अजूनकाही
१. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवलेले आणि स्वत:ला 'संस्कारी' म्हणवणारे पहलाज निहलानी सेक्स आणि क्राइमवर आधारित 'जुली २' चे वितरक बनले आहेत. मागच्याच महिन्यात त्यांची सेन्सॉर बोर्डावरून हकालपट्टी झाली आहे. ते म्हणाले, 'हा खूप 'स्वच्छ' प्रौढ सिनेमा आहे. मी जर सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष असतो तरी या सिनेमात एकही कट सुचवला नसता. यात कोणतीच अश्लीलता किंवा शिवीगाळ नाही. हा संपूर्णपणे प्रौढांसाठीचा सिनेमा आहे.'
मुलांनो, आजचे संस्कार लिहून घ्या. अंतर्वस्त्रात आडवी पडलेली स्त्री आणि तिच्या उरोभागाला झाकायला फक्त एक मॅगझिन अशा चित्राची जाहिरात असलेल्या सिनेमात कणभरही अश्लीलता नाही. ज्या कुणाला ती दिसत असेल, त्याच्या नजरेवर पुरेसे संस्कार झालेले नाहीत. शिवीगाळ नाही, म्हणजे सिनेमा संस्कारी. संपूर्णपणे प्रौढांसाठीच्या सिनेमाचं पोस्टर लहान पोरंटोरंही पाहतात, ते फक्त प्रौढांनी पाहण्याची काही व्यवस्था नाही, त्यात निहलानींचा काय दोष?
.............................................................................................................................................
२. ‘देशात महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्यानं बहुजन समाजाच्या नेत्या म्हणून प्रगतीशील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यासाठी ही योग्य वेळ आहे’, अशा शब्दांत काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भंडारा-गोंदिया येथील पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी शरसंधान केल्याची शाई वाळत नाही, तोच आशिष देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. ‘पार्टी विथ डिफरन्स’मधील सुप्त ‘डिफरन्सेस’ हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाचा एवढ्यात विस्तार होत नाही आणि झालाच तर त्यात देशमुख यांचा नंबर लागणं शक्य नाही, हे या बातमीवरून लक्षात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांची ‘हिचकॉक’स्टाइल धक्के देण्याची आवड लक्षात घेता, पंकजाताई राहतील बाजूला, एखाद दिवशी, केवळ पंकजाताईंना शुभेच्छा दिल्यामुळेच राज्यभरात माहिती झालेल्या, देशमुखांचा नंबर लागून जायचा... जो जेवढा नगण्य, तेवढा प्रिय, असं तत्त्व आहे त्यांच्या बॉसेसचं.
.............................................................................................................................................
३. भ्रष्टाचारविरोधी लढाईतील आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. देशभरात लोकायुक्तांची अंमलबजावणी व्हावी, तसंच शेतकऱ्यांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात यासाठी ते उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज पत्र लिहिलं आहे. मोदी सरकारवर टीका करताना अण्णा म्हणाले की, ‘हे आंदोलन मोदी सरकारविरोधात असणार आहे. सत्तेत येऊन तीन वर्षं झाली तरी या सरकारनं अद्याप लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त केलेले नाहीत. लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी तसेच शेतकऱ्यांबाबत मुद्द्यांची मी तीन वर्षांपासून सरकारला आठवण करून देत आहे. मात्र, माझ्या पत्राला तुम्ही साधं उत्तरही दिलेलं नाही की, कोणतीही कारवाई केलेली नाही’, असंही अण्णांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
अण्णांनी केलेल्या आधीच्या आंदोलनानंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. अण्णांच्या उपोषणाला मोदी कंपनी दाद देईल, याची सुतराम शक्यता नाही. अण्णांवर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबायलाही ते कमी करणार नाहीत. शिवाय, यूपीएच्या काळात आक्रमक झालेले अण्णा नंतरच्या सरकारच्या कारकीर्दीत अनेक विषयांवर तोंडात मिठाची गुळणी धरून बसले होते, हेही लोकांनी पाहिलं आहे. ‘देर आये पर दुरुस्त आये’, असं दरवेळी होत नाही.
.............................................................................................................................................
४. लष्करात तृतीयपंथींना भरती करण्याचा ओबामा यांचा आदेश विद्यमान अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिरवला असून, समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती करण्यास बंदी घातली आहे. ही सैनिकांबाबत क्रूरता असून त्यामुळे त्यांचं खच्चीकरणही होणार आहे, अशा शब्दांत विरोधी डेमोक्रॅटिक पक्षानं या निर्णयावर टीका केली आहे. ओबामांनी समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेश देण्याचं धोरण जाहीर करून लिंगबदल शस्त्रक्रियांनाही परवानगी दिली होती.
ट्रम्प यांच्या मेंदूवर विचारबदलांची शस्त्रक्रिया होत नाही, तोवर असल्या प्रतिगामी निर्णयांची सवयच ठेवायला हवी. शिवाय, ट्रम्प यांनी ही असलीच मागासलेली उद्दिष्टं जाहीर करून निवडणूक जिंकली आहे. अमेरिकनांनी या उद्दिष्टांनाच कौल दिला आहे. त्यामुळे त्याबाबतीत आता तक्रार करून उपयोग नाही. त्यांनी असे निर्णय केले नाहीत, तर तोच त्यांच्या मतदारांशी द्रोह ठरेल. तेव्हा, अब भुगतो!
.............................................................................................................................................
५. आसाराम बापू यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणातील खटल्याची सुनावणी कूर्मगतीनं सुरू असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं गुजरात सरकारला फटकारलं असतानाच आसाराम बापूंनी बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. आसाराम बापू मुद्दाम या प्रकरणात दिरंगाई करत आहेत, अशा नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे. सुनावणी संथगतीनं झाल्यास खटला कमकुवत होत जाईल आणि आमच्यासारखी गरीब लोक मानसिक त्रासाला कंटाळून आणि आर्थिक विवंचनेतून आम्ही तक्रार मागे घेऊ. यासाठीच हा डाव आखला जात असल्याचं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे.
शहाणी माणसं कोर्टाची पायरी चढत नाहीत, ती यासाठीच. मात्र, सगळी माणसं अशी ‘शहाणी’ असतील, तर आसाराम, रामरहीमसारख्या नराधमांच्या लीलांना आळा बसणं शक्यच नाही. ‘अंत में सत्य की जीत होतीही है’ असं म्हणतात खरं, पण, सत्यासाठी, न्यायासाठी झगडणाऱ्यांचा अंत पाहिल्यानंतरच तो विजय प्राप्त होतो. इथं तर लढाई विद्यमान सरकारच्या सगळ्या वरिष्ठांना श्रद्धेय होऊन बसलेल्या एका बड्या बाबाशी आहे. लढत राहण्यावाचून आता पर्याय नाही. किमान न्यायव्यवस्था तरी सर्वस्वी विकली गेलेली नाही, या दिलाशानं वाटचाल चालू ठेवायची.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment