अजूनकाही
बाबा राम रहिम या भोंदूमुळे तथाकथित आध्यात्मिक क्षेत्राचा जुनाच अध्याय नव्यानं चर्चेला आला आहे. अर्थात या भोंदूची महती आता सर्वांपुढे येत असली तरी ही खूप जुनी अख्यायिका आहे. या बाबाला हात लावणं सोडा, त्याच्याबद्दल ‘ब्र’ काढणं कठीण असताना आणि त्याचे वैचारिक भक्त व पाठीराखे सत्तेत असताना त्याला सजा सुनावली जाते, हीच काय ती आनंदाची बातमी! अर्थात या भोंदू बाबाला शिक्षा सुनावली गेली आहे, ती आपल्या राज्यघटनेच्या ताकदीनं. कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे कधीतरी सिद्ध होतंच असतं. ते झालं! काहीशी उशिरा पण योग्य वेळी या बाबाला सजा झाल्यामुळे न्यायालय अन घटनात्मक प्रक्रियांवरचा विश्वास दृग्गोच्चर होण्यास मदत झाली आहे. ही घडामोड व्यापक अर्थानं लोकशाहीला बळ देणारी आहे. अन्यायाच्या भीतीनं खचणार्या लाखोंच्या जगण्याला यातून उभारी मिळेल.
बाबा राम रहिम आणि त्याचे कारनामे यावर भरपूर चर्चा झाली आहे. या बाबाला आपल्या व्यवस्थेनं पुरवलेली रसद भयानक आहे. कमी-अधिक फरकानं कोणत्याही राजवटीत हेच झालं असतं. कारण साधं आहे. या बाबाबद्दल २००२ ला तक्रार करण्यात आली, त्याची सजा तो २०१७ मध्ये भोगणार आहे. थोडक्यात तक्रार केल्यापासून १५ वर्षं हा बाबा मोकाट राहतो, ही अन्यायी वृतीला आपल्या राजकीय व्यवस्थेनं स्वार्थासाठी दिलेली अधिमान्यता होती, हे लक्षात घ्यावयास हवं.
गेल्या १५ वर्षांत किती महिला-मुलींना (३०० महिलांवर बलात्कार केल्याची बातमी आली आहेच. अजून तपशील यायचे आहेत. काही तपशील बाहेर येणारही नाहीत.) किती वेळा या बाबाच्या ‘सेवे’च्या नावाखाली त्यांच्याच अंध कुटुंबियांमुळे आपलं अस्तित्व गहान ठेवावं लागलं असेल?
हे सगळं केवळ भयानक आहे. यात आधुनिक धर्मवादी मानसिकतेचा संकुचित अन भौतिकतेचा मारा आहेच. त्याहीपुढे यात शोषणाचं अतिशय किळसवाणं रूप आहे. माणुसकीला काळिमा फासणारे धर्माच्या नावाखाली असा उच्छाद मांडत असतीत, तर असा धर्म हवाच कशाला?
बाबा राम रहिम हे केवळ एक उदाहरण आहे. असे भोंदू बाबा-बुवा गावोवाव आहेत. त्यांचे धंदे जवळपास सारखेच आहेत. सर्वांकडून सर्वांगीण लुट सुरूच असते. या देशातील शेतकरी जगण्याची रोज नवी वेदना सहन करत असताना हे भोंदू बाबा-बुवा मस्तवाल झालेले आहेत. यांच्या अधिकृत अन अनधिकृत संपत्तीचे आकडे ऐकले किंवा पाहिले तर डोळे फिरतात.
अशा सर्व बाबांचे पिळवणुकीचे प्रकार वेगवेगळे असतात, पण मार्ग एकच असतो. विशिष्ट स्वरूपाच्या मागास मानसिकतेचा फायदा उठवून हे आपले धंदे रुजवतात. हे सगळे भोंदू बाबा-बुवा प्रवृत्तीनं मागास आहेतच. त्याहीपेक्षा ते हिंस्त्र राक्षशी प्रवृत्तीतून बाहेर आलेले नाहीत. यांचं धर्मकारण हा निव्वळ कांगावा असतो. खरा उद्देश पिळवणूक आणि मस्तवाल होऊन अय्याशी करण्यावरच यांचा भर असतो.
अशा भोंदू बाबा-बुवांना कोण पोसतं?
या भोंदू बाबा-बुवांना साथ देण्यात पहिला क्रमांक लागतो राजकारण्यांचा. त्यात डाव्या पक्षांचा अपवाद वगळता जवळपास सगळे राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. मतपेटीच्या भीतीपोटी अशा भोंदू बाबा-बुवांचं दुकान अभेद्यपणे टिकवलं अन वाढवलं जातं. या भोंदू बाबा-बुवांचा दुसरा आधार असतो, आपलं सामाजिक अज्ञान अन मागासलेपणा. आपल्या समाजात रूढी-परंपरा अजूनही टिकून आहेत. त्या रूढी या भोंदू बाबा-बुवांना पोसण्यात मोलाचा वाटा उचलत आल्या आहेत. रूढींमध्ये दैवी शक्ती नावाची अनामिक भीती या भोंदू बाबा-बुवांना वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. मुळात हे भोंदू बाबा-बुवा तसे प्रचंड भित्रे असतात. यांच्याकडे साधा पोलिस चौकशीला गेला तर यांचं अवसान गळून पडतं. पण त्यांच्या आख्यायिका इतक सुरसपणे निर्माण करून पेरल्या जातात की, त्यामुळे पोलिसांची अनेकदा हिंमत होत नाही. त्यात अन्यायग्रस्त हा अन्याय करणाऱ्यापेक्षा अधिक जबाबदार असतो, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं इथं लागू आहेच. हे भोंदू बाबा-बुवा आपल्या चमत्कारिक शक्तीच्या भाकड कथा अशा पेरतात की, त्यातून भीतीचं सावट उभं करण्याचा डाव यशस्वी होतो.
या भोंदू बाबा-बुवांचा कशातच मूळ पाया भक्कम नसतो. यांचा कोणताही व्यवहार निरपेक्ष नसतो. धारण केलेला अवतार अन प्रत्यक्ष कार्य यांचा संबध नसतो. मुळात यांचं डोक फार कामाचं असतं, असंही नाही.
महाराष्ट्रात नरेंद्र महाराज नावाचा एक बाबा आहे. त्याचे थोडे मागचे दिवस आठवले तर हा मुद्दा लक्षात येईल. या बाबाला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जाहीर आव्हान दिल्यावर त्याचं दुकान ओथंबलं. तत्पूर्वी हा बाबा म्हणजे रामबाण उपाय वाटायला लागला होता. अगदी पिकावर रोग पडला तरी त्याचं नाव घेतलं की, तो रोग जातो असे लोक म्हणायचे!
आपल्या समाजातल्या बिचार्या मागास मानसिकतांचा फायदा उचलून अशा भोंदू बाबा-बुवांची दुकानं आकाराला येतात अन सत्य बाहेर आल्यावर ती कोसळतातही. तेव्हा त्यांचा खरा-खोटा भगवंतही त्यांना सहन करत नाही. आजवर आपल्या देशात कोणताही भोंदू बाबा वा बुवा दीर्घकाळ आपली मान्यता टिकवू शकलेला नाही. त्यात अशी माया जमवलेले व महिलांचा अमानुष छळ करणारे तर आयुष्याची अखेर (त्यांच्याच भाषेत नियतीनं) तुरुंगामध्येच साजरी करत आहेत!
या भोंदू बाबा–बुवांचं प्रस्थ आजच्या आधुनिक आणि विज्ञानवादी सामाजिक मान्यतेच्या प्रगती व विस्ताराच्या काळात होत आहे, हे आपलं दुर्देव आहे. २१ शतकाची पहाट आता संपली आहे. जगाच्या आव्हानांना खांद्यावर घेऊन संघर्ष करण्याच्या काळात आपण बुरसटलेल्या मानसिकतेशी लढा देत आहोत. हाच काय तो जागतिकीकरण स्वीकारल्यानंतरचा दैवदुर्विलास!
भोंदू बाबा-बुवा वाढतात कसे?
जवळपास सगळे भोंदू बाबा–बुवा त्यांच्या कुटुंबांनी व्यवहारिकतेच्या निकषावर घरातून हद्दपार केलेले असतात. ‘ज्यांना आपल्या गावात अन घरात कोणी विचारत नाही ते बाबा होतात’, असं ग्रामीण भागात मानलं जातं. याशिवाय ज्यांचा आधार वाटण्याऎवजी त्रासच असतो, अशांना गावात अन घरात ‘जा बाबा कुठेतरी डोंगरात अन हो बाबा’ असंही म्हटलं जातं. त्यामुळे हे बाबा सामाजिक अर्थानं फकीर असतात. बाबा–बुवा व्हायचं म्हणून कोणी ठरवून जन्माला येत नाही. अशा बाबा–बुवांना आपला समाज वाढवतो. अर्थात समाजाचं मागासलेपण त्याच्या मुळाशी असतं. या भोंदू बाबा-बुवांना जोवर समाजमान्यता नसते, तोवर हे छोटेखानी प्रबोधनाचं काम करतात. यातले बहुतेक लोक ज्यांना मूलबाळ होत नाही, अशा लोकांनी वाढवलेले आहेत. मूलबाळ होऊ न शकणार्या लोकांना बाबा–बुवाच्या खर्या आख्यायिका माहीत नसतात. त्यांना तथाकथित मूल होण्याची बाबाची चमत्कारी कथा सांगितली जाते अन बिचारे विज्ञानयुगातही डॉक्टरकडे जाण्याऎवजी यांच्याकडे जातात अन फसतात.
अशा प्रकरणांचा बारकाईनं अभ्यास केला तर त्यात महिलेचा छळ ठरलेला असतो. जे तिला भोगाव लागतं, ते ती बिचारी अनेकदा कुणाला सांगायलाही जाऊ शकत नाही. अन ‘तेरी भी चूप अन मेरी भी चूप’ म्हणत सार्वजनिक इभ्रतीसाठी गोपनीयतेला वारेमाप महत्त्व प्राप्त होतं. पण त्यात त्या त्या महिलांची इभ्रत मात्र केव्हाच संपवलेली असते.
भोंदू बाबा–बुवांची ही एक आख्यायिका झाली. अशा अनेक आख्यायिका असतात. सगळ्यात महत्त्वाचं या भोंदू बाबा–बुवांनी घर अन आपलं गाव सोडलेलं असतं. गावात अन घरात यांचा आकार-उकार माहीत झालेला असतो. हे महाराज होऊन अवतार कार्य करायला निघतात. सुरुवातीला आर्थिक माया जमवेपर्यंत असे बाबा फारसं दळणवळण नसलेल्या अन शिक्षणाची साधनं नसलेल्या गावात आपल्या मठाचं बस्तान बसवतात. कुठल्याही गावात अधिक श्रीमंत माणसाला देवा-धर्माला पैसे लावण्याची\खर्च करण्याची आपल्या गावसंस्कृतीत पद्धत आहे. त्यामुळे सुरुवात होते गावातील दानशूर लोकांच्या पुढाकारानं. मग अखंड हरिनाम सप्ताहासारखे उपक्रम सुरू होतात. (आपल्याकडील कीर्तन–प्रवचन अन त्यांचे सप्ताह याला अपवाद आहेत!)
या भोंदू बाबा–बुवांच्या मठांच्या ठिकाण निवडीचं गणित भन्नाट असतं. जसजसा या भोंदू बाबा-बुवांचा चमत्कार अर्थकारणाला बळ द्यायला लागतो, तसतशी जमीन अन संपत्तीला उभारी मिळते. त्यात या भोंदूंना मोठमोठ्या घरून स्वच्छ दूध-तूप यांसारख्या गोष्टी मिळत राहतात. त्यातून आर्थिक अन सामाजिक स्तरावर जरा दबदबा निर्माण झाल्यावर यांचं ठिकाण बदलतं. बाबाची आख्यायिका वाढली की, बाबा स्वतःच्या मठाच्या शाखा काढतात. मग या शाखांमध्ये बाबाच्या अस्तित्वाबद्दल बरीच गोपनीयता पाळली जाते. त्या गोपनीयतेच्या मागे चमत्कार दाखवून पुढच्या लुटीचा अध्याय रचला जातो.
भोंदू बाबांचं अर्थकारण ही तर स्वधर्मीयांची लूट
भोंदू बाबा-बुवांचं अर्थकारण हे फार तगडं प्रकरण आहे. हे बाबा सतत उत्पन्नाची नवनवीन साधनं शोधत असतात. त्यात भक्तांचा ‘उदार’ भाव हा पारंपरिक स्त्रोत असतोच. त्याशिवाय भक्तांच्या गळी आपली तथाकथित औषधं, पुस्तकं, सौंदर्य प्रसाधनं उतरवली जातात. माल तयार करतात भक्त, विकतातही भक्तच. त्याचा दर्जा सुमारच असतो, पण बाबांच्या ‘दैविक’ लोकप्रियतेचा फायदा घेऊन या वस्तू विकल्या जातात. बाबा-बुवांना काळाच भान नसतं. आणि हे बाबा-बुवा त्यांच्या भक्तांना काळाचं भान येऊ न देण्यासाठी कष्ट घेण्यावर भर देत असतात. कारण समाज मागास अन पारंपरिकच राहिल यावर ते भर देतात. त्यात देशी मालाची अस्मिता, प्रत्येक मुद्द्याला किंवा वस्तूला धार्मिक चौकट जोडण्यावर त्यांचा आग्रह असतो.
धार्मिक अस्मितांना जोडून हे भोंदू बाबा-बुवा ज्या धर्माची काळजी वाहतात, त्या धर्मातल्या गरीब बहुसंख्याकांना लुटण्यात ते यशस्वी होतात. धार्मिक अस्मितांचं अर्थकारण जागतिकीकरणानंतर यशस्वी करण्यात हे भोंदू बाबा-बुवा तरबेज असतात. एक बाबा अडकला की, दुसरा जन्माला येतो हा इतिहास आहे. आसारामबापू तुरुंगात गेल्यावर लगेच पुढच्या टप्यावर ‘योगायोगानं’ आलेला भंपक, पण धार्मिक उद्योगपती जन्माला आलेला आहेच! त्याची उत्पादनं जवळपास सर्वांना माहीत झाली आहेत, अनेक जण ती वापरतही आहेत. फक्त त्याचे बाकी उद्योग जाहीर होणं बाकी आहे.
मंदिरात पैसे टाकण्याचं प्रमाण कमी झाल्यावर हे भोंदू बाबा-बुवा जन्माला आलेले आहेत. यांची आर्थिक महती अगदी अलीकडच्या काळातील आहे.
राजकीय आव्हान काय आहे?
भाजपच्या विषय पत्रिकेत बाबा-बुवांचं स्थान अढळ आहे. काँग्रेस जेव्हा संस्थात्मक राजकारण करण्यात गुरफटली होती, तेव्हा भाजप धार्मिक संस्थानांच्या भल्यासाठी काम करत होता. त्यामुळॆ काँग्रेसच्या संस्थात्मक प्रेमात काही व्यक्तींची आत्मकेंद्री बेटं निर्माण झाली. ती पूर्णतः व्यक्तीवादी राजकारणाचा भाग आहेत. त्यांनी पक्ष वाढवण्याऎवजी आपलीच संपती वाढवण्याचे डाव रचले. त्यात काँग्रेस झोपत गेली. तोच प्रकार आता बाबा-बुवांच्या निमित्तानं भाजपच्या बाबतीत होत आहे. पिळवणुकीपासून अर्थकेंद्री विचारापर्यंत बरीच साम्यं या काँग्रेसच्या संस्था आणि भाजपच्या तथाकथित संस्थानांच्या व्यवहारांत आहेत. फक्त पिळवणुकीचे मार्ग वेगवेगळे आहेत. संस्थात्मक र्हासात काँग्रेस जशी नेस्तनाबूत होत गेली, तसाच या बाबा-बुवांच्या कृत्यांचा दुष्पपरिणाम भाजपला भोगावा लागणार आहे.
त्यामुळे बाबा राम रहिमचं पाप जगजाहीर करत त्याच्या पायावर भाजप कसा माथा टेकवत आला आहे, हे लोकांना माध्यमांनी फार रंजकपणे दाखवलं आहे. त्याला वाजपेयींपासूनची परंपरा आहे. वाजपेयी आसारामबापू या भोंदू बाबाच्या पायावर माथा टेकवत होते, हे पुन्हा पाहून त्यांच्याबद्दलचा अनेकांचा आदर कमी झाला असेल यात शंका नाही. परिणामी बाबा राम रहिमची थोरवी माहीत होण्यात भाजपच्या सत्तेच्या गढीला हादरा बसला असल्याचं चित्र निर्माण होत आहे.
थोडक्यात भाजपला बाबा-बुवांचं प्रेम महागात पडणार आहे. कारण सत्ताधारी पक्षानं मोठी प्रस्थं सांभाळायची असतात, असा प्रघात असला तरी त्याला खाजगीपणाच्या मर्यादा असतात. माध्यमांच्या स्पर्धेच्या काळात काहीही लपून राहू शकत नाही, हे भाजपनं लक्षात घ्यायला हवं. सगळेच भोंदू बाबा-बुवा भाजपच्या जवळचे कसे? असे भोंदू बाबा-बुवा वाढले कोणत्या राज्यात? ज्या राज्यात जास्त काळ भाजप सत्तेत आहे, त्यांनी अशा भोंदू बाबा-बुवांना अप्रत्यक्ष पोसलं असल्याचा संदेश समाजमनात जात आहे. जिथं आपलेच पैसे आपले वाटण्याची भीती जे सरकार निर्माण करतं, ते अशा भोंदू बाबा-बुवांची मालमत्ता भरमसाठपणे वाढत असताना झोपलेलं असतं का?
या भोंदू बाबा-बुवांचं राजकारण काय आहे?
तर त्यांना समाज वैज्ञानिक दृष्टीला जाऊ द्यायचा नसतो. तो त्यांना परवडणारा नसतो. हे समाजाला समजायला वेळ लागणार नाही. गायीच्या प्रेमाचं राजकारण या भोंदूंच्या सर्वांगीण आश्रयासाठीच आहे, हे जसजसं स्पष्ट होत जाईल तसतसे भाजपच्या भोंदू बाबा-बुवा प्रेमी राजकारणाला तडे जायला लागतील.
आजही मागासलेपणाच्या विचारात गरिबी नावाचं अर्भक सतत वाढत असतं. गरिबी टिकणं, माणसं मागास असणं, त्यांना देवादिकांचा आधार वाटणं, यात या भोंदू बाबा-बुवांच्या दुकानांचं अर्थकारण सामावलेलं असतं. या भोंदू बाबा-बुवांकडे जाण्यामागे अनामिक भीतीचं थोतांड असतं. यात राक्षशी प्रवृत्ती अन आर्थिकदृष्ट्या मस्तेवाल होणं ही पारंपरिक मानसिकताही आहे. हे भोंदू बाबा–बुवा जी लूट करतात, ती देशातील कुठल्याही सार्वजनिक भ्रष्टाचाराइतकीच दुखरी आहे. अधिक धोकादायक आहे.
सर्वस्व गहाण ठेवण्याचा अनुभव म्हणजे बाबा-बुवांचा धार्मिक तमाशा!
.............................................................................................................................................
लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.
kdraktate@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment