अजूनकाही
पुण्यात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एक वाद चिघळला आहे. हा वाद आहे गणेशोत्सवाच्या जनकत्वाचा. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी? १८९२मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी टिळकांच्याही आधी एक वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. म्हणून या उत्सवाचं जनकत्व रंगारी यांना देण्यात यावं आणि त्याला १२६ वर्षं झाली आहेत, याची नोंद घ्यावी, असा आग्रह पुण्यातल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टनं धरला आहे. हे गणपती मंडळ पुण्यात अप्पा बळवंत चौकात, शनिवारवाड्याच्या पाठीमागे आहे.
‘रंगारी की टिळक?’ हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयातही गेला आहे. पुणे महानगरपालिकेनं या वर्षी गणेशोत्सवाचं १२५वं वर्ष धूमधडाक्यात साजरं करण्याचा घाट घातला आणि या वादाला तोंड फुटलं. गणेशोत्सवाच्या १२५व्या वर्षाच्या लोगोचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करायचं होतं, तेव्हा हा वाद विकोपाला गेला. लोगोवर कुणाचं छायाचित्र असावं, टिळकांचं की रंगारी यांचं, यावरून कार्यकर्त्यांमध्ये ‘तू तू मैं मैं’ सुरू झाली. शेवटी गणपतीचं छायाचित्र घ्यावं, दोघांचंही नको असा तोडगा काढला गेला खरा, पण तो तात्पुरता ठरला. त्यानंतर रंगारी गणपती ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. उपोषणं, निदर्शनं इथपर्यंत मामला गेला.
रंगारी ट्रस्टचं म्हणणं असं की, ज्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे. इतिहास पुसता कामा नये. रंगारी यांनी पहिल्यांदा गणेशोत्सव सुरू केला आहे, तर त्यांचं श्रेय का पळवलं जातंय? आता हा इतिहास समजून घेण्याऐवजी काहींनी रंगारी ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणं चालू केलंय. ‘तुम्ही टिळकांचा द्वेष करताय? मुद्दाम या विषयाला ब्राह्मण-ब्राह्मणेतर रंग देताय, वाद माजवताय’ असा, प्रचार काहींनी सुरू केला आहे. त्यामुळे हा वाद आता विकोपाला जाण्याची चिन्हं आहेत.
भाऊसाहेब रंगारी यांचा इतिहास जाणकारांनी पुढे आणला आहे. त्यातून त्यांच्याविषयी बरीचशी माहिती उपलब्ध झाली आहे. रंगारी हे एक क्रांतिकारक कार्यकर्ते होते. पुण्यात त्यांच्या वाड्यात क्रांतिकारकांना गुप्तपणे शस्त्र चालवण्याचं शिक्षण दिलं जाई. आपल्या सहकाऱ्यांसमवेत ते इंग्रजांविरोधात क्रांतिकार्य करत असत. त्यांच्या वाड्यात नुकताच शस्त्रसाठाही सापडला आहे. रंगारींचा शालूंना रंग देण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांचं ‘जावळे’ हे आडनाव मागे पडून ‘रंगारी’ हे टोपणनाव रूढ झालं. रिचर्ड कॅशमन (Richard I. Cashman) या इंग्रज लेखकानं ‘The Myth of Lokmanya : Tilak and Mass Politics in Maharashtra’ या पुस्तकात रंगारी यांचा उल्लेख केला आहे. त्यात कॅशमन यांनी म्हटलं आहे की, ‘Bhau Lakshman Javale was a Maratha whom the Police considered an extremely dangerous and troublesome man.’ या उल्लेखावरून इंग्रजांना रंगारींचा किती दरारा वाटत होता, हे लक्षात येईल. रंगारी ख्यातनाम वैद्यही होते. त्यांच्या राहत्या घरी आयुर्वेदिक दवाखानाही होता.
१९८२ साली सर्वप्रथम पुण्यात रंगारींनी गणेशोत्सव सुरू केला. त्याच्या पुढच्या वर्षी २६ सप्टेंबरला १८९३च्या दै. ‘केसरी’च्या अग्रलेखात स्वत: टिळकांनी लिहिलंय की, ‘सालाबादाप्रमाणे यंदा गणेशोत्सवास अधिक सार्वजनिक स्वरूप आलं असून ज्या गृहस्थांनी गेल्यावर्षी खटपट केली त्यांचे आभार मानले पाहिजेत.’ हे गृहस्थ म्हणजे भाऊसाहेब रंगारी होत.
सार्वजनिक गणेशोत्सवातल्या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याची सुरुवातही रंगारी यांनीच केली. टिळकांनी रंगारी यांच्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १८९४मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात भाग घ्यायला सुरुवात केली.
पुण्यात तेव्हाच्या सामाजिक जीवनातही रंगारी हे एक माननीय व्यक्तिमत्त्व होतं, याचे उल्लेख सापडतात. दारूवाला पुलावरील हिंदू-मुस्लिम दंगल थांबवणारं व्यक्तिमत्त्व म्हणून टिळकांचे खंदे सहकारी न. चिं. केळकर यांनी रंगारींचा उल्लेख केला आहे. केळकर हे काही साधेसुधे व्यक्ती नव्हते. टिळकांइतकाच त्यांचा पुण्यात स्वत:चा रुबाब आणि कार्य प्रसिद्ध आहे.
रंगारी यांनी १९०५मध्ये आपलं मृत्युपत्र बनवलं. त्यात त्यांनी स्वत:च्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची तजवीज करून ठेवली आणि आपली सर्व संपत्ती सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दान केली. जून १९०५मध्ये त्यांचं निधन झालं. त्याची फक्त एका ओळीची बातमी २० जून १९०५च्या ‘केसरी’च्या अंकात आलेली दिसते.
एका ओळीची बातमी देऊन ‘केसरी’नं रंगारींची एक प्रकारे उपेक्षाच केली. गणेशोत्सवाला स्वत:ची संपत्ती दान करणारे रंगारी किती समर्पित होते आणि गणेशोत्सवावर त्यांचा किती जीव होता, हे दिसून येतं. ही उपेक्षा आजही चालू असेल तर ती का खपवून घ्यायची, असा रंगारी गणपती ट्रस्टचा सवाल आहे.
या वादाला ‘रंगारी विरुद्ध टिळक’ असा रंग दिला जातोय, तो बरोबर नाही. कारण त्यातून जुन्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचं भूत पुन्हा डोकं वर काढतंय. ते सर्वथा गैर आहे. अगोदरच पुणे शहराला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची मोठी पार्श्वभूमी आहे. ब्राह्मण समुदायाला ‘देशाचे दुश्मन’ म्हणून पुस्तकरूपानं मांडून चळवळ करणारे दिनकरराव जवळकर हे पुण्यातलेच. या वादाचं नेतृत्व करणारे केशवराव जेधे हेही पुणेकर. ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकाचा वाद एवढा चिघळला की, पुढे त्यातून मारामाऱ्या झाल्या. हा वाद न्यायालयात गेला. ब्राह्मणेतरांच्या बाजूचं वकीलपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं. खुद्द इंग्रजांना हा वाद लावून देण्यात रस होता. या वादानं तेव्हा काही काळ पुण्याचं सामाजिक सौहार्द खराब झालं होतं. त्याचे डाग आजही दिसतात. त्यात आता ‘टिळक की रंगारी?’ हा वाद उफाळला आहे. टिळक ब्राह्मण आणि रंगारी (जावळे) मराठा, ही जात पार्श्वभूमी या वादात अधिक तेल ओतणार हे ओघानं आलंच.
सध्या महाराष्ट्रात सर्वच जाती खूप संवेदनशील झाल्या आहेत. राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री सत्तेवर आहे, भाजपची सत्ता आहे, भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष आहे, असं प्रचारात आहेच. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीमुळे संघटित होऊन वेळोवेळी रस्त्यावर उतरतो आहे. ओबीसी, दलित त्यांची दुखणी घेऊन जागृत झालेले आहेत. अशा स्फोटक वातावरणात सामाजिक एकोप्यासाठी सुरू झालेल्या गणेशोत्सवातच बेकीचा वाद माजावा आणि तोही त्याचं जनकत्व कुणाकडे यावरून, हे खूप म्हणजे खूपच घातक आहे.
या वादात टिळकभक्तांनी मन मोठं केलं पाहिजे. टिळकांच्या घरातल्या मुक्ता टिळक पुण्याच्या महापौर आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन या वादात समन्वय घडवायला हवा. गणेशोत्सवाचं जनकत्व निर्विवादपणे भाऊसाहेब रंगारी यांना देऊन हा वाद मिटवायला हवा. त्यामुळे लोकमान्य टिळकांची थोरवी आणखी वाढेल. कारण अशा वादात मन मोठं करण्याची भूमिका खुद्द टिळकांनी अनेक ठिकाणी, अनेक वेळा घेतलेली दिसते. टिळक हे मोठेच आहेत, याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. रंगारी यांना त्यांचा मान दिल्यानं त्यांचं मोठेपण उणावण्याचंही काहीएक कारण नाही.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष
टिळक-रंगारी वाद रस्त्यावर येण्याआधीच तो मिटवायला हवा. पुण्यात अनेक शहाणी माणसं राजकारण-समाजकारणात आहेत. त्यांनीही पुढे आलं पाहिजे. अन्यथा हा वाद ऐन गणेशोत्सवात पेटला तर राज्याच्या सांस्कृतिक चेहऱ्यावर आणखी एक डाग पडून तो अधिक विद्रूप होऊ शकतो. गणेशोत्सवात सर्वांनी सामाजिक सौहार्द, एकोपा जपला पाहिजे. गणेशोत्सवासारख्या एकीच्या सणात ‘बेकीचं राजकारण’ माजणं बरोबर होणार नाही.
.............................................................................................................................................
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणे यांच्या फेसबुक पेजचं पहिलं पान. अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/bhaurangari/
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment