‘शम्मी कपूर : अ रेबेल स्टार’ हे ज्येष्ठ पत्रकार रौफ अहमद यांनी लिहिलेलं शम्मी कपूरचं अधिकृत चरित्र नुकतंच मराठीत प्रकाशित झालं आहे. पत्रकार मुकेश माचकर यांनी अनुवादित केलेलं हे चरित्र इंद्रायणी साहित्य, पुणे यांनी प्रकाशित केलं आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
सुबोध मुखर्जी यांनी मुळात ‘जंगली’- मूळ शीर्षक होतं ‘मिस्टर हिटलर’- हा त्यांचा मित्र देव आनंद याला डोळ्यांसमोर ठेवून आखला होता. देवबरोबर त्यांनी आधी लागोपाठ तीन हिट सिनेमे (‘मुनीमजी’, १९५५; ‘पेइंग गेस्ट’, १९५७ आणि ‘लव्ह मॅरेज’, १९५९) दिले होते आणि दोघांमध्ये फारच उत्तम जवळीक निर्माण झाली होती. अपमानित झालेल्या सुबोध यांनी ‘जंगली’ या सर्वांत महत्त्वाकांक्षी सिनेमासाठी शम्मी कपूरची निवड केली, तेव्हा त्यांच्या सेटअपमध्ये बरीच उलथापालथ झाली. शम्मीनं निरीक्षण नोंदवलं, ‘‘ ‘जंगली’ हा माझं नाव ज्या प्रकारच्या सिनेमांशी जोडलं गेलं होतं, त्या जातकुळीतला हलकाफुलका संगीतमय रोमँटिक सिनेमा नव्हता. मला नायक निवडून सुबोध यांनी फार मोठा धोका पत्करला आहे, असं सांगून अनेकांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता. सिनेमाच्या प्रारंभीच्या भागात या प्रमुख व्यक्तिरेखेच्या व्यक्तिमत्त्वाला एक गंभीर बाजू होती. या भागात तो चिडचिडा, रूक्ष-गंभीर, कायम दुर्मुखलेला आणि प्रेमशून्य वातावरणात सापडलेला तरुण असतो. पण, सुबोध आपल्या निर्णयावर अढळ राहिले. देव आनंदनं हा सिनेमा करण्याचं वचन देऊन केलेल्या अनपेक्षित ‘विश्वासघाता’च्या दंशामुळे त्यांनी हा धैर्याचा मुखवटा धारण केला असेल कदाचित, मला माहिती नाही. पण, या व्यक्तिरेखेच्या छटा पाहून मी रोमांचित झालो होतो आणि ती मी उत्तम प्रकारे साकारेन याची मला खात्री होती. उलट देवच्या जागी आल्यानं मला आव्हान दिल्यासारखं झालं होतं. नाचगाणी हे माझं बलस्थान होतंच. पण, मी त्या चक्रात कायमस्वरूपी अडकून पडू इच्छित नव्हतो. ‘जंगली’मधल्या भूमिकेनं मला नवीन काहीतरी करून पाहण्याची संधी दिली.’’
शम्मीनं या तरुण नायकाच्या गुंतागुंतीच्या, पण रोचक व्यक्तिरेखेच्या सादरीकरणावर तर काम केलंच; पण या सिनेमात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या शीर्षकगीताच्या (‘चाहे कोई मुझे जंगली कहे’) चित्रिकरणातही फार मोलाची भूमिका बजावली. शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतले जयकिशन आणि मोहम्मद रफी यांच्या साथीनं त्यानं हे गाणं सिनेमाचं एक प्रमुख आकर्षण बनवून टाकलं.
‘‘या गाण्यातली ‘याहू’ची आरोळी हा जणू माझ्या अस्तित्वाचा भाग होती. ती माझ्या सिस्टममध्ये कशी आली हे खरंच माहिती नाही. मला वाटतं, वडिलांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये येणाऱ्या एका पठाणाकडून मी ती उचलली असणार. तो अगदी अशीच आरोळी ठोकायचा. पण मला त्याबद्दल खात्री नाही. लहानपणी काऊबॉयचे सिनेमे पाहायला आवडायचे, त्यांच्यातूनही ती आलेली असू शकते. त्यातल्या एका सिनेमात एक काऊबॉय गुरांना एकत्र आणताना अशी आरोळी ठोकताना पाहिला होता, असं आठवतं.
‘‘ ‘तुमसा नहीं देखा’मध्ये मी एकदा उत्स्फूर्तपणे ‘याहू’ची आरोळी ठोकली होती, नंतर ‘दिल दे के देखो’मध्ये. ‘जंगली’च्या शीर्षकगीतावर सुबोधबरोबर चर्चा करत असताना ती माझ्या मनात आली. नंतर माझा मित्र जय (जयकिशन) या गाण्याच्या चालीवर काम करत होता, तेव्हा त्याच्याशी या आरोळीबद्दल बोललो. अगदी फसफसत्या उत्साहानं ही कल्पना सांगितली, तेव्हा तो म्हणाला, ‘आता हे माझ्यावर सोड, मी काहीतरी करेन त्याचं.’ त्यानं ते केवढ्या चमकदार पद्धतीनं करून दाखवलं हा इतिहास आहे!’’
एका निष्क्रिय, प्रेमविव्हळ, तरुण माणसाच्या मनात अकस्मात प्रेम आणि जिगीषा जागृत होते, या संकल्पनेची प्रभावी अभिव्यक्ती बनलं आहे हे शीर्षकगीत. या गाण्यात अत्यानंदानं ठोकलेल्या ‘याहू’च्या जंगली आरोळीमागचा आवाज मोहम्मद रफीचा नाही (आजही अनेकांची तशी समजूत आहे), तो शम्मी कपूरचाही नव्हता; तो रूढार्थानं गायकही नसलेल्या एका माणसाचा, प्रख्यात पटकथाकार प्रयाग राज यांचा आवाज होता.
प्रयाग राज हा पृथ्वी थिएटर्सपासून शम्मी कपूरचा जवळचा मित्र होता. फुटकळ भूमिका करणारा अभिनेता म्हणून त्यानं कारकिर्दीची सुरुवात केली, नंतर हिंदी सिनेमात लेखक, वादक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशा अनेक भूमिका त्यानं पार पाडल्या. सिद्धहस्त लेखक असलेल्या प्रयाग राजनं मनमोहन देसाईंसाठी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे लिहिले. त्यांत ‘अमर अकबर अँथनी’ (१९७७), ‘सुहाग’ (१९७९) आणि ‘कूली’ (१९८३) या अमिताभ बच्चनच्या सर्वांत मोठ्या हिट सिनेमांचा समावेश होता. त्याने देसाईंबरोबर ‘कूली’ सहदिग्दर्शितही केला होता. तो शशी कपूरच्या अनेक सिनेमांशी संबंधित होता. त्यातूनच त्यानं मर्चंट आयव्हरी प्रॉडक्शन्सच्या अनेक चित्रपटांवर काम केलं. शंकर-जयकिशन यांच्या वाद्यवृंदात तो अनेकदा कोरस गायक म्हणून सहभागी होत असे.
शम्मी कपूरची कालजयी ओळख बनून गेलेल्या ‘याहू’ या ‘प्रेमोन्मादी आरोळी’मुळे ‘जंगली’च्या शीर्षकगीताला एक वेगळंच परिमाण मिळालं आणि त्यातून एक पंथच निर्माण झाला. मोहम्मद रफीनं जोशात गायलेल्या गाण्यात ही आरोळी पाच वेळा येते. मोहम्मद रफीला इतक्या उंच पट्टीतलं गाणं गाताना आरोळीही ठोकायला सांगणं चुकीचं ठरेल, हे लक्षात आल्यावर ‘याहू’ची आरोळी ठोकण्याची जबाबदारी जयकिशननं स्वत:वर घेतली होती. त्या आरोळीत प्रचंड जोम आणि उत्साह असणं आवश्यक होतं. मात्र काही तालमींनंतर जयकिशननं माघार घेतली. या रेकॉर्डिंगचे अनेक रिटेक होण्याची शक्यता होती, त्यामुळे संपूर्ण गाण्यात तोच जोश कायम ठेवायला जमेल का, याबद्दल त्याच्या मनात शंका निर्माण झाली. सुरुवातीच्या एक-दोन तालमींनंतर त्याचा आवाज घोगरट व्हायला लागला, तेव्हा जयकिशननं प्रयाग राजला बोलावलं आणि तुला हे जमेल का, असं विचारलं. प्रयाग तयार झाला. त्यानं मोहम्मद रफीबरोबर एक-दोन वेळा खालच्या पट्टीत तालीम केली आणि आता टेकला तयार आहोत, असं सांगितलं.
प्रयाग राज स्मृतींना उजळा देताना म्हणाला, ‘‘पहिल्या दोन टेक्सनंतर माझ्या आवाजाचा पोत आणि ‘याहू’चा खणखणीतपणा कायम राहील का, याची रफीसाहेबांना चिंता वाटायला लागली. पण, तुम्हाला नाउमेद करणार नाही, असा दिलासा मी त्यांना दिला. ते खूप अवघड होतं, तरी मी शब्द पाळला. वेगवेगळ्या कारणांसाठी त्या गाण्याचे आठ टेक झाले. म्हणजे मला ४० वेळा ‘याहू’ची आरोळी ठोकावी लागली. प्रत्येक टेकमध्ये ती पाच वेळा होती.’’ यानंतर त्याचा आवाज नॉर्मल व्हायला जवळपास दोन महिने लागले.
प्रशिक्षित गायक असलेल्या प्रयागनं शंकर-जयकिशनसाठी अनेकदा कोरस गायला होता. ‘‘मी पृथ्वी थिएटर्समध्ये प्रवेश केला, तेव्हा मी या दोघांना पहिल्यांदा भेटलो. तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं आणि माझ्याकडे स्थिर नोकरी नव्हती. त्यामुळे आपल्या वाट्याला येणारं कोणतंही आणि कसलंही काम मी चटकन् स्वीकारायचो,’’ प्रयाग आयुष्यातल्या कठीण काळाबद्दल सांगत होता.
एचएमव्ही या रेकॉर्डिंग कंपनीनं नामोल्लेखाचं आश्वासन देऊनही या अजरामर गाण्याच्या श्रेयोल्लेखातून प्रयागचं नाव गाळलं, तेव्हा तो भयंकर निराश झाला. त्याबद्दल खंतावून तो म्हणाला, ‘‘ ‘जंगली’च्या श्रेयनामावलीत माझा साधा उल्लेखही नव्हता. पण, शम्मी माझा मित्र होता आणि तो कायम मला मदत करत असे, म्हणून मी ते फारसं मनावर घेतलं नाही.’’
पृथ्वी थिएटर्समधल्या ‘त्या दिवसां’च्या आठवणी सांगताना प्रयाग म्हणतो, ‘‘पृथ्वी थिएटर्सच्या ‘शकुंतला’ या प्रसिद्ध नाटकात शम्मी भरताची भूमिका करायचा. तो खूप चांगलं गायचा, त्याच्या भावापेक्षा, राज कपूरपेक्षाही सुरेल. शम्मी बाहेर पडल्यानंतर गायनक्षमतेच्या बळावर मला भरताची भूमिका मिळाली. त्यानंतर शकुंतलेची शीर्षकभूमिका करणाऱ्या उजरा मुमताजनं गायनाची जबाबदारी उचलली. कारण, माझ्यानंतर त्या भूमिकेत आलेल्या शशीला (कपूर) गाता येत नव्हतं.’’
गंमत म्हणजे, जंगलीचं मोठं आकर्षण बनलेलं आणि लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान गाण्यांमध्ये गणलं जाणारं हे ‘याहू’गीत काश्मीरशी कसलाच संबंध नसताना काश्मीरशी जोडलं गेलं आहे. ते खरं तर हिमाचल प्रदेशातल्या, शिमल्यापासून १३ किलोमीटरवर असलेल्या कुफ्री या टुमदार आणि निसर्गसुंदर हिल स्टेशनवर चित्रित झालं आहे.
तरुण नायकाच्या मनात अचानक जागलेली प्रेमाची आग प्रतीकात्मकरीत्या मांडणारं हे गाणं शम्मीच्या लाडक्या काश्मीरमध्येच चित्रित होणार होतं. शम्मीनं मांडलेल्या ढोबळ कल्पनेच्या आधारे काश्मीरमधील पहलगाम हेच त्यासाठीचं आदर्श स्थळ असेल, असा निर्णय सुबोध मुखर्जी यांनी केला होता.
एका ऐसपैस मोकळ्याढाकळ्या जागी प्रेमपिसाट नायक ‘याहू’ अशी आरोळी ठोकत उडी घेतो आणि बर्फाच्या शिखरावरून घसरत खाली येतो, अशी ही साधारण संकल्पना होती. मात्र, शम्मी हे नेमकं कसं करणार आहे, याची कोणालाही, अगदी दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांनाही कल्पना नव्हती.
सगळं युनिट पहलगामला पोहोचलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, शम्मीने वर्णन केलं होतं तेवढा बर्फ इथं नाही. अचानक सगळ्याच्या मनात निराशा दाटून आली. शम्मीच्या मनातली ‘अनोखी कल्पना’ आता कशी प्रत्यक्षात येणार, याची कोणाला काही क्लृप्ती सुचेना. ही कल्पना आता सोडून द्यावी लागणार, असं सगळ्यांना वाटू लागलं. काही दिवस धीरानं वाट पाहिल्यानंतर एक दिवस शम्मी भडकला. त्याचं सुबोध मुखर्जींशी कडाक्याचं भांडण झालं.
‘‘काय चाललंय काय इथं?’’ त्यानं विचारलं आणि सगळ्या गोष्टी भरभर झाल्या नाहीत तर पॅकअप करून मुंबईला निघून जाईन, अशी धमकी त्यानं दिली. ‘‘मी बसून राहायला आणि बिनमहत्त्वाचे प्रसंग चित्रित करणारं युनिट पाहायला काश्मीरमध्ये आलेलो नाहीये.’’ सुबोध यांनी त्याला बाजूला घेऊन सगळी परिस्थिती समजावून सांगितली. ते म्हणाले, सगळं नियोजन बाराच्या भावात गेलंय आणि तुझ्या मनात जे आहे, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी पहलगाममध्ये पुरेसं हिमाच्छादनच नाहीये. त्यांनी विनंती केली, ‘‘थोडी कळ काढ. मी काहीतरी करतो.’’ यानं शम्मी आणखी भडकला. तो उपरोधानं म्हणाला, ‘‘हिमवर्षावच पुरेसा झाला नसेल, तर तुम्ही अडचण कशी सोडवणार? बर्फ तयार करणार?’’ सुबोध तरीही शांतपणे म्हणाले, “ते माझ्यावर सोड. काहीही किंमत मोजावी लागली, तरी तुला जे हवंय ते मी देईन.” त्यांनी लगेच पुढचा मार्ग ठरवला. ‘‘आता लगेच पॅक अप करू आणि परवा पुन्हा मुंबईकडे निघू,” असं त्यांनी सगळ्या युनिटला सांगितलं. त्या रात्री शम्मी दारू पिऊन तर्रर्र झाला आणि काही काळ फुरंगटून बसला. नंतर मात्र जे अपरिहार्यच होतं, त्याचा त्यानं स्वीकार केला आणि दुसऱ्या दिवशी युनिटच्या आधीच तो मुंबईला विमानानं निघून गेला.’’
पहलगाममध्ये आणखी हिमवृष्टी होण्याची शक्यताच नसल्यानं सुबोधना ते संपूर्णपणे बाद करावं लागलं. हे गाणं सिनेमात अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे त्याच्या चित्रिकरणात त्यांना कसलीही तडजोड करायची नव्हती. दुसऱ्या दिवशी ओबेरॉय पॅलेस हॉटेलच्या आत आणि त्या परिसरात तसंच शम्मीच्या अतिशय लाडक्या दल लेकच्या व शालिमार बागेच्या परिसरात जेवढं काही चित्रित करता आलं तेवढं करून पुढच्या दिवशी युनिट मुंबईला परत आलं.
‘मेरे यार शब्बा खैर...’ हे युगुलगीत त्यांनी शम्मी आणि सायरा यांच्यावर श्रीनगरपासून ७८ किलोमीटर अंतरावरच्या वेरीनागमध्ये आधीच चित्रित केलं होतं. सुबोध मुखर्जी यांचे मेव्हणे आणि वरिष्ठ सहायक दिग्दर्शक समीर गांगुली सांगतात की, ‘जंगली’चं ८० जणांचं युनिट आणि त्यातले स्टार एका बसमधून भटकत होते. हिंदी सिनेमात याआधी दिसलं नसेल, असं एक फ्रेश लोकेशन शोधत ते अक्षरश: भटकत होते. त्यांचा शोध वेरीनागच्या आल्हाददायक मुघल गार्डन्समध्ये संपला.
काही महिन्यांनी, फेब्रुवारीमध्ये, हिवाळ्याच्या मध्यावर सुबोध मुखर्जी यांनी शम्मी, सायरा आणि सगळ्या युनिटला शीर्षकगीताच्या चित्रिकरणासाठी सिमल्याजवळच्या कुफ्री या नव्या लोकेशनवर नेलं. इथं १२ फूट उंचीचा बर्फ जमा झाला होता आणि आसपासचा परिसर चित्ताकर्षकरित्या मनोरम होता. त्यामुळे ही नेपथ्यरचना आदर्श दिसत होती. प्रत्येकाच्या मनात एकच मौन प्रश्न होता : आता शम्मी काय करणार आणि तो ते कसं करणार? सगळं युनिट सूर्योदयाची वाट पाहत होतं, सस्पेन्स अजून कायम होता.
शम्मी मनातल्या मनात मागे जाऊन त्या काळात डोकावून म्हणाला, ‘‘मी काय करणार होतो, हे मला कळलं असतं, तरी खूप होतं. जयनं (जयकिशन) एक सुंदर गाणं मला दिलं होतं, हसरत जयपुरीनं एकदम भारून टाकणारे शब्द लिहिले होते, रफीसाहेबांनी नेहमीप्रमाणे ते गाताना अफलातून कामगिरी केली होती. माझा मित्र प्रयाग यानं ‘याहू’ची आरोळी ठोकताना जबरदस्त मेहनत घेतली होती. आता मला ते कॅमेऱ्यासमोर जिवंत करायचं होतं. इथं कोणी नृत्यदिग्दर्शक नव्हता. मी कधीच कोरिओग्राफर वापरला नाही. कारण, आधी सांगितल्याप्रमाणे मी गाणी नेहमीच उत्स्फूर्तपणे केली, माझ्या आत्म्यातून ती यायची, त्यांच्यावर आधी ठरवलेल्या हालचालींची बंधनं नसायची. पण, इथं हे फक्त उत्स्फूर्त असण्यापुरतं मर्यादित नव्हतं. काय होणार आहे, हे कुणालाच माहिती नव्हतं. कुणीच कशाचा विचार केला नव्हता. शम्मी कपूर काहीतरी जबरदस्त करणार, असा त्यांना विश्वास होता. सगळी जबाबदारी माझ्यावर होती.’’
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता युनिट शम्मीबरोबर हिमशिखरावर पोहोचलं. तिथं त्याला उडी मारून घसरायचं होतं. पण, कॅमेरा सुरू होण्याच्या वेळेलाच सूर्य ढगांआड गेला. सूर्यप्रकाशाविना तिथं ते शूटिंगच करू शकत नव्हते.
पुढचे सहा दिवस शम्मी आणि युनिट रोज चढून त्या लोकेशनवर जायचे आणि आशेचा एखादा किरण मिळतो का, याची वाट पाहायचे. पण, तो मिळायचा नाही. उद्विग्नता पुन्हा मनांना कुरतडू लागली, पण सूर्यानं काही दयामाया दाखवली नाही. शम्मीनं मात्र हे गोठलेले क्षणही वाया घालवले नाहीत. सगळ्या युनिटचं मनोधैर्य टिकवण्यासाठी त्यानं सगळ्यांसाठी बीअरची व्यवस्था केली आणि त्यांना धमाल करायला सांगितलं. ते बीअरच्या बाटल्या बर्फात पुरायचे आणि बीयरचे घुटके घेत आजूबाजूला बागडायचे, सगळे मस्त मजा करत होते. शम्मीनं आपल्या मनालाही बर्फावर घसरगुंडी खेळायला पाठवून दिलं होतं!
सातव्या सकाळी अखेर सूर्यमहाराजांनी दर्शन दिलं आणि कॅमेरे सुरू झाले, तेव्हा शम्मी त्याच्या ‘कोरिओग्राफी’सह सज्ज होता. ‘‘मी बर्फावर काय काय करणार आहे, त्याचा छोट्यात छोटा तुकडाही पाठ झाला होता मला तोपर्यंत. आम्ही सगळं गाणं अवघ्या सात तासांत शूट केलं. युनिटचा प्रारंभिक अंदाज सात दिवस लागतील असा होता. पण, मी पाच दिवस रोज छातीवर घसरून घसरून माझ्याही नकळत बर्फात इथं (डोक्याकडे बोट दाखवून) एक वाट आखून ठेवली होती आणि माझ्या शरीरानं, हातापायांनी चित्रणाशी संबंधित सगळ्या संभाव्य सूचना कसलीही खळखळ न करता आत्मसात केल्या होत्या.’’
अशा रीतीनं हिंदी सिनेमा संगीतातलं एक असामान्य गाणं असामान्य परिस्थितीत इतिहासात गोठवलं गेलं! शिमल्याजवळचं कुफ्री हे प्रत्यक्ष चित्रिकरण स्थळ असूनही गाण्यांच्या चित्रिकरणाची एक शैली निर्माण करणारं हे गाणं खरोखरच काश्मीरमध्ये चित्रित झालेलं आहे, अशी आजही अनेक लोकांची समजूत आहे.
मैलाचा दगड ठरलेलं हे गाणं ज्या दिवशी पूर्ण झालं, त्या दिवशी सुबोध मुखर्जी यांनी आपल्या युनिटला ‘आज सगळ्यांनी लवकर झोपायचं’ अशी सक्त ताकीद देऊन स्वत:ही सुटकेचा नि:श्वास ठेवून बिछान्याला पाठ लावली असणार. त्यांना सकाळची लवकरची मुंबईची फ्लाइट गाठायची होती. पण, अदम्य उत्साहानं भारलेल्या शम्मी कपूरसाठी रात अभीभी जवाँ थी. त्यानं, त्याच्या उत्साहाच्या वेगानं काम करणाऱ्या त्या अतिशय उपक्रमशील युनिटच्या साथीनं सात दिवसांचा वेळ घेणारं शूटिंग अवघ्या सात तासांत पूर्ण केलं होतं; तेही कागदावर कसलीही संकल्पना लिहिलेली नसताना आणि कोणीही नृत्यदिग्दर्शक नसताना. सगळ्यांनी मिळून केलेल्या या अफलातून कामगिरीचं सेलिब्रेशन करण्यासाठी तो जणू उत्साहानं उसळत होता. केवळ शम्मी कपूरच इतक्या अफलातून पद्धतीनं गाण्याचं चित्रीकरण करू शकतो, असं त्या युनिटनेही अत्यानंदानं मान्य केलं होतं. त्यांनाही त्याच्याबरोबर आनंद लुटायचा होता. शम्मीनं संपूर्णपणे अनिर्बंध अशा पार्टीचे आदेश दिले. त्यामुळे रात्रभर सगळ्यांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होत्या, पहाटेपर्यंत सेलिब्रेशन चालू राहिलं आणि तरीही सगळे वेळेवर विमान पकडायला हजर झाले.
शम्मीला सहकाऱ्यांबरोबर, खासकरून युनिटबरोबर यश साजरं करायला आवडायचं. व्यक्तिगत आवडीनिवडी आणि आनंदनिधानांचा खर्च कधीही निर्मात्यांना करायला न लावणारा मुंबईतला हा एकमेव स्टार होता. ही त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवणारी गोष्ट होती. शम्मीचं हे तत्त्व इंडस्ट्रीत ‘कधी कुणी ऐकलेलंही’ नव्हतं, असं प्रयाग राजनं सांगितलं. एखाद्या परगावातल्या शूटसाठी मुंबईहून विमानानं निघायचा, तेव्हा त्याची स्वत:ची लिमोझिन त्या ठिकाणी त्याला एअरपोर्टवर रिसिव्ह करायला हजर असायची आणि तीच त्याला हॉटेलला किंवा लोकेशनला घेऊन जायची. त्याच्याकडे क्लास होता आणि तो सगळ्या गोष्टी स्टायलीत करायचा.
‘‘तो प्रदीर्घ आउटडोअर शूटला गेला तर निर्मितीअवस्थेत असलेल्या इतर चित्रपटांच्या किंवा भविष्यातल्या सिनेमांच्या निर्मात्यांना तो लोकेशनवर चर्चेसाठी बोलावायचा. त्यांच्या प्रवासाचा आणि निवासाचा खर्च कटाक्षानं तोच करायचा.’’
‘याहू’च्या रासवट आरोळीच्या माध्यमातून शम्मी कपूरनं जणू पडद्यावरून प्रेक्षकांच्या हृदयातच थेट उडी मारली आणि ‘जंगली’नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली. नासिर हुसेनच्या, देव आनंदची भूमिका असलेल्या ‘जब प्यार किसी से होता है’ या सिनेमालाही मागे टाकून ‘जंगली’ हा ६०च्या दशकातल्या सर्वाधिक यशस्वी सिनेमांच्या पंक्तीत जाऊन बसला. ‘जब प्यार किसी से होता है’नं जेमतेम रौप्य महोत्सवापर्यंत मजल मारली होती, ‘जंगली’नं सुवर्ण महोत्सव साजरा केला. शंकर-जयकिशन यांनी या सिनेमाला दिलेलं संगीत आगीसारखं पसरलं.
‘तुमसा नही देखा’च्या वेळी जे घडलं, तेच आताही घडलं. शम्मी कपूरनं ज्या जोशात आणि डौलात ‘जंगली’तली भूमिका साकारली होती, तशी देव आनंदला जमली नसती, खासकरून गाणी जमली नसती, असंच एकमुखी मत होतं. शम्मीच्या डोक्यातून आकाराला आलेलं ‘याहू’गीताचं चित्रिकरण टाळ्यांचा कडकडाट खेचत होतं.
‘जंगली’नं शम्मीला रॉकेटच्या वेगानं स्टारडमच्या शिखरावर नेऊन बसवलं. त्या दशकातला एक प्रमुख स्टार म्हणून तो उदयाला आला होता. सिनेमाचं कथानक काहीही असलं आणि इतर कलावंत कोणीही असले तरी त्याचे सिनेमे केवळ त्याच्या अस्तित्वाच्या बळावर चालत होते.
शम्मी खोट्या विनम्रतेसाठी कधीच प्रसिद्ध नव्हता, त्यामुळे हर्षोत्फुल्ल शम्मीनं त्याचं स्टार स्टेटस कधी झाकून ठेवलं नाही. तो डोळा मारून म्हणाला, ‘‘ ‘याहू’नं अनेक समकालीन अभिनेत्यांच्या आत्मविश्वासाला हादरा दिला होता. माझ्यासाठी ती विजयाची आरोळी होती, असुरक्षितता आणि निराशेच्या दिवसांमधून मुक्त झाल्याची ग्वाही देणारी.’’ या सिनेमानंतर त्यानं आपल्या लाडक्या जीपचं नावही ‘याहू’ ठेवलं होतं.
‘‘ ‘याहू’ ही अत्यानंदाची आरोळी होती. मी तिच्याकडे याच नजरेनं पाहतो. ‘जंगली’ आणि ‘याहू’च्या संदर्भात कमलेश पांडेनं (ख्यातनाम जाहिरातसर्जक आणि पटकथाकार, ज्यांनी ‘तेजाब’, १९८८ आणि ‘सौदागर’, १९९९ यांसारखे सिनेमे लिहिले आहेत.) जे लिहिलं आहे, तेही मला लक्षवेधी वाटतं. त्यानं म्हटलं होतं, ‘शम्मी कपूर ने इस धरती पर जो जवान है उसको जगाया…’ मी ते कापून जपून ठेवलंय. खरं सांगायचं तर मी त्या भावनेशी एकरूप होऊ शकतो, पण ते गाणं करत असताना मनात कसल्याही बंडाबिंडाची निशाणीही नव्हती. मी काही देशातल्या तरुणांना जागवण्याचा अजेंडा नीट ठरवून मेक अप करून कॅमेऱ्यासमोर उडी टाकली नव्हती. मी कसलाही संदेश ओरडून सांगत नव्हतो. मी जो प्रसंग साकारत होतो, त्यातल्या आंतरिक ऊर्जेचं ते हर्षोत्फुल्ल आणि उत्स्फूर्त प्रकटीकरण होतं. ते अकस्मात घडून गेलं. आता वळून पाहताना वाटतं की, मी जे सांगू पाहात होतो, असं कमलेशला वाटलं होतं, ते माझ्याकडून पोहोचलं, याचा आनंदच आहे.’’
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4024
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment