टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अमित शहा, शरद पवार, डोनाल्ड ट्रम्प, रामदास आठवले, श्री श्री रविशंकर आणि बाबा रामदेव
  • Wed , 23 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अमित शहा Amit Shah शरद पवार Sharad Pawar डोनाल्ड ट्रम्प Donald Trump रामदास आठवले Ramdas Athawale श्री श्री रविशंकर Sri Sri Ravi Shankar बाबा रामदेव Baba Ramdev

१. पुढील ५० वर्षं देशात भारतीय जनता पक्षाचंच सरकार राहील, असं विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतंच केलं होतं. त्यावर, शहा यांनी पंचांग घेऊन भविष्य सांगायचा व्यवसाय कधीपासून सुरू केला, हे मला माहीत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या विधानाची खिल्ली उडवली. सत्तेवर कोणता पक्ष किती दिवस राहणार याचा निर्णय जनताच करेल, अशी टिपणीही त्यांनी केली.

पवारसाहेब, आपलं बोट धरून राजकारणात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही नेमकं कसलं गुह्य ज्ञान दिलंत ते ठाऊक नाही; पण, त्यांचे एकनिष्ठ हनुमान असलेले अमित शहा प्रबळ विरोधकांच्या कुंडल्या मांडायला मात्र तुमच्याकडूनच शिकले असावेत, असं वाटतंय. या शिकवणीची परतफेड म्हणूनच काही कुंडल्या मांडल्या गेलेल्या नसाव्यात.

.............................................................................................................................................

२. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले. फोर्ट मायर इथं अमेरिकन सैनिकांशी संवाद साधताना त्यांनी भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांविषयीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर ताशेरे ओढले. दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान अशाच प्रकारे सुरक्षित आसरा ठरत राहिल्यास अमेरिकेला शांत बसता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानने आता दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी केली पाहिजे, असंही ते म्हणाले.

कित्ती कडक बोलतात नाही ट्रम्पतात्या! एखाद्या प्रेमळ आईने आपल्या नाठाळ कारट्याचा गालगुच्चा घेऊन आता परत त्या काकांची खोडी काढलीस, त्यांच्या घराला पुन्हा आग लावलीस तर अर्धा लाडूच देईन तुला, असं म्हटल्यासारखं वाटतं. शिवाय पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देणं खरोखरच बंद करायचं असेल, तर सगळ्यात आधी अमेरिका या जगातल्या सर्वांत मोठ्या युद्धसाहित्य पुरवठादार दहशतवाद-प्रसारक राष्ट्राला आपल्या भूमीवरून हुसकावायला हवं... काय म्हण्टा तात्या?

.............................................................................................................................................

३. अमेरिकेत सोमवारी खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळालं. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये, ही तज्ज्ञांनी केलेली आणि शाळकरी मुलांनाही माहिती असलेली सूचना धुडकावून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या बेदरकार वृत्तीला जागून उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहिलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अशा प्रकारे ग्रहण पाहिल्यानंतर अंधत्व येण्याचा धोका असतो.

ट्रम्पतात्या हे आत्मप्रेमामध्ये, स्थलांतरितांच्या द्वेषानं आणि गौरवर्णीयांच्या फुकाच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनांनी आधीच इतके ठार आंधळे झाले आहेत की, त्यांना सूर्यग्रहणानं आणखी काय अंधत्व येणार? त्यांचा सूर्यग्रहण पाहतानाचा फोटो मात्र पाठवून द्या. सूर्यग्रहणाच्या वेळी ट्रम्प यांना सूर्याने त्रिखंडाच्या महानेत्याचा चेहरा दाखवला आणि ट्रम्प गॉगल घालायला विसरले, असं पोस्टर आम्ही करून घेऊ फोटोशॉपमध्ये.

.............................................................................................................................................

४. सामाजिक-आर्थिक कारणांमुळे मुंबईतील ५० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहत असून त्यांना घटनेनं दिलेला निवाऱ्याचा हक्क कोणालाही डावलता येणार नाही. त्यामुळे २००० नंतरच्या झोपड्यांनाही राज्य सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यायलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

खरं सांगायचं तर आठवलेसाहेबांनी फारच फुटकळ मागणी केली आहे. देशाच्या, राज्याच्या, मुंबईच्या कोणत्याही भागातल्या माणसाने मुंबईत झोपडी बांधायचा विचार जरी मनात आणला, तरी सरकारने त्याला तेवढा प्लॉट, पाणी-वीज वगैरे सोयींसह दिला पाहिजे, शिवाय या खर्चिक शहरातलं जीवनमान लक्षात घेता माणशी दहाएक हजारांचा उदरनिर्वाह भत्ताही दिला पाहिजे. जागेची चिंता करू नका. आठवले साहेबांच्या बंगल्याच्या हिरवळीवरही तीनचार झोपड्या आरामात उभ्या राहू शकतील. शेवटी गरीबांच्या निवाराहक्काचा प्रश्न आहे.

.............................................................................................................................................

५. अल्पावधीतच ग्राहकाच्या पंसतीस उतरलेल्या योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीला बाजारात टक्कर देण्याची तयारी सुरू आहे. रामदेव बाबांच्या पतंजलीला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) कंपनी टक्कर देणार आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी 'श्री श्री आयुर्वेद' कंपनीने एक हजारहून अधिक दुकानं उघडण्याची तयारी केली आहे. सुरुवातीला टूथपेस्ट, डिटर्जंट, तूप आणि बिस्कीट्स ही उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

हे दोन बुवा सहकार्य करार करणार आहेत की, एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत? बाबा रामदेवांनी तथाकथित ‘स्वदेशी’ची बाजारपेठ तयार केली, तेव्हा त्यांना आपल्याच मूळ व्यवसायातून स्पर्धा निर्माण होईल, याची कल्पना नसावी. आता या दोन स्वदेशी बोक्यांच्या भांडणात लोण्याचा गोळा नेहमीप्रमाणे तथाकथित ‘विदेशी’ बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मटकावू नये म्हणजे झालं. आपण किती ‘स्वदेशी’ आहोत, हे दाखवण्याची त्यांचीही स्पर्धा सुरूच आहे की!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......