डॉ. नरेंद्र दाभोलकर : आगरकरांचा वारसदार
संकीर्ण - श्रद्धांजली
राजा पिंपरखेडकर
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर
  • Mon , 28 August 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली डॉ. नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar विनोद शिरसाठ Vinod Shirsath विज्ञान आणि समाज Science and Society इंडिया मार्च फॉर सायन्स India March For Science

‘विज्ञाननिष्ठा’ हा ज्यांच्या जीवनकार्याचा गाभा बनला होता, अशा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात हत्या करण्यात आली. गुन्हेगारांचा शोध अजूनही लागलेला नाही. त्याबाबत न्यायालयाने सरकार, पोलीस अधिकारी यांच्यावर वेळोवेळी कडक शब्दांत ताशेरे ओढले असले तरी सरकारी तपास धिम्या गतीनेच चालू आहे. तर दुसरीकडे भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून अ-वैज्ञानिक बजबजपुरी माजत चालली आहे. त्याविरोधात आणि एकंदरच सरकारने विज्ञानाभिमुख व्हावे यासाठी ९ ऑगस्ट रोजी देशभरातील ४० शहरांमध्ये वैज्ञानिकांनी मोर्चे काढले. या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर २०, २६ आणि २८ ऑगस्ट २०१३ रोजी लिहिलेल्या नोंदी एकत्रित स्वरूपात...

.............................................................................................................................................

२० ऑगस्ट २०१३

नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, या धक्यातून बाहेर यायला जर वेळ लागला म्हणून हे टिपण लिहायला उशीर होत आहे. दाभोलकरांच्या जाण्याचे भयावह परिणाम महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी-आंदोलनं यांच्यावर होणार आहेत. पुरोगामी महाराष्ट्र या एका घटनेनं १०० वर्षं मागे गेला आहे. विचारांचा सामना विचारांनी करायचा असतो. लोकशाहीत सतत वाद-संवाद करणारी माणसं असतील तरच लोकशाही अधिकाधिक रुजायला, जीवनप्रणाली म्हणून स्वीकारली जायला मदत होते. कारण आमचे मित्र विनय हर्डीकर म्हणतात त्याप्रमाणे 'शंभरातील एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के लोक आपण विचार करतो असा विचार करतात आणि उरलेले ९० टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत, हे लोकशाहीचं दारुण वास्तव असतं. ' त्यामुळे लोकशाहीची सारी भिस्त ही या एक टक्का लोकांवरच असते. समाजावरील बरे-वाईट परिणाम, रूढ संकेतांना धक्के देणं, नव्या दिशेनं, विवेकपूर्ण बुद्धीनं विचार करायला लावणं, हे या एक टक्का लोकांचं काम असतं. आजघडीला महाराष्ट्रात दाभोलकर यांच्या इतका सहिष्णू, उदारमतवादी आणि बुद्धिनिष्ठ सामाजिक कार्यकर्ता दुसरा दाखवता येत नाही. 'बांधव हो विचारकलहाला का भिता?' या 'सुधारक'कार आगरकर यांची उक्ती प्रमाण मानून डॉ. दाभोलकर महिन्याचे २५-२७ दिवस महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून समाज प्रबोधनाचं काम करत होते. ‘निखळ वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टीकोन’ बाळगत धार्मिक अनाचार, फाजील कर्मकांडे, बुवाबाजी, जादूटोणा यांसारख्या गोष्टींविरोधात रणशिंग फुंकत फिरणारे डॉ. दाभोलकर अफाट आणि अचाट ऊर्जेनं काम करत. त्यांच्या उत्साहाकडे पाहून आम्हा तरुणांनाही लाज वाटत असे. 'हे सर्व कोठून येते?' हा प्रश्नाचे उत्तर डॉ. दाभोलकर यांच्यापुरते असे होते कि, समाज कळकळीची आच असल्यावर हे सर्व होते.   

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

२००४ साली संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तेथील दुर्मिळ कागदपत्रांची नासधूस केली. या घटनेनं महाराष्ट्रातील बुद्धिवंत बुचकळ्यात पडले आणि त्यांनी मराठा समाजाविषयी बोलणंच थांबवलं. परिणामी मराठा समाजाची सरंजामी वृत्ती पुन्हा उफाळून आली. राजकीय हेतूंनी प्रेरित असणाऱ्यांनी याचा फायदा उठवत आरक्षण नामक अफूचं गाजर दाखवायला सुरुवात केली. आणि मग आक्रमक मराठ्यांच्या २२ संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. आणि या संघटनांनी मराठा समाजाला, त्यातही सुशिक्षित तरुणांना मागे खेचायला सुरुवात केली. जातीय विद्वेषाचं विष त्यांच्या मनात पेरायला सुरुवात केली. पण सगळेच संधिसाधू असल्यानं त्यांच्यात आता श्रेयाची चढाओढ सुरू झाली आहे. आता या संघटनांचा प्रवास एकमेका नामशेष करू या दिशेनं होऊ घातलाय. आणि तसंच होणार होतं. यात नुकसान झालं ते सुशिक्षित मराठा तरुणांचं. त्यांना या लोकांनी १०० वर्षं मागे नेऊन ठेवलं. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनं कोणा एका समाजाचं नुकसान होणार नसून सबंध महाराष्ट्राचंच मोठं नुकसान होणार आहे.  

समाजहितासाठी स्वत:चा स्वार्थ, अहंकार आणि आवडीनिवडी यांना कात्री लावावी लागते. दाभोलकर यांनी समाजहित हेच आपलं जीवनकार्य मानलं होतं. समाजाचं नेतृत्व करण्यासाठी स्वत:ला समाजाबरोबर आणून ठेवावं लागतं. तो गुण डॉ. दाभोलकर यांच्याकडे जन्मजात म्हणावा इतका सहज होता. अतिशय साधी राहणी, कुठलंही व्यसन नाही, बोलण्यात ऋजुता आणि वागण्यात आदाब, ही त्यांची वैशिष्ट्यं होती. 

देवावर डॉ. दाभोलकर यांचा विश्वास नव्हता. पण बुवाबाजी आणि कर्मकांड यांना मात्र प्रखर विरोध होता. आणि त्यासाठीचे वैज्ञानिक, तार्किक आणि बौद्धिक युक्तिवाद त्यांच्याकडे होते. कोणतीही गोष्ट पुराव्यानं सिद्ध करता आली पाहिजे आणि बुद्धीच्या कसोटीला उतरली पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या जगात हा दृष्टिकोनच सर्वात महत्त्वाचा आहे, या धारणेनं डॉ. दाभोलकर महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते. अनेक बुवा-बाबांचा त्यांनी भांडाफोड केला, महाराजांना जाहीर चर्चेचं आव्हान देऊन त्यांना निरुत्तर केलं आणि लेखन करून समाजप्रबोधन केलं. पण त्यांचं हे काम काही सनातनी विचाराच्या मंडळींना पसंत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात होत्या. हल्ली भावना ही इतकी उथळ गोष्ट झाली आहे की, ती कशानं दुखावेल याचा काही भरवसा राहिला नाही. भावना दुखावल्या म्हणणारी मंडळी खरं तर कांगावखोर असतात. आणि त्यांच्या भावना सोयीस्कर असतात. आपली दुकानदारी राजरोसपणे चालू राहावी म्हणून त्यांनी अनेक सोंगं घेतलेली असतात आणि अनेक मतलबी भ्रमही तयार केलेले असतात. अशा लोकांना डॉ. दाभोलकर यांचं काम पटणं शक्य नव्हतंच. ही मंडळी सतत त्यांच्याविषयी गरळ ओकत असत. पण ती या धराला जातील याची कल्पना कुणी केली नव्हती. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

दाभोलकर यांच्या हत्त्येनं या तथाकथित लोकांची भोंदूगिरी निदान काही काळ चालू राहीलही, पण ती सर्व काळ चालू राहील अशा भ्रमात त्यांनी राहता कामा नये. कारण जॉर्ज ऑर्वेलनं म्हटलं आहे की, काही लोकांना काही काळ, सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवता येतं, पण सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही.   

२६ ऑगस्ट २०१३

दाभोलकर यांची हत्या होऊन आता पाच दिवस होत आलेत. पण अजूनही हल्लेखोरांचा शोध पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांची अनेक पथके आपआपल्यापरीने शोध घेत आहेत, पण त्यांचा तपास अजून नीट दिशा पकडताना दिसत नाही. तर दुसरीकडे दाभोलकर यांच्यावर कुणी हल्ला केला असावा याचे अनेक तर्क पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर लोक लावत आहेत. प्रत्येक जन आपल्या कुवतीनुसार अंदाज व्यक्त करतो आहे. तर बुद्धिवंत महाराष्ट्र पुरोगामी कधी होता किंवा आज आहे कि नाही याची चर्चा करत आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची चर्चा अधूनमधून होतच आली आहे. त्यात नवीन काही नाही. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक चळवळी, आंदोलनं झाली. सामाजिक बदलांसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले. एकोणिसावं शतक हे महाराष्ट्राचं ‘प्रबोधनाचं शतक’ होतं. त्या काळातही महाराष्ट्र १०० टक्के पुरोगामी नव्हता, तर पुरोगामित्वाच्या दिशेनं वाटचाल करत होता, असं फार तर म्हणता येऊ शकतं. विश्वास दांडेकर यांनी कालच्या ‘लोकसत्ता’मधील लेखात म्हटलं आहे, त्यानुसार ‘पुरोगामी महाराष्ट्र’ हे मिथक आहे. आणि त्याकडे तसंच पाहायला हवं. 

या मिथकाला अलीकडच्या काळात बराच धक्का लागला आहे. बलात्कार, खून, अराजक सदृश घडामोडी यांची सातत्यानं होत असलेली पुनरावृत्ती, या काही कारणांमुळे महाराष्ट्राचं पुरोगामित्व पणाला लागलं आहे. त्याची दिशा परत योग्य रीतीनं जायची असेल तर सामाजिक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू व्हायला हव्यात. पण गेल्या दोन दशकांत तर सामाजिक चळवळी खूपच थंडावल्यात आणि दुसरीकडे अध्यात्माला चांगले दिवस आले आहेत. बुवा, बाबा, महाराज, साधू यांची लोकप्रियता, त्यांची संपत्ती आणि त्यांचे कारनामे यांची रसभरीत वर्णनं सतत वाचायला, ऐकायला मिळतात. या दांभिक लोकांचा सुळसुळाट हा निर्बुद्ध समाजाच्या प्रवृतीचं निदर्शक आहे. झटपट श्रीमंती, मनशांती, सुख-समाधान, कुटुंब कलह अशा प्रश्नांची उत्तरं या बुवा, बाबा, महाराज, साधू यांच्याकडे मिळतील या आशेनं लोक त्यांच्याकडे जातात, तसा या बुवा, बाबा, महाराज, साधू यांचा दावा असतो. त्याबदल्यात ते या पीडित लोकांचा ब्रेन वॉश करून त्यांना आपल्या भजनी लावतात. आणि आपली दुकानदारी चालू करतात. अशा काळात विज्ञानवादी, विवेकनिष्ठ आणि बुद्धिवादी पद्धतीनं जगणं, वागणं, विचार करणं यासाठी काम करणाऱ्या डॉ. दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्ती समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, तर हे बुवा, बाबा, महाराज, साधू समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न करतात. पण समाजाला श्रेयस-प्रेयस काय याचं तारतम्य नसतं. 

तर दुसरीकडे कर्मठ लोक आपल्या संघटना, संस्था चालू करून समाजात अनाचार माजवण्याचा प्रयत्न करतात. अशा आक्रमक आणि जातीयवादी संघटनांची संख्या अलीकडच्या काळात सतत वाढताना दिसते आहे. ब्राम्हण समाज, मराठा समाज आणि दलित समाज या तीन समाजात अशा संघटनांची संख्या सर्वांत जास्त दिसते. या संघटना आधुनिक संपर्क साधनांचा वापर करून आपली दांडगटशाही पुढे रेटण्याचा प्रयत्न करत राहतात. यामुळे समाज चिकित्सा, समाज बदल, टाकाऊ सामाजिक रूढी या विषयी बोलण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. परिणामी सामाजिक सहिष्णुता कमी होत चालली आहे, तर आक्रमकता वाढत चालली आहे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. सामाजिक अनारोग्य वाढत चाललं की, समाजाची झपाट्यानं घसरण सुरू होते. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

डॉ. दाभोलकर यांच्यासारख्या लोकशाहीवादी कार्यकर्त्याची हत्त्या ही या चढेल आक्रमकपणातून घडली आहे. आणि प्रशासनाच्या पातळीवरही कार्यक्षमपणे काम करण्याची सवय हरवत चालल्यामुळे गुन्हेगारांचा छडा लावण्याची चुरस दिसत नाही. केवळ वरिष्ठांकडून आदेश आला म्हणून प्राथमिकता पूर्ण केली जाते आहे. यामुळे पोलीस नामक यंत्रणेचा धाक वाटेनासा होतो. आणि डॉ. दाभोलकर यांच्यासारखे प्रामाणिक लोक गमावण्याची पाळी येते. 

हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असंही म्हणता येत नाही, कारण बिहारमध्येही हल्ली असे भीषण प्रकार घडत नाहीत.          

२८ ऑगस्ट २०१३

डॉ. दाभोलकर यांच्या जाण्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं महाराष्ट्रभर पसरलेलं काम थांबलेलं, ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. डॉ. दाभोलकर यांनी आपल्या हयातीतच कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार केली आहे आणि ती समर्थपणे आपलं काम करत आहे, राहणार आहे. देवा-धर्माच्या नावानं आपल्या तुंबड्या भरणाऱ्या बुवा-बाबांची दुकानदारी उद्धवस्त करण्याचं काम यापुढेही चालू राहणार आहेच. महाराष्ट्र सरकारनेही वटहुकूम काढून जादूटोणा विरोधी कायदा लागू केला आहे. त्याची सरकारकडून नीट अंमलबजावणी झाली तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि एकट्यादुकट्या व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या बुवा-बाबांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवता येईल.

पण ‘सुधारक’कार आगरकरांच्या या वारसदाराचे मारेकरी आपण कधी पकडणार आहोत?  

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......