टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सर्वोच्च न्यायालय, आधार कार्ड, बाबा राम रहिम, विराट कोहली, स्वामी ओम आणि मोहम्मद कैफ
  • Fri , 25 August 2017
  • विनोदनामा टपल्या सर्वोच्च न्यायालय Supreme court आधार कार्ड Aadhar Card बाबा गुरमीत राम रहिम Baba Gurmeet Ram Rahim विराट कोहली Virat Kohli स्वामी ओम SwamiOm मोहम्मद कैफ Mohammad Kaif

१. व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या निकालाने आधारसक्तीच्या निर्णयावर मोठा परिणाम होणार आहे. नऊ सदस्याच्या घटनापीठानं एकमतानं हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारला हादरा बसला आहे. सामाजिक कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. आधारसक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयता या  मूलभूत अधिकाराचा भंग होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

रेल्वेचा पास काढताना आधारसक्ती, मोबाइलच्या नंबरला आधार जोडणं, अशा मार्गानं हळूहळू बाळाला पोलिओची लस पाजतानाही आधारसक्तीपर्यंत हे सरकार जाईल, अशी दाट शक्यता होती. कदाचित जन्माला आल्यानंतर ट्यँहँ करण्याच्या आधी बाळाला आधार नंबर विचारला जाईल, अशी परिस्थिती या सरकारच्या, नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ करण्याच्या अतिउत्साहानं आणली होती. देशातल्या प्रत्येक नागरिकाला रांगेत उभं करून झालं, आता प्रत्येकाला काहीही सामान्य व्यवहार करताना गुन्हेगारी कृत्य करतो आहोत, ही भावना देण्याचा हा प्रयत्न काही प्रमाणात हाणून पाडला गेला आहे, हे स्तुत्य आहे. नशीब यांनी निकाल देण्याआधी न्यायाधीशांकडे आधार नंबरची मागणी नाही केली.

.............................................................................................................................................

२. सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी तिहेरी तोंडी तलाकची प्रथा घटनाबाह्य व बेकायदा ठरवण्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर त्याचं स्वागत करणारा भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याला धर्मबांधवांच्या ट्रोलिंगला बळी पडावं लागलं. ‘तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवण्याच्या न्यायालयाचं मी स्वागत करतो. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना सुरक्षा मिळेल. महिलांना समानतेचा हक्क देणाऱ्या या निर्णयाची गरजच होती,’ असं ट्विट मोहम्मद कैफने केल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर हिंस्त्र ट्वीट्सचा मारा केला.

एरवी भारतीय जनता पक्षाचे सहानुभूतीदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त समाजमाध्यमांवर ज्या प्रकारे विरोधी मत व्यक्त करणाऱ्यावर तुटून पडतात, त्यांच्यात आणि कैफवर हल्ला चढवणाऱ्यांमध्ये काहीही गुणात्मक फरक नाही. कैफला धर्म शिकवायला निघालेल्या एकालाही एक नातं केवळ एका शब्दाच्या एकतर्फी त्रिवार उच्चारानं एकतर्फी निकालात निघावं, हे माणुसकीशून्य आहे, असं वाटलं नाही, यातच त्यांची एकंतर संवेदनशीलता दिसून येते. कैफच्या कौटुंबिक फोटोंवर तुटून पडणाऱ्या या गणंगांच्या टीकेला न जुमानता कैफ नेहमीच आपली मतं स्पष्टपणे मांडतो, हे कौतुकास्पद आहे.

.............................................................................................................................................

३. बेताल विधानांनी वाद निर्माण करून सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहणारा स्वामी ओम हा तिहेरी तलाकच्या निकालावर प्रतिक्रिया देत असताना त्याला मारहाण करण्यात आली. स्वामी ओमच्या एका समर्थकाला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी तिहेरी तलाकची प्रथा मोडीत काढली. या निकालावर प्रतिक्रिया देण्यासाठी स्वामी ओमही तिथं पोहोचला. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या ठिकाणी उभे होते, तिथे ओम स्वामी घुटमळत होता. शेवटी एका पत्रकारानं या वृत्तावर स्वामी ओमला प्रतिक्रिया विचारली. स्वामी ओमही प्रतिक्रिया देण्यासाठी सरसावला. मात्र त्यानं बोलायला सुरुवात करताच तिथं थांबलेले काही तरुण संतापले. स्वामी ओम काहीही बरळतो असं सांगत त्या तरुणांनी स्वामीला रोखलं. यानंतर त्याला धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केला. स्वामी ओमच्या एका शिष्यानं त्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणांनी त्यालाही चांगलंच चोपलं. प्रकरण चिघळत असल्यानं बघून स्वामी ओमनं तिथून काढता पाय घेतला.

स्वामी ओम हा महामूर्ख असेल, वादग्रस्त बोलून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्याची सवय असेल. पण, अखिल भारतवर्षात असा हा एकच इसम आहे का? अशाच सवयी असलेले आणि इतकाच बुद्ध्यांक असलेले अनेक लोक वेगवेगळ्या पक्षांमध्ये, सरकारांमध्ये प्रमुख पदांवर आहेत आणि त्यांच्या गरळओकू बरळण्यातून दंगली उसळतात, मुडदे पडतात. त्यांना बोलण्याचा हक्क असेल, तर स्वामी ओमला का नाही? देशात फक्त सुज्ञ व्यक्तींनीच बोलायचं, असा फतवा निघाला, तर स्मशानशांतता पसरेल.

.............................................................................................................................................

४. देशातील सनदी अधिकारी आणि उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती धोरणासंदर्भात मोदी सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या धोरणाचा अंतिम मसुदा निश्चित झाला असून याद्वारे सरकार राष्ट्रीय एकात्मतेचा नवा प्रयोग करू पाहत आहे. त्यानुसार आता भारतीय प्रशासकीय सेवा (आईएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि भारतीय वन सेवा (आईएफओएस) या पदांवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना राज्यांऐवजी ठरवून दिलेल्या झोनचा विचार करावा लागणार आहे. सध्या या तिन्ही सेवांसाठी नियुक्ती करताना विशिष्ट राज्यांच्या केडरचा विचार केला जातो. याशिवाय, विशिष्ट निकषांची पूर्तता केल्यानंतर यापैकी काही अधिकाऱ्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवरही पाठवलं जातं. मात्र, आता राज्यनिहाय केडरच्या या धोरणात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार देशातील २६ केडरची पाच झोनमध्ये विभागणी होईल. हे अधिकारी भौगोलिकदृष्ट्या लांब असणाऱ्या राज्यांमध्ये काम करायला फारसे उत्साही नसतात. सरकारला अधिकाऱ्यांची हीच सवय मोडायची आहे. घरापासून लांब असलेल्या राज्यांमध्ये काम केल्यानं या अधिकाऱ्यांमधील राष्ट्रीय एकीकरणाची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असा सरकारचा विचार आहे.

हे सगळं ऐकायला वगैरे फार छान आहे. अधिकाऱ्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जावं, वेगळ्या प्रांतात जाऊन तिथल्या जनजीवनाशी जोडलं जावं, हे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं छानच आहे. पण, आपल्या कार्यकाळात पक्षातल्या आणि देशातल्या प्रमुख पदांवर गुजराती व्यक्तींची नेमणूक करणाऱ्या आणि आपण शाकाहारी आहोत, तर जणू सगळा गुजरातच शाकाहारी आहे, अशा रीतीनं पंतप्रधानपदावरून आपल्याच राज्याच्या शेलक्या खाद्यपदार्थांचा प्रचार करणाऱ्या पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांकडून ही अपेक्षा करावी, हे जरा मजेशीर आहे.

.............................................................................................................................................

५. सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला गुरूमंत्र दिल्याचा दावा केला आहे. या मंत्रामुळेच विराट कोहलीची फलंदाजी बहरल्याचं त्यांनी सांगितलं. विराट कोहली याने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र, त्या वर्षी विराटला फक्त ५ एकदिवसीय सामन्यांमध्येच खेळण्याची संधी मिळाली. २००९ हे वर्षही विराटसाठी निराशाजनक ठरलं. याच काळात विराटनं बाबा राम रहीम यांची भेट घेतली आणि बाहुंमध्ये बळ निर्माण करण्यासाठी काय करता येईल, असं त्यांना विचारलं होतं. तेव्हा बाबा राम रहीम यांनी विराटला आक्रमकपणे खेळ, असा गुरूमंत्र दिला. त्यानंतर २०१० मध्ये विराट कोहलीनं एकूण २५ एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने ७ अर्धशतकं आणि ३ शतके झळकावली. तेव्हापासून विराट कोहलीची फलंदाजी सातत्याने बहरत आहे. विराट कोहलीच नव्हे, तर शिखर धवन, आशिष नेहरा, झहीर खान आणि युसूफ पठाण हे भारतीय संघातील खेळाडूही आपल्याकडे सल्ला मागण्यासाठी आले होते, असा दावाही बाबा राम रहीम यांनी केला होता.

आता भारतीय क्रिकेट संघासाठी प्रशिक्षक, मॅनेजर, गोलंदाजी कोच, फलंदाजी कोच, फिजिओ, ट्रेनर यांच्याबरोबर एक अधिकृत बाबाही नेमण्यावर बीसीसीआय गंभीरपणे विचार करेल का? कदाचित योग्य बाबा नेमला तर संघाला या बाकी सगळ्या प्रशिक्षकांची गरजही पडणार नाही. त्यांवरचे पैसेही वाचतील. शिवाय, प्रतिस्पर्धी संघावर झाडफूँक करून त्यांना खेळण्याआधीच नामोहरम करण्यासाठी एखादा तांत्रिक-मांत्रिकही नेमायला हरकत नाही.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......