अजूनकाही
नवाजुद्दीन सिद्दीकी एक बहुआयामी अभिनेता आहे. अल्पावधीतच त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. केवळ त्याचं नाव पाहून चित्रपट पाहणारा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. मात्र 'बाबूमोशाय बंदूकबाज' हा त्याचा नवीन हिंदी चित्रपट केवळ तो आहे म्हणून पाहायला गेलो तर साफ निराशा करतो. विशेष म्हणजे नवाजुद्दीननं या चित्रपटात धडाकेबाज काम करूनही या 'बंदूकबाज' अभिनेत्याची गोळी बरोबर लागली नाही, हे हा चित्रपट पाहिल्यानंतर जाणवत राहतं. कारण या चित्रपटात बाकी काही नाही, पण लैंगिक दृश्यं आणि हिंसाचारानं कळस गाठला आहे. चित्रपटाचं नाव 'बंदूकबाज' आहे म्हणून पडद्यावर सारखं 'ठो... ठो' ऐकायला मिळालं की, ते सार्थ होत असलं तरी कथा-पटकथेच्या नावानं सारं काही 'ठो... ठो' असल्याचंच दिसतं.
या चित्रपटात 'राजकारण', 'गुंडगिरी', प्रेम, विश्वास, दगाफटका आणि सरतेशेवटी 'सूड' याची सरमिसळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आणि हे सर्व चांगलं होण्यासाठी लैंगिकता आणि हिंसाचाराचा भरपूर मालमसाला वापरण्यात आला आहे.
या चित्रपटामध्ये पाहायला मिळते ती 'सुपारी' घेऊन खून करणाऱ्या बाबू बिहारी (नवाजुद्दीन सिद्दीकी) नावाच्या सामान्य गुंडाची कथा. तो 'आशिक' आहे, 'प्रेमिक' आहे, कामाशी एकनिष्ठ आहे, शब्दाला जागणारा आहे आणि सूड भावनेनं पेटून उठणाराही आहे. त्या मानानं त्याचं जग खूप मर्यादित आणि छोटं आहे. राजकीय टोळ्यांमधील सत्ता-संघर्षात 'सुपारी' देऊन प्रतिस्पर्धी टोळीतील माणसांचा मुडदा पाडण्याचं काम आपल्याकडे, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत सर्रास चालतं. बाबू बिहारी अशाच टोळ्यांचा हस्तक आहे. फुलवा नावाच्या (बिदिता बाग) एका बलात्कार पीडितेवर बलात्कार करणाऱ्या दोघा जणांना केवळ तिच्या सांगण्यावरून तो मारतो आणि नंतर तिचा 'आशिक' म्हणून तिच्याबरोबर राहतो.
मात्र एकदा तो ज्यांचा खून करण्याची 'सुपारी' घेतो, तो त्याच्या ओळखीच्या सुमित्रादेवीच्या ('जीजी', दिव्या दत्ता) टोळीतील असतो. म्हणून बाबू बिहारी त्याची कल्पना 'जीजी'ला देतो. 'सुपारी' देणाऱ्या टोळीप्रमुखाला हे कळल्यावर तो बाबू बिहारीला मारण्यासाठी बांके बिहारी या दुसऱ्या गुंडाला सुपारी देतो. बांके बिहारी हा बाबू बिहारीला आपला 'गुरू' मानत असतो. एका प्रसंगात तो त्याला वाचवतो. त्यामुळे बाबू बिहारी त्याला घरी येऊन येतो. 'सुपारी' देण्या-घेण्याच्या कामात ते दोघे नंतर एकत्र येतात. मात्र त्यांच्या 'घरगुती' मैत्रीला वेगळंच वळण लागतं. आणि शेवटी परस्परांमध्ये सूडभावना निर्माण होऊ त्यांच्यातच संघर्ष होतो. चित्रपटात सांगितल्याप्रमाणे वाईट गोष्टीचा अंत शेवटी वाईट पद्धतीनंच होतो.
बाबू बिहारी हा सराईत 'सुपारी बहाद्दर' आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा त्याच्या भोवतीच फिरत राहते. लहानपणीच केवळ भूक शमवण्यासाठी दोन केळासाठी त्यानं खून केल्याचा उल्लेख होतो. एवढीच त्याची पार्श्वभूमी. बाकी चित्रपटात राजकीय टोळ्या म्हणायला म्हणून आहेत. त्यांचे नेमके हेतू शेवटपर्यंत स्पष्ट दाखवले नाहीत. त्यामुळे पडद्यावर एकानंतर एकाचे फक्त खून होत असलेले पाहायला मिळतात. चित्रपटातील संवाद आणि गाणीही अश्लीलता आणि हिंसाचारात भर घालणारे आहेत. शिवाय बाबू बिहारीला दोनदा गोळ्या लागूनही आणि एका प्रसंगात रेल्वेपुलावरून खाली पडूनही तो वाचल्याचा 'फिल्मी चमत्कार'ही पाहायला मिळतो.
पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष असताना हा चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात अडकला होता आणि तब्बल आठ दृश्यं वगळल्यानंतरच त्याला संमती देण्यात आली. यावरून या चित्रपटातील अश्लीलता आणि हिंसाचाराची रेलचेल समजू शकते.
या चित्रपटाचं नावातील 'बाबूमोशाय' हा बंगाली शब्द कोणालाही आदरार्थी वचनानं संबोधला जातो. असं नाव देऊन सुपारी घेऊन काम करणाऱ्याला गुंडांच्या प्रतिमेचं उदात्तीकरण करण्याचा निर्माता-दिग्दर्शकाचा हेतू असावा. परंतु चित्रपट पाहिल्यानंतर तोही असफल झाल्याचं जाणवतं.
नवाजुद्दीन सिद्दीकीनं बाबू बिहारीच्या भूमिकेत जबरदस्त काम केलं आहे. त्याची संवादफेक निर्ढावलेल्या गुंडाला साजेशी आहे. जतीन गोस्वामी यानंही बांके बिहारीच्या भूमिकेत त्याला तोडीस तोड काम केलं आहे. बंगाली अभिनेत्री बिदिता बाग फुलवाची भूमिका बिनधास्तपणे जगली आहे. तर दिव्या दत्त प्रथमच सुमित्रादेवीच्या रूपानं राजकीय टोळीप्रमुखाच्या भूमिकेत समोर आली आहे.
मात्र केवळ नवाजुद्दीन सिद्दीकीसाठी हा चित्रपट कोणी पाहणार असेल तर त्याचा अभिनय सोडल्यास निराशाच होईल.
लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment