अजूनकाही
सार्त्र, काम्यू, काफ्का, किर्केगार्द आदी अस्तित्ववाद्यांनी मानवी अस्तिवाचा अर्थ शोधताना मानवाचं रूपांतर किटकात झालं असल्याचं भान व्यक्त करताना त्याच्या अर्थशून्यतेचा नवा प्रत्यय जगाला आणून दिला. मराठीत मर्ढेकरांनी मानवाचं मुंगीत रूपांतर झाल्याचं भान दिलं; तर नेमाड्यांच्या सांगवीकरनं आपण आपल्याभोवती स्वत:च कोश विणत आपला कोसला झाला असल्याचं जाहीर केलं. तर अलीकडे लेखकाचा मृत्यू जाहीर करून वाचकांना केंद्रस्थानी आणलं आहे. अशा एका मोठ्या टप्प्यावर येऊन थांबलेल्या आणि अर्थशून्य झालेल्या मानवाचं अस्तित्व तरीही चिरंतन आहे. अशा अस्तित्वाचं काय करायचं हा खरा प्रश्न आजच्या कलावंतापुढं आहे. आणि हा प्रश्न महेश लोंढेपुढेही आहे. तो प्रश्न नोंदवताना लिहितो-
आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर
चालत नाही
निसर्गाचे कुठलेही घड्याळ
आपण डोळे झाकल्याने
कुठेच होत नाही रात्र अन्
उघडल्याने नाही उगवत कुठला दिवस
शेवटी जेव्हा उडून जातो आपला प्राण
तेव्हा त्याला कुणीही म्हणणार नाही महानिर्वाण
मानवाच्या या अर्थशून्यतेचेभान महेशला असल्यामुळेच तो ‘निद्रानाशाची रोजनिशी’ लिहायला बसला आहे. मानवाचं एकूण जगणं भयावह, कृत्रिम आणि वेगवान झाल्यामुळं आणि अशा या वेगवान जगण्याला दिशाहीन करणाऱ्या धर्मांध, मूलतत्त्ववादी शक्ती वेगानं डोकं वर काढून सबंध अस्तित्वालाच घेरून टाकू लागल्या आहेत. अशा या काळात आपलं स्वत्व जपणं आणि आपल्या अस्तित्वाला या व्यवस्थेत ओतून ठामपणे उभं राहणं मुश्कील बनत चाललेलं असताना महेशची कविता या अर्थशून्यतेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्न करते, हे त्याच्या कवितेचं महत्त्वाचं लक्षण आहे.
अलीकडच्या काळात केवळ आशयावर भिस्त ठेवून आणि प्रचारकी भूमिकेला बळी पडत चाललेल्या कवितेच्या अवकाशात महेशची ही कविता उठून दिसणारी आहे. आशयाच्या पलीकडे जाऊन, भाषेवर ताबा मिळवून, तो आशय रूपामध्ये ट्रान्स्फर करण्याची क्षमता बाळगणारी ही कविता अस्तित्वाच्या अर्थशून्यतेला अर्थपूर्ण बनवू पाहते. ही अर्थपूर्णता नकाराऐवजी सकारात्कतेकडे घेऊन जाणारी आहे. ही सकारात्मकता शोधताना कवी मानवाच्या निसर्गाशी असलेल्या आदिम नात्याचा नवा अन्वयार्थ लावताना लिहितो-
खिडकीकडे पाठ करून पाखरांकडे द्यायचेत वृक्ष
पाखरं येतील वाळवंट खातील तेव्हा
कुथल्या तरी कीटकाला भर उन्हात मिळालेला असेल मोक्ष
खुल्या अंगणात पालथ्याने चांदण्यांकडे ठेवायचेय लक्ष
झोप लागेल जाग यईल तेव्हा रात्रीचा कदाचित असेल
भरून आलेला वक्ष
आजच्या संभ्रमित वर्तमानाला शब्दबद्ध करताना महेश भाषेची मोडतोड करतो. भाषेला वाकवून स्वत:ची भाषा तयार करताना दिसतो. त्यासाठी तो निसर्गाची वेगळी भाषा बोलतो. परंपरेचं पुनर्वाचन करतो. तसंच तिचं विरूपीकरण करताना आपल्या अस्तित्वाचे रंग भरत जातो आणि स्वत:चा असा नवा अन्वय त्याला देतो.
एकूणच आपली स्वत:ची वेगळी शैली आणि नवी ओळ्ख निर्माण करणारी ही मराठीतली महत्वाची कविता आहे.
निद्रानाशाची रोजनिशी - महेश दत्तात्रय लोंढे
बारलोणी बुक्स,पाने - ९०, मूल्य - १२० रुपये.
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3998
.............................................................................................................................................
लेखक विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
mahendrakadam27@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment