवळ प्रस्थानत्रयीवरच भाष्ये लिहिली, असे नव्हे तर इतरही अनेक रचना केल्या. कवी, भक्त आणि तत्त्वज्ञ या तिन्हींचा संगम शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानात दिसून येतो. त्यांचे ‘ब्रह्मसूत्रभाष्य’ हे वेंदातसुत्रावरील भाष्य अतिशय प्रसिद्ध असून ते ‘शांकरभाष्य’ या नावानेही ओळखले जाते. ‘उपदेशसाहस्त्री’, ‘शतलोकी’ हे ग्रंथ आणि ‘आंनदलहरी’, ‘सौंदर्यंलहरी’ ही स्त्रोते अत्यंत प्रसिद्ध आहेत.

शंकराचार्यांचे कार्य इतके उत्तुंग आणि थोर आहे की, भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे अद्वैत वेदान्त हे समीकरण त्यांच्यामुळेच तयार झाले. हजारो वर्षांपासून अनेक पुराणकथा, भाकडकथा, मिथके यात अडकलेल्या आणि त्यातच भंजाळलेल्या अद्वैत सिद्धान्ताची वेगळी स्वतंत्र निखळ, शुद्ध मांडणी त्यांनी केली. त्यांच्यापासूनच हिंदू वैदिक धर्माला चेहरा लाभला. त्यांच्या अद्वैताच्या मांडणीत वर्ण-जातीव्यवस्थेला स्थान दिलेले नाही, हे महत्त्वाचे आहे. अनेक कारणांमुळे शंकराचार्य हेच खरे भारतीय आचार्य (पाश्चात्य परंपरेच्या परिभाषेत ‘मास्टर ऑफ दि मास्टर’) ठरतात.

Master आणि Teacher

हे दोन्ही शब्द ईश्वर आणि माणसासाठी उपयागात आणले गेले आहेत. दोन्ही संज्ञा ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रातही उपयोगात आणल्या गेल्या. ज्ञानी असतो तो Master आणि हे ज्ञानदान करतो तो Teacher, ही साधारण संकल्पना आहे. ईश्वर Teacher आणि Master दोन्ही असतो, हा समज सर्व धर्मांमध्ये (बौद्ध आणि जैन हे निरीश्वरवादी धर्म वगळता) प्रचलित आहे. माणूस Teacher आणि Master दोन्ही असू शकतो. पण त्यावेळी संदर्भ बदलतो. ईश्वराचा शिष्य किंवा धर्मसंस्थापक अथवा धर्मसंस्थापकाचा शिष्य या अर्थाने अस्सल शिष्यच Teacher आणि Master दोन्ही असू शकतो.

गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे निरीश्वरवादी धर्म संस्थापक आपापल्या धर्माचे Teacher आणि Master आहेत. ख्रिश्चन धार्मिक परंपरेत ईश्वर आणि धर्मगुरू दोघांसाठी हे शब्द वापरले जातात. ‘बायबल’च्या ‘जुना करार’नुसार ईडनच्या बगीच्यात आदम आणि ईव्ह यांना ईश्वराने जगाच्या निर्मितीचे रहस्य शिकविले. म्हणून ईश्वर हाच पहिला Teacher होय. त्याला विश्वाचे ज्ञान असते, म्हणून तोच पहिला Master सुद्धा आहे. ईश्वर जे सांगतो तेच धर्मगुरू सांगतात. त्यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूंना सुद्धा Teacher म्हणण्याची पद्धत आहे.

तत्त्वज्ञानात या दोन्ही संज्ञाचा मिलाफ ‘ज्ञान’ या निकषाच्या आधारे या संज्ञेत केला गेला.  

Teacher

इंग्लीशमधील Teacher हे नाम Teach या शब्दाचे क्रियापद आहे. Teach हे पद प्राचीन इंग्लीशमधील (taeca) tǣca अथवा किंवा मध्ययुगीन इंग्लीशमधील techen पासून बनते. techen चा अर्थ दाखविणे, एखादा मुद्दा अधोरेखित करणे अथवा सूचना देणे. १२९० नंतर हा शब्द ‘तर्जनी’ (The index finger) साठी वापरला जाऊ लागला. कारण ते बोट, एखादा मुद्दा दाखविणे-मुद्द्यावर बोट ठेवणे, यासाठी उपयुक्त असल्याचे मान्य झाले होते. १३०० नंतर त्याला आज प्रचलित असलेला अर्थ लाभला. (taeca) tǣca’चे इतर प्राचीन भाषेचे म्हणजे प्रोटो जर्मन, इंडियन, प्रोटो-इंडो-युरोपीअन भाषेतील संदर्भ पाहता एक वेगळीच बाजू समोर येते. या भाषांनुसार ‘(taeca) tǣcaचे अर्थ दाखविणे, शिकविणे. यात दोन अर्थ लपले आहेत. पहिला अर्थ : ‘समोरल्या शिकविल्यानंतर त्याला ते कबूल आहे’ असा जणू काही आरोपच करणे आणि दुसरा अर्थ : ‘‘संबंधित व्यक्ती माझ्याकडून शिकली’’ असे जाहीर शिक्षकाने स्वत:हून जाहीर करणे’. शिकविणारा, मार्गदर्शक हा समान अर्थ खूप उशीरा म्हणजे १३व्या शतकानंतर प्रचारात आला आणि सर्वच क्षेत्रात वापरला जाऊ लागला.   

‘Teacher’s Whisky’ या नावाची एक व्हिस्कीही आहे. ती अर्थात दोन्ही अर्थांनी आहे. तिचा गंमतशीर अर्थ घेतला तर ती शिक्षकांसाठीची दारू होते. मूळ अर्थ असा की, ती स्कॉटलॅण्डमधील विल्यम टीचर नावाच्या मद्यप्रेमीने ती १८३० साली सुरू केली. हा धंदा १८८४ साली (म्हणजे भारतीय काँग्रेस स्थापन झाली त्यावर्षी) चांगलाच भरभराटीला आला. आज ती जास्त फेमस आहे. अर्थात टीचर हे नाव असावे का? हा प्रश्न निरर्थक आहे. आपल्याकडेही शास्त्री, गुरू, मौला, ही आडनावे आहेत. आता टीचर अशी व्हिस्की असेल तर स्टुडंट नावाची बियर असायला काय हरकत आहे? युरोपात म्हणच आहे Student without a beer is like a dog without a tail! पण अद्यापि अशी बियर कुणी सुरू केलेली नाही. खरे तर भारतात ती संधी आहे. कारण भारतात ‘बियर ही दारू नाही’ अशी घोषणा होऊन ती रेशनिंगच्या दुकानात द्यावी, अशी सूचनाही आली होती. असो, म्हणजे पुन्हा एकदा नसो!!

माणसातील Teacher हा मान दोन तत्त्ववेत्त्यांकडे दिला जातो. पहिला मान अर्थातच अ‍ॅरिस्टॉटलकडे जातो. दुसरा मान अल फ़राबी (Al-Farabi – ८७२-९५०) या अरबी तत्त्ववेत्त्याकडे जातो.

अल् फराबी

ग्रीक तत्त्वज्ञान आणि अरबी जगत

हाव्या शतकात बगदाद हे तत्त्वज्ञानाचे मोठे केंद्र होते. हा काळ ‘इस्लामी सुवर्ण युग’ समजला जातो. तेथील अरबी मातीत अ‍ॅरिस्टॉटलवादाचे बी रूजविण्याचे महत्त्वाचे काम चार अरबी तत्त्ववेत्त्यांनी केले. पहिला अल् किंदी (जन्म -८६६ किंवा ८७३), दुसरा अल् फ़राबी (८७२-९५०), तिसरा इब्न सीना (९८०-१०३७) आणि चौथा इब्न रशीद (११२६-९८).

या साऱ्यांनी इस्लामची केलेली सर्वांत मोठी सेवा म्हणजे त्यांनी समस्त अरबी इस्लामी संस्कृतीला आणि विचारवंतांना ग्रीक वैचारिक आणि सांस्कृतिक वारशाचा करून दिलेला परिचय! तत्कालिन अरबी विचारवंत अनेक प्रकारच्या वैचारिक व्यामोहात गोंधळून गेले होते. इस्लामचा धार्मिक दबाव असूनही ते शुद्ध सामाजिक व वैज्ञानिक ज्ञानाचे भक्त होते. त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा होता. पण ज्ञानाची पद्धशीर मांडणी करण्याची रीत त्यांना अज्ञात होती. विशेषत: खगोलशास्त्रात ते प्रगती करीत होते. पण दिशा सापडत नव्हती. पण वर उल्लेखलेल्या चार अरबी विचारवंतामुळे ग्रीक तत्त्वज्ञानाचा आणि ज्ञानाची सुव्यवस्थित मांडणी शिकविणारा अ‍ॅरिस्टॉटल त्यांच्या जीवनात आला. अ‍ॅरिस्टॉटलच्या एकूण तत्त्वज्ञानामुळे अरबी इस्लामी विचारवंतांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे सुलभ झाले. अ‍ॅरिस्टॉटलच्या ज्ञानापुढे ते दिपून गेले. आश्चर्यचकीत झाले. असा ज्ञानी विचारवंत त्यांनी पाहिला नव्हता, ऐकला नव्हता.

अ‍ॅरिस्टॉटलचा ज्ञानाधिकार, त्याचे योगदान आणि त्यांच्या स्वत:वर पडलेला प्रभाव पाहून अरबी विचारवंतांनी अ‍ॅरिस्टॉटलला अरबी ज्ञानविश्वाचा The First Teacher (आद्य गुरू) हा बहुमान दिला. अ‍ॅरिस्टॉटलला अरबी भाषेत Aristutalis असे नाव आहे. त्याचे प्रचलित रूप Aristu किंवा Arastoo (अरस्तू) हे अरबी रूप उर्दू-हिंदीत आले. आजही अ‍ॅरिस्टॉटलला अरबी जगतात ‘the wise man’ म्हणून ओळखले जाते.

अल् किंदीने अरबी जगतास ग्रीक संस्कृतीचा परिचय करून दिला, पण ग्रीक विचारांचा प्रचार व प्रसार अरबी जगतात फारसा झाला नाही. ते महत्त्वाचे काम अल् फ़राबीमुळे पूर्ण झाले.

अल् फ़राबी (जन्म : ८७२ तुर्कस्थान आणि मृत्यू : १४ डिसेंबर ९५० ते १२ जानेवारी दमास्कस - अन्य नाव : अबु नस्त्र अल् फराबी. हा इस्लामी तत्त्ववेत्ता केवळ इस्लामी तत्त्वज्ञानापुरताच महत्त्वाचा नसून एकूण जागतिक तत्त्वज्ञानात मूलभूत भर घालणारा म्हणून वैज्ञानिक आणि तत्त्ववेत्ता म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा स्वत:चा संप्रदायही होता.

फराबीने ग्रीक संस्कृती आणि अ‍ॅरिस्टॉटलचा इस्लामी विज्ञान व तत्त्वज्ञान यांच्या संदर्भात नव्याने शोध घेतला. प्लेटोवाद आणि अ‍ॅरिस्टॉटलवाद या दोघांचेही विचार फ़राबीने इस्लामी जगतात नव्या रूपात रूजविले. हे करताना प्लेटोवाद आणि अ‍ॅरिस्टॉटलवाद यांचा वेगळ्या रीतीने त्याच्याकडून समन्वय झाला. असा प्रयत्न खुद्द ग्रीक परंपरेतही झाला नव्हता. ते अनेक शतकांनंतर एका इस्लामी तत्त्ववेत्त्याकडून म्हणजे फ़राबीकडून झाले. त्यामुळे त्यास नवप्लेटोवादी असे म्हटले जाते. त्याचा संप्रदाय ‘फ़राबीवाद’ किंवा ‘अल् फ़राबीवाद’ (Farabism or Alfarabism) नावाने प्रसिद्ध आहे.

फ़राबीची ग्रंथसंपदा

अल् फ़राबीने खगोलशास्त्र, तर्कशास्त्र, संगीत, गणित, राजकारण आणि शिक्षण, तसेच आज ज्यास मानसशास्त्र म्हटले जाते, त्या विषयावर प्रचंड लिखाण केले. दुदैवाने त्याचे अनेक ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झाले, पण ११७ पुस्तकांचा शोध लागला असून त्यात ४३ तर्कशास्त्रावर, ११ तत्त्वज्ञानावर, सात नीतीशास्त्रावर, सात राज्यशास्त्रावर, १७ संगीत, औषधे, समाजशास्त्र यावर आणि ११ इतरांवरची भाष्ये आहेत. अ‍ॅलेक्झांड्रियातील नव-अ‍ॅरिस्टॉटलवादाचा त्याच्यावर प्रभाव होता. नव-अ‍ॅरिस्टॉटलवादास नव संजीवनी देणे आणि नवा शोध घेणे या हेतूने त्याने हे सारे लिखाण केले. 

फराबीचे महत्त्वाचे दोन ग्रंथ म्हणजे किताब अल् हुरफ़  (Kitab al-huruf - The Book of Letters), आणि दुसरा ग्रंथ अल् मदिना अल्-फ़दीला (Al-Madina al-Fadila) किंवा (Ara Ahl al-Madina al-Fadila - 'The Model City'). या ग्रंथाचे पूर्ण नाव - Kitab fi mabadi' ara' ahl al-madina al-fadila - The Book of the Principles of the Opinions of the People of the Virtuous City. हा फ़राबीचा राज्यकारभाराविषयीचा ग्रंथ प्लेटोच्या ‘रिपब्लिक’ ग्रंथाइतकाच दर्जेदार असून तो विचारविश्वात मान्यता पावलेला आहे.

फ़राबीच्या मते, जगात तत्त्वचिंतनाचा अंत झाला आहे, इस्लाममध्ये मात्र तत्त्वज्ञानास नवसंजीवनी लाभू शकते. अर्थात ‘एखाद्या तत्त्ववेत्त्यास आवश्यक असणाऱ्या वैचारिक साधनांची गरज’ इस्लाम एक धर्म या भूमिकेतून पुरवू शकत नाही, असे त्याचे मत होते. तत्त्वचिंतनाशी परिचय नसणाऱ्या जनसामान्यांना प्रतीकात्मक चिन्हांच्या रूपात धर्म सत्याचे दर्शन घडविते, पण त्या मूढांना सत्याचे निखळ शुद्ध स्वरूप जाणता येत नाही, असे त्याचे तत्त्वज्ञान होते. ईश्वर जसे विश्वाचे नियंत्रण करतो, तसे तत्त्ववेत्त्यांनी राज्यावर राज्य करावे, अशीही त्याची भूमिका होती. त्याची मते प्लेटोच्या ‘रिपब्लिक’मधील विचारांशी जुळतात.

दहाव्या शतकानंतर आधुनिक विज्ञानाचा उगम होईपर्यतच्या अनेक शतकांवर फराबीचा मोठा प्रभाव होता. तत्त्कालिन विज्ञान आणि तत्त्वज्ञान फ़राबीवादाने भारलेले होते. तत्त्वज्ञान आणि सुफ़ीवाद यांचा समन्वय करणारा तो आद्य तत्त्ववेत्ता होता. फ़राबीने अ‍ॅरिस्टॉटलचे जणू शिष्यत्व पत्करले होते. अ‍ॅरिस्टॉटलच्या ‘पेरिपेटेटीक स्कूल’चा तो इस्लामी प्रणेता होता. ज्ञानाच्या तुलनेत तो अ‍ॅरिस्टॉटलला समतुल्य होता. म्हणून तर त्यास इस्लामी बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्ववेत्त्यांनी ‘Al-Mou’allim al-Than’ - The Second Teacher’ (‘दुसरा गुरू’) हा सर्वोच्च दर्जा बहाल केला.   

Professor, Sir‚ Prinicipal

आता Professor, Sir आणि Prinicipal या संज्ञांचीही कूळकथा पाहू.

Professor

ज्याच्याकडे सांगण्यासारखे (to Profess) काहीतरी आहे तो Professor. जुन्या फ्रेंचमधील professeur, लॅटिनमधील professus पासून मध्ययुगीन इंग्लीशमध्ये professour असा तयार होतो. अन्य व्यत्पत्तीनुसार Professour हा शब्द अँग्लो-नॉर्मन भाषेतील Proffessur पासून व्युत्पन्न होतो. या सर्वांचे भूतकालीन धातुसाधित रूप profiteor (profess) असे आहे. पण Professor हे पद कॉलेजात नसते, तर विद्यापीठांमध्ये असते. पण विद्यापीठात शिकविणारे सगळेच Professor नसतात. या पदवीचा इतिहास विकीपीडीयात पुढीलप्रमाणे दिला आहे. प्रत्येक देशात याचा अर्थ काहींसा बदलतो, पण मतितार्थ एकच आहे. ज्याने किमान मास्टर्स  आणि पीएच.डी. पदवी मिळविली आहे आणि ‘‘ज्याच्याकडे सांगण्यासारखे काही आहे’’ तोच प्रोफेसर. अर्थात काही विद्यापीठे कलाकार, खेळाडू, राष्ट्रपतीसारखे प्रथम नागरिक यांना ‘सन्माननीय प्राध्यापक’ या पदाने बहुमान करतात, पण त्यांना शिकवण्याची परवानगी नसते. जागतिक पातळीवर प्रोफेसरपदाचे तीन वर्ग करण्यात आले आहेत -

१. प्रोफेसर (Professor) : ज्येष्ठ, अनुभवी आणि संशोधक, मार्गदर्शक प्राध्यापक. काही वेळेस अशा प्राध्यापकांना त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ‘Full Professor’ म्हणण्याची रीत आहे. 

२. असोसिएट प्रोफेसर (Associate Professor) : ज्येष्ठ, अनुभवी, शिक्षणप्रक्रियेची जाण असणारा. विद्यमान संशोधन नाही पण ते करण्याची तयारी असणारा तसेच ते सिद्ध करणारा.

३. असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) : अध्यापन क्षेत्रात नुकताच पदार्पण करणारा, मास्टर्स  आणि पीएच.डी. ही किमान पात्रता असणारा, विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर मार्गदर्शन करणारा, अनुनभवी, विद्यमान संशोधन नाही, पण ते करण्याची तयारी असणारा तसेच ते सिद्ध करणारा.

या खेरिज ‘प्रोफेसर एमिरिटस’ (Emeritus Professor) असेही एक पद असते. पण ते दुर्मीळ असते आणि फारच प्रज्ञावंत, एकूण मानवी ज्ञानरचनेत नवी भर टाकणाऱ्या, त्याच्या संबंधित विषयाला नवी वळणे-कलाटणी-दिशा देणाऱ्या प्राध्यापकास हे पद सन्मानाने बहाल केले जाते. विद्यापीठात, महाविद्यालयात अशा दर्जाचा प्राध्यापक असणे, ही अतिशय अभिमानाची घटना असते. ते विद्यापीठ, महाविद्यालय अथवा शिक्षणसंस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावते. काही देशांमध्ये या पदाचे नामकरण Distinguished Professor किंवा Endowed Chair असे केलेले असते. विद्यापीठ निधी, खासगी व्यक्ती किंवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत या पदाचा Full Professor दर्जाचा आर्थिक भार उचलला जातो. असाच प्राध्यापक मग त्या विषयाच्या संशोधन व अभ्यास मंडळाचा अध्यक्ष म्हणून निवडला जातो. सर्व साधारणपणे निवृत्त प्रोफेसरच या पदाला पात्र ठरू शकतात. Emeritus हा शब्द दोन संज्ञांचा संधी आहे. ‘e’ -आणि ‘merēre’ ( जसे की ex-). ‘e’ म्हणजे ‘च्या पासून’ किंवा ‘च्या बाहेर’ आणि ‘merēre’  म्हणजे ‘उत्पन्न’. Emeritus याचा एकूण अर्थ ‘जी प्राध्यापक व्यक्ती उत्पन्नाच्या बाहेर आहे’. अर्थात ‘जी पैशासाठी काम करत नाही तर केवळ शुद्ध ज्ञानाच्या प्रेमासाठी काम करते’. Emeritus हे emerereचे भूतकालीन रूप आहे. ‘सुप्रतिष्ठित प्राध्यापक’ असे साधारण मराठी भाषांतर म्हणता येईल.  

Sir

‘Sir’ या नामाचे मूळ मध्ययुगीन फ्रेंचमधील Sire, जुन्या फ्रेंचमधील sieur आणि लॅटिनमधील   seniorयामध्ये आहे. Sieur हे Seigneur याचे लघुरूपांतर असून त्याचा अर्थ lord’. या सन्मानदर्शक नामापासून messier बनतो. त्याचा त्याचा अर्थ mylord. लॅटिनमधील senior (elder), हाच इंग्लीशमध्येही senior झाला. Sire हा १२०५ पासून प्रचलित होता. १२२५ पर्यंत पुरुषांसाठीच वापरला गेला. १२५० मध्ये त्याला ‘father, male parent" हा अर्थ जोडला गेला. १३६२ पासून "mportant elderly man’ (महत्त्वाचा ज्येष्ठ माणूस(पुरुष)’) हा अर्थ पक्का झाला. आज ‘Sir’ पदवी युरोपीअन भाषांमध्ये आदर व्यक्त करण्यासाठी दिली जाते. हे भाषिक राजकारण उघडच पुरुषपक्षपाती आहे, हे सांगणे न लगे! Sir हा शब्द युरोपीय परंपरेत केवळ शब्द उरला नाही तर ती कालांतराने पदवी बनली. अ‍ॅकेडेमिक अर्थाने आणि सामाजिक अर्थानेसुद्धा ती पदवी म्हणून विकसित झाली.

Prinicipal (प्राचार्य)

Prinicipal या संज्ञेचे मूळ लॅटिनमधील prīncipālis या शब्दात आहे. त्याचा अर्थ पहिला, मुख्य. Prīncip+ ālis -al असा संधी बनतो. Prīncipālisपासून prince शब्द बनतो. अंदाजे १२५०-१३०० दरम्यान हा अर्थ वापरात होता. नंतर शिक्षणसंस्थेचा प्रमुख, व्याज द्यावे लागते ती मुद्दलाची रक्कम इत्यादी अर्थ जोडले गेले. पण मुख्य असणे हा अर्थ सर्वत्र समान होता. प्रिन्स किंवा ‘राजपुत्र हा राजाच्या नंतरचा मुख्य’ असल्याने तेच महत्त्व शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या prinicipalला असते. राजपुत्राप्रमाणेच prinicipal हा शिक्षणसंस्थेचा सत्ताधिकारी असतो. संस्थेची ध्येयधोरणे, अमलबजावणी ही कर्तव्ये तो बजावतो.  

हे सगळे अर्थ आपण मुळापासून शुद्ध स्वरूपात बिनभेसळीचे कसे बनतात, ते पाहिले आहे. हाच गृहीत धरून या सर्वांना समान असणारा शिक्षक हा आदरणीय मानला गेला. तो आदरभाव गृहीत धरून जगात ‘शिक्षक दिन’सुद्धा साजरा केला जातो. पण ‘भारतीय शिक्षक दिन’सुद्धा असाच शिक्षकांविषयी आदरभावानं व्यक्त करण्याचा दावा केला जातो, पण प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे शिक्षक दिन ‘मास्तरडे’मध्ये रूपांतरीत होतो.

लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......