मला भावलेल्या शिरीषताई पै
पडघम - साहित्यिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • शिरीष पै (१५ नोव्हेंबर १९२९ - २ सप्टेंबर २०१७)
  • Tue , 05 September 2017
  • पडघम साहित्यिक शिरीष पै Shirish Pai हायकू Haiku

खूप जुनी गोष्ट आहे. मी सोळा-सतरा वर्षांचा, नुकताच मिसरूड फुटलेला आणि कॉलेजात जाऊ लागलेला एक पोट्टा-सोट्टा होतो, तेव्हाची. एक दिवस कसं काय कोणास ठाऊक, मला एकदम लिहायची स्फूर्ती आली. माझ्या घरी साहित्यिक वातावरण होतं. माझी आई, मालती निमखेडकर ही विदर्भातली प्रख्यात बालकथाकार. ती आकाशवाणीसाठी आणि वृत्तपत्रांसाठी नियमित लेखन करत असे. माझ्या आई-वडिलांना दोघांनाही पुस्तकांचा प्रचंड शौक होता. त्यामुळे बालवयापासूनच माझंही वाचन भरपूर होतं. अनेक लेखक मंडळी आमच्याकडे गप्पा करायला येत असत. कदाचित यामुळे माझ्या अंगात लेखनाचा किडा शिरला असावा. तर त्या दिवशी मला अचानक काहीतरी लिहावं असं वाटलं. आणि मी माझा पहिला लेख लिहिला. कोणावर? थेट आचार्य अत्रे यांच्यावर. नुकतंच मी त्यांच्या आत्मचरित्राचे पाच खंड एकदा नव्हे, दोनदा वाचून काढले होते. त्यांची बाकीचीही बरीच पुस्तकं मी वाचली होती. ‘अत्रेय’ या त्यांच्यावरच्या स्मरणिकेची मी नववीत असतानाच अनेकदा पारायण केलं होतं. त्यांचे बरेच अग्रलेख आणि विनोद तर मला तोंडपाठ होते. मुंबईचं त्यांचं दैनिक ‘मराठा’ ही अधूनमधून वाचत होतो. जून महिन्यात त्यांची पुण्यतिथी होती. मला वाटलं त्यांच्यावरच लिहावं. मग मी ‘साहेब, तुम्ही आज असायला हवे होतात’ अशा शीर्षकाचा एक चार पानी लेख लिहिला. आणि लगेच तसाच्या तसा थेट ‘मराठा’च्या संपादकांच्या नावे पोस्टानं पाठवूनसुद्धा दिला. आईला यातलं काहीच माहीत नव्हतं.

काही दिवसांनी मी बाहेर टवाळक्या करून रात्री घरी आलो, तर आईनं एक पोस्टकार्ड मला वाचायला दिलं. ते होतं शिरीष पै यांचं पत्र. माझा लेख त्यांनी स्वीकारला होता, मात्र त्यात काही दुरुस्त्या आणि मुख्य म्हणजे काटछाट होणार होती, हे त्यांनी कळवलं होतं. तिला न दाखवता, न सांगता मी परस्पर असं केलं, याचा आईला थोडा राग आला होता. पण त्यापेक्षा तिला आनंद जास्त झाला होता. तिनं मला लेख वाचायला मागितला. मी इतका विद्वान होतो की, मी त्याची स्थळप्रतसुद्धा ठेवली नव्हती. काही दिवसांनी तो लेख छापून आला, यथावकाश त्याची कात्रणंही पोस्टानं आली. मात्र नंतर तो कुठेतरी हरवला.

या माझ्या पहिल्या लेखानं मी ‘लेखकू’' झालो. आपला पहिलाच लेख पहिल्या झटक्यात प्रकाशित झाला, हा तर आनंद होताच, पण त्याहीपेक्षा त्यामुळे शिरीष पै यांचा परिचय झाला याचा मला जास्त आनंद झाला. मग त्यांचा-माझा नियमित पत्रव्यवहार सुरू झाला. माझ्या लेखात काय उणिवा होत्या, हे त्यांनी मला समजावून सांगितलं. लेखन कसं करावं, वर्तमानपत्रांसाठी लिहिताना काय काळजी घ्यावी, याबद्दल त्या मला छोट्या छोट्या सूचना करत असत. नंतर मी ‘मराठा’साठी आणखी थोडं लेखन केलं. एक-दोन कवितासुद्धा लिहिल्या. तो काळ जी. ए. कुलकर्णी आणि ग्रेस यांचा होता. या दोघांचं लिखाण वाचून आमच्यासारखे नवलेखक तर भारावून जायचे. माझ्या एका कवितेवर शिरीषताई म्हणाल्या, ‘प्रतिमांमध्ये जास्त गुंतून जाऊ नको. सगळ्यांनाच ग्रेस होता येते असे नाही. आणि होऊ पण नये.’ किती मोलाचा सल्ला होता तो त्यावेळी माझ्यासाठी! सरळ साधं, पण उत्तम लिहावं, विद्वत्ताप्रचुर जड लिहून उगाच पांडित्याचा आव आणू नये, हे त्यांनी मला शिकवलं. मग, बहुधा, १९७६ साली ‘मराठा’चं प्रकाशन बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण आमचा पत्रव्यवहार चालू राहिला.

त्यानंतर एकदा मी मुंबईला गेलो असताना आधी फोन करून दादर शिवाजी पार्क जवळच्या त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो. माझ्या आईनं तिची काही पुस्तकं त्यांच्यासाठी माझ्यासोबत पाठवली होती. त्यांनी मोठ्या आनंदानं ती स्वीकारली, आईबद्दल चौकशी केली. मग त्यांच्यासोबत मी खूप गप्पा मारल्या. त्यांचा धाकटा मुलगा विक्रम याची माझी तेव्हा ओळख झाली. त्या आणि माझी आई दोघीही १९२९ सालच्या. चार-सहा महिन्यांचा फरक असेल, बस. हे त्यांनी सांगितल्यावर मी आपल्या खास वऱ्हाडी आगाऊ सलगीच्या सवयीनं म्हणालो, ‘मग, शिरीषताई, आजपासून तुम्ही माझ्या मावशी.’ त्यांनीही खळखळून हसत मला दाद दिली. पण तरीही मी त्यांना ‘शिरीषताई’ असंच म्हणायचो. काही दिवसांनी त्यांचं आईला आवर्जून पत्र आलं. त्यात त्यांनी तिच्या पुस्तकांवर अभिप्राय कळवला होता. मग त्या दोघींचाही काही काळ पत्रव्यवहार सुरू होता. आमचाही अधूनमधून सुरू होता.

दरम्यान एकदा कधीतरी त्यांचा मोठा मुलगा राजू काही कामासाठी नागपुरला आला असताना शिरीषताईंच्या सांगण्यावरून मला भेटला. अगदी गडबडीत असूनसुद्धा केवळ आईच्या म्हणण्याखातर त्यानं आठवण ठेवून मला भेटावं, याचा आम्हा सर्वांनाच फार आनंद झाला.

१९८२ मध्ये माझं लग्न झालं. माझी बायको संजीवनी नागपूरचीच, पण तिचा बराच गोतावळा मुंबईत होता. त्यामुळे एकदा जरा जास्त मुक्कामानं मुंबईला जावं लागलं. त्यावेळी मी संजीवनीला घेऊन शिरीषताईंना भेटायला गेलो. ती नाही - नाहीच म्हणत होती, कारण एवढ्या मोठ्या बाईंशी मी काय बोलू असा तिला प्रश्न पडला होता. पण शिरीषताईंनी इतक्या प्रेमानं तिचं स्वागत केलं की, ती पाच मिनिटांतच रिलॅक्स् झाली. याही वेळी आम्ही खूप गप्पा केल्या. आम्ही निघालो तेव्हा त्यांनी माझ्याकडे त्यांची दोन-तीन पुस्तकं दिली आईसाठी भेट म्हणून. नागपूरला आल्यावर आम्ही सर्वांनी त्यांचा आस्वाद घेतला. त्यातल्या एका पुस्तकानं (बहुधा 'ध्रुवा') आई इतकी भारावली की, तिनं अभिप्राय म्हणून लगेच एक कविता लिहून त्यांना पाठवली. तिचं शीर्षक होतं, 'आज मी शिरीषपुष्प पाहिलं'. शिरीषताईंनी उलटटपाली आईच्या या काव्यात्म अभिप्रायाचं मनसोक्त कौतुक केलं.

हळूहळू मी माझ्या वकिली व्यवसायात आणि संसारात व्यस्त होत गेलो. न्यायालयाची कामं करता करता वेळ पुरायचा नाही. आणि मुख्य म्हणजे आता मी इंग्रजीमधून लिहायला सुरुवात केली होती. या सगळ्यामुळे माझं मराठी साहित्यिक लिखाण मागं पडलं. पण तरीही मी शिरीषताईंच्या थोड्याफार संपर्कात होतोच. मुंबईला आता फक्त कामासाठीच जाणं व्हायचं, तेही एखाद दिवसाच्या वर नाही. त्यामुळे मनात असूनही मी पुन्हा कधी त्यांना भेटू मात्र शकलो नाही. मला वाटतं, २००५ च्या आसपास मी त्यांना शेवटचं पत्र लिहिलं असावं. त्यानंतर ई-मेलनं हस्तलिखित पत्रांची जागा घेतली आणि पोस्टकार्ड, आंतर्देशिय पत्रं, पाकिटं, असे प्रकार जवळपास बंदच झाले माझ्यासाठी. अन् अचानकच मग आमचा पत्रव्यवहार थांबला. त्या माझ्या आईच्याच वयाच्या होत्या, त्यामुळे ८० वर्षांची झाल्यावर ती जशी थकत गेली, तशा त्याही थकल्या असतील असं वाटत होतं. त्यांना आता काय डिस्टर्ब करायचं, म्हणून मी नंतर त्यांना पत्र लिहिलं नाही. आता वाटतं की, मी त्यांना या काळात एखादं तरी पत्र पाठवायला हवं होतं. पण त्यांची आठवण कधी ना कधी तरी यायचीच, हे मात्र अगदी खरं. परवा त्यांच्या निधनाची बातमी ऐकून या सगळ्या जुन्या आठवणी क्षणार्धात जाग्या झाल्या.

या सर्व माझ्या खासगी, वैयक्तिक स्मृती आहेत. या लेखातून मला ना त्यांच्या जीवनावर लिहायचं आहे, ना त्यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल. हे काम माझ्यापेक्षा जास्त अधिकारी व्यक्तीचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की, त्या किती प्रेमळ, शांत आणि एखाद्या अनोळखी, वयानं लहान व्यक्तीलाही किती मान देणाऱ्या होत्या! माझ्याशी ज्या आपलेपणानं त्या वागल्या, प्रोत्साहन दिलं, त्याचं मला फार कौतुक वाटतं आणि धन्यतासुद्धा. असेच चांगले अनुभव इतर अनेकांचेही असतील. गेल्या पन्नास वर्षांत मी अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी लेखक-लेखिकांना, पत्रकारांना, संपादकांना जवळून पाहिलं आहे. नागपूर-विदर्भातल्या आणि मुंबई-पुण्याकडच्या पण. यातले अनेक जण आढ्यताखोर, मिजासी, घमेंडी, तुसड्या स्वभावाचे, अहंकारानं ग्रस्त, इतरांना कस्पटासमान लेखणारे होते/आहेत. पुढे पुढे करणारे, सरकार-दरबारी आपली वर्णी लावण्यासाठी कट-कारस्थाने करणारे, बक्षिसे, पुरस्कार मिळविण्यातच इतिकर्तव्यता मानणारे, साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं मिळाली की, जीवनाचं सार्थक झालं असं समजणारे हे स्वनामधन्य, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक कुठे, आणि साक्षात भाषाप्रभु आचार्य अत्रे यांचा वारसा चालवणाऱ्या, पण कधीही, कुठेही स्वतःला प्रोजेक्ट न करणाऱ्या, प्रकाशझोतापासून दूर असणाऱ्या, शालिन, सोज्वळ, हसऱ्या, प्रेमळ, निगर्वी, मोठेपणाची झूल अंगावर कधीही न बाळगणाऱ्या शिरीषताई कुठे!

ज्यांच्याविषयी खरोखर आदर वाटावा, ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं असं वाटावं असे फार थोडे लोक आज राहिले आहेत. शिरीषताई या थोड्या लोकांमधल्या एक होत्या. त्यांचा माझा जो काय थोडा संबंध आला त्यातून मला सतत त्यांच्या मनाचा मोठेपणा जाणवला. हेच त्यांचं वैशिष्ट्य मला भावून गेलं. महाराष्ट्राच्या साहित्य विश्वानं त्यांच्या कर्तृत्वाची म्हणावी तितकी दखल घेतली नाही, ज्या मानसन्मानाला त्या पात्र होत्या, तो त्यांना कधीच पूर्णपणे दिला नाही, असं मला वाटतं. त्या कोणत्याही ‘कंपू’त नव्हत्या, म्हणून तर नाही ना? एखाद्या हिमट्यासारखं का असं वागतो आपण?

गेल्या वर्षी एक सप्टेंबरला माझी आई गेली. त्यानंतर बरोबर एका वर्षानं दोन सप्टेंबरला शिरीषताई गेल्या. आईच्या प्रथम स्मृतीदिवसाच्या निमित्तानं आम्ही परवा तीन तारखेला आमच्या शेतात वृक्षरोपण केलं. त्यातलं एक आंब्याचे झाड मी शिरीषताईंच्याही नावानं, त्यांची मला कायम आठवण राहावी यासाठी लावलं आहे. निसर्ग संवर्धनाचा हा एक प्रयत्न, हीच माझी माझ्या आईला आणि माझ्या शिरीषमावशींना आदरांजली!

लेखक वकील आहेत आणि वुडहाऊसचे अभ्यासकही.

bosham@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......