हॉलिवुडच्या कुठल्याशा प्रिव्ह्यू थिएटरमध्ये निर्माता अॅरन रूसो याच्यासाठी नव्या चित्रपटाचा खास ट्रायल शो सुरू होता. चित्रपटाची निर्मिती केलेल्या ‘वेस्ट्रॉन पिक्चर्स’चा हा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे स्टुडिओचे एग्झिक्युटिव्ह्ज श्वास रोखून रूसोच्या प्रतिक्रियेची वाट बघत होते. रूसो म्हणजे हॉलिवुडमधलं बडं प्रस्थ. ‘ट्रेडिंग प्लेसेस’, ‘वाइज गाइज’ आणि ‘द रोज’चा निर्माता. त्याच्या शब्दाला वजन होतं. चित्रपट जसजसा पुढे सरकत होता, तसतसे रूसोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. ते पाहून ‘वेस्ट्रॉन’च्या एग्झिक्युटीव्ह्जचा जीवही वरखाली होत होता.
अखेरीस ‘द एंड’ची पाटी झळकली. एग्झिक्युटीव्ह्जनी अभिप्रायासाठी उत्सुकतेनं रूसोकडे बघितलं.
रूसो खुर्चीतनं उठला आणि ‘चित्रपटाच्या निगेटीव्ह्ज जाळून टाका आणि इन्शुरन्सचे मिळतील तेवढे पैसे घेऊन गप्प बसा’ असं म्हणून तिथून निघून गेला.
रूसोच्या या शब्दांनी त्या एग्झिक्युटीव्ह्जचा उरलासुरला धीरही खचला. स्टुडिओतल्या कोणालाच चित्रपट फारसा आवडला नव्हता. या चित्रपटाचं काही खरं नाही, असाच सगळ्यांचा सूर होता. पहिलीच निर्मिती आणि इतकी अवलक्षणी निघावी? अखेरीस आठवड्याभरासाठी चित्रपट प्रदर्शित करावा आणि नंतर थेट होम व्हिडिओच्या मार्केटमध्ये उतरवावा, असा निर्णय घेण्यात आला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
चित्रपटाच्या मार्केटिंगसाठीही कोणी पार्टनर सापडेना. जो तो अखेरच्या क्षणी हात काढून घेऊ लागला. शेवटी कसाबसा २१ ऑगस्ट १९८७ या दिवशी अमेरिकेत अत्यंत मर्यादित स्वरूपात तो प्रदर्शित करण्यात आला आणि त्यानंतर वर्षभर तो तिथून हलला नाही. कमाईच्या दृष्टीनं त्या वर्षीच्या टॉप टेन चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला. ऑस्कर्स, ग्रॅमी, गोल्डन ग्लोब अशा सर्व प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात त्याने हंगामा केला. जगभरातल्या तरुण-तरुणींनी आणि त्यांच्या मातापित्यांनीही आसुसून हा चित्रपट वारंवार पाहिला. चित्रपटाची कीर्ती उत्तरोत्तर वाढतच गेली. सरणाऱ्या प्रत्येक वर्षासरशी खास तरुणाईसाठी बनवलेला हा चित्रपट अधिकाधिक तरुण होत गेला. आजवर त्याच्या १ कोटीहून अधिक व्हिडिओ कॅसेट्स आणि डीव्हीडीज विकल्या गेल्यात. १० वर्षांपूर्वी ‘बीबीसी’नं त्याच्यावर खास डॉक्युमेंट्री केली. नुकताच जगभरातील चित्रपटप्रेमींनी त्याचा तिसावा वाढदिवस साजरा केला. अनेक नामांकित वर्तमानपत्रं, नियतकालिकं आणि वेबसाइट्सवर त्याच्याविषयी पुन्हा रकानेच्या रकानं भरून लिहिलं गेलं. त्याचा प्रीक्वल झाला, रिमेक झाला, रंगमंचीय आवृत्ती झाली. चित्रपटप्रेमींच्या भावविश्वाचा तो कायमचा भाग झाला.
‘डर्टी डान्सिंग’ची बातच काही और आहे!!
एखादी उदबत्ती मंदपणे जळत राहावी आणि तिच्या सुगंधानं मनावर आगळी धुंदी चढावी, तशी ‘डर्टी डान्सिंग’ची धुंदी आहे. ती एकदा चढली की उतरतच नाही.
इतक्या बेतीव पटकथेवरचा, सरधोपट मार्गानं जाणारा आणि तरीही काहीतरी विलक्षण जादू असलेला दुसरा चित्रपट शोधून सापडणं अवघड आहे.
असं काय आहे ‘डर्टी डान्सिंग’मध्ये?
पॅट्रिक स्विझी आणि जेनिफर ग्रेची भन्नाट केमिस्ट्री आहे. जिमी इनरची भन्नाट गाणी आहेत. या गाण्यांवरचं झिंगबाज नृत्य आहे. नुकत्याच वयात आलेल्या तरुण-तरुणींच्या मनाला गुदगुल्या करणारा किंचितसा एरॉटिसिझम आहे आणि या सगळ्याच्या जोडीला तोंडी लावण्यापुरतं लुटुपुटूचं कथानक आहे.
फ्रान्सिस हाऊसमन (जेनिफर ग्रे) ऊर्फ बेबी तिचे डॉक्टर वडील, आई आणि मोठ्या बहिणीसोबत समर व्हेकेशनसाठी एका रिसॉर्टमध्ये येते. अनेक उच्चभ्रू कुटुंब तिथं एकत्र आलेली आहेत. त्यांच्या मनोरंजनासाठी विविध अॅक्टिव्हिटीजचं आयोजन करण्यात आलंय. वेगवेगळे परफॉर्मन्सेस आहेत, बीच गेम्स आहेत, फॅन्सी ड्रेस काँम्पिटिशन आहे आणि विविध प्रकारचे डान्स करणारा एक तरुण-तरुणींचा ग्रुपही आहे. या ग्रुपचा लीडर जॉनी कॅसल (पॅट्रिक स्विझी) याच्याकडे ती आकर्षित होते. त्याच्याकडून डान्स शिकता शिकता दोघं जवळ येतात. पण तो पडला गरीब. त्यातच बेबीच्या वडलांचा जॉनीविषयी गैरसमज होतो. त्यामुळे ते त्याच्या विरोधात आहेत. पण बेबी ठाम राहते. दोघंही बेबीच्या वडलांचा विरोध ठामपणे मोडून उभे राहतात आणि शेवट अर्थातच गोड होतो.
चित्रपटाची कथा म्हणावी तर एवढीच आहे. म्युझिकल रोमँटिक चित्रपटाची कथा जी अपेक्षित वळणं घेते, ती सगळी वळणं ‘डर्टी डान्सिंग’ची कथाही घेते. पण इथं कथा महत्त्वाची नाहीच आहे. ‘डर्टी डान्सिंग’ हा या कथेच्या पलिकडचा सिनेमा आहे. केनी ऑर्टेगानं बसवलेल्या अफलातून नृत्यांमागच्या पॅशनचा हा सिनेमा आहे. जिमी इनरच्या तडकत्या-भडकत्या गाण्यांचा हा सिनेमा आहे. बेबी आणि जॉनी यांच्यातले जे अनेक उत्कट प्रसंग आहेत, त्या प्रसंगांचा हा सिनेमा आहे. आपल्या दोन्ही हातांमध्ये जिचा चेहरा हळुवारपणे धरावा आणि जिला एक उत्कट चुंबन द्यावं, असं प्रत्येक तरुणाला वाटावं, अशा विलक्षण लोभस जेनिफर ग्रेच्या बेबीचा हा सिनेमा आहे. गरिबीपेक्षाही नाकारल्या जाणाऱ्या संधींमुळे रागानं आतल्या आत धुमसणाऱ्या पॅट्रिक स्विझीच्या जॉनीचा हा सिनेमा आहे. जॉनीच्या समवेत बेधुंद होऊन नाचता नाचता विश्वासानं त्याच्या मिठीत झोकून देणाऱ्या बेबीचा इनोसन्स आणि जॉनीची व्हल्नरेबिलिटी यांचा हा सिनेमा आहे आणि या दोघांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या तरुणाईचा हा सिनेमा आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
सिनेमात अनेक अंडरकरंट्स आहेत, पण ते नैमित्तिक आहेत. फार काही गंभीर मांडायचंय, या हेतूनं ना लेखिकेनं त्यांची कथेत पेरणी केली आहे, ना दिग्दर्शकानं तशी मांडणी केली आहे. उदा. बेबी ज्यू आहे आणि जॉनी आयरिश. बेबी श्रीमंत आहे आणि जॉनी कष्टकरी वर्गातला. म्हणजे इथं वर्गभेदही आहे आणि वंशभेदही. शिवाय, बेकायदा गर्भपाताचंही एक उपकथानक आहे. जॉनीच्या ग्रुपमधली त्याची सहनर्तिका पेनी गर्भार राहाते. जॉनी तिची जबाबदारी स्वीकारतो. जॉनीचा भाऊ तिला एका तथाकथित एमडी डॉक्टरकडे गर्भपातासाठी घेऊन जातो, पण प्रकरण चिघळतं. डॉक्टर बोगस निघतो. पेनीच्या प्रकृतीला धोका निर्माण होतो. नाईलाजानं बेबीला आपल्या डॉक्टर वडलांना बोलवावं लागतं. वडील पेनीला वाचवतात, पण हे कृत्य जॉनीचंच आहे, असं समजून त्याच्याविषयी मनात अढी बाळगतात.
खरं तर कथानक पुढे नेण्याच्या दृष्टीनं, म्हणजे बेबीच्या वडलांकडे जॉनीला विरोध करण्यासाठी काहीतरी कारण हवं म्हणून या उपकथानकाचा समावेश कथेत आहे. पण चित्रपट यशस्वी झाल्यानंतर अनाहूतपणे केलेल्या गोष्टींचंही कसं उदात्तीकरण होतं, त्याचं हे बेकायदा गर्भपात प्रकरण उत्तम उदाहरण आहे. ‘डर्टी डान्सिंग’ला अनपेक्षितपणे अमाप यश मिळाल्यापासून गेल्या तीन दशकांमध्ये चित्रपटाची लेखिका एलिनॉर बर्गस्टिनच्या अनेक ठिकाणी मुलाखती प्रसिद्ध झाल्यात. अगदी अलिकडे, चित्रपटाच्या तिसाव्या वाढदिवसानिमित्तही तिच्या काही ठिकाणी मुलाखती छापून आल्या. त्यात तिने, आपण कसं मुद्दाम हे उपकथानक चित्रपटात घेतलं, तरुणींना आपल्याला सजग करायचं होतं, वगैरे बरंच काय काय सांगितलंय. खरं म्हणजे चित्रपट लिहिताना वगैरे असं काही डोक्यात नसतं किंवा हीच गोष्ट लोकांना अपील होईल, असं काहीही छातीठोकपणे सांगता येत नाही. चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शित करायच्या पूर्वी जे विविध ट्रायल शोज झाले होते, त्यावेळी ४० टक्के प्रेक्षकांना तर चित्रपटात असं काही उपकथानक आहे, याची जाणीवही झाली नव्हती, इतका त्यांनी तो मुद्दा दुर्लक्षिला होता. त्यामुळे हा मुद्दा क्लिक झाल्यानंतर लेखिकेनं स्वत:चीच आरती ओवाळून घेण्यापलिकडे त्याला फारसा अर्थ नाही.
पण वरती म्हटल्याप्रमाणे ‘डर्टी डान्सिंग’ या सगळ्याच्या पलिकडचा चित्रपट आहे.
एखादा चित्रपट काय नशीब घेऊन जन्माला येईल, हे सांगता येणं अवघड असतं. ‘डर्टी डान्सिंग’चं नशीब असंच थोर होतं.
म्हणजे बघाना, ‘डर्टी डान्सिंग’ची लेखिका, निर्माती, दिग्दर्शक यांची आधीची पाटी कोरी होती आणि ‘डर्टी डान्सिंग’नंतरही त्यांच्या हातून म्हणावी तितकी चमकदार कामगिरी होऊ शकलेली नाही. ‘डर्टी डान्सिंग’च्या नशिबी योग होता, हेच खरं.
एखादा चित्रपट जमून यावा लागतो. ठरवून काहीच करता येत नाही. कधी कुठली गोष्ट क्लिक होईल, हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही, मग त्या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांची तर बातच सोडा.
‘डर्टी डान्सिंग’मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत.
मुख्य कलाकार पॅट्रिक स्विझी आणि जेनिफर ग्रे यांचं चित्रिकरणादरम्यान अजिबात पटत नव्हतं, पण प्रत्यक्षात पडद्यावर त्या दोघांची केमिस्ट्री डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे.
‘आय हॅव हॅड द टाइम ऑफ लाइफ’ हे ‘डर्टी डान्सिंग’मधलं सगळ्यात आयकॉनिक गाणं. चित्रपटाच्या क्लायमॅक्सला ते येतं आणि चित्रपट खऱ्या अर्थानं उत्कर्षबिंदूला पोहोचतो. बिल मेडली आणि जेनिफर वॉर्न्स या द्वयीनं हे गाणं गायलं. मेडली याबाबतची आठवण सांगताना म्हणतो, ‘जिमी इनरने जेव्हा चित्रपटाचं कथानक सांगून हे गाणं गाण्यासाठी मला विचारणा केली, त्यावेळी कथानक ऐकून हा एखादा सॉफ्ट पॉर्न मूव्ही असावा, अशी माझी समजूत झाली होती.’ त्याच सुमारास मेडलीच्या बायकोची कुठल्याही क्षणी डिलिव्हरी होणार होती, त्यामुळे त्याने इनरला नकार कळवला. काही महिन्यांनी इनरने मेडलीला पुन्हा विचारलं आणि गाणं गाण्यासाठी त्याचं मन वळवलं. काहीशा नाखुषीनेच मेडली तयार झाला. पण नंतर हे गाणं इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की, गाण्याला थेट ऑस्कर मिळालं. गोल्डन ग्लोब आणि ग्रॅमी पुरस्कारही या गाण्यानं पटकावला. डर्टी डान्सिंगच्या गाण्यांच्या सव्वातीन कोटींहून अधिक कॅसेट्स आणि सीडीज आजवर विकल्या गेल्या आहेत. सलग १८ आठवडे हा अल्बम पहिल्या क्रमांकावर होता. मेडलीने काही वर्षांनी आत्मचरित्र लिहिलं, त्याचं नावच त्याने ‘द टाइम ऑफ माय लाइफ’ ठेवलं.
अनाहूतपणे, उत्स्फूर्तपणे किंवा अपघातानेच केलेली एखादी गोष्ट कधी कधी आयकॉनिक पातळीपर्यंत कशी पोहोचते, त्याचं आणखी एक उदाहरण या चित्रपटात आहे. जॉनी बेबीला नृत्य शिकवतोय. बेबी जॉनीकडे पाठ करून उभी आहे. जॉनी मागून येतो आणि तिला हळुवार कवेत घेतो. ती त्याच्या एका खांद्यावर डोकं टेकते आणि आणि दुसऱ्या खांद्यावर आपला एक हात ठेवते. तो तिच्या हातावरून आपला हात हळुवारपणे फिरवत खाली आणतो आणि तिच्या कंबरेवर ठेवतो, अशी ती नृत्याची स्टेप आहे. पण चित्रीकरणाच्या वेळी प्रत्येक वेळी स्विझी ग्रेच्या हातावरून हात फिरवून खाली आणू लागला की, तिला गुदगुल्या होऊन ती हसायला लागायची. आधीच दोघांचं पटत नव्हतं, त्यात हा प्रकार. स्विझी चिडू लागला. रिटेकवर रिटेक होऊ लागले आणि अखेरीस एक टेक ओके झाला. रशेस बघताना दिग्दर्शकाला काय वाटलं कोणास ठाऊक; त्याने रिटेकचे फसलेले शॉटही प्रसंगात ठेवले आणि प्रसंगाच्या अखेरीस फायनल टेकचा शॉट वापरला. या प्रसंगाचा परिणाम पडद्यावर अनुभवण्यासारखा आहे. चित्रपटाच्या आणि बेबीच्या नृत्य शिकण्याच्या एकूण संदर्भात हा प्रसंग अतिशय फिट्ट बसतो आणि त्याची खुमारी आणखी वाढते.
खरं म्हणजे चित्रपट बनवताना असं काही होईल हे डोक्यात नसतं. ‘डर्टी डान्सिंग’च्या लेखक-दिग्दर्शकाच्या डोक्यातही १०० टक्के असं काही नसणार. त्यामुळेच गर्भपाताचं उपकथानक मुद्दाम तरुणींना सजग करण्यासाठी घेतलं, चित्रपटाच्या कथानकात नैतिक संदेश असला पाहिजे, अशी आपली ठाम धारणा आहे वगैरे दावे तद्दन बोगस म्हटले पाहिजेत. चित्रपट बनवणं हेच खरं तर लेखिका, तिची निर्माती आणि दिग्दर्शकासाठी कसरतीचं होतं.
कुठल्याच स्टुडिओकडून होकार मिळत नव्हता. सततच्या रिजेक्शनमुळे लेखिका एलिनॉर बर्गस्टिन आणि निर्माती लिंडा गॉटलिब निराश झाल्या होत्या. वास्तविक प्रख्यात ‘एमजीएम’ स्टुडिओनं या दोघींची मोट बांधली होती. बर्गस्टिनने १९८४च्या सुमारास ‘एमजीएम’च्या संचालकांपुढे कल्पना मांडली, त्यावेळी त्यांना ती पसंत पडली होती. पण साधारण दीड-पावणे दोन वर्षांच्या अवधीत बर्गस्टिनची पटकथा लिहून पूर्ण होईस्तोवर एमजीएममध्ये बरेच बदल झाले होते आणि या पटकथेच्या आणि पर्यायाने या दोघींच्या नशिबी वणवण आली.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अनेक स्टुडिओंच्या नकारानंतर अखेरीस ‘वेस्ट्रॉन पिक्चर्स’ या नुकत्याच स्थापन झालेल्या कंपनीच्या एग्झिक्युटीव्ह्जनी या पटकथेवर पसंतीची मोहर उमटवली. कंपनीची ही पहिलीच निर्मिती असणार होती. बजेट मंजूर झालं अवघं ५० लाख डॉलर. त्या काळात साधारण ज्या बजेटमध्ये सिनेमे व्हायचे, त्याच्यापेक्षा हे बजेट निम्म्याहूनही कमी होतं.
पण ‘समथिंग इज बेटर दॅन नथिंग’ असं म्हणून बर्गस्टिन आणि गॉटलिब जोडीनं काम सुरू केलं. तोवर दिग्दर्शक म्हणून एमिल आर्डोलिनो या दोघींना येऊन मिळाला होता. आर्डोलिनोने चार वर्षांपूर्वी ‘ही मेक्स मी फील लाइक डान्सिंग’ या माहितीपटासाठी ऑस्कर मिळवलं होतं. ‘डर्टी डान्सिंग’ हा त्याचा पहिला चित्रपट असणार होता.
चित्रपट बनवताना फारशा अडचणी आल्या नाहीत. एकच मोठी अडचण होती, ती म्हणजे पॅट्रिक स्विझी आणि जेनिफर ग्रे यांचं एकमेकांशी अजिबात पटत नव्हतं. दोघांमध्ये कमालीच्या कोल्ड वाइब्ज होत्या. ग्रेची निवड आधी झाली होती आणि तिला ज्या वेळी समजलं की, जॉनीच्या भूमिकेसाठी स्विझीचा विचार सुरू आहे, त्याच वेळी तिने नाराजी व्यक्त केली होती. दोघांनी पूर्वी ‘रेड डॉन’ नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं आणि त्याच वेळी दोघांना एकमेकांचा फारसा चांगला अनुभव आला नव्हता. पण ग्रेप्रमाणेच स्विझीलाही नृत्याचं चांगलं अंग होतं. दोघांच्याही एकत्रित ऑडिशन्सचे परिणाम कल्पनेपलिकडे चांगले आले होते. पुढे चित्रीकरणाच्या वेळी कधी अडचणीचा प्रसंग उद्भवलाच तर दिग्दर्शक त्या दोघांना या ऑडिशन्सच्या टेप्स दाखवून ‘बघा, पडद्यावर तुमची केमिस्ट्री किती भन्नाट दिसते,’ हे पटवून द्यायचा आणि कामाला राजी करायचा. एवढी एक बाब वगळता चित्रीकरणात फारशा अडचणी आल्या नाहीत.
पण मुख्य जोडीचं एकमेकांशी न पटणं, चित्रपट पूर्ण झाल्यावर ज्यांना ज्यांना दाखवला त्यांना न आवडणं, निगेटिव्ह जाळून टाका इथवर प्रतिक्रिया मिळणं, खुद्द निर्मात्यांचाच चित्रपटावरचा विश्वास उडणं, एवढं सगळं होऊनही ‘डर्टी डान्सिंग’ने इतिहास रचला. एखाद्या चित्रपटाचं नशीबच थोर असतं.
‘डर्टी डान्सिंग’चं नशीब थोरच होतं!! आणि हो, देअर इज नथिंग डर्टी अबाइट धिस मूव्ही.
.............................................................................................................................................
लेखक मुक्त पत्रकार आहेत.
chintamani.bhide@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment