अजूनकाही
जुलै महिन्याच्या आठ आणि पंधरा तारखेला किशोर बेडकिहाळ यांचे दै. ‘लोकसत्ता’मध्ये ‘मध्यमवर्ग ‘झाला’ कसा?’ आणि ‘मध्यमवर्गाचे काय झाले?’ असे दोन लेख प्रकाशित झाले. मध्यमवर्गाचं विश्लेषण करणारं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे (The Indian Middle class - Surindar Jodhka and Aseem Prakash, Oxford University Press), त्यावर आधारित हे दोन लेख होते. रूढार्थानं कदाचित परीक्षणं म्हणावीत असेच हे लेख होते. मात्र जाता जाता बेडकिहाळ काही प्रश्न निर्माण करतात. त्यामुळे ‘मध्यमवर्ग’ वेगळा पाहता येऊ शकतो. तसा हा वर्ग समाजात आपलं ठळक अस्तित्व निर्माण करणारा वर्ग आहे हे खरं. मात्र गेल्या काही काळात अनेक मूल्यांची इतकी मोठी घुसळण झाली आहे की, मध्यमवर्ग नेमकं कुठल्या समूहाला म्हणावं याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. आजच्या पर्यावरणात त्याच्या असण्याचा परीघ नेमका करणं अवघड आहे.
१९९० नंतर शहरांमधून राहणाऱ्या अनेकांनी ग्रामीण कुटुंबापासून, आपल्या परंपरेपासून फारकत घेऊन आपली एक वेगळीच शहरी तोंडवळा असलेली जीवनशैली प्रमाणित केली आहे. ही मंडळी विलग आहेतही आणि नाहीतही. पण तरीही एक स्पष्ट आहे की, जे चित्र आहे ते मध्यमवर्गीय शैलीतलंच आहे. आणि तरीही त्याला ‘मध्यमवर्ग’ म्हणायचं का याबद्दल साशंकता आहे!
आता प्रश्न असा निर्माण होतो की, या पूर्वीच्या काळातील ‘मध्यमवर्ग’ कुठला? संगणक-क्रांती किंवा माहिती तंत्रज्ञान युगाची सुरुवात होण्याच्या आधीच्या या छटा आपण ओळखू शकतो, कदाचित एखाद्या जातीचा उल्लेखही करता येईल, पण आपण फक्त छटांचा विचार करू...
फारसा श्रीमंत नसलेला, कमी आकांक्षा असलेला, स्वत:च्या परिघात आनंद निर्माण करणारा, निष्ठा बाळगणारा, प्रतिष्ठा जपणारा आणि बऱ्याच अंशी मूल्यांना मानणारा हा वर्ग म्हणजे ‘मध्यमवर्ग’ असं म्हणता येईल. या सगळ्या चौकटीत त्याची आर्थिक सुबत्ता सुस्थिर असणं हा भागदेखील महत्त्वाचा. मात्र ती त्याची पूर्व-अट नव्हती किंवा तो त्याबद्दल फारसा आग्रही नव्हता. अंथरूण पाहून पाय पसरावं म्हणताना त्यानं अंथरूणाची लांबी-रूंदी गरजेनुसार स्थिर केली. प्रसंगपरत्वे वाढवलीदेखील.
नव्यानं शहरात दाखल झालेल्या ‘त्या’ नव्या मध्यमवर्गास प्रवेश देताना किंचित नाराजीच्या छटा अजूनही अनुभवाला येतात, हेही आधीच नमूद करतो. मात्र काळानं आणि इतर अनेक बाबींनी हे सिद्ध केलं आहे की, हे आता आपल्या आसपास घडत आहे. या वर्गाचा आर्थिक स्तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानं अतिशय जलद बदलला आहे. आता त्यांच्या उड्या मोठ्या झाल्या आहेत. जुनी वयस्क पिढी गोंधळलेली आहे आणि नव्या पिढीकडे वेळ नाही. मुलांना सोयरसुतक नाही आणि शेवटच्या फांदीवर लटकणाऱ्यांना आपण पडू अशी भीती आहे.
मुळातील पुस्तक मी वाचलं नाही, पण वरील लेखात केलेला ऊहापोह बघता या नवीन दुनियेबद्दल फार मोठा आवाका त्या पुस्तकात नसावा. मात्र भूतकाळात घडलेल्या बदलांचा वेध तितकाच महत्त्वाचा आहे. युरोपात काय झालं, हा मुद्दा बाजूला ठेवून आपण आपल्याकडे काय झालं, याच्याबद्दल बोलणं अधिक सयुक्तिक.
भारतीय मध्यमवर्गाची निर्मिती ही वसाहत काळापासून झाली. ब्रिटिशांना दुहेरी हेतू ठेवून प्रगती करण्याचा अजेंडा वाढवायचा होता. आपण इथं कायमस्वरूपी नाही, हा विचारदेखील असावा. मात्र सर्व वर्ग एकाच वेळी उठाव करणार नाहीत, याची खबरदारी ते घेत होते, हे लेखकाचं म्हणणं पटण्यासारखं आहे. म्हणूनच मेकॉलेच्या चातुर्यातून एक स्तर शिक्षणाच्या माध्यमातून वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवण्याचा दृष्टिकोन समोर आला आणि यशस्वी झाला. आजदेखील त्याचे पडसाद आपण अनुभवू शकतो. दिसण्यानं आणि रंगानं भारतीय असणारा, पण दृष्टिकोनानं ‘ब्रिटिश’ असणारा असा एक वर्ग इंग्रजी शिक्षणातून निर्माण झाला.
आणि हे फक्त शिक्षणापुरतंच मर्यादित राहिलं नाही; तर प्रशासन, बाजारपेठ, शेतीव्यवस्था इत्यादी क्षेत्रातदेखील त्याचं प्रतिबिंब पडणं साहजिक होतं. शाळा, विद्यापीठं, न्यायालयं, महाविद्यालयं इत्यादींच्या अस्तित्वातून ही नवी प्रणाली योग्य असल्याचा निर्वाळा साहजिकपणे समाजातून निर्माण झाला. ही मंडळी नवेपणाची झूल घेत यथावकाश डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, कारकून, इंजिनियर झाली आणि अनेक रूपांत भारतीय मध्यमवर्ग निर्माण झाला. आता त्याची स्वप्नं नवीन होती...
संगणकयुगाच्या स्थिरीकरणानंतर आयटी क्षेत्र उदयाला आलं आणि मुळातच सावध असलेला हा वर्ग मोठ्या प्रमाणात आयटीत विसावला. तेथील मिळकतीचं गणित पाहता हा वर्ग चकीत झाला. त्यानं हे आव्हान त्यांच्या नियामासहित झटकन स्वीकारलं. आता त्यांची स्वप्नं विकसित झाली. त्यांना अशक्य असं काही राहिलं नाही. आज ज्या वेळी स्वास्थ्य, शरीर-प्रकृती, आवाका, कौटुंबिक समस्या, इतकंच काय पण लग्नदेखील बाजूला टाकून आयटी क्षेत्राचा भागीदार होताना असंख्य उदाहरणं आसपास पाहतो, त्या वेळी माझ्या मनाला ते कुठेतरी डाचतं. अर्थात हा कुणाला रुचण्याचा प्रश्नच नाही. वेगच इतका आहे की, सगळ्यांचं भान सुटलं आहे. किंवा त्याचं काही वाटेनासं झालं आहे. आयुष्याच्या सर्वंकष आकलनाची गरज कालबाह्य झाली आहे.
हा कदाचित मध्यमवर्ग असू शकेल. पण त्यात इतका आणि असा बदल झाला आहे. ही प्रतिक्रिया अत्यंत साहजिक आहे, हे गृहीत धरलं तरी यात होत चाललेला बदल मुळातून सर्व बदलवणारा आहे. याचं सुख-दु:ख बाळगायचं की नाही, हादेखील पुन्हा एक प्रश्नच. हा बदलाचा प्रवाह कुठल्या खडकावर फुटणार आहे, याचा अंदाज येत नाही. ज्या वर्गाची धडपड मूल्यांना चिकटून राहण्याची होती, त्यांचेच पायाभूत बदल आपल्याला बेचैनी आणत आहेत. ही बेचैनी बेदखल करण्याकडे वर्तमान झुकत आहे. उद्याचं माहिती नाही.
आणखी एका गोष्टीची दखल घ्यायला हवी आहे. अतिशय गुंतागुंतीच्या होऊन बसलेल्या राजकीय घटनांमधून सतत होत राहिलेले आरोप. हे सर्व आरोप याच मध्यमवर्गाला ‘टार्गेट’ करणारे आहेत. कदाचित त्या सगळ्यांपासून या वर्गानं वेगळा मार्ग निवडला की काय? कारण तसा हा वर्ग विचार करणारा नक्कीच आहे. त्यामुळे आवश्यक ते स्थैर्य आणि सुबत्ता यांची गरज पूर्वी कधी नव्हती इतकी त्याला आज वाटत आहे. याच गोष्टींची मातब्बरी न मानता अनेक वर्षं त्यानं ‘मूल्यं’ सांभाळली. ढासळत चाललेल्या स्वत:च्या ओळखीबद्दल तो आज इतका कानकोंडा कसा झाला? त्यामुळे येत्या काळात ज्या परंपरेला त्यानं आपल्या अस्तित्वाचा भाग मानलं, ती संज्ञा नामशेष होईल याचं भयदेखील आता त्याला वाटेनासं झालं आहे. कारण अभिप्रेत असलेले कुठलेच गुण (किंवा दोषही) आज कुणीच मानायला तयार नाही.
लेख वाचल्यावर प्रथम भविष्यातील घटना समोर आल्या. त्याचा अंदाजे वेध घेतला. मूळ पुस्तकात अर्थात ऐतहासिक महत्त्वाच्या अशा स्थित्यंतरांबद्दल अधिक ऊहापोह आहे. आणि तो नक्कीच पटेल असा आहे. काही अंशी ब्रिटिशधार्जिणा पण वृत्तीनं व्यक्तीस्वातंत्र्य मानणारा आणि विज्ञानवादी असा हा समूह. वसाहत युगात आर्थिक बाबींसोबत जातीय, शहरी ग्रामीण असे प्रकारही होते. (उलट आज मात्र आर्थिक स्तराचं प्राबल्य वाढतं आहे असं वाटतं.) हे विभागलेपण होतं, पण त्यात एक साहचर्य होतं का? अर्थात हा त्या युगाचा, पद्धतीचा पुरस्कार नव्हे, तर केवळ एक वस्तुस्थिती. एक सत्य स्वीकारलंच पाहिजे की, या सामाजिक विषमतेविरुद्ध किंवा जातीच्या उतरंडीवर या कथित विचारी वर्गानं कसलं पाऊल उचललं नाही. तार्किक चर्चा कदाचित झाल्या असतील, पण एकंदरीत उदासीनताच. कदाचित याचमुळे सत्ताकारणात मात्र त्यानं महत्त्वाची पदं भूषवली. हा एक प्रकारे सत्तेतील वाटाच होता.
एक भूमिका अशीही मांडली जाते की, अस्तित्वासाठी हे अपरिहार्य होतं. ते खरं मानायला हरकत नाही. अखेर त्या वेळी तो संघर्ष परकियांसोबत होता! मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. आर्थिक सुस्थितीमुळे जीवनशैली, परंपरा आणि त्याचबरोबर स्वत:ची ओळखदेखील विसरलेला हा वर्ग आता स्वकेंद्रित होतो आहे. जीवनशैली आणि उपभोग क्षमता यांच्या पलीकडे जाऊन काही मांडणी करण्याची त्याची मानसिकताच राहिली नाही. राष्ट्रस्तरावरदेखील एक प्रकारची उदासीनता जाणवते. अतिरेकी, अराजकवादी, पुराणपुरुषवादी भूमिका घेणाऱ्याचे प्रतिवाद न करता त्यांच्या झुंडशाहीकडे दुर्लक्ष करण्याची कातडीबचाऊ भूमिका घेतली जाते आहे. याचा एक अर्थ असाही होतो की, अंगभूत हुशारी तो अत्यंत चलाखीनं वापरत आहे. मोक्याच्या क्षणी आपलं हित जपायचं गणित त्याला अवगत आहे! हे त्याचं प्राक्तन आहे आणि हाच त्याचा भविष्यकाळ आहे, अशी स्थिती निदान आज तरी आहे....!
.............................................................................................................................................
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र : मध्यमवर्गाचा उदय - डॉ. राजा दीक्षित
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
पाने - , मूल्य - २९५ रुपये, सवलतीत - २२१ रुपये
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/86
.............................................................................................................................................
jayantraleraskar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment