टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • लुइगी ब्रागान्रो, मनोहरलाल खट्टर, बाबा रामदेव आणि श्रीकांत प्रसाद पुरोहित
  • Fri , 01 September 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या लुइगी ब्रागान्रो मनोहरलाल खट्टर बाबा रामदेव आणि श्रीकांत प्रसाद पुरोहित

१. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या ‘कारवाया या लष्करी अधिकाऱ्यास शोभणाऱ्या नाहीत’ हे लष्करी गुप्तचर विभागाच्या महासंचालकांच्या अहवालातील ताशेरे लष्करी सेवेत पुन्हा रुजू होण्याच्या पुरोहित यांच्या इच्छेआड येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानं २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी जामीन मंजूर केल्यानंतर, आता पुन्हा एकदा सैन्याच्या सेवेत आपण जाऊ इच्छितो, असे पुरोहित म्हणाले होते. या प्रकरणात पुरोहित यांचं नाव आल्यानंतर लगेचच लष्करी गुप्तचर विभागानं (मिलिट्री इंटेलिजन्स) त्यांची चौकशी सुरू केली होती. विभागाच्या महासंचालकांनी २७ जुलै २०११ रोजी त्याचा अहवाल सादर केला. पुरोहित यांचा या प्रकरणातील कथित सहभाग तसंच त्यांचे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी असलेले संबंध याबाबतची माहिती या अहवालात आहे. एवढंच नव्हे, तर पुरोहित हे लष्करी शस्त्रांच्या बेकायदा विक्री व्यवहारातही सहभागी असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. पुरोहित हे ‘आर्थिक फायद्यासाठी शस्त्रं मिळवणं आणि त्यांची विक्री करणं यात सहभागी होते.’ सुरुवातीला ते पुण्यातील एका शस्त्रदलालाशी व्यवहार करत असत. नंतर त्यांनी राकेश धावडे (मालेगाव खटल्यातील आरोपी) याच्याशी व्यवहार सुरू केले, असंही या अहवालात म्हटलं आहे.

पुरोहितच्या सुटकेनं जणू कोणी थोर देशभक्त क्रांतिकारक सुटून आला आहे, असा आनंद झालेल्यांवर या माहितीचा काहीही परिणाम होणार नाही. पुरोहित आणि प्रज्ञा यांच्या कारवाया उघडकीला आणणारे एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना ‘देशद्रोही’, ‘धर्मद्रोही’ ठरवण्यापर्यंत यांची मजल गेली होती. पुरोहित ज्या ‘अभिनव भारत’च्या गुप्त सभांना हजेरी लावत होता, त्यांत हिंदूराष्ट्र स्थापनेच्या आड येणाऱ्यांच्या हत्येचे कट शिजत होते, ज्यांची हत्या करायची होती, त्यांत एक नाव सरसंघचालक मोहन भागवत यांचंही होतं, याचीही आठवण या मंडळींना राहिलेली नाही.

.............................................................................................................................................

२. पर्यटनासाठी जगप्रसिद्ध अशा व्हेनिस शहराची शान असणाऱ्या सेंट मार्क्स स्वेअर परिसरात जर कोणीही ‘अल्ला-हो- अकबर’ असं ओरडलं तर त्याला तिथंच गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रागान्रो यांनी दिले आहेत. सेंट मार्क स्वेअर परिसरात ‘अल्ला-हो-अकबर’ असं मोठ्यानं ओरडत धावत येणाऱ्या माणसाला गोळ्या घालून ठार करण्यात यावं. घातपाताच्या घटना घडवून आणताना दहशतवादी ही घोषणा देताना दिसतात. म्हणूनच हा आदेश देण्यात येत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

अरे वा, अखिल हिंदूराष्ट्रात इटलीचाही समावेश झाला की काय? अगदी इकडच्या ‘परिवारा’त शोभून दिसणारा मनुक्ष तिकडे महापौर कसा काय बनला? उत्तम प्रगती आहे. नाहीतरी ‘परिवारा’चे राष्ट्रप्रेमाचे आणि वांशिक श्रेष्ठत्वाचे विचार इटलीहूनच आयात झालेले आहेत. शिवाय, इटली ताब्यात घेण्यातून शत्रूचं माहेर ताब्यात घेण्याचा जो आनंद मिळेल, त्यालाही तोड नाही!

.............................................................................................................................................

३. राजकीय स्वार्थासाठी तुम्ही पंचकुला जळू दिलेत, असा ठपका पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयानं हरयाणा सरकारवर ठेवल्यानंतरही हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना न हटवण्याचा निर्णय भाजपनं घेतल्याचं समजतं. हरियाणातील हिंसाचाराचं अजिबात समर्थन करता येणार नाही. कायदा व सुव्यवस्था हाताळण्याबाबतचे आक्षेप काही प्रमाणात योग्य आहेत. पण तरीसुद्धा डेरा सच्चा सौदाच्या उग्र भाविकांची हजारोंच्या घरातील संख्या, त्यांचा गावोगावी असलेला प्रभाव लक्षात घेता तुलनेनं खट्टर सरकारनं परिस्थिती शक्य तितक्या बऱ्यापैकी हाताळल्याचं म्हणता येईल, अशी क्लीन चिट त्यांना देण्यात आली. खट्टर यांची हकालपट्टी केल्यास विरोधकांपुढे भाजप झुकल्याचा आणि त्यांच्या नियुक्तीचा मोदी-शहांचा निर्णय चुकीचा ठरल्याचा संदेश जाण्याची भीती भाजपला वाटते आहे. त्यातूनच खट्टर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं.

राजकारण हा ताठेबाज मंडळींचा खेळ नाही. आपणच शहाणे, आपण सांगू ती पूर्वदिशा, आपल्याइतकं हुशार कोणी नाही, आपल्याइतकी थोर देशभक्ती कोणाची नाही, आपणच खरे धर्मपरायण, असे अनेक ताठर गंड सध्याच्या सत्ताधीशांमध्ये दिसतात. राजकारणात काही निर्णय चुकू शकतात, ते दुरुस्त करावेच लागतात. ते दुरुस्त करण्यातली मानहानी स्वीकारणं, हे त्या निर्णयांमधून भविष्यात भोगाव्या लागणाऱ्या दुष्परिणामांपेक्षा अधिक स्वीकारार्ह असतं. ही लवचीकता न दाखवणारे आणि आवश्यक तिथं न वाकणारे पुढे मोडून पडतात.

.............................................................................................................................................

४. धर्म हेच जीवनातील श्रेष्ठ आचरण आहे. हिंसा आणि उन्माद हा काही धर्म नाही, असं ट्विट बाबा रामदेव यांनी केलं असून त्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे ‘डेरा सच्चा सौदा’च्या समर्थकांवर निशाणा साधला आहे. धर्मात सर्वस्व काय आहे हे जाणून घ्या आणि त्या मार्गावर चालत राहा. जे तुम्हाला आवडणार नाही, तसं वर्तन करू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘सलवार बाबा’ या नावानंही सुपरिचित असलेल्या रामदेव बाबांना धर्माचरणाचा किती दांडगा अनुभव आहे, ते त्यांच्या व्यापारी कारभारातून दिसून आलेलं आहेच. गेली तीन वर्षं देशात गोरक्षकांचा उन्माद सुरू आहे. त्यांनी या गोरक्षकांनाही असंच धर्माचरणाचं आणि हिंसा, उन्माद टाळण्याचा संदेश काही दिला नाही. उलट, गाय ही आपली माता कशी आहे आणि तिच्यात सगळे देव कसे वसलेले आहेत, या अंधश्रद्धेचा होता होईल तो प्रसार करण्यातच त्यांनी शक्ती खर्च केली आहे. शिवाय देशातल्या सगळ्याच हिंदूंची ही श्रद्धा असल्याची लोणकढीही ते अधूनमधून फेकत असतात!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......