अजूनकाही
खूप आधी एक सिनेमा पाहिला होता. गडबडीत पाहिला आणि तो मागेच पडला. मध्यंतरी एका चर्चेनिमित्त तो आठवला म्हणून परत एकदा पाहिला.
सिनेमा सुरू होताना पडद्यावर सुरुवातीला साध्या रेषांनी केलेली इलस्ट्रेशन्स दिसतात. आणि पार्श्वभूमीला वाहनांचा, वाऱ्याचा वगैरे आवाज येतो. हा आवाज थांबून, ही इलस्ट्रेशन्स जाऊन आता पडद्यावर कसले तरी स्फटिकसदृश आकार दिसायला लागतात. आधी एकच मोठं स्फटिकसदृश काहीतरी दिसतं. मग पाच-पन्नास गारगोटीसारखे खडे दिसतात. नंतर सहस्र मणी पडल्यासारखं दिसतं आणि जेव्हा लेन्स झूम आऊट केली जाते, तेव्हा कळतं की ही वाळू आहे. नुसतीच वाळू. वाळूचा समुद्र! वाळूचं बेट!!
जपानी चित्रपटात नवी लाट घेऊन येणाऱ्या ज्या दिग्दर्शकांची नावं घेतली जातात, त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे हिरोशी तेशिगाहारा. सरिअॅलिझमचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे याचे सिनेमे. त्याचाच हा एक १९६४ साली आलेला सिनेमा. कोबो अॅबे या नोबेलसाठी नामांकन असणाऱ्या जपानी लेखकाच्या १९६२ साली लिहिलेल्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा म्हणजे – ‘Woman in the dunes’.
शहरातल्या एका शाळेत शिक्षक असणारा आणि किटकशास्त्रात (entomology) रस असणारा, त्याचा अभ्यास करत असणारा नायक तीन दिवसांची सुट्टी घेऊन वाळूत आढळणाऱ्या किटकांचा अभ्यास करण्यासाठी जपानच्या एका काहीशा दुर्गम असणाऱ्या समुद्रालगतच्या वाळवंटात जातो. कीटक हेरून, त्यांचे फोटो काढून, ते गोळा करून सगळीकडे फिरत असताना त्याची परतीची शेवटची बस चुकते. त्या वेळी तिथंच फिरत असणारा एक खेडूत त्याला म्हणतो की, ‘गावातच कुठेतरी तुझी सोय करता येईल’.
तो खेडूत आणखी काही गावकऱ्यांना सोबत घेऊन तिथल्याच एका स्थानिक विधवा बाईच्या घरात या शहरी शाळाशिक्षकाची सोय करायचं ठरवतात. शिक्षक याकरता संमती दर्शवतो आणि ते सर्वजण भल्या मोठ्या वाळवंटातून पाय ओढत त्या बाईच्या घरापाशी येऊन पोहोचतात. एका खोल खड्ड्यात, चहूबाजूंनी वाळूच्या मोठाल्या मोठाल्या भिंती असल्यासारख्या त्या खड्ड्यात एक लाकडी खोपटं असतं. ते म्हणजे त्या विधवाबाईचं घर. तिच्या घरी जाण्यासाठी दोरखंडाच्या शिडीवरून त्याला खाली सोडतात आणि ती शिडी काढून घेतात.
ही विधवा बाई खूप काळ एकटी असते. हा शिक्षक पाहुणा आल्यावर ती लगेच त्याचं सामान उतरवून घेते आणि त्याच्यासाठी जेवण तयार करते. तिच्या असंबद्ध बोलण्याकडे दुर्लक्ष करत हा जेवून घेतो. विधवा बाई सतत या शिक्षकाच्या तिथंच कायमचं राहण्याबद्दल बोलत असते. त्याकडे दुर्लक्ष करून आपण फक्त एका रात्रीसाठी इथं राहणार असल्याचं तो ठासून सांगतो.
रात्र होते तसं ती बाई घराबाहेर वाळू उपसायचं काम करत असते. चार-पाच मोठ्या बास्केट्स भरून झाल्यावर एका झोळीत या बास्केट्स ठेवते. वरून दोरखंडानं गावकरी या बास्केट्स ओढून घेत, रिकाम्या करून परत नव्यानं भरून घेण्यासाठी दोरखंडाच्या साहाय्यानं खाली पाठवून देत.
हे शिक्षकाला काहीच समजत नाही. पण तरीही तो तिला विचारतो की, ‘मी काही मदत करू का?’ यावर ती म्हणते- ‘Not on the first day.’ तो ‘आपण उद्या लगेच जाणार’ असल्याचं पुन्हा सांगतो, पण तिला ते न पटल्यानं कंटाळून झोपायला जातो. बाई म्हणते- "I will have to continue my work as sand won't wait" आणि ती तिचं काम बऱ्याच उशीरापर्यंत सुरू ठेवते.
दुसऱ्या दिवशी सकाळी याला जाग येते, तेव्हा खोलीच्या दुसऱ्या टोकाला ती बाई झोपलेली असते. कसलाच संकोच न बाळगता ती वस्त्रहीन होऊन झोपलेली असते. घराच्या छपरातून गळणारी वाळू नाकाडोळ्यात जाऊ नये म्हणून चेहरा तेवढा एका रूमालानं झाकून घेतलेला असतो. बाकी तिचं वस्त्रहीन शरीर वरून गळत असणाऱ्या वाळूनं झाकून गेलेलं असतं. काही क्षण हे पाहून झाल्यावर शिक्षकाला गिल्टी वाटतं आणि तो उठून निघण्याची तयारी करतो. आवरून झाल्यावर आपल्याला एका रात्रीचा आसरा दिला, जेवायला दिलं म्हणून काही पैसे तिथं एका फळीवर ठेवतो.
बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात येतं की, वर जायला आता शिडी नाहीये. तो तसंच वाळूच्या भिंतींवरून चढून जायचं ठरवतो. दोन-चार पावलं चढल्यावर वाळू निसटू लागते आणि तो पुन्हा होता तिथंच येतो. असं थकून जाईपर्यंत तो करत राहतो.
त्या बाईला तो याबद्दल विचारतो, तेव्हा त्याला ती सांगते की, ‘आता त्याला इथंच राहावं लागणार!’ "You know, how difficult it is to live and survive for an alone woman" असं ती त्याला म्हणते आणि सांगते की तिचं गाव वाचवण्यासाठी ती रोज रात्री वाळू उपसायचं काम करते. पूर्वी तिचा नवरा आणि मुलगी त्यात तिला मदत करत, पण एका वादळात ते नाहीसे झाले.
शिक्षकाकडून आता तिला वाळू उपसायला मदत हवी असते.
तिथं राहण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही. पण तिथून सुटण्यासाठी तो सतत धडपडत राहतो. काही ना काही प्रयत्न करत राहतो. तिथं त्यांना आठवड्यातून एकदाच वरून, गावातून अन्नपाण्याचा पुरवठा होत असतो. "If you have a man at home they provide you with some more food, otherwise they dont" असं ती एकदा त्याला म्हणते. पाण्याचा थेंबही प्यायला नाही, असे काही दिवस त्याला काढावे लागतात.
या साऱ्यात पुढे काय होतं, तो शिक्षक काय करतो, ती कसं वागते आणि वाळू, वाळूचा समुद्र, त्याची तगमग, एकटेपणातून तिला आलेला असहाय्यपणा, या साऱ्याला न्याय देणारं तोरू टेकेमित्सु यांचं संगीत. हे सारंच प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं आहे.
सिनेमा पाहताना त्या खेड्याचा कारभार नेमका काय आहे? ती बाई या शिक्षकासारखीच त्या वाळूच्या खड्ड्यात असणाऱ्या गावातल्या खोपट्यात आली होती की, ती तिथलीच होती? वाळू उपसणं गावाच्या हिताचं आहे असं ती का म्हणत असते? असे प्रश्न पडतात, जे शेवटपर्यंत अनुत्तरीतच राहतात.
बाई एकदा शिक्षकाला म्हणते की, गाववाले ही वाळू एका कंपनीला विकतात. इतकाच काय तो उल्लेख! बाकी ती बाई वाळू उपसण्याव्यतिरिक्त ती चाळून त्यात असणारे बारीक मणी, स्फटिकं दोऱ्यात ओवून त्याच्या माळा करून वरच्या गाववाल्यांमार्फत विकत असते. त्यातून रेडिओ घेण्यासाठी पैसे जमा करत असते. त्या वाळूच्या खड्ड्याबाहेरच्या जगात काय चाललं आहे, हे निदान रेडिओवर समजेल असं तिला वाटत असतं.
बाहेर पडण्यासाठी चिडचिड, धडपड करून शेवटी शिक्षकाला तिथल्या रूटिनची सवय होते. तिथलं जेवण, काम, वाळूवर खाली झोपणं, कधीतरी मिळणारी दारू (shochu), सिगरेट आणि आठवडी आंघोळ या सगळ्याचा त्याला सराव होतो. तरुण बाई आणि पुरुष एकत्र राहू लागतात आणि त्यांच्यात ओघानंच शरीरसंबंध प्रस्थापित होतात. खड्ड्याच्या वरचे गाववालेही आता त्या विधवेचा हा नवीन नवरा, असंच त्याला ओळखू लागतात.
तेशिहागारा, अॅबे हे लोक युद्धोत्तर जपानमधेच वाढलेले, पण युद्धाचे जे खोलवर परिणाम संपूर्ण जपानवर झाले, त्यातून हे तेही सुटले नाहीत. स्वतःचा शोध घेणं, अस्तित्वाचा शोध घेणं, हे या युद्धामुळे अनेकांच्या मनात सुरू झालं. त्यात हे कलाकारही होते. आणि मग या अस्तित्व शोधातून होत जाणारी तगमग, स्वतःशीच होणारं वैचारिक युद्ध, हे सारं त्यांच्या कलाकृतीत उतरलेलं दिसतं. ‘Woman in the dunes’ ही त्यापैकीच एक आहे.
काही वेळा काफ्काच्या पात्रांप्रमाणे ही पात्रं वाटतात, तर काही वेळा ग्रीक मायथॉलॉजीतील 'सिसिफस'ची आठवण येत राहते. शिक्षकाची होणारी धडपड आणि सिनेमाचा शेवट पाहून जी. ए. कुलकर्णींची ‘स्वामी’ ही कथा आठवते -
"तू असाच वर जा.
अंधाऱ्या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणाऱ्या ईर्ष्येने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सूर्यप्रकाशाला भेटू दे.
तुला जर फुले येतील-
आणि तुला सोन्याच्या लहान पेल्यांसारखी फुले यावीत व त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोके पिवळी सुगंधी व्हावीत.
तुला जर फुले येतील, तर अशा सहस्त्र फुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरे जा व त्याच्या निळ्या साक्षीने तू त्यांच्यात सूर्यप्रकाश साठवून घे.
तुला जर फळे येतील-
आणि तुला दर पानाआड लहानसे लाल फळ यावे व ते इतके रसरशीत असावे की, त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सूर्यप्रकाशाचा एक एक कण सुखाने नांदात राहावा.
तुला जर फळे येतील, तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पहा. कारण तू अशा अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस.
मग तुझ्या बीजांची फळे सर्वत्र विखरून त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत.
जर कणाएवढ्या प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला तर तू त्याचे स्वागत कर.
त्या कणाच्या अभिमानाने त्याने रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन त्याचा एक कण जिंकून प्रकाशित केला आहे.
आभाळात एखादे लहान पाखरू उडताना दिसले तर त्याला आतिथ्य दाखव.
कारण दोन कोवळ्या पंखांच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटत आहे.
जर कधी एखाद्या मुलाने तुझे एक रसरशीत पान घेऊन दुमडून ते पुन्हा आडवे उघडले व पानाचा आरसा केला; किंवा कधी तुझे पिवळे फूल तोडून बोटे पिवळ्या धुळीने माखून घेतली; अगर तुझे एक लाल फूल खुडून ते दोन बोटांत चेंगरत रसाचा लाल धागा काढला, तर तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस.
कारण, कुणास ठाऊक, अब्जांमध्येच एक आढळणारे असे ते मूल असून ते देखील भोवतालच्या अंधाऱ्या अजस्त्र भिंती फोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधी तरी धडपड करणार असेल.
आणि तसे असेल तर ते तुझ्या रक्तानात्याचेच आहे.
म्हणून तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस.
एक पान गेल्याने तुला दारिद्रय येणार नाही.
एक फूल गेल्याने तुझे सौंदर्य उणे भासणार नाही.
एक फळ नाहीसे झाल्याने तुझ्या आयुष्यात नैराश्य येणार नाही.
इतके तुला वैभव आहे. इतके वैभव तुला मिळो!
या साऱ्यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एकेक पान म्हणजे माझाच एकेक श्वास आहे. म्हणून तू म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर मी केवळ बदललो आहे.
तू आपले सारे सामर्थ्य घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे.
मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या कारंजाप्रमाणे वर आलो आहे, हेदेखील इतरांना कळू दे.
म्हणून तू असाच वर जा...”
शिक्षक आपली सुटका करून घेण्यासाठी वाळू उपसून त्यात एक बॅरल ठेवतो. ते झाकून त्यावर माशाचा गळ लावतो. जेणेकरून वर फिरणारा एखादा कावळा त्या माशाच्या आमिषानं खाली येईल आणि अडकेल. मग त्याच्या पायाला 'HELP'ची चिठ्ठी बांधून त्याला पुन्हा उडवता येईल आणि कधीतरी मदत येईल, या आशेवर तो वाट पाहतो.
त्यात कावळा अडकला आहे का, हे पाहण्यासाठी तो एकदा बॅरलवरचं झाकण काढून पाहतो, तर त्यात पाणी जमा झालेलं असतं. या प्रकारे आपण पाणी तयार करू शकतो, मिळवू शकतो आणि कधीतरीच मिळणाऱ्या पाण्यावाचून तडफडणं थांबवू शकतो हे त्याच्या लक्षात येतं.
त्यासाठी तो निरनिराळे प्रयोग करायचं ठरवतो. करतो. त्याला यश मिळतं. आणि तेव्हाच बाईला दिवस गेल्याचं समजतं. तिला काही त्रास होत असल्यानं खड्ड्यातून बाहेर काढून वर खेडेगावात असणाऱ्या दवाखान्यात घेऊन जावं लागतं. तेव्हा संधी असूनही शिक्षक तिथून पळून न जाता आपली परिस्थिती स्वीकारतो.
‘स्वामी’मध्ये तो शेवटी त्याला दिसलेल्या त्या आशेच्या हिरव्या प्रकाशाला जे म्हणतो, तेच इथं तो शिक्षक स्वतःला शेवटी म्हणतो, असं वाटत राहतं आपल्याला.
सिनेमाच्या कथेसाठी, दिग्दर्शनासाठी, संगीतासाठी, सिनेमॅटोग्राफीसाठी, त्यातून येणारी अस्वस्थता अनुभवण्यासाठी, त्यातून जाणवणारा अस्तित्वशोध समजून घेण्यासाठी, हा सिनेमा जरूर पाहावा.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment