गांधींकडे पुन:पुन्हा का जावं लागतं?
सदर - गांधी @ १५०
प्रा. सुहास पळशीकर
  • महात्मा गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Sat , 02 September 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा आठवा लेख आहे.

.............................................................................................................................................

गांधींच्या खुनानंतर इतक्या वर्षांनी आपण सगळे गांधीवादी असलेले आणि गांधीवादी नसलेलेही परत परत गांधींकडे का जातो? आणि जर जात असू, तर त्यातून आपल्याला काय मिळतं की मिळत नाही? म्हणजे, गांधींकडे आपण परत जाणं हा गांधींचा मोठेपणा आहे. पण गांधींकडे परत-परत जाऊनही जर आपल्या हाती काही येत नसेल आणि फक्त झाडू येत असेल, स्वच्छता अभियान येत असेल; तर गांधींकडे परत जाऊन आपल्याला नक्की काय मिळतं?

आता किशोर बेडकिहाळ आणि विजय दिवाण या दोघांनीही ‘भय इथले संपत नाही’ असा उल्लेख केला. मला वाटतं, तो गांधींकडे जाण्यासाठीचा एक आरंभबिंदू म्हणून आपण त्याकडे बघू शकतो. याचं कारण असं की, गांधींनी स्वातंत्र्यलढा चालवला हे जसं खरं आहे, तसंच किंवा त्याहून जास्त हेही खरं आहे की, त्यांनी इथल्या वसाहतवादी घटिताकडं कसं बघायचं, त्याची दृष्टी आपल्याला दिली. ती दृष्टी या भयाच्या मुद्याशी संबंधित आहे. याचं कारण असं की, गांधींनी जेव्हा स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व सुरू केलं किंवा स्वत:कडे घेतलं, त्या वेळी स्वातंत्र्याची चळवळ जोमानं सुरू नव्हती. चळवळ जोमानं सुरू नसली, तरी वसाहतवाद आहे आणि त्या वसाहतवादाला प्रतिकार केला पाहिजे, याची जाणीव होऊन बराच काळ लोटला होता. मग या परिस्थितीत गांधी नेमकं काय करतायत? तर, ते त्यांच्या वेळच्या या वसाहतवादाला प्रतिसाद देणाऱ्या लोकांपेक्षा वेगळं काही तरी करतायत. गांधींच्या काळातला जो प्रचलित प्रतिसाद होता- ‘तो आपल्यात काही तरी कमी आहे, पौर्वात्यामध्ये पाश्चात्यांच्या तुलनेनं, भारतीयांमध्ये इंग्रजांच्या तुलनेनं, वसाहतींमध्ये वसाहतवाद्यांच्या आणि साम्राज्यवाद्यांच्या तुलनेनं काही तरी कमी आहे, म्हणून आपण त्यांच्यासारखं बनलं पाहिजे’- असा होता. म्हणजे वसाहतवादाविरोधी जो लढा सुरू होता, त्यामध्ये आपल्या राज्यकर्त्यांसारखं आपण बनणं, यावर भर होता. गांधींनी हा भ्रमाचा पाया उखडून टाकला आणि त्यांनी असं सांगितलं की- ‘या ज्या वसाहतवादी सत्ता आहेत, त्यांच्याजवळ कोणतंही नैतिक सामर्थ्य नाही.’ गांधींनी सांगितलेली ही क्रांतिकारी गोष्ट होती. याचं कारण- तुम्हाला ज्यांची भीती वाटते, त्यांचे नैतिकतेचे दावे कसे पोकळ आहेत, हे जर तुम्ही एकदा समजून घेतलं तर ती भीती काढून टाकण्याचा रस्ता तुम्हाला मोकळा होतो. तुम्ही जर त्यांच्यासारखं बनायला लागलात, तर तुम्हाला ना कधी स्वातंत्र्य मिळतं, ना कधी भीतीपासून मुक्तता मिळते. म्हणून गांधी काय करत होते; तर हे जे प्रस्थापित होते, (ज्याला आताच्या प्रचलित भाषेत आपण ‘धुरीणत्व’ म्हणतो) वसाहतवादी सत्ता नावाचं हे जे धुरीणत्व होतं- त्यांनी निर्माण केलेलं हे जे संमतीचं क्षेत्र होतं, त्याला गांधींनी आव्हान दिलं.

मग ते आव्हान त्यांच्या इतर विचारांमध्ये आपल्याला सातत्यानं दिसतं. त्यांनी हे आव्हान इंग्रजी शिक्षणाला दिलं. त्यांनी हे आव्हान पुरुषपणाला दिलं. त्यांनी हे आव्हान स्त्रीप्रश्नाकडे बघण्याच्या पद्धतीला दिलं. त्यांनी हे आव्हान बलपूजा करण्याच्या किंवा शस्त्रपूजा करण्याच्या आणि शस्त्रांच्या व शस्त्रास्त्रांच्या शक्तीच्या मागे लागण्याच्या हव्यासाला दिलं. त्यांनी हे आव्हान हिंसेला दिलं. आणि असे म्हणाले की, ‘ही हिंसा हे आमचं जाण्याचं ठिकाण नाही. हिंसा ही आमची शर्यत नाही. हिंसेतून काही मिळत नाही. हिंसेतून जर काही मिळत नसेल, तर ती हिंसा ज्याच्यातून होते, त्या शोषणाला आमचा विरोध आहे.’ ही जी सार्वत्रिक धुरीणत्वविरोधी वृत्ती त्यांच्या लिखाणात निर्माण झाली, त्याचं मूळ हे त्यांच्या १९०९ ते १९१९ या दहा वर्षांतील विचारांमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. सत्ताधारी ज्या वेळेला नैतिक श्रेष्ठत्वाचा दावा करत असतात, तेव्हा तो दावा तुम्हाला खोडून काढता आला, तो दावा शोषितांना मनोमन हद्दपार करता आला- तर शोषितांच्या मुक्ततेचा मार्ग सुरू होतो. (त्यातून लगेच मुक्ती मिळते, अशातला भाग नाही.) या अर्थानं गांधींकडे जर पाहिलं, तर आपल्याला असे दिसेल की, आपल्या स्वातंत्र्योत्तर काळानंतरच्यासुद्धा अनेक टीकांना गांधी का बरं उत्तरं देऊ शकतात किंवा निदान गांधींचा हात धरून काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण का करू शकतो, याचं दिग्दर्शन त्याच्यातून होतं.

त्याच्यातूनच तर्कत: दुसरा मुद्दा येतो. गांधींच्या स्वत:च्या काळामध्येही तो मुद्दा होता आणि त्याचं त्रांगडं आजही शिल्लक आहे. ते म्हणजे, आधुनिकता आणि परंपरा यांचं त्रांगडं. ते त्रांगडं आपल्याला अजूनही सुटलेलं नाही. त्यामुळं मी मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे गांधींच्या काळात काहींना वसाहतवाद्यांसारखं बनायचं होतं, तसं त्याचं दुसरं टोकही होतं- वसाहतवाद्यांच्या विरोधातलं. दुसऱ्या बाजूला जाऊन, तिथं जाऊन जे काही आहे ते आम्ही बनून, परंपरेला पूर्णपणे आत्मसात करून अशा प्रकारे परंपरेचं प्रतिनिधित्व करू की; आमच्या विरोधात असलेली ही जी वसाहतवादी शक्ती आहे, तिचा दुसरा बिंदू- पर्याय बिंदू म्हणून आम्ही उभे राहू. परंपरेची कास धरू. बंगाल प्रबोधनामधून- तथाकथित बंगाल प्रबोधनातून- असा पहिला प्रतिसाद निर्माण झाला होता. त्याचं प्रतिनिधित्व साधारणपणे बंकिम आणि विवेकानंद यांच्यामध्ये आपल्याला दिसतं. ते म्हणजे, ‘तुमच्या राज्यकर्त्यांसारखेच ताकदवान तुम्ही बना.’ तसेच महाराष्ट्रात दुसरी परंपरा होती. आपण तिला ‘चिपळूणकरी परंपरा’ असं म्हणू शकतो. पण, चिपळूणकरी परंपरेखेरीज इथं जे काही अनेक प्रवाह होते, त्यामध्ये परंपरा आत्मसात करून परंपरेच्या मदतीनं वसाहतवादी हे आधुनिक आहेत म्हणून विरोध करण्याचे प्रयत्न केले जात होते.

गांधींचेही अनेक अभ्यासक आणि पुरस्कर्ते त्यांना असेच परंपरेचे पाईक मानतात. पण थोडं बारकाईनं आपण वाचायला लागल्यास दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे, गांधींना आधुनिक आणि परंपरा या ढोबळ वर्गवाऱ्यांमध्ये बसवताना दमछाक होते. आणि दुसरे म्हणजे, गांधी या दोहोंपैकी कोणी होते का नव्हते, हा प्रश्न तयार होतो. कारण, गांधी दोन्ही प्रवृत्तींचं अनुकरण करतात. म्हणून गांधी आधुनिक आणि परंपरा या त्रांगड्याच्या संदर्भात तीन गोष्टी करत होते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

पहिली गोष्ट म्हणजे- आधुनिक आणि पारंपरिक याच्यामध्ये एक तुटलेपण आहे, खंडितता (rupture) आहे, हे ते मानत नव्हते. असं काही नाही की- एका मुद्याला, एका टप्प्याला केव्हा तरी इथं परंपरा थांबली, संपवली, बाजूला सारली आणि त्याच्या जागी एक नवं काहीतरी घडलं. आधुनिक नावाची गोष्ट अचानकपणे येऊन टपकली, अशा प्रकारची बाळबोध कल्पना- जी अनेक आधुनिकतावाद्यांची आहे- तशी गांधींची नव्हती. ते खंड मानत नाहीत, ब्रेक मानत नाहीत, हा एक भाग झाला.

दुसरी गोष्ट गांधी अशी करतात की, आधुनिकतेचे जे काही दावे आहेत, ते आपलेसे करतात. साधारणपणे आधुनिकता तीन प्रकारचे दावे करते. एक- प्रातिनिधिकत्वाचा. दुसरा- लोकशाहीचा. आणि तिसरा दावा- मानवी प्रतिष्ठेचा. कोणी त्यात चौथा दावा म्हणून परिवर्तनाची भर घालेल. हे चारही दावे गांधी करतात म्हणून ते आधुनिकतेत बसतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते प्रातिनिधिकत्वाचा दावा करतात, लोकशाहीचा करतात, मानवी प्रतिष्ठेचा करतात आणि ते परिवर्तनाचाही दावा करतात. हे सगळं करत असताना त्याच्यासाठीची एतद्देशीय ऊर्जा शोधतात आणि तिथं गांधी इतर आधुनिकांपेक्षा वेगळे पडतात. म्हणून आधुनिकांना ते समजत नाहीत किंवा पचत नाहीत. याचं कारण ते एतद्देशीय ऊर्जास्रोत शोधून आपली आधुनिकतेबद्दलची मांडणी सजवण्याचा, घडवण्याचा आणि पुढे रेटण्याचा सतत प्रयत्न करतात.

तिसरी गोष्ट, गांधी आधुनिकता आणि परंपरेबद्दल करतात. ती म्हणजे- परंपरा आणि आधुनिकता यांच्यामध्ये ते खंड मानत नसल्यामुळे त्यांना परंपरेचं वावडं नव्हतं, हे तर खरंच आहे. ते नुसतं परंपरेच्या भाषेत बोलतात असं नाही; ते परंपरेलाही आपलंसं करतात, हेही खरं आहे. पण हे करत असताना परंपरा म्हणजे काय, कोणती परंपरा; हे ठरवण्याचे अधिकार ते माणसाच्या विवेकाकडे ठेवतात. आणि एकदा विवेकाच्या आधारावर तुम्हाला परंपरा स्वीकारणं किंवा नाकारणं ही शक्ती प्राप्त झाली; तर आपोआपच तुम्हाला त्या परंपरेचं हव्या त्या पद्धतीनं पुनर्घटन करणं, पुनर्मांडणी करणं आणि त्याच्या आधारे नवं आधुनिक घडवणं शक्य होतं, असा दावा ते करू शकतात.

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

गांधी काय करत होते, याबद्दल या तीन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या, तर आपल्याला असं दिसेल की त्यांचा विहार, त्यांचा एकंदर संचार हा एका बाजूला वसाहतवादाला प्रतिकार करण्यापासून तर दुसऱ्या बाजूला स्वत:चा किंवा ‘आत्म’चा शोध घेण्यापर्यंत अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होतो. एका बाजूला माणसांचं पुरुषपण जे आहे, त्याचं नियमन कसं करायचं इथपासून दुसरीकडे रचनांतर्गत असलेलं जे शोषण आहे, त्याचं काय करायचं इथपर्यंत त्यांचा विहार होतो; त्यांच्या विचारांचा वावर होतो. म्हणून आज आपल्याला गांधींकडे परत-परत जाण्याची आणि त्यातून नवी दृष्टी मिळवण्याची शक्यता निर्माण होते.

या पुनर्मांडणीमध्ये अर्थातच येणारा अपरिहार्य असा आणि आजच्या प्रसंगी- आजकालच्या प्रसंगी- सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे तो प्रश्न म्हणजे, धर्म आणि हिंदू धर्म होय. गांधी यापासून ‘धर्मनिरपेक्षपणे’ पळ काढत नाहीत. गांधी अर्थातच निधर्मी म्हणजे ऐहिक या अर्थानं भूमिका घेत नाहीत. म्हणून ते धर्माचं काय करतात आणि हिंदू धर्माचं काय करतात, हे पाहणं अत्यंत रोचक ठरतं. विशेषत: आता ते जास्त महत्त्वाचं ठरतं. याचं कारण आता एका बाजूला हिंदू धर्माच्या आधारे राजकारण करण्याचे प्रयत्न जसे भारतात यशस्वी होताना दिसताहेत, तसं दुसरीकडे हिंदू म्हटलं की अ‍ॅलर्जी निर्माण होणारी आणि सर्व धार्मिक हिंदूंना काही वेळा बुचकळ्यात टाकणारी, तर काही वेळा दुरावून टाकणारी अशा प्रकारची एक नवी परिवर्तवादी भूमिका किंवा बैठकही तयार होत आहे; ज्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. गांधींना अशा प्रकारची अ‍ॅलर्जी नव्हती. कारण माझा हिंदू धर्म काय आहे, कसा आहे, हे ठरवण्याची- कसोटी ठरवण्याची धमक त्यांनी व्यक्त केलेली दिसते.

त्यातील पहिली गोष्ट अशी आहे की, मुळात ते धर्माबद्दल जे बोलतात, तो ऐहिक धर्म आहे. ते केवळ दरिद्रनारायणाबद्दल बोलतात या अर्थानं तो ऐहिक नाही. त्या अर्थानं तर आहेच आहे; पण त्यापेक्षाही तो ऐहिक आहे, कारण त्या धर्माचा संबंध तुमच्या रोजच्या जीवनातील व्यवहारांशी, शोषणाशी आणि अत्याचारांचा सामना करण्याशी आहे. या भूमिकेतून ते धर्माकडे पाहतात. धर्मातलं काय घ्यायचं, मुळात धर्म कशाला म्हणायचं, याबद्दलचे स्पष्ट मानदंड ते मान्य करतात. ते असं सांगतात आणि त्याबद्दलचा वादही प्रसिद्ध आहे. ते म्हणतात- ‘ज्या धर्मात अस्पृश्यता असेल, तो धर्म मला मान्य नाही. जो ईश्वर अस्पृश्यता सांगतो, तो ईश्वर मला मान्य नाही. ज्या धर्मग्रंथात अस्पृश्यतेचं समर्थन आहे, तो धर्मग्रंथ मला मान्य नाही.’ अशा प्रकारच्या भूमिका घेऊन ते विवेकावर आणि नीतीवर आधारित धर्माला घेऊन पुढे जातात. धर्म नावाची कोणतीही अशी एक प्रस्थापित शक्ती नाही की, ज्या शक्तीच्या पुढे नतमस्तक होऊन ती शक्ती सांगेल त्या पद्धतीनं मी माझी विवेकबुद्धी गहाण ठेवून वागलं पाहिजे, अशी धर्मशरण भूमिका ते नाकारतात. त्याऐवजी असं म्हणतात- हा जो माझा हिंदू धर्म आहे आणि माझ्या कल्पनेतील म्हणून जो काही धर्म आहे, तो मला जर चांगल्या गोष्टी सांगत असेल, तर तो धर्म आहे. तो चुकीच्या गोष्टी सांगत असेल आणि त्या चुकीच्या गोष्टी मला कळत असतील, तर तो धर्म नाही. ही धर्म ठरवण्याची व्याख्याच ते तयार करतात आणि त्याचा आधार आपण घेतला, तर मला असं वाटतं की, धर्म आणि हिंदू धर्मातील विविध अडचणींच्या, चुकीच्या, अन्यायाच्या आणि विषमतामूलक गोष्टी यांचा त्याग करण्याचे रस्ते ते खुले करून देतात. तिसरी आणखी एक गोष्ट ते करतात. जिचा आपल्या भारतातील सामाजिक वास्तवाशी थेट संबंध आहे. ती म्हणजे, ‘आधुनिक राज्यव्यवस्थेच्या संदर्भात या धर्माचं करायचं काय?’ या प्रश्नाचंही ते उत्तर देतात.

ते असं सांगतात की, राज्यसंस्थेनं सगळ्या धर्मांचा सार्वजनिकपणे आदर केला पाहिजे. ज्याला आपल्याकडचे कडवे पुरोगामी सर्वसाधारणपणे टिंगलीनं आणि हेटळणीनं सर्वधर्मसमभाव असं म्हणतात, तो सर्वधर्मसमभाव. पण गांधींच्या सर्वधर्मसमभावात सार्वजनिकपणे सगळ्या धर्मांचा आदर करणं हा अर्धाच भाग आहे आणि त्यावर प्राय: भर दिला जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यापुढचा अर्धा भाग जो आहे, तो म्हणजे- सर्व धर्मांची धर्मांतर्गत चिकित्सा होऊन त्या धर्मांचं विशुद्ध स्वरूप पुढे यायला पाहिजे. तो अधिकार ते त्या धर्मगुरूंना न देता धर्मातील लोकांना देतात. त्या धर्मातल्या लोकांनी त्या धर्माचा जो विशुद्ध भाग आहे, विशुद्ध स्वरूप आहे ते आविष्कृत करावं आणि सार्वजनिकपणे म्हणजे राज्यसंस्थेनं मात्र सर्व धर्मांचा आदर करावा (अर्थातच हा आदर त्या विशुद्ध आणि विवेकनिष्ठ धर्माचा!).

आता याचे आपल्याला अनेक तपशील सांगता येतील. पण अगदी साधा मुद्दा आहे की- बहुधर्मीय समाजाची एकमेकांशी वागण्याची कोणती नैतिकता असली पाहिजे, याचा हा धडा आहे. स्वधर्म श्रेष्ठ मानून इतर धर्मांवर टीका करणं आणि ते धर्म कसे चुकीचे आहेत, हे सांगणं त्यांना मान्य नव्हतं. धर्मचिकित्सा ही स्पर्धेच्या भावनेतून होता कामा नये, अशी ही भूमिका आहे. म्हणजे मिशनरी ज्या पद्धतींनी हिंदू धर्मांवर टीका करत होते (जे गांधींना मान्य नव्हतं), त्याला त्यांचा जो आक्षेप होता, तो या कारणांसाठी राहील. बिगरहिंदूंनी हिंदू धर्मांतील चुका दाखवायच्या. हिंदूंनी बिगरहिंदू धर्मांतील चुका दाखवायच्या- हा जो धर्मांतील चुका दाखवायचा राजकीय खेळ आहे, त्याच्या बाहेर पडण्याचा मार्ग हा होता की; सार्वजनिक म्हणून तुमचं जे विश्व आहे, त्यामध्ये सर्व धर्मांना सारखाच आदर दिला जाईल. मात्र, प्रत्येक धर्मात त्या धर्माची अंतर्गत कठोर चिकित्सा होऊन त्या धर्मातली फोलपटं, त्या धर्मातील चुकीच्या गोष्टी या बाजूला काढून धर्मांचं उन्नत स्वरूप शोधण्याचे निरंतर प्रयत्न होतील. ते प्रयत्न थांबणार नाहीत. कारण, ते प्रयत्न थांबले तर त्या धर्माचा एक धर्मग्रंथ बनेल. म्हणून त्या धर्मग्रंथाच्या पलीकडे जायचे असेल, तर तुम्हाला पुन्हा त्या धर्मग्रंथाची चिकित्सा करावी लागेल. ही चिकित्सेची भूमिका ते घेतात.

.............................................................................................................................................

लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5073/Mahatma-Gandhi

.............................................................................................................................................

आजच्या भारतातल्या किंवा भारताखेरीज कुठल्याही इतर देशातल्या बहुविधता असलेल्या वास्तवासाठीची ती एक भूमिका असू शकते. ती अंतिम भूमिका असायला हवी, असं नाही; पण एक मार्ग हा असू शकतो. तो केवळ धर्माबद्दल नाही तर भारतातील जे वास्तव आहे, त्याच्यामध्ये विशेष करून जी धर्मांतर्गत स्पर्धा चालते, एका धर्मातल्या लोकांनी एक कठोर भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या धर्मातील लोकांनी दुसरी कठोर भूमिका घ्यायची, मग दोघांनी मिळून आपापल्या व एकमेकांच्या धर्मांतल्या लोकांना मारायचं- या भूमिकेच्या पलीकडे जाण्याचा रस्ता हा गांधींच्या या धर्मचिकित्सेमधून निर्माण होतो. त्यामुळे गांधी काय करत होते, याचं उत्तर द्यायचं झालं, तर आपल्याला असं देता येईल :

एक- गांधी हे आपल्यावर अन्याय करणाऱ्यांच्या किंवा शोषण करणाऱ्यांची आपण स्वत: प्रतिमा (ाळीीेी ळारसश) बनण्यापासून स्वत:चा, आपल्या समाजाचा बचाव करत होते.

दोन- कोणत्याही समाजाच्या आधुनिक बनण्याच्या प्रयत्नांमध्ये दुसरीकडून आलेल्या कोणत्याही ऊर्जा वापरण्यापेक्षा त्या समाजातील पारंपरिक ऊर्जेचा ते शोध घेत होते.

तीन- ते धर्म नावाच्या एका अत्यंत अवघड अशा गोष्टीला आपण किती नाजूकपणे आणि ठामपणे सामोरे जाऊ शकतो, याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत होते.

या तिन्ही गोष्टींमध्ये अपुरेपणा असला, तरी मला असं वाटतं की, त्यानं काही बिघडत नाही; कारण तो गांधींचा खरं तर विजय ठरेल. त्या भूमिका अंतिम ठरल्या, तर त्याचा अर्थ गांधी हे एक धर्मग्रंथ बनतील आणि मग त्यांची पोथी घेऊन आपल्याला गांधी भवनात बसावं लागेल. या गांधी भवनमधील पोथी वाचण्यापासून, कर्मकांडापासून, त्या २ ऑक्टोबरच्या सूतकताईपासून आणि आताच्या २ ऑक्टोबरच्या स्वच्छता अभियानापासून गांधींना वाचवण्याचे जे अनेक प्रयत्न होत असतात, त्याच्यातला एक प्रयत्न म्हणून सुमंतांनी केलेलं लेखन हे इथून पुढच्या काळातही आपल्याला उपयोगी पडू शकेल, या विश्वासानं आपण या पुस्तकाचं वाचन करू या आणि त्याच्यातून आपल्या स्वत:च्या प्रज्ञेनं- त्या पुस्तकाशी संवाद करत गांधींचा हा अन्वयार्थ आपल्याला पुढे नेता येईल का, याचा शोध घेऊ या.

(‘साधना’ साप्ताहिकाच्या ३० एप्रिल २०१६च्या अंकातून साभार)

.............................................................................................................................................

लेखक प्रा. सुहास पळशीकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक आहेत.

suhaspalshikar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......