अजूनकाही
किशोरीताईंनी रागाची व्याख्या केली होती – ‘राग म्हणजे भाव’. एका रागाचा एकच विवक्षित भाव, असा त्याचा अर्थ होतो. कालांतरानं ताईंनी या व्याख्येचा आग्रह सोडला. रागाचं एक वातावरण असतं आणि ते विवक्षित असतं, असं त्या म्हणू लागल्या. त्यानंतर राग चैतन्यरूप आहे, त्याला ‘स्व’भाव आहे, हा आपला अनुभव त्या सांगू लागल्या. विवक्षित भाव यापेक्षा हा दृष्टिकोन व्यापक झाला. शास्त्रीय संगीत म्हणजे रागसंगीत हे भावविहीत, भावनिरपेक्ष नाही, किंबहुना तेच खरं भावसंगीत आहे असं त्या, विशेषत: कलाकारांना, तळमळीनं सांगत राहिल्या. संगीत म्हणजे स्वरांची भाषा आणि ही भाषा वाहनासाठी सर्वाधिक अनुकूल आहे, असा निर्वाळा त्या देत राहिल्या. ‘All arts aspire towards music’ हे जे म्हटलं जातं, ते यामुळेच असं त्या म्हणत. ‘प्राचीन ऋषींनी स्वरांना पाहिलं आहे. त्यांचे रूप-रंग-स्वभाव त्यांनी वर्णन करून ठेवले आहेत, ते सगळं काल्पनिक असं कसं म्हणता येईल?’ अशी ताईंची धारणा होती.
सश्रद्ध अंत:करणानं प्राचीन ऋषींचा अनुभव, जो आपल्यासाठी परानुभव आहे, त्या परानुभवाचा, अनुसंधानानं स्वानुभव करणं ही साधना आहे आणि ती आपण करतो असं ताई सांगत. स्वरांचं नवरसांशी साहचर्य आहे आणि ते वैश्विक आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. रागसंगीतात स्वरांचा हेतूपूर्वक प्रयोग होतो – स्वरांची नक्षी विणणं – म्हणजेच सौंदर्यनिर्मिती हा तो हेतू नाही. भाव प्रतीयमान करणं हा तो हेतू आहे. हे सगळं ऐकताना-वाचताना भारावून जायला होतं. पण ते समजून घेणं, उमजणं दुरापास्त वाटतं.
धैवत (ध) या स्वरांचं अदभुत रसाशी साहचर्य आहे असं प्राचीन ऋषींनी लिहून ठेवलं आहे, हे खरं कशावरून? कशावरून धैवतातून अदभुताची प्रतीती येते किंवा धैवतातून येणारी प्रतीती ही अदभुताची(च) असते, हे प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येक वेळी खरं असेल का?
ताईंना असे प्रश्न बाष्कळ वाटत. स्वराच्या निकट जा, आणखी जवळ जा, सर्व बाह्य उपाधी दूर करून निखळ स्वराच्या जवळ जा, तुम्हाला स्वर तेच दर्शन देईल, असा भरवसा ताई देत. शास्त्रकारांवर प्रगाढ विश्वास ठेवून, अचूक अभ्यास करून आपलं रागसंगीत गायकांनी भावानुगामी करावं म्हणजे ते लोकप्रिय होईल. आम्ही गायकांनी माहिती आणि माध्यम यांच्या नको तेवढं मागे लावून अनुभूती आणि हेतू याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संगीत (आपलं शास्त्रीय संगीत) लोकांपासून दूर गेलं. खरं म्हणजे लोक शास्त्रीय संगीतापासून दूर गेले, असं ताई म्हणत. त्यांना ते प्रामाणिकपणे तसं वाटत असे.
आता ताईंना कसं आणि कोणी सांगावं की, अभिजात कलेची लोकप्रियता आणि लोकप्रिय कलेची लोकप्रियता, हे विषय, व्याख्या, व्याप्ती, मोजमाप सगळ्याच बाबतीत एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. माध्यम आणि हेतू, साधन आणि साध्य अशी काटेकोर फारकत करता येत नाही. असा फरक करणं ही केवळ वैचारिक सोय आहे.
निवांत पहुडलेल्या आळशी माणसाची गोष्ट ठाऊक आहे ना? एक उद्योगी माणूस त्या आळशी माणसाला कार्यप्रवृत्त करू पाहत असतो. आळशी माणूस प्रत्येक पायरीला ‘याने काय होईल\मिळेल?’ असा प्रश्न करत असतो. या प्रश्नोत्तराच्या पाठशिवणीच्या खेळात उद्योगी माणूस एका पायरीला उत्तर देतो – “की मग तुला आराम करायला मिळेल…” आळशी माणूस म्हणतो – “मग मी आता काय करतोय?” साधन-साध्य फारकतीचा विचार करताना मला हीच गोष्ट आठवते. ‘आनंद’ हे साध्य आणि ‘संगीत’ हे साधन अशी फारकत करणं आत्मघातकी आहे. संगीतानंद हेच साध्य असं म्हणणंच सयुक्तिक आहे.
ताईंना बहुधा असं म्हणायचं असेल की, बहुतांश गायक केवळ पाठांतरवजा, गतानुगतिक, आपण काय, कशासाठी गातो हे न समजता गातात आणि त्यामुळे अशा गायकांचं अवतारकार्य म्हणजे केवळ ‘गळ्याची तयारी दाखवणं’ एवढंच उरतं. जे जे म्हणून गावं ते ते त्या रागाचं वातावरण गहिरं करणारं असावं. रागाच्या भावाचा उत्कर्ष करणारं असावं. असंगत, वातावरण बिघडवून टाकणारं नसावं एवढा सरळ साधा, सोपा अर्थ ताईंच्या भूमिकेतून समजून घेणं शक्य आहे. एवढा राग-भाव संबंध हा विषय अतिशय गहन आहे. आणि विवाद्यसुद्धा!
संगीतात भाव कसा\कशानं उत्पन्न होतो? (मुळात होतो का, आणि होत असला तर मग हा प्रश्न येतो…) सुट्या, स्वतंत्र स्वराला भाव असतो का, की स्वरावली तयार झाली की भाव उत्पन्न होतो? स्वराला (‘Pitch’ या अर्थानं भाव असतो का? जरा, भास्कर चंदावरकरांचं पुस्तक आठवा म्हणजे ‘स्वर’ या अस्तित्वाच्या मिती आठवतील – उंची – Pitch, लहान-मोठेपणा, पोत, लांबी) यातली कोणती मिती भाव अभिव्यक्त करते? की या सर्वांचं संयुग स्वराला भाव देतं? गायकाचा कायिक अभिनय या कारणी कितपत उपयोगाचा – आणि कितीसा निषिद्ध? भाव निश्चितीसाठी स्वराला शब्दाची जोड अनिवार्य आहे का?
प्रश्न बरेच आहेत. आणि वेळोवेळी किशोरीताईंनी (आणि अन्य कलाकरांनीही) या प्रश्नांवर आपली मतं मांडली आहेत. स्वरांची भाषा स्वायत्त आहे. शब्दांची जोड या भाषेला गरजेची नाही, एवढंच नाही तर ती हानिकारक आहे असं ताई सांगत. स्वर, भाव अभिव्यक्त करतो. भावाभिव्यक्तीसाठी कायिक अभिनयाची गरज तर नाहीच, किंबहुना असा अभिनय हानिकारक आहे असंही ताई सांगत.
कायिक अभिनय एकतर कृत्रिमता आणतो आणि गायकाचा वैयक्तिक भाव तो व्यक्त करतो. संगीतातला भाव – स्वरभाव हा विदग्ध (ताईंचा आवडता शब्द) म्हणजे refined आणि स्थल-काल-व्यक्ती निरपेक्ष असतो आणि म्हणून तो व्यापक असतो.
दु:खाच्या प्रसंगी चित्रपटात नायिका गाता गाता हुंदके देते. चित्रपटात हे ठीक आहे, पण शास्त्रीय गायनात हुंदके देता येणार नाहीत. हुंदक्यात जरी ध्वनी असला तरी हुंदका स्वरभाषेचा घटक नाही. शास्त्रीय गायकाला हुंदक्याची भावावस्था स्वरातून-स्वरावलीतून व्यक्त करायची असते. (कसंही करून) दु:ख हा भावनुभव देणं हा संगीताचा – अगदी करुणरस प्रधान रागाचाही – अंतिम उद्देश नाही. संगीताच्या भाषेतून तो अनुभव देणं हे संगीताचं ब्रीद आहे. (हुंदका, आरोळी, गर्जना, बोबडी वळणं…) शांततेचा अनुभव देण्यासाठी नाहीतर गायकाला शांतच बसावं लागेल. (हा पर्यायही काही फार वाईट नाही, नाही का?) असो.
गायकानं रागाचं गायन करावं, भाव – जो काही असेल तो – (आपोआपत) प्रकट होईल, अशी एक भूमिका घेता येते. या विरुद्ध म्हणजे गायकानं रागाचा भाव समजून घ्यावा आणि तो अभिव्यक्त करण्यासाठी योग्य, अनुकूल सामग्री निवडावी. पुष्कळदा हे दोन पर्याय संपूर्ण स्वतंत्र राहत नाहीत. सांगीतिक सामग्रीची निवड ही लक्षपूर्वक केली किंवा नाही, तरी निवड होत असते. जेव्हा जाणीवपूर्वक ही निवड होत नाही, तेव्हा ती नेणीवेतून होत असते. म्हणजेच राग तुमचं बोट धरून आपल्याबरोबर, आपल्या वाटेनं तुम्हाला चालवत असतो. नेणीवेतली निवड अनेक घटकांवर अवलंबून असते.
ताईंचं म्हणणं असं असावं (असा माझा अंदाज आहे) की, नेणीव निखळ अम्लान राहू द्यावी. एकाग्रता जेवढी वाटेल तेवढे असांगीतिक घटक दूर सरतील. एखादे वेळेला रागानं जे दर्शन दिलं आहे, त्या अनिर्वचनीय दर्शनाची आस धरावी. “केशवा, मला भीती वाटते रे… माझा धीर होत नाही…, येईल का रे तो राग…?” ताईंची अशी सगळी विधानं त्या दर्शनाला अनुलक्षून असत.
रागगायनात – खयाल गायनात म्हणू या – बंदिश असते. बंदिशीचं काव्य आपल्याला जाणवणाऱ्या रागभावाशी मिळतं-जुळतं एवढं पथ्य शब्दार्थ कळणारा प्रत्येक गायक पाळीत असावा (पण शंका यावी असे मासले अनेक आहेत! जाऊ दे!), पण खयालात त्या शब्दांना स्वरबद्ध वगैरे करायचं नसतं, त्या शब्दांच्या मागे जायचं नसतं, खयालाची जशी बढत होत जाईल, तसे ते शब्द केवळ उच्चार उरावेत, स्वरांनी बोलायला खयाल गायनात अनेक गानक्रियांचा वापर होतो. मींड आणि गमक या त्यातल्या प्रमुख क्रिया. कण, खटका, मुरकी, झमझमा… अनेक क्रिया आहेत. ताईंची नेहमी तक्रार असे की, गायक या क्रिया (किंवा त्यांना अलंकारही म्हणता येईल) विवेकानं वापरत नाहीत. रागभावाला अनुकूल अशाच किंवा वापरल्या जाव्यात.
एकदा टीव्हीवर एका प्रसिद्ध गवयाचा मारवा चालला होता. ताईंनी मला विचारलं – “त्याला भेटून सांग रे, नको त्या मुरक्या आणि हरकती घेऊस त्या मारव्यामध्ये. मारव्याला आपली भाषा बोलू दे. तुझ्या भाषेत त्याचं बोलणं नको ऐकवू.” एका गंभीर प्रात:कालीन रागाच्या स्वरचित बंदिशीत एका गायिकेनं एक हरकत लावलेली ताईंनी ऐकली, तेव्हाही त्या अस्वस्थ झाल्या.
आता पुन्हा मुद्दा येतो – एखादा राग ताईंना जसा दिसतो, तसाच तो इतरांना दिसण्याची सक्ती आहे का? हरकती-मुरक्यांनी नटलेलं, मारव्याचं रूप, नटू पाहणारा मारव्याचा स्वभाव त्या कलाकाराला भावू शकत नाही का? अशा प्रश्नावर आपण कोण उत्तर देणारे? आवडणं-न आवडणं आपल्या हाती असतं. थोडं खोलात जाऊन पाहिलं तर अशी ही शक्यता लक्षात येते की, त्या गायकाला नटव्या स्वभावाचा वगैरे मारवा काही कुठे भेटलेला नाही. हरकती-मुरक्या ही त्याच्या गळ्याची सवय आहे एवढंच. कलाकार जितका मोठा असतो, तितकी त्याची प्रस्तुती पारदर्शक असते. त्याला जे जसं दिसतं, ते तसं तो तुमच्यापर्यंत पोचवतो आणि त्या दर्शनासाठी आवश्यक अभिरूचीही ती कलाकृती तुमच्यात उत्पन्न करते, असा माझा (भाबडा?) विश्वास आहे.
ताना फार बदनाम आहेत. ताना सुरू झाल्या की, भावाचा अवतार आटोपतो असं भले भले म्हणतात. खुद्द किशोरीताईंनी अनेक रागांत ताना निषिद्ध मानल्या आहेत. पण मला तान आवडते. तानेनं रसभंग होतो असं मला वाटत नाही. रागाचा बनलेला माहोल तानांनी विस्कटतो असं अनेक वेळा म्हटलं जातं, ते मला फारसं खरं वाटत नाही. ज्यांच्या विलंबित गायनात फारसा माहोल बनलेला नसतो, अशा गवयांनी त्याच पद्धतीनं ताना मारल्या म्हणून काही विस्कटणं-बिघडणं असा काही धोका नसतोच. पण जे कलाकार माहोल बनवतात, ते तानाही अशाच घेतात की रागभावाचा उत्कर्ष व्हावा.
बंदिशीच्या शब्दांना सजवण्यासाठी खयाल गायला जात नाही. बंदिशीचे शब्द किंवा त्यांचा अर्थ ही काही खयालाची सीमारेषा नाही. विशिष्ट चषकात ओतल्यावरच ज्याला खुमारी आहे, असं काही खयाल हे पेय नाही. निवडक रंग-रंगोटी, कपडे, दागिने घालून सजवायची खयाल ही बाहुली नाही. खयाल आहे एक लसलसता अनुभव. एक शोध, एक आकांक्षा. निरोप समारंभाला केलेल्या भाषणांसारखा नसतो रागाचा भाव, तर तो असतो जवळ नसलेल्या व्यक्तीची भेट आणि ताटातूट एकाच वेळी घडवणाऱ्या आठवणींसारखा!
लेखक अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.
kdparanjape@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment