शिक्षक दिन ते मास्तरडे (मास्तर-डे!) – एक शोकांतिक प्रवास (भाग पहिला)
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 05 September 2017
  • पडघम सांस्कृतिक शिक्षक दिन Teachers' Day मास्तर डे ५ सप्टेंबर 5 September

आज ५ सप्टेंबर. शिक्षक दिन. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र अलीकडच्या काळात ‘भारतीय शिक्षक दिन’ दोन चेहऱ्यांच्या कात्रीत सापडला आहे. ‘शिक्षक दिन’ या शिक्षकांच्या सणाला ‘मास्तर-डे’ असे स्वरूप आलेले आहे. त्याचा शोध या लेखमालिकेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखमालिकेत ‘मास्टर’ (Master)ची खिल्ली उडवून, विडंबन करून भारतात ‘मास्तर’ करण्यात आला, त्या मूळ ‘मास्टर’ (Master) संकल्पनेचा इतिहास आहे, भारतात ‘शिक्षक दिन’ हा ‘मास्टर्स - डे’ (Master’s Day) ऐवजी ‘मास्तर-डे’ कसा झाला हे स्पष्ट केले आहे आणि भारतात या ‘मास्तर-डे’ होण्याच्या घटनेमागे भारतीय सामाजिक व सरकारी ध्येयधारणा कशी उभी आहे, याचे किंचित विश्लेषण केले आहे. ही लेखमालिका पाच भागात प्रकाशित होईल. आज हा पहिला भाग.

.............................................................................................................................................

भारतीय समाजाचे दोन चेहरे आहेत. एक जाहिरातीचा आकर्षक सुंदर स्वप्नमय चेहरा आणि दुसरा अतिशय कुरूप, शोषक, भीषण वास्तव चेहरा. जाहिरातीचा चेहरा स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनच ‘मेरा भारत महान’ची दवंडी पिटवून आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतर ‘जगातील मोठी लोकशाही’चा बेन्जो, डीजे आदळत समोर येतो. कुरूप, शोषक चेहरा वर्णजातीयवादी राजकारणातून जाणवतो. तो खूप कष्ट घेऊन शोधावा लागतो. समोर आणला तरी तो मान्य केला जात नाही. भारताचे अधिकृत तत्त्वज्ञान म्हणून अद्वैत वेदान्ताला मान्यता आहे. ‘जीव हाच ब्रह्म’ (प्रथमपुरुषी एकवचनी = ‘‘अहं ब्रह्मास्मि!’’). ‘दोन नाही तर एकच’ ही या तत्त्वज्ञानाची शिकवण आहे. ती व्यवहारात वरील दोन चेहऱ्यांच्या अद्वैतात शोधता येते.

या जाहिरातीच्या आकर्षक, मुलायम चेहऱ्याच्या मेकअपचे फाऊंडेशन प्रामुख्याने भारतीय वैदिक हिंदू धर्मातून घालण्यात आलेले आहे. त्याचीच लागण इतर भारतीय धर्म म्हणजे जैन, बौद्ध आणि शीख या धर्मांनाही झाली आहे. नंतरच्या कालखंडात तीच लागणीची लस इथं स्थिरावलेल्या इस्लाम, ख्रिश्चन या धर्मांनाही आपसूकच टोचली गेली आहे. या नव्या अभारतीय धर्मांचाही एक आकर्षक चेहरा तयार करून त्यांनाही सनातन वैदिक धर्माने अगदी कचाट्यात पकडले आहे. त्यांचा हा जाहिरातीचा आकर्षक चेहरा म्हणजे ‘भारतीय इस्लाम’, ‘भारतीय ख्रिश्चन’ इत्यादी. त्यांचेही मूळ चेहरे भारतीय वैदिक हिंदू धर्माच्या मूळ चेहऱ्याप्रमाणे कुरूपच आहेत. विद्यमान भारत सर्वधर्मिय देश असल्याने आजच्या शिक्षणव्यवस्थेत या सर्वधर्मियांचा सहभाग आहे. 

‘भारतीय शिक्षक दिन’ या दोन चेहऱ्यांच्या कात्रीत सापडला आहे. ‘शिक्षक दिन’ या शिक्षकांच्या सणाला ‘मास्तर-डे’ असे स्वरूप आलेले आहे. त्याचा शोध या लेखमालिकेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या मूळ ‘मास्टर’ (Master) संकल्पनेची खिल्ली उडवून, तिचे विडंबन करून भारतात ‘मास्तर’ करण्यात आला, त्या मूळ ‘मास्टर’ (Master) संकल्पनेचा इतिहास आणि महत्त्व या लेखमालिकेत स्पष्ट केले आहे. त्यानंतर पुढील भागात भारतात ‘शिक्षक दिन’ हा ‘मास्टर्स - डे’ (Master’s Day) ऐवजी ‘मास्तर-डे’ कसा झाला हे स्पष्ट केले आहे. त्यानंतर ‘मास्तर-डे’ होण्याच्या घटनेमागे भारतीय सामाजिक व सरकारी ध्येयधारणा कशी उभी आहे, याचे किंचित विश्लेषण केले आहे.

Master संकल्पनेचे स्वरूप

Master ही ग्रीक संकल्पना आहे. त्याचा अर्थ तज्ज्ञ पण प्रज्ञानी माणूस. प्रज्ञानी (wise) या शब्दाला विशेष अर्थ आहे. तो म्हणजे प्रज्ञानाचा प्रेमिक (Lover of Wisdom) म्हणजे Philosopher. ग्रीकांच्या मते विश्वाची गुंतागुंतीची रचना करणारा ईश्वर हाच खरा प्रज्ञानी असून माणूस प्रज्ञानी असू शकत नाही. पण माणूस ईश्वराच्या सर्वगुण संपन्नतेवर, त्याच्या प्रज्ञानावर प्रेम करणारा प्रेमिक तर असू शकतो. म्हणून ग्रीकांनी Philosopherची व्याख्या Lover of Wisdom अशी केली. ही व्याख्या पायथागोरसने शोधली. 

Philosopher आणि Philosophy हे शब्दही पायथागोरसनेच शोधले, असे म्हणतात. पायथागोरसच्या काळी ग्रीसमध्ये गुरुने ज्ञानदान केवळ ज्ञानाच्या प्रसारासाठीच करावे, पैशासाठी करू नये, असा समज होता. कारण Wisdom म्हणजे ईश्वराचे ज्ञान. ही पवित्र गोष्ट असून ईश्वर ज्यांच्यावर कृपा करतो त्यांनाच तो ‘प्रसाद’ म्हणून देतो. ईश्वराचे ज्ञानाचे स्वरूप काय आहे? तर विश्वाचा निर्मिक, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, विश्वाचा चक्रवर्ती इत्यादी स्वरूपाचे असण्यातच परमेश्वराचे प्रज्ञान दडलेले आहे. हे असे उदात्त स्वरूप हाच ईश्वराचे ‘प्रज्ञान’ आहे. हा दैवी गुण असल्याचे भान ज्यांना येते ती माणसे म्हणूनच अतिशय सावध भूमिका घेतात : ती माणसे स्वत:ला ‘प्रज्ञानी माणसे’ (Wise Men) समजत नाहीत, तर केवळ प्रज्ञानाचे प्रेमिक’ (The Lover of Wisdom = Philosopher)  म्हणवून घेतात.

ही व्याख्या नंतर बदलत गेली. माणूसही प्रज्ञानी आहे. प्राण्याकडे प्रज्ञान असू शकत नाही. ‘प्रज्ञान’ हे मानवी व्यक्तीकडेच असणारे वैशिष्ट्य आहे. अर्थात त्याचे स्वरूप वेगळे आहे. पण म्हणून माणसात सुद्धा प्रत्येक व्यक्ती प्रज्ञानी असेल असे नाही. काहीजणच प्रज्ञानी असतात. बहुतेक जण जगाच्या स्पर्धेत उतरलेले असतात. मानवी प्रज्ञान दोन प्रकारचे आहे. पहिले त्याला स्वत:ला स्वत:च्या ज्ञानाच्या मर्यादांचे ज्ञान असणे आणि दुसरे ईश्वरनिर्मित जग, माणसांचे जग, माणसाने निर्माण केलेले सामाजिक व नैसर्गिक जग यांचे ज्ञान असणे. 

माणसाचे प्रज्ञान कशात आहे? ते कसे व्यक्त होते? तर मुख्य म्हणजे माणूस जन्ममृत्यूने बांधला गेलेला आहे. त्याच्या क्षमतांच्या तुलनेत माणसाचे ईश्वराविषयीचे, विश्वाविषयीचे, विश्वातील अनेक गोष्टींविषयीचे ज्ञान मर्यादित आहे. त्यात जन्ममृत्यूच्या अज्ञानाची भर सुद्धा आहेच आहे. म्हणजेच माणूस अनेक बाबतीत अज्ञानी आहे. पण हे त्याने कबुल केले पाहिजे. व्यवहारात आपण पाहतो की, अनेक माणसे स्वत:ला शहाणी समजतात, इतरांना अज्ञानी. पण मुळात माणसाचे ज्ञानच मर्यादित आहे. ते ओळखणे, हाच माणसाचे प्रज्ञान होय, अशी ग्रीकांची धारणा आहे.

थोडक्यात ईश्वरी प्रज्ञानाचे ज्ञान होऊ शकत नाही आणि स्वत:चे ज्ञान तर मर्यादितच आहे; मर्यादा म्हणजे अनेक बाबतीत अज्ञान असणे. तेव्हा स्वत:च्या अज्ञानाचे ज्ञान असणे हाचमानवी प्रज्ञान होय. आपली मर्यादा कबूल करण्याची माणसाची ही विनम्रताच तर त्याच्या ’प्रज्ञानी’ असण्याचे प्रसादचिन्ह आहे.

पायथागोरसची ही भूमिकाच नंतर ग्रीक तत्त्वज्ञानाचा मुगुटमणी सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता सॉक्रेटीसची (इ.स.पू.४६९-३९९) अधिकृत भूमिका बनली. म्हणूनच तर सॉक्रेटीस स्वत:ला नम्रपणे अज्ञानी समजतो. तो म्हणतो ‘I do not think, that I now : what I do not know’ (‘मी असा विचार करीत नाही की, मला जे माहीत नाही, ते मला माहीत आहे’.’ याचा अर्थ असा की मला काहीही ज्ञान नाही आणि असलेच काही ज्ञान तर मला माझ्या अज्ञानाचे ज्ञान आहे’’. अशा स्पष्ट शब्दात अज्ञान कबूल करणारा सॉक्रेटीस हा जगातील शहाणा माणूस आहे. (आजही!) या काटेकोर अर्थाने असे म्हणता येईल की, ‘मानवी प्रज्ञान म्हणजे सारासार विवेक, सारासार विचार, तारतम्य, commonsense’ होय. त्यात न्याय, प्रेम, करुणा, ज्ञान सहिष्णुता, वैचारिक उदारता अशा सदगुणांचा प्रज्ञानात सामावेश असतो. हा मानवी प्रज्ञान पहिला प्रकार.                 

मानवी प्रज्ञान दुसरा प्रकार म्हणजे ईश्वरनिर्मित जगाचे, माणसांचे, निसर्ग नियमांचे ज्ञान करून घेणे. त्यासाठी स्वत:ची बुद्धी पूर्णपणे पणाला लावणे. यातून विविध सामाजिक व निसर्ग विज्ञानांचा जन्म होतो. अशा रीतीने ज्ञानरचना करणे, शास्त्रांचा विज्ञानांचा शोध लावणे, त्यात भर टाकणे, अभ्यास करणे, संशोधन करणे हे Master असण्याचे लक्षण आहे.

अशा रीतीने दोन ज्ञानाचे ज्ञान असणे म्हणजे असणे Master होय. पहिले स्वत:च्या अज्ञानाचे ज्ञान आणि मग ते अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाची निर्मिती. अज्ञानी माणूस ज्ञानाचा आणि जगाचा जो शोध घेईल त्यातून विविध विषयांमध्ये तज्ज्ञ होईल. त्याला मग Master म्हणावे. जगात असे केवळ तीनच Master झाले. ते पाहण्यापूर्वी आपण Master या शब्दाची माहिती घेऊ. 

प्रचलित इंग्लीशमधील Master ही संज्ञा जुन्या इंग्लीशमधील mæġester (maegester) शब्दापासून बनते. mæġester (maegester) हा शब्द लॅटिनमधील magister (chief, superior, director, teacher) या शब्दापासून बनतो. तो जुन्या फ्रेंचमध्ये maistre, mestre असे रूप धारण करतो. magisterचा अर्थ magis (more or great 0r magnus) + -ter.  

संज्ञेची व्युत्पत्ती पुरुषप्रधानतेशी जोडलेली आहे. ती विधानात अथवा वाक्यामध्ये नाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद अशा कोणत्याही ठिकाणी स्थानबद्ध होऊन जन्मसिद्ध अधिकार गाजविते. Magister हे पुरुषासाठी तर Magistra हे स्त्रीसाठी वापरले जाणारे शब्द आहेत. इंग्लीशमधील Mister हे उपपद knighthood किताबप्राप्त पुरुषासाठी राखून ठेवले गेले. या Mister या शब्दाची दोन लघुरूपे म्हणजे Mr. (Commonwealth English) किंवा Mr. (American English) (येथे पूर्णविराम महत्त्वाचा आहे. ते काही उगाच दिलेले टिंब नाही.) Misterचे साधारण रूप master हे  झाले. Master किंवा sir हे पद विधानात जेव्हा नाम म्हणून येते, तेव्हा त्याचा अर्थ ‘तत्त्वज्ञान आणि उदारमतावादी कला यांचे विद्यापीठीय उच्चशिक्षण घेतलेला अधिकारी पुरुष’ असा असतो. येथे पुरुष म्हणजे स्त्री-पुरुष समासातील ओरिजनल पुरुष. हा मध्ययुगीन अर्थ आहे.

Master किंवा MASTER असे पहिले अक्षर कॅपिटल किंवा सगळा शब्द कॅपिटल लिहिला की त्याचा अर्थ ‘धर्मगुरु’ असाच होतो. तो दुसऱ्या कोणत्याही अर्थाने घ्यावयाचा नसतो. ईश्वर हाच पहिला MASTER थवा TEACHER म्हणून त्याचा पुत्र येशू तोही MASTER; म्हणून येशूची वचने प्रसारित करतो, तो ‘धर्मगुरू'सुद्धा MASTER!

Masterचे समानार्थी शब्द इंग्लीशमध्ये अनेक आहेत, पण प्रचलित आणि रूढ तसेच विकसित झालेले शब्द पुढीलप्रमाणे : administrator, boss, captain, chief, chieftain, commandant, commander, commanding officer, conqueror, controller, director, employer, general, governor, guide, guru, head, headperson, instructor, judge, lord, manager, matriarch, overlord, overseer, owner,  patriarch, pedagogue, preceptor, principal, pro, ruler, schoolmaster/ mistress, skipper, slave driver, spiritual leader, superintendent, supervisor, swami, taskmaster, teacher, top dog, tutor, wheel.

नाम म्हणून Master ही संज्ञा १२२५ला प्रथम वापरली गेली. या संज्ञेला १३८०च्या दरम्यान शैक्षणिक अर्थ जोडला गेला. त्यामुळे Master ही पदवी मिळविल्यामुळे ‘विद्यापीठात शिकविण्यास पात्र होणारा म्हणजे विद्यापीठ शिक्षक’ असा दर्जा त्यास आला.

Master ही पदवी

इतकी आशय समृद्धता Master शब्दाला असल्यानेच विद्यापीठांनी तिची पदवी बनविली. M.A., M.Sc इत्यादी. बॅचलर (‌bachelor)च्या पदवीनंतरची ही पदवी असते. आपल्या निवडलेल्या विषयात आपण मास्टर असावे, ही किमान अपेक्षा असते. काही युरोपीअन भाषांमध्ये मास्टर्स पदवीला असेही नाव आहे. या शब्दाचा अर्थ आपण पाहिलाच आहे. या पदवीची दोन सुप्रसिद्ध (की कुप्रसिद्ध?!) रूपे Master of Arts (M.A.) म्हणजे आणि Master of Science (M.S., M.Si., or M.Sc.); व हॉर्वर्ड आणि मॅसॅच्युएटस् इन्स्टिट्यूटमध्ये (एमआयटी) अद्यापिही Master of Arts magister artium किंवा artium magiste णि Master of Scienceसाठी  magister scientiae or scientiae magister ही लॅटिन रूपे वापरतात. लघुरूप À.M. आणि S.M. 

पदवीचा संक्षिप्त इतिहास

मास्टरची पहिली पदवी अंदाजे बाराव्या शतकात प्रदान झाली असावी. रोमन सम्राट जस्टीनियन (Justinian the Grea, जन्म : ४८२, मृत्यू : १४ नोव्हेंबर ५६५) याने त्याच्या साम्राज्यातील रोम आणि कॉन्स्टॅटीनोपल (आजचे तुर्कस्थानमधील इस्तंबुल) येथील विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्यांवर मास्टरची पहिली पदवी आधारित होती. बोलोना (बोलोना, इटली स्थापना १०८८), पॅरिस (स्थापना : ११६० ते १२५९ दरम्यान) आणि ऑक्सफर्ड (स्थापना अज्ञात पण १०९६ च्या आसपास अध्ययनास सुरुवात) या विद्यापीठांना युरोपीअन विद्यापीठांमधील ‘ओरिजिनल थ्री’ (Original three) म्हटले जाते. या विद्यापीठांमधून कला, कायदा, वैद्यक आणि धर्मशास्त्र या ज्ञानशाखांमध्ये मास्टरची पदवी दिली जात होती. अर्थातच त्या काळात एकमेकांच्या पदव्यांना मान्यता नव्हती.

ही पदवी मिळविणे, ही विद्यापीठात शिकविण्याची मूळ पात्रता समजली जात होती किंवा खरे तर ही पदवी मिळविल्यानंतर विद्यापीठात किमान दोन वर्षे शिकविणे बंधनकारकच होते. त्या काळात ‘Doctor,’ ‘Master,’ आणि Professor’ असा भेद केला जात नव्हता, ही नामाभिधाने वेगळी समजली जात नव्हती. तीनही विद्यापीठात या पदव्या होत्या, एक मिळविली म्हणजे दुसरी मिळविली, असे मानले जात होते.  

युरोपात जसे जसे सांस्कृतिक नवजीवन सर्वत्र झिरपू लागले तसतसे विद्यापीठांनी केवळ अभ्यासक्रमातच बदल केले असे नाही, तर शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. परिणामी मास्टर पदवीतही बदल झाला. त्रिकोटी  आणि चतुष्कोटी शिक्षण पद्धती  सुरू झाली. त्रिकोटी म्हणजे व्याकरण, तर्कशास्त्र आणि काव्यशास्त्र (Trivium = grammar, logic and rhetoric) आणि चतुष्कोटी  म्हणजे भूमिती, अंकगणित, खगोलशास्त्र आणि संगीत (the Quadrivium = geometry, arithmetic, astronomy and music). या सात विद्यांचा अभ्यास हा तत्कालिन अभिजात अध्ययनाचा पाया समजला जात होता. मास्टरची पदवी मिळविण्याची प्रवेश पात्रता परीक्षा होती. Triviumअ चा अर्थ ‘तीन मार्ग’ आणि Quadrivium चा अर्थ ‘चार मार्ग’. Trivium आणि Quadrivium हे लॅटिन शब्द आहेत.

Doctor आणि Master यात जो फरक आज केला जातो, तो अंदाजे सोळाव्या शतकात सुरू झाला. संपूर्ण युरोपभर पदव्या सुरू झाल्या आणि वाढू लागल्या, तसतसे मास्टर पदवीचे प्रकार आणि त्यांच्या प्रवेशांच्या अटींमध्ये बदल होऊ लागला. बोलोना विद्यापीठाने ‘बोलोना अ‍ॅकॉर्ड’ (The Bologna Accord किंवा The Bologna Process) या नियमाद्वारे युरोपीअन विद्यापीठांमध्ये शिक्षण रचनेतच एकसूत्रीकरण करण्याचा पाया रचला. आज ज्या क्रेडिट सिस्टिमचा गाजावाजा चालू आहे, त्याची मूळ मांडणी या नियमानुसार करण्यात आली. त्यात अर्थात प्राथमिक पातळीवर बऱ्याच त्रुटी राहिल्या. पण मुख्य फायदा म्हणजे ‘बॅचलर’ आणि ‘मास्टर’ या दोन मूलभूत पदव्यांचे स्वरूप निश्चित होऊन सर्वत्र स्वीकारले गेले. दोन्ही पदव्यांची वेगवेगळी  क्रेडिट सिस्टिम तयार झाली. अशा रीतीने मास्टर पदवीला किमान ९०० वर्षांचा इतिहास आहे. अर्थात आजही विविध जागतिक विद्यापीठांची आणि प्रत्येक देशाची मास्टर पदवीची अट, स्वरूप, रचना आणि अमलबजावणीचे नियम वेगवेगळे आहेत. कारण हा ‘बोलोना अ‍ॅकॉर्ड’ आजही परिपूर्णरीत्या स्वीकारलाच गेलेला नाही! मात्र वरील मूळ तीन विद्यापीठांचे नियम मात्र बहुतेक एकसमान आहेत.

जगातील तीन Masters

ग्रीक-पाश्चात्य परंपरेत अ‍ॅरिस्टॉटल (Aristotle- इ.स.पू. ३८४ ते ३२२) हा पहिला Master होता. क्रमांक दोनच्या Master पदाचा मान आधुनिक विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीचा प्रणेता लॉर्ड फ्रान्सिस बेकन (Francis Bacon- १५६१ ते १६२६). तिसरा Master म्हणजे होमिओपॅथीचा उद्गाता सम्युएल हनिमान (Christian Fiedrich Samuel Hahnemann- १७७५ ते १८४३). विसाव्या शतकात Master हा मान विख्यात तत्त्ववेत्ते बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell, 3rd Earl Russell- १८७२ ते १९७०) यांना देणे योग्य ठरते.  

अ‍ॅरिस्टॉटल

अ‍ॅरिस्टॉटल हा असामान्य बुद्धीचा व तर्कशुद्ध रीतीने विचार करणारा महान तत्त्वज्ञ होऊन गेला़ सॅाक्रेटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल अशी पाश्चात्य गुरु-शिष्य परंपरा आहे. सॉक्रेटिस हा आद्यगुरू असून प्लेटेा त्याचा शिष्य होता आणि अ‍ॅरिस्टॉटल प्लेटोचा शिष्य होता. ‘अ‍ॅरिस्टॉटल’ या नावाचा अर्थ ‘सर्वोत्तम हेतू’ (Aristotle = the best purpose (aristos = best + telos = purpose OR aim) वरील ग्रीक अर्थाने म्हणजे त्याला स्वत:ला स्वत:च्या ज्ञानाच्या मर्यादांचे ज्ञान होते. म्हणूनच त्याने ईश्वर, माणसांचे जग, माणसाने निर्माण केलेले सामाजिक व नैसर्गिक जग यांचे ज्ञान निर्माण केले.  

सर्व ज्ञानाची सुव्यवस्थित रचना करण्याचा आणि ज्ञानाला वैज्ञानिकतेचा दर्जा देण्याचे महान कार्य अ‍ॅरिस्टॉटलनेच केले. आज जगाला ज्ञात असलेले सारे विज्ञान व वैज्ञानिक पद्धतीच्या मूळ संकल्पनेची मांडणी त्याने केली. तत्त्वज्ञानाला आणि एकूणच चिंतनविश्वाला त्याने शिस्त लावली. त्याच्या तत्त्वज्ञानाला ‘आद्य तत्त्वज्ञान’ किंवा ‘अंतिम तत्त्वज्ञानाचे चिंतन’ (Metaphysics : The First Philosophy)  म्हणतात. त्याने विचार केला नाही, ज्याचे शास्त्र बनविले नाही, असा विषय या जगात नाही, असे म्हटले जाते. त्याने किमान दोनशे पुस्तके लिहिली असावीत, त्यापैकी आज केवळ एकतीसच ग्रंथ उपलब्ध होऊ शकले आहेत, असा अंदाज आहे. अ‍ॅरिस्टॉटलने तर्कशुद्ध विचार पद्धती स्पष्ट करण्यासाठी आणि विज्ञान व वैज्ञानिक पद्धतीच्या मूळ संकल्पनेची मांडणी  करण्यासाठी ‘The Organon’ (instrument, tool, organ) हा सहा खंडांचा प्रचंड मोठा ग्रंथ लिहिला. अ‍ॅरिस्टॉटलचा हा ग्रंथ नंतरच्या मानवी ज्ञानविज्ञानाच्या विकासात जणू काही ‘बायबल’ मानला गेला. 

अ‍ॅरिस्टॉटलचा जन्म थ्रेस प्रांतातील (हा प्रांत आजचा ग्रीस, बल्गेरिया, टर्की या प्रदेशात विभागला आहे. बाल्कन पर्वतराजीजवळ हा भाग येतो.) स्टॅगिरस (विद्यमान ऑलिम्पीयाड नगरी) या शहरी इ.स़ पू़ ३८४ मध्ये झाला. इ स़ पू़ ३६७ मध्ये अ‍ॅरिस्टॉटल प्लेटोच्या अ‍ॅकॅडेमीत दाखल झाला. तेथे त्याने वीस वर्षे (प्लेटोच्या निधनापर्यंत) अध्ययन केले. प्लेटोच्या मृत्यूनंतर मात्र तो लगेच अ‍ॅटेनिअसचा राजा हर्मिअस याच्या दरबारी तीन-चार वर्षे जाऊन राहिला. त्यानंतर मॅसिडोनियाचा राजा फिलिप, याच्या निमंत्रणावरून राजपुत्र अ‍ॅलेक्झँडर (अ‍ॅलेक्झँडर दि ग्रेट) याचा शिक्षक म्हणून त्याने इ.स.पू. ३४२-३३५ असे सात वर्षे काम केले. अ‍ॅलेक्झँडेरने आपल्या पूर्वेकडील स्वाऱ्या सुरू केल्यावर तो अ‍ॅथेन्सला परतला व त्याने लिसिअम (Lyceum) नावाचे आपले स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापीठांत त्याने १२-१३ वर्षे अध्यापन केले व विद्यापीठाचें सर्व कामकाज पाहिले. शिष्यांसमवेत बागेतून येरझारा घालीत शिकविण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे त्याच्या पंथाला पेरिपेटेटीक स्कूल (Peripetetic School) म्हणजे येरझाऱ्या लोकांचा पंथ  असे नाव पडले. अ‍ॅलेक्झँडेरच्या मृत्यूनंतर त्याने यूबियामधील कॅन्सिस गावी पळ काढला व तेथेच तो इ.स पू़. ३२२मध्ये मरण पावला.

अ‍ॅरिस्टॉटलला ‘विचारवंताचा विचारवंत’ (The Thinker of the thinkers) किंवा ‘आचार्य’ (The Master) म्हटले जाते. या अर्थाने अ‍ॅरिस्टॉटल हा जगातील पहिला ‘आचार्य’ समजला जातो. महाकवि डांटे याने अ‍ॅरिस्टॉटलचा गौरव ‘ज्ञानियांचा राजा’ अशा उक्तीत केला आहे. ज्यास खऱ्या अस्सल अर्थाने गुरू (Master) म्हणता येईल, असा अ‍ॅरिस्टॉटल हाच जगातील पहिला Master आहे. थॉमस अ‍ॅक्विनास हा मध्ययुगीन संत-तत्त्ववेत्ता अ‍ॅरिस्टॉटलला ‘The Philosopher’ ही पदवी देतो. विल ड्युरंट हा विसाव्या शतकातील लेखक त्याचा ‘The Encyclopaedia Britannica of ancient Greece’ या शब्दात गौरव करतो. ‘‘संपूर्ण मानवजातीला गेल्या दोन हजार वर्षात अ‍ॅरिस्टॅटलसारखा तत्त्वचिंतक निर्माण करता आला नाही’’ या शब्दात बर्ट्रांड रसेल अ‍ॅरिस्टॉटचे कौतुक करतो.

सम्युएल हनिमान

सम्युएल हनिमान हा जर्मनवंशीय वैद्य आधुनिक आरोग्यविज्ञानाचा जनक मानला जातो. हनिमान हा अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. तो उत्तम भाषा तज्ज्ञ होता. त्याला इंग्लीश, फ्रेंच, इटालियन, ग्रीक, लॅटिन, अरबी, सिरियाक, खाल्डियन आणि हिब्रू अशा अनेक भाषा अवगत होत्या. तो अतिशय उत्तम दर्जाचा भाषांतरकार आणि लेखक होता.

हनिमानने औषधोपचारात ‘काट्याने काटा काढावा’ अशा अर्थाने प्रचलित असणारी चमत्कारिक  पद्धती  शोधून काढली. ती सारखेपणाच्या तत्त्वावर ( Law of Similar) आधारित होती. ही पद्धती म्हणजे होमिओपॅथी. तत्कालिन औषधोपचार पद्धती आणि वैद्यकशास्त्र वास्तवात फारच अप्रगत होते. पण ते रक्तशोषक होते, असे हनिमानचे मत होते. त्यामुळे त्याने पर्यायी औषधोपचार विज्ञानाचा शोध लावला. त्याचे संशोधन त्याने ‘Organon of the Rational Art of Healing’ या ग्रंथात विशद केलेले आहे. या ग्रंथाचे नाव नंतरच्या आवृत्तीत ‘The Organon of the Healing Art असे बदलले गेले. या ग्रंथामुळे हनिमान जगप्रसिद्ध झाला. लोक त्याच्याकडे आकृष्ट झाले. हनिमानने पारंपरिक आरोग्यविज्ञानात मोठी क्रांती केली. या ग्रंथामुळे त्याचे नाव अ‍ॅरिस्टॉटलच्या बरोबरीने घेतले जाऊ लागले. हनिमानला आरोग्यविज्ञान जगतातील अ‍ॅरिस्टॉटल असा मान लाभला. 

लॉर्ड फ्रान्सिस बेकन

लॉर्ड फ्रान्सिस बेकन (जन्म २२ जानेवारी १५६१, मृत्यू : ०९ एप्रिल १६२६) हा इंग्लीश तत्त्ववेत्ता, राजकारणी, वैज्ञानिक, न्यायाधीश आणि लेखक-साहित्यिक होता. केवळ ब्रिटन अथवा इंग्लंडच्या नवजीवनाचाच तो अध्वर्यू नव्हता, तर संपूर्ण युरेापयीय नवजीवन काळाचा (Age of Renaissance) तो अध्वर्यू होता. बेकनच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे केवळ १२व्या वर्षी त्याला केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात प्रवेश मिळाला. तेथे त्याला अ‍ॅरिस्टॉटलचे अध्ययन करता आले, पण अ‍ॅरिस्टॉटलविषयी त्याच्या मनात तिटकारा व घृणा निर्माण झाली. तेथूनच त्याला नव्या तर्कशास्त्राची आणि विचार पद्धतीची रचना करण्याची गरज भासली.

बेकनला आधुनिक वैज्ञानिक क्रांतीचा प्रेषित (The Prophet of the scientific evolution) मानले जाते. तत्कालिन वैज्ञानिक क्रांतीला त्याच्या वैज्ञानिक पद्धतीमुळे विधायक कलाटणी मिळाली. जिला आज वैज्ञानिक पद्धती म्हटले जाते, ती शोधणारा बेकनच होता. त्यामुळे पद्धतीला बेकनची पद्धती  म्हटले जाते. या पद्धतीमुळेच आधुनिक विज्ञानाचा पाया रचला गेला. म्हणून बेकनला ‘आधुनिक विज्ञानाचा जनक’ म्हटले जाते. त्याच्या मते ज्ञानाचे अस्सल मूल्या ज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोजनात, त्याच्या उपयुक्ततेतच असते. ज्ञानाचे खरे कार्य केवळ निसर्गाच्या रहस्यांवर मानवाने विजय मिळविण्यातच आहे. बेकन निसर्गाला जणू काही स्त्री समजून पुरुषाने स्त्रीचा रहस्यभेद करावा, तसा निसर्गभेद केला पाहिजे, असे म्हणतो. विज्ञान-तंत्रज्ञानाचे तेच काम आहे. हे सारे स्पष्ट करताना तो बरीच अश्लाघ्य आणि अश्लील भाषा वापरतो.

बेकनने अ‍ॅरिस्टॉटलचे सगळेच तत्त्वज्ञान झिडकारले आणि नवे तत्त्वज्ञान रचले. अनुभववादाचा तो निर्माता होता. विशेषत: नवे तर्कशास्त्र रचले. एवढेच नव्हे तर त्याला ‘आजच्या औद्योगिक युगाचा’ही जनक मानले पाहिजे. आजच्या फ्रिझ किंवा रेफ्रिजिरेटरचा जनकही बेकनच आहे.

शेक्सपीअर आणि बेकन असाही एक प्राचीन वाद आहे. शेक्सपीअरची सारी नाटके त्यानेच लिहिली, असे म्हणतात. शिवाय इंग्लीश साहित्यविश्वात बेकन ‘निबंधकार’ (Essayeist) म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याचे एकूण कार्य लक्षात घेऊन खास त्याच्यासाठी इंग्लडंच्या महाराणीने बॅरन व्हेरूलम  (the Baron Verulam) हा किताब १६१८मध्ये आणि नंतर दि व्हीस्काऊंट सेंट अल्बन (The Viscount st. Alban) हा किताब १६२१ मध्ये निर्माण केला होता. हे किताब एक अपवाद वगळता अद्यापि कोणालाही प्रदान करण्यात आलेले नाहीत.

.............................................................................................................................................

या लेखाचे पुढील भाग

१) शिक्षक दिन ते मास्तरडे (मास्तर-डे!) – एक शोकांतिक प्रवास (भाग दुसरा)

https://www.aksharnama.com/client/article_detail/1222

२) शिक्षक दिन ते मास्तरडे (मास्तर-डे!) – एक शोकांतिक प्रवास (भाग तिसरा)

https://www.aksharnama.com/client/article_detail/1227

३) शिक्षक दिन ते मास्तरडे (मास्तर-डे!) – एक शोकांतिक प्रवास (भाग चौथा-पाचवा)

https://www.aksharnama.com/client/article_detail/1231

.............................................................................................................................................

लेखक श्रीनिवास हेमाडे संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......