विज्ञान म्हणजे काय?
पडघम - विज्ञाननामा
जॉर्ज ऑर्वेल
  • जॉर्ज ऑर्वेल आणि खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओच्या भेटीला कवी जॉन मिल्टन
  • Mon , 28 August 2017
  • पडघम विज्ञाननामा डॉ. नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar विनोद शिरसाठ Vinod Shirsath विज्ञान आणि समाज Science and Society इंडिया मार्च फॉर सायन्स India March For Science जॉर्ज ऑर्वेल George Orwell विज्ञान म्हणजे काय? What is Science?

गेल्या आठवड्यातील ‘ट्रिब्यून’मध्ये, जे. स्ट्युअर्ट कुक यांचे एक चित्तवेधक पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्यांनी असे सुचवले आहे की, विज्ञानाच्या आधारावर श्रेणीबद्ध वर्गवारीचा धोका टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जनसामान्यातील प्रत्येकाला विज्ञानाचे शिक्षण शक्य तितके दिले पाहिजे आणि त्याच वेळी वैज्ञानिकांना त्यांच्या कोषातून बाहेर आणून राजकारणात व प्रशासनात जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे.

सर्वसाधारण विधान म्हणून आपल्यापैकी बहुतेक जण याच्याशी सहमत होतील. पण मला असे वाटते की, त्या विधानात स्ट्युअर्ट कुक विज्ञानाची व्याख्या करत नाहीत; आणि असे ध्वनित करतात की, विज्ञान म्हणजे असे वस्तुनिष्ठ शास्त्र, ज्याची प्रात्यक्षिके प्रयोगशाळेतील साहित्याच्या साह्याने केली जाऊ शकतात. त्यातून ते असेही सूचित करतात की, प्रौढांच्या शिक्षणाचा कल वाङमयीन, आर्थिक सामाजिक अभ्यासाला अधिक पसंती देऊन विज्ञानाचा अभ्यास टाळण्याकडे असतो. म्हणजे अर्थशास्त्र व समाजशास्त्र यांना ते विज्ञानाच्या शाखा म्हणून मानत नाहीत. वरवर पाहता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पण ‘विज्ञान’ हा शब्द नेहमी दोन अर्थांनी वापरला जातो आणि आपापल्या सोयीचा अर्थ घेण्याच्या लबाड प्रवृत्तीमुळे विज्ञानाचे शिक्षण हा प्रश्न काहीसा झाकोळून गेला आहे.

‘विज्ञान’ या संकल्पनेचे सामान्यत: दोन अर्थ घेतले जातात. पहिला- वस्तुनिष्ठ विज्ञान, म्हणजे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांसारखे विषय. आणि दुसरा- विचारांची अशी पद्धत, जिच्यामध्ये वस्तुस्थितीची निरीक्षणे तार्किक पद्धतीने पडताळून पाहून निष्कर्ष काढले जातात.

कोणत्याही वैज्ञानिकाला किंवा खरे तर कोणत्याही सुशिक्षित माणसाला ‘विज्ञान म्हणजे काय’ असा प्रश्न विचारला, तर पटकन येणारे उत्तर दुसऱ्या प्रकारचे असते. पण रोजच्या व्यवहारात बोलताना किंवा लिहिताना ‘विज्ञान’ हा शब्द लोकांकडून वापरला जातो, तेव्हा मात्र त्याचा अर्थ पहिल्या प्रकारचा असतो : विज्ञान म्हणजे असे काहीतरी जे प्रयोगशाळेत घडते. त्या शब्दांतून उभे राहणारे चित्र म्हणजे आलेख, परीक्षानळ्या, मोजपात्र, सूक्ष्मदर्शक यंत्र इत्यादी. एखादा जीवशास्त्रज्ञ किंवा खगोलशास्त्रज्ञ यांचे आणि फार तर मानसशास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ यांचे वर्णन ‘विज्ञानाचा माणूस’ असे केले जाते. पण ही संज्ञा राजकीय मुत्सद्दी, कवी, पत्रकार आणि तत्त्ववेत्ते यांनाही लावण्याबाबत कोणी विचारही करू शकत नाही. आणि जेव्हा काही लोक ‘तरुणांना विज्ञानाचे शिक्षण दिले पाहिजे’ असे म्हणत असतात; तेव्हा त्यांच्या मनातला अर्थ ‘तरुणांना- किरणोत्सर्ग, अवकाश-तारे, शरीररचनाशास्त्र यांचे शिक्षण दिले पाहिजे’ असाच असतो. ‘तरुणांना अधिक तर्कशुद्ध व वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करायला शिकवले पाहिजे’ असा अर्थ त्यांच्या मनात नसतो.

हा अर्थाचा गोंधळ काही वेळा जाणीवपूर्वक केला जातो, त्यात एक मोठा धोका आहे. ‘विज्ञानाचे शिक्षण अधिक दिले पाहिजे’ असे सूचित केले जाते, तेव्हा त्यात असा दावा केलेला असतो की, विज्ञानाचे शिक्षण घेतलेल्यांचा सर्वच विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन (ज्यांनी असे शिक्षण घेतलेले नाही त्यांच्यापेक्षा) अधिक प्रगल्भ असतो. त्यात असेही गृहीत धरले जाते की, वैज्ञानिकांची राजकीय-सामाजिक समस्यांवरची मते, नैतिक-तात्त्विक प्रश्नांवरची मते आणि एवढेच काय कलेविषयीची मतेसुद्धा (ज्यांना त्या विषयांचे फारसे ज्ञान नाही, त्यांच्यापेक्षा) अधिक महत्त्वपूर्ण असतात. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, ‘हे जग वैज्ञानिकांच्या नियंत्रणाखाली असते तर अधिक चांगले बनले असते’, असा तो दावा असतो. पण आत्ताच आपण पाहिले, दैनंदिन व्यवहारात ‘वैज्ञानिक’ म्हणजे ‘वस्तुनिष्ठ विज्ञानाच्या एखाद्या शाखेचा विशेष तज्ज्ञ.’ मात्र मानले असे जाते की, रसायनशास्त्रज्ञ किंवा भौतिकशास्त्रज्ञ हा राजकीय बाबतीतही कवी किंवा वकिलापेक्षा अधिक बुद्धिमान असतो. या गृहितकावर विश्वास असलेले लाखो-करोडो लोक आपल्या सभोवताली आहेत.

पण हे संपूर्ण सत्य आहे का? विशिष्ट ज्ञानशाखेत तज्ज्ञ असलेल्या, म्हणजे मर्यादित अर्थाने ‘वैज्ञानिक’ असलेल्या व्यक्तीचे दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातील समस्यांविषयीचे मत इतर लोकांपेक्षा अधिक ग्राह्य मानायचे का? नाही! असे समजायचे काहीच कारण नाही. एक साधे उदाहरण घ्या, राष्ट्रवादाच्या बाजूने उभे राहण्याबाबतचे! ‘विज्ञान हे वैश्विक आहे’, असे सहजपणे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात विज्ञानाच्या क्षेत्रांत काम करणारे लोक आपापल्या शासनाच्या मागे फारशा (लेखक व कलावंतांइतक्या) शंका उपस्थित न करता उभे राहतात. जर्मनीतील वैज्ञानिकांच्या समूहाने एकत्रितपणे हिटलरला विरोध केला नाही. जर्मनीतील विज्ञानाच्या दीर्घकालीन वारशाचे हिटलरने अतोनात नुकसान केले, तरीही तिथे अनेक प्रतिभावंत माणसे अशी होती, जी सिंथेटिक ऑईल, जेट विमाने, रॉकेट प्रक्षेपणास्त्र आणि अणुबाँब बनवण्यासाठी आवश्यक असलेले संशोधन हिटलरच्या आदेशानुसार करत होती. त्यांच्याशिवाय जर्मनीची युद्धसामग्री उभारलीच गेली नसती.

दुसऱ्या बाजूला, ‘नाझी’ सत्तेवर आले तेव्हा जर्मन साहित्यक्षेत्रात काय झाले? संपूर्ण यादी प्रसिद्ध झालेली नसावी, पण माझा असा अंदाज आहे की, ज्यांनी हद्दपारी ओढवून घेतली किंवा ज्यांचा सरकारने अतोनात छळ केला अशा जर्मन लेखक- पत्रकारांपेक्षा जर्मन वैज्ञानिकांची संख्या फार कमी होती. पण याहून अधिक क्लेशदायक हे आहे की, अनेक जर्मन वैज्ञानिकांनी त्या (वंशश्रेष्ठत्वाचा सिद्धान्त मांडणाऱ्या) राक्षसी प्रवृत्तीकडून झालेले अपमान सहन केले. या संदर्भातील काही नावे व त्यांची विधाने प्रोफेसर ब्रॅडी यांच्या ‘द स्पिरिट अ‍ॅन्ड स्ट्रक्चर ऑफ जर्मन फॅसिझम’ या पुस्तकात सापडतील.

थोड्याफार वेगळ्या स्वरूपात हेच चित्र सर्वत्र आहे. इंग्लंडमधील आघाडीच्या वैज्ञानिकांमधील फार मोठ्या समूहाने भांडवलशाही समाजरचना स्वीकारली आहे. स्वातंत्र्याच्या काळातही त्यांना दिले गेलेले नाइटहूड, बॅरोनेटारीज आणि पिअरेजोस (सरदार, जहागिरदार, अंमलदार इ.) किताब पाहिले तर हे सहज लक्षात येईल. सर मॅक्स बिरबोहम यांच्यासारखा अपवाद वगळला, तर टेनिसनपासून आत्तापर्यंतच्या इंग्लिश लेखकांना (जे भरपूर वाचले जातात) असे किताब दिले गेले नाहीत. आणि ज्या इंग्लिश वैज्ञानिकांनी ते किताब स्वीकारले नाहीत, ते कधीतरी कम्युनिस्ट होते. याचा अर्थ इतर वैज्ञानिक आपापल्या क्षेत्रात चोख काम बजावत असतील, पण ते चिकित्सक होत नसत आणि काही बाबतीत तर अप्रामाणिकपणे वागत. म्हणजे वस्तुस्थिती ही आहे की, वस्तुनिष्ठ विज्ञानाच्या एक किंवा अनेक शाखांमध्ये शिक्षण घेतलेली आणि उच्च दर्जाच्या क्षमता असलेली व्यक्ती मानवतावादी, संशयवादी व चिकित्सक दृष्टिकोन असणारी असेलच, असे नाही. पाचसहा महान राष्ट्रांचे भौतिकशास्त्रज्ञ अतिशय उतावीळपणे अणुबॉम्ब निर्मितीसाठी गुप्तपणे संशोधन करत होते, हे याचे निदर्शक आहे.

मग याचा अर्थ असा आहे का, की सामान्य जनता विज्ञानाचे शिक्षण अधिक घेतलेली नसावी? नाही! याचा अर्थ एवढाच आहे की, विज्ञानाचे शिक्षण मोठ्या समूहाला कमी उपयुक्त आणि अधिक नुकसानकारक ठरेल, जर ते शिक्षण केवळ भौतिक-रसायन किंवा जीवशास्त्र अशा विषयांचे असेल, आणि त्या समूहाला साहित्याचा व इतिहासाचा परिचयही नसेल. बहुतांश माणसांवर याचा संभाव्य परिणाम असा होईल की, त्यांच्या विचारांच्या कक्षा संकुचित होत जातील आणि स्वत:ला ज्ञात नसलेल्या विषयांबाबत त्यांना तिरस्कारच वाटेल. आणि मग त्यांच्या राजकीय समस्यांवरील प्रतिक्रियाही कदाचित, (ज्यांना हिरोशिमा इतिहासाची थोडीबहुत माहिती आहे, कलाभिरुची आहे अशा) निरक्षर सामान्य माणसांपेक्षा कमी समज असणाऱ्या असतील.

नेमकेपणाने सांगायचे तर विज्ञानाचे शिक्षण याचा अर्थ विवेकी, चिकित्सक व प्रयोगशील प्रवृत्ती अंगी बाणवणे असाच असला पाहिजे. विचारांची अशी पद्धत जिच्यात केवळ माहितीची जंत्री नसेल आणि ती कोणत्याही समस्येच्या निवारणासाठी वापरता येईल. हे सर्व याच शब्दांत मांडले तर विज्ञानाचे शिक्षण नसल्यामुळे अपराधीपणाची भावना असणारा माणूस हे सर्व मान्य करेल. पण त्याला आणखी खोदून विचारले, तपशीलवार सांगायला लावले तर तो विज्ञानाचे शिक्षण म्हणजे वस्तुनिष्ठ विज्ञानाकडे अधिक लक्ष (म्हणजे माहितीची जंत्री) देणे असाच अर्थ घेईल.

विज्ञान म्हणजे केवळ ज्ञान नव्हे, तर जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन या कल्पनेला प्रत्यक्ष व्यवहारात मात्र प्रचंड विरोध होतो. टोकाचा व्यावसायिक मत्सर हे त्याचे एक कारण असावे. विज्ञान ही केवळ विचारपद्धती किंवा दृष्टिकोन असेल तर ज्याची विचारप्रक्रिया पुरेशी विवेकी आहे, अशा कोणालाही एका मर्यादित अर्थाने ‘वैज्ञानिक’ म्हणायला हरकत नसावी. पण मग आज फार मोठी प्रतिष्ठा मिळत आहे, असे मर्यादित अर्थाने वैज्ञानिक असलेले रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ यांचे आणि ते इतरांपेक्षा अधिक शहाणे असतात या दाव्याचे काय?

शंभर वर्षांपूर्वी चार्ल्स किंग्जले यांनी विज्ञानाचे वर्णन ‘प्रयोगशाळेत ओंगळवाणे वास निर्माण करणारा विषय!’ असे केले होते. या उलट, दोनेक वर्षांपूर्वी एक तरुण रसायन उद्योजक मला अत्यंत निरागसपणे सांगता होता की, ‘कवितेचा काय उपयोग होतो तेच मला कळत नाही’. म्हणजे मत-मतांतरे या टोकापासून त्या टोकापर्यंतची आहेत. पण यापैकी कोणताही एक दृष्टिकोन दुसऱ्याहून अधिक चांगला आहे असे मला वाटत नाही. आजच्या काळात विज्ञानाची श्रेणी सर्वांत वरची मानली जाते आणि म्हणून जनसामान्यांना विज्ञानाचे शिक्षण दिले पाहिजे, हा दावा आपण ऐकून घेतो आणि ते योग्यही आहे. पण त्याचप्रमाणे वैज्ञानिकांनीही इतर विषयांचे थोडेफार शिक्षण घेतले तर त्यांना त्याचा फायदाच होईल असा प्रतिदावा करता येईल. मात्र तो दावा आपण ऐकून घेत नाही.

हा लेख लिहायला सुरुवात करण्याआधी मी एका अमेरिकन नियतकालिकात वाचले की, अनेक ब्रिटिश व अमेरिकन वैज्ञानिकांनी अणुबॉम्बवरील संशोधन करण्यास सुरुवातीपासून नकार दिला आहे. म्हणजे विक्षिप्तांच्या जगात अशी काही शहाणी माणसे आहेत तर! त्या लोकांची नावे प्रसिद्ध झालेली नसली तरी माझी अशी खात्री आहे की, त्या सर्वांना बऱ्यापैकी सांस्कृतिक पार्श्‍वभूमी असेल आणि इतिहास, वाङमय किंवा कलेचा थोडाबहुत परिचय असेल. थोडक्यात ते असे लोक आहेत ज्यांची अभिरूची (हल्लीच्या परिभाषेत) शुद्ध वैज्ञानिक नाही!

(हिटलरची आत्महत्या, हिरोशिमा व नागासकी या शहरांवर अमेरिकेने टाकलेले अणुबॉम्ब आणि दुसऱ्या महायुद्धाची अखेर या पार्श्वभूमीवर लंडनमधील ‘ट्रिब्यून’ या नियकालिकाच्या ऑक्टोबर १९४५ च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.)

.............................................................................................................................................

(‘साधना साप्ताहिका’च्या २ सप्टेंबर २०१७च्या अंकातून साभार)

अनुवाद : विनोद शिरसाठ. अनुवादक ‘साधना साप्ताहिका’चे संपादक आहेत.

vinod.shirsath@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

प्रा. मे. पुं.  रेगे यांचे तात्त्विक विचार जागतिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक असूनही ते विचार इंग्रजीत जावेत, असे त्यांचे चहेते असणाऱ्या सुशिक्षित वर्गाला का वाटले नाही?

प्रा. रेगे मराठी तत्त्ववेत्ते होते. मराठीत लिहावे, मराठीत ज्ञान साहित्य निर्माण करावे, असा त्यांचा आग्रह असला, तरी खुद्द रेगे यांच्या विचारविश्वाचे, त्यांच्या काही लिखाणाचे अवलोकन करता त्यांचे काही विचार केवळ कार्यकर्ते, विचारवंत आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, अन्य तत्त्वज्ञान प्रेमिक यांच्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या समग्र मराठी लेखनावर इंग्रजीसह इतर भाषिक अभ्यासक, चिंतकांचाही हक्क आहे.......

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......