टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • शरद पवार, संजय राऊत, मोहन भागवत आणि माते महादेवी
  • Thu , 24 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या शरद पवार Sharad Pawar संजय राऊत Sanjay Raut मोहन भागवत Mohan Bhagwat माते महादेवी Mate Mahadevi

१.  ‘मनी’ आणि ‘मुनी’च्या जोरावर भाजपने मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक जिंकली, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत केला. निवडणुकीत भाजपचा प्रचार करणाऱ्या जैन मुनींवरही त्यांनी शेलक्या शब्दांत टीका केली. या जैन मुनींनी जातीच्या आधारावर मतं मागितली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांच्या राजकारणासाठी एखाद्या जैन मुनीसमोर लोटांगण घालणं, हा आचारसंहितेचा भंग आहे.

उगी उगी उगी! रूमाल आहे ना खिशात? या तथाकथित मुनीसमोर आपण लोटांगण घातलं होतं, त्याचं काय? मिराभाईंदरमध्ये अवघी ३० हजार लोकसंख्या असलेल्या जैनांनी पर्युषणकाळात आठ दिवसांची मांसाहारबंदी लादली, तेव्हा सत्तेत भागीदार असलेले शिवसेनेचे नगरसेवक चिडीचूप्प होते. कोळी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आणि मराठीजनांकडून शिवसेनेचे वाभाडे निघाले, तेव्हा ते आयत्या आंदोलनाचे नेते झाले. त्यानंतर जैन शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंना भेटलं आणि आम्ही जैनांच्या भावनांची कदर करतो वगैरे मखलाशा कशाला केल्या? शिवाय राजकारणात धर्माचं गदळ आणि साधू, महंत, योगी वगैरेंची वर्दळ घेऊन येण्याच्या पातकात शिवसेनाही तेवढीच मोठी भागीदार आहे, त्याचं काय?

.............................................................................................................................................

२. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आमच्या प्रकरणात ढवळाढवळ करू नका, असा थेट इशारा या समाजाच्या नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना दिला. भागवत यांनी काही दिवसांपूर्वी हुबळीमध्ये लिंगायत समाजातील गुरूंची भेट घेऊन स्वतंत्र धर्माचा हट्ट सोडून देण्याचा अनाहूत सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील कालच्या मोर्च्यात माते महादेवी यांनी भागवत यांना खडे बोल सुनावले. आम्ही भागवतांप्रमाणे पुराणकालीन मूल्यांना नव्हे, तर आधुनिक लोकशाहीच्या मूल्यांना धरून जगत आहोत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून सल्ला घेण्याची काडीमात्र गरज नाही, असं माते महादेवी म्हणाल्या.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या धुरीणांनी या देशाची एकंदर प्रकृती लक्षात घेऊन अतिशय दूरदृष्टीने आणि विचारपूर्वक फक्त राज्यघटनेवर आधारलेलं, धर्मनिरपेक्ष, कोणत्याही धर्मावर अधिष्ठित नसलेलं, संघराज्य प्रस्थापित केलं. त्याला सुरुंग लावून या देशाचं हिंदुराष्ट्र बनवायला निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा घरचा अहेर आहे. या कालबाह्य अस्मिता गुंडाळून भारतीयत्वाच्या झेंड्याखाली पुढे कूच करण्याऐवजी हिंदुत्वाचं मर्यादित आकलन राष्ट्रीयत्व म्हणून लादण्याचा हा उद्योग देशात किती चिरफळ्या निर्माण करू शकतो, त्याचे हे अशुभ संकेत आहेत.

.............................................................................................................................................

३. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार चार दिवसांत पाऊस पडल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असं विधान माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. वेधशाळेचा अंदाज खरा ठरल्यानंतर पवारांनी कर्मचाऱ्यांसाठी बारामतीवरून साखर पाठवली. पावसानं दडी मारल्यानंतरही, चांगला पाऊस होईल, असा अंदाज मागील आठवड्यात पुणे वेधशाळेनं वर्तवला होता.

वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांनी पुरेशा सावधतेनं बारामतीची साखर स्वीकारावी आणि शक्यतो इतरांमध्ये वाटून द्यावी किंवा इतर ठिकाणच्या साखरेमध्ये थोडी थोडी मिसळूनच तिचं सेवन करावं, अशा सूचना वेधशाळेच्या वरिष्ठांनी केल्या आहेत म्हणे! ही साखर ज्याच्या तोंडात पडते, तो बारामतीकरांचीच ‘री’ ओढायला लागतो, त्यांचीच भाषा बोलायला लागतो, असा या साखरेचा लौकिक आहे म्हणतात! काय सांगावं, उद्यापासून ढगही बारामतीच्या कलानं पाऊस पाडू लागतील.

.............................................................................................................................................

४. सांगलीमधील मणेराजुरीमध्ये असलेले म.पा.सा हायस्कूल बॉम्बनं उडवू, शाळेत कोणतीही परीक्षा घ्याल तर खबरदार! अशा धमकीचं पत्र प्राचार्यांना मिळाल्यानं तातडीनं पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी कसून केलेल्या चौकशीत हा सगळा प्रकार दोन विद्यार्थ्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

शाळेच्या परीक्षेची मुलांना धास्ती असतेच, पण ती इतकी असावी? शिवाय, शाळेत परीक्षा घेतली तर ती उडवून देऊ असं कोणतीही दहशतवादी संघटना का सांगेल? हे पत्र म्हणजे आपल्याच शाळेतल्या उपद्व्यापी पोरट्यांचा प्रताप आहे, हे शाळेतल्या एकाही शिक्षकाला किंवा मुख्याध्यापकाला वाटू नये! त्यासाठी पोलिस बोलवावे लागतात?

.............................................................................................................................................

५. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मौदाहा तालुक्यातील गदाहा गावात १० दिवस चालणाऱ्या रामायण पाठाच्या काळात दलितांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात त्यांना मंदिर प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली असून तशी नोटीसच दलितांच्या घरांवर लावण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे दलितांमध्ये प्रचंड संताप पसरला असून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दलितांचं अस्तित्व अशुभ मानलं जात असल्यानं गावात कोणतंही धार्मिक कार्य असेल तर आम्हाला गावाबाहेर ठेवलं जातं, असं या गावातील दलितांनी सांगितलं.

अरेच्च्या, आगामी हिंदुराष्ट्राचे हे दोन्ही घटक अजून हिंदू म्हणून एकवटलेले नाहीत काय? देशात, राज्यात कट्टर हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार असताना असं कसं झालं? की हिंदुराष्ट्रात शूद्रांना शिक्षणाचा, समानतेचा अधिकार नाकारला जाणार आहे पुरातन काळासारखा? हे तथाकथित पुजारी रामायणाचा पाठ पढतात, तेव्हा ते शंबुक वगैरे शूद्रांचे उल्लेख गाळतात की, प्रत्येक उल्लेखागणिक गोमूत्र प्राशन करून जीभ स्वच्छ करतात? तेवढ्या भागाचं वाचन खरंतर त्यांनी गायीच्या पार्श्वभागाखालीच बसून करायला हवं.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......