अजूनकाही
महा अनुभव
‘अनुभव’चा दिवाळी अंक हा ज्येष्ठ-श्रेष्ठ लेखकांच्या लेखनानं नटलेला आहे. सकस लेखन हा या अंकाचा प्रधान विशेष आहे. रत्नाकर मतकरी, जयंत पवार यांच्या कथा नेहमीप्रमाणेच वाचनीय आहेत. अलीकडच्या काळात जयंत पवार सातत्यानं दर्जेदार, वेगळ्या आणि उत्कट कथा लिहीत आहेत. त्याचा प्रत्यय त्यांच्या या अंकातील ‘लेखकाचा मृत्यू’ या कथेतूनही येतो. रत्नाकर मतकरी यांची ‘गॅस चेंबर’ ही कथाही वाचनीय आहे. श्याम मनोहर यांची कथा असल्याचा उल्लेख अनुक्रमणिकेत केला असला तरी ते त्यांच्या आगामी कादंबरीतील एक प्रकरण आहे. ‘एक बातमी आणि वाचकांची पत्रे’ या नावातूनच मनोहरांच्या वेगळेपणाची चुणूक सुरू होते. एका बातमीवर वाचकांची उलटसुलट पत्रं येतात आणि त्यातून ही कथा उलगडत जाते. निळू दामले यांनी नेहमीच्या अमेरिकेची वेगळी ओळख करून दिली आहे. ती लोभस आहे. राजेश्वरी देशपांडे यांनी अल्पकाळात पाहिलेल्या आणि जाणवलेल्या पोलंडची सफर घडवली आहे. साधना शिलेदार यांचा कुमार गंधर्वांच्या माळव्याविषयीचा लेख हे एक चांगलं स्मरणरंजन आहे. ‘माणसं’ या विभागातील पहिलाच लेख आहे एनीडीटीव्ही हिंदीचे लोकप्रिय अँकर रवीश कुमारविषयी. देशातील आघाडीचा आणि निष्पक्ष पत्रकार असलेल्या रवीश कुमारची चांगली ओळख या अभ्यासपूर्ण व्यक्तिचित्रातून होते. ‘न्यूयॉर्कर’चे व्यंगचित्रकार सॉल स्टाइनबर्ग यांच्याविषयीचा अनिल अवचट यांचा लेख त्यांच्या नेहमीच्या पाल्हाळ शैलीतलाच आहे. पण या लेखात त्यांनी स्टाइनबर्ग यांच्या काही व्यंगचित्रांवर उदाहरणांसह लिहिले आहे. त्यामुळे हा लेख सुसह्य होतो. बाकी अवचटांचे दिवाळी अंकांतले लेख हे त्यांच्या वाचक-भक्तांनाच आवडू शकतात. हा मात्र त्यापुढे दोन पावले जाणारा आहे. प्रभाकर कोलते या अमूर्त चित्रकाराविषयी दीपक घारे यांनी लिहिलेला लेख अमूर्त चित्र समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतो. प्रशांत खुंटे यांचा लेखही वैशिष्ट्यूपूर्ण आहे. ललित आणि अनुवादित कथा या दोन्ही विभागात दोन लेख व दोन कथा आहेत. थोडक्यात अनुभवचा अंक संपादकांनी गंभीरपणे काढला आहे, त्यामुळे त्याचं वाचनही तशाच पद्धतीनं करायला हवं.
सर्वोत्तम (लेख\कथा) – एक बातमी आणि वाचकांची पत्रे (श्याम मनोहर), नमष्कार, मैं रवीश कुमार (श्रीरंजन आवटे)
उत्तम मध्यम – स्टाइनबर्ग (अनिल अवचट), निवांत शांत अमेरिका (निळू दामले)
मध्यम मध्यम – गुरुजी,अनुवादित कथा
‘महा अनुभव’, संपादक सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, पाने - १७८ , मूल्य – १२० रुपये.
.........................
परिवर्तनाचा वाटसरू
‘परिवर्तनाचा वाटसरू’चा दिवाळी अंक हा सकस वैचारिक खाद्य देणारा दिवाळी अंक असतो. त्यामुळे केवळ वाचनानंद वा करमणुकीसाठी वाचणाऱ्यांना या अंकाचा उपयोग केवळ झोप येण्यासाठीच होऊ शकतो! दुसरी गोष्ट म्हणजे ‘परिवर्तनाचा वाटसरू’ हे व्यवस्थेला प्रश्न विचारणारे, तिची चिकित्सा करणारे पाक्षिक आहे. त्याला साजेसा विषय यंदा घेतला गेला आहे. तो आहे – ‘बदलता गुजरात’. अलीकडच्या काळात गुजरातच्या विकासाची चर्चा देशपातळीवर केली जाते. पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, याचं अगदी सांगोपांग दर्शन नसलं तरी त्याचं झलकदर्शन हा अंक घडवतो. मुलाखती, पुस्तक अंश आणि लेख यातून गेल्या पंधरा-वीस वर्षांतील, म्हणजे गोध्रानंतरच्या गुजरातविषयीचा हा अंक संग्राह्य म्हणावा असा आहे. पटेल आंदोलन, दलित आंदोलन, गुजरातमधील अभयारण्य, चित्रपट, बुधन चळवळ यांच्या आढाव्याच्या निमित्तानं गुजरातच्या अंतरंगाचं केवळ काही तुकडेच हाती लागत असले तरी ते मराठी वाचकांच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण आहेत. या अंकातून गुजरातचं घडणारं दर्शन फारसं स्पृहणीय नाही हे मात्र खरं. बाकी या अंकात दीर्घकथा, अनुवादित कथा-कविता आणि स्वतंत्र कविता यांचाही समावेश आहे. पण फक्त गुजरातविषयीचा विभाग हेच या अंकांचं मुख्य आकर्षण आहे.
सर्वोत्तम (लेख\कथा) – गुजरात : २००० नंतरचा (संजीवनी बाडीगर-लोखंडे), अस्मितेच्या राजकारणाची भाषा (नरेंद्र पंजवानी)
उत्तम मध्यम – गुजराती चित्रपट : संत, सती आणि शेठाणी यांच्या गोष्टी, एडवर्ड सिम्पसन यांची मुलाखत
मध्यम मध्यम – तोपर्यंत प्रश्न राहतीलच (गणेश देवी), पाटीदार आंदोलनाचा अन्वयार्थ लावताना (घनश्याम शहा)
‘परिवर्तनाचा वाटसरू, संपादक अभय कांता, पाने - १७८, मूल्य – ५० रुपये.
..............................
जडण-घडण
हा अंक टिपिकल दिवाळी अंकांच्या परंपरेतला अंक आहे. या अंकाचे मानद संपादक ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर असले तरी त्यांच्या कल्पनेतून या अंकातले चार लेख तरी तयार झाले असतील की नाही याचा संशय आहे. उलट संपादक असलेल्या माशेलकरांविषयी त्यांच्या मुलीने लिहिलेला लेख या अंकात आहे. त्यांचा हा पहिलाच लेख असल्याने त्यात नवखेपणा, प्रवाहीपणाचा अभाव आणि काय सांगू अन काय नको, अशी द्विधा या गोष्टी जाणवत असल्या तरी तो वाचनीय आहे हे नक्की. या अंकाचे सरळ दोन विभाग आहेत. पहिला विभाग आहे – ‘बापमाणसं’. त्यात जयंत नारळीकर, अभय बंग, चंद्रशेखर धर्माधिकारी, अभय जोशी, द.ना.धनागरे, रवी परांजपे, डॉ. के. एच.संचेती, विजय भटकर, आनंद करंदीकर अशा २४ मान्यवरांनी आपल्या वडिलांविषयी लिहिले आहे. नावांची यादी काढली, त्यात सर्वज्ञात नावांचा समावेश होईल याची काळजी घेतली, त्या त्या व्यक्तींना लेख लिहायला सांगितले आणि हा विभाग तयार झाला! त्यामुळे या सगळ्या लेखांचा विशेष म्हणजे ते सर्वच आपल्या वडिलांच्या मोठेपणाचे किस्से सांगणारे आहेत.
दुसरा विभाग आहे - ‘स्पर्धा परीक्षांचे ‘ते दिवस’’. यात लीना मेहेंदळे, अविनाश धर्माधिकारी, अश्विनी भिडे, सुनील लिमये, सचिन जाधव, सुदाम खाडे, सलील बिजुर अशा १६ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लेख आहेत. हे सर्वच लेख प्रामाणिक आहेत, पण धर्माधिकारी व मेहेंदळे यांचे लेख वगळता बाकीचे जवळपास सर्वच लेख हे त्रोटक म्हणावेत इतके छोटे आहेत. त्यामुळे हे लेख केवळ स्पर्धा परीक्षांच्या मुलांना समोर ठेवून लिहिल्यासारखे वाटतात. परिणामी त्यांतून सर्वसामान्य वाचकांच्या हाती फारसं काही लागत नाही. गेल्या काही वर्षांत पुण्यात स्पर्धा परीक्षांचं मार्केट मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. ते नजरेसमोर ठेवून या विभागाची रचना करण्यात आली असावी.
सर्वोत्तम (लेख\कथा) – एकही नाही
उत्तम मध्यम – अभय बंग, माधव गाडगीळ, मृणालिनी सावंत, – आनंद करंदीकर, हमीद दाभोलकर
मध्यम मध्यम – ‘स्पर्धा परीक्षांचे ‘ते दिवस’’ विभागातील जवळपास सर्वच लेख
‘जडण-घडण’, संपादक सागर देशपांडे, पाने - २४६, मूल्य – १५० रुपये.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment