माणूस मोठा ताकदीचा, पण...
पडघम - माध्यमनामा
राजा कांदळकर
  • डॉ. कुमार सप्तर्षी
  • Mon , 21 August 2017
  • पडघम माध्यमानामा डॉ. कुमार सप्तर्षी Kumar Saptarshi सत्याग्रही विचारधारा Satyagrahi Vichardhara

१९६५ नंतरची दोन दशकं महाराष्ट्रातील तरुण वर्गात मोठी जागृती आणि चळवळ निर्माण करणाऱ्या ‘युक्रांद’ या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत, अहमदनगरचे माजी आमदार, ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष आणि ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आज वयाची पंचाहत्तरी पूर्ण करून ७६ व्या वर्षांत पदार्पण केलं. त्या निमित्तानं हा लेख...

.............................................................................................................................................

‘पाव्हणं रामराम... घ्या तमाकू, मळा अन् चुनाबी घ्या. बरं, काय म्हणतंय राजकारण? काय चाललंय गावात, शिवारात? काय म्हणत्यात नेते? तुमच्या पुढाऱ्यांचं कसंय? पुढारी अन् तमाकू यावरून आठवलं- आपण कार्यकर्ते म्हंजी तमाकूच समजत्यात की नेते! तलप आली की मळायची, टाकायची तोंडात. जरूर असंल तवर चघळायची, गरज संपली की टाकायची थुकून...’

‘लोकसत्ता’ वर्तमानपत्र वाचत असताना बावीस-तेवीस वर्षांपूर्वी भेटलेला हा मजकूर, डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ‘रामराम पाव्हणं’ या कॉलममधला. अधाशासारखा कॉलम वाचला. त्यानंतर दर आठवड्याला वाचत गेलो. या लेखकाविषयी मनात काही प्रतिमा साकारत गेली. त्याचा फोटो पाहिला. त्याची दाढी, डोक्यावरच्या केसांचा कोंबडा, खादीचा झब्बा. त्याच्या भाषेत भलताच दम जाणवला. गावातल्या पारावरची भाषा, लोकांच्या मनातले प्रश्न, त्यांच्या जिनगानीतले प्रसंग-उदाहरणं घेऊन या कॉलमात चर्चा होई. राजकारण, समाजकारण, शेती, धर्म, अर्थकारण, गावगाडा, स्त्री-पुरुष समता, शिक्षणव्यवस्था, गावच्या पाटलांची दादागिरी, टग्या राजकारण्यांची मनगटशाही- असे नाना प्रश्न. त्यांची चर्चा. डॉक्टर अत्यंत भेदक पद्धतीनं करत.

या लेखकाला भेटलं पाहिजे, असं मनात ठाम झालं. कॉलमच्या मजकुरात भेटलेले डॉक्टर पुढे पुण्यात शिकायला गेलो अन् जवळचे झाले. पुण्यात एस. पी. कॉलेजच्या समोर ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाचं ऑफिस होतं. त्याचं नाव ‘क्रांतिनिकेतन’ ठेवलेलं. मोठं बोलकं नावं. चार मजले चढून डॉक्टरांना भेटायला जावं लागे. चार मजले चढून आलेल्याला डॉक्टर म्हणत, ‘हे चार मजले जो चढतो, तो निरोगी असल्याचं सर्टिफिकेट मी देतो!’

आपण माणसांचा डॉक्टर असल्याचं ते वारंवार सांगत. त्याचा त्यांना अभिमान असावा, हे जाणवायचं. डॉक्टरांकडे गेल्यावर त्या ऑफिसचे काही नियम दिसले. न सांगता ऑफिसातल्या मावशी प्रत्येकाला चहा देत. दुधाचा चहा मोठा रुचकर. गावाकडचा आहे, असं वाटे. चहा पिता-पिता डॉक्टरांचं बोलणं चालू. ते ऐकणं हा मोठा आनंददायी, विचार करायला लावणारा तरीही करमणुकीचा भाग असे. डॉक्टर या गप्पा-चर्चांमध्ये विविध विषय हाताळीत असत. इतिहास, तत्त्वज्ञान, उत्क्रांतीशास्त्र, सामाजिक विज्ञान, विकास, राजकारण, नेत्यांचे विचारविश्व, खेळ, आहार, स्त्री-पुरुष संबंध, लैंगिक जीवन, भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, जडवाद, गांधीवाद, कादंबऱ्या, आत्मचरित्रं, चित्रपट, संपूर्ण क्रांती, खरं अध्यात्म, खरं वैराग्य, बुद्धाचा धम्म, महावीराचं तत्त्वज्ञान, चार्वाक, फुले-आंबेडकरवाद, जातिव्यवस्थेचं गौडबंगाल, गावगाडा, गावच्या पाटलांचे विचित्र मनोविश्व, घमेंडी पाटलांच्या गंमतीजमती, क्रौर्य, फजित्या... अशा नानाविध विषयांवर चर्चा चाले. वेळ-काळाचं भान हरपून डॉक्टर बोलत असत. हा अखंड विचारमहोत्सव असे. या महोत्सवाचा आपण भाग आहोत, ही जाणीव खूप सुखद असे. खूप माहिती मिळे. चर्चेनंतर आपण नवे झालोत, असं वाटे.

डॉक्टरांचा एक विशेष होता. त्यांच्यासमोर जसा माणूस येई, तसा ते त्याच्याशी संवाद साधत. अडचणीतला माणूस असेल, तर त्याच्याशी त्याच्या अडचणीपुरतं बोलायचं. शिक्षक-वकील असेल, तर त्याच्याशी त्यांच्या व्यवसायाविषयी. आमच्यासारखे कॉलेजातले विद्यार्थी पाहिले की, डॉक्टर अधिक मोकळे होत असावेत. डॉक्टर आपल्याशी मनमोकळं बोलतात, अखंड बोलतात- हा आम्हालाही सन्मान वाटे. दुपारी दोन वाजता भेटायला गेलेल्या आमच्याशी डॉक्टर रात्री आठपर्यंत चर्चा करत. ऑफिसात सकाळी दहा वाजता आलेले शेषराव, शीलवंत, दशरथ चव्हाण यांना याचा त्रास होई. ते आमच्यावर कधी कधी वैतागत. म्हणत, ‘तुम्हाला काही कामं नाहीत का रे?’ अर्थात् हे तिघेही इतर वेळी खूप प्रेमानं वागत. पण कधी कधी त्यांना या चर्चा, उशीर यांचा मन:स्ताप होत असावा.

एकदा डॉक्टर म्हणाले, “चल येतोस का? उद्या मी राशीनला चाललोय, शाळेवर! पण लवकर निघावं लागेल. तू विद्यापीठातून सकाळी सात वाजताच घरी ये.” मला आनंदच झाला. दिवसभर डॉक्टरांचा सहवास, घनघोर चर्चा, प्रवास अन् शाळा पाहणं. त्या वेळी डॉक्टरांची पांढरी अॅम्बॅसिडर कार होती. दशरथ ड्रायव्हर. सकाळी सात वाजता डॉक्टरांना जॉइन झालो. तेव्हा डॉक्टर संगमनेरी गायछाप तंबाखू खात. एकदा विडा तोंडात टाकला की, बोलू लागत.

या प्रवासात मला कळलं की, डॉक्टरांनी ग्रामीण भागात ग्रामविकासाचे प्रयोग करावेत म्हणून शाळा काढली. राशीन (ता.कर्जत, जि.अहमदनगर) हे डॉक्टरांचं मूळ गाव. या गावावर त्यांचं खूप प्रेम. बोलण्यात ते दिसे. राशीनचा माणूस भेटला की, डॉक्टर लहान मुलासारखे हरखून जात. त्याच्याशी गावातला एक होऊन समरसून बोलत. याचं काय चाललंय, तो कसा आहे, असं विचारून गावमय होत. राशीनला जाता-जाता डॉक्टरांनी युवक क्रांती दलाची स्थापना, त्यांची आंदोलनं, राशीनमधले लढे, राशीनच्या पाटलांशी झालेले झगडे याविषयी सांगितलं.

त्यांच्या बोलण्यातून एक विशेष जाणवे. ते खूप संवादी बोलत. तमाशात जशा बतावण्या, सवाल-जवाब असत तसं ते चाले. चर्चा एवढी लाइव्ह करणारा माणूस माझ्या पाहण्यात अन्य कोणी नव्हता. गावात पाटीलशाहीचा अंमल किती प्रभावी आहे, हे सांगताना डॉक्टर सांगत... गावात पाटील म्हणतो, “काय रे गणप्या, कसं?” गणप्या लागलीच म्हणे, “मालक, तुमी म्हंत्याल तसं.” ग्रामीण भागातले असे असंख्य लाडके संवाद म्हणत डॉक्टर चर्चा रंगवत जात. पण ही चर्चा मनोरंजनातून लगेच उंच वैचारिक पातळीवर जाई. सरंजामशाही, पाटीलशाही संपवून युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी (युक्रांदीयांनी- हा  शब्द डॉक्टरांचा जीव की प्राण) गावात लोकशाही कशी आणली, हे ते पोटतिडकीनं कथन करत. आपण त्या काळातच आहोत, असं वाटे.

मी संगमनेर तालुक्यातील खेडेगावातला. शेतकरी कुटुंबातला. गावगाडा अनुभवलेला. मला डॉक्टरांचं विचारविश्व खूप जिवंत वाटे. माझं गाव आणि राशीन यात तसं काही अंतर दिसत नसे. गरीब, मागासांना, महिलांना गावगाडा कसा दाबतो; पाटील, टगे आणि दांडगे यांची दादागिरी गावात कशी चालते, हे डॉक्टर जेव्हा सांगत तेव्हा ते माझ्या गावाविषयी बोलताहेत असं वाटे. मग मीही राशीनमय होई.

राशीनची शाळा- ‘लोकनायक जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय’- कशी सुरू झाली, जमीन कशी घेतली, झाडं कशी लावली, इमारत कशी बांधली, तिथले शेतीतले प्रयोग याची तपशीलवार वर्णनं डॉक्टर ऐकवीत. त्यात डॉ. बाबा आमटेंकडे ते कसे गेले, त्यांच्यापासून काय घेतलं, त्यांचं काय पटलं नाही- याचं विश्लेषण ऐकत राहावं, असं वाटे. या माणसाला प्रयोग करण्याची अनिवार ओढ आहे. हा नुसता चर्चाळू नाही, हे जाणवत असे.

पुणे ते राशीन आणि उलट राशीन ते पुणे या प्रवासात डॉक्टर सतत बोलत होते. मला त्याचं खूप कौतुक वाटे. हा माणूस एवढा बोलतोय; त्यात रीपिटेशन नाही, सतत नवा विषय. परत चर्चा रटाळ होत नसे. घडीत तिरकस कॉमेंट, घडीत विनोदी प्रसंग. पुढे लगेच तत्त्ववैचारिक मांडणी. मधेच साभिनय संवाद म्हणत एखादी घटना सांगत. मनात येई, काय अजब माणूस! एवढा मालमसाला याच्याजवळ कसा? नंतर उलगडे. डॉक्टर विद्यार्थिदशेपासून जे जगले-लढले ते समरसून... म्हणून त्यांच्याजवळ एवढं सांगण्यासारखं जमा झालेलं आहे. बरं, हा माणूस नुसता बोलत नाही; त्याचं वाचन अफाट आहे, हे कळे! इंग्रजी, हिंदी, मराठी महत्त्वाच्या पुस्तकांचे संदर्भ बोलण्यात येत.

राशीनची शाळा, विद्यार्थी, ग्रामविकासाचे प्रयोग, तिथली संस्था, माणसं यांच्यावर डॉक्टरांनी आईची माया लावलेली आहे, हे जाणवायचं. मी जो विचार करतो तो इथं उगवतोय, याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसे.

डॉक्टर वरून तर्ककठोर वाटत; पण ते खूप हळवे आहेत, हे अनेक प्रसंगांत जाणवे. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया यांच्यावर डॉक्टरांची खास माया आहे, हे उमजे. त्यातही गांधी-जयप्रकाश यांची डॉक्टरांच्या जीवनावर गहिरी छाप दिसे. चर्चेत अर्ध्या तासात एकदा तरी गांधी-जयप्रकाश यांचं नाव-विचार येई, एवढी त्यांची या दोन महामानवांशी अॅटॅचमेंट जाणवे. जयप्रकाशांच्या तर बरोबर ते वावरले होते. तो ओलावा चर्चेत पाझरे.

एकदा आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या होस्टेलवर डॉक्टरांचं व्याख्यान घडवून आणलं. नितीन कोत्तापल्ले, अजित देशमुख, नारायण भोसले, दत्ता कोकाटे, अशोक अडसूळ यांचा त्यात पुढाकार होता. अजित सरदार आणि डॉक्टर दोघे आले. अजित सरदार जास्त बोलले नाहीत. म्हणाले, “कुमारला जास्त बोलता यावं म्हणून मी माझा वेळ त्याला देतो.” आणि त्यानंतर डॉक्टर जवळपास दीड तास बोलले... मग प्रश्नोउत्तरं झाली. खूप मजा आली. युक्रांदचे लढे, आणीबाणीतले संघर्ष, डॉक्टरांची तुरुंगवारी, विद्यार्थी आंदोलनं, जयप्रकाशांच्या भेटी, बिहारच्या दुष्काळातलं काम, मराठवाडा विकास आंदोलनं, विद्यापीठ नामांतर, मराठवाड्यातले दलित अत्याचाराचे प्रश्न... आंदोलनं... इथपासून तर ‘नवा विचार काय केला पाहिजे, कोणते जुने विचार टाकले पाहिजेत’ अशी धुंवांधार मांडणी डॉक्टरांनी केली. हे व्याख्यान म्हणजे एक उदबोधनच ठरलं. ‘उदबोधन’ हा डॉक्टरांचा खास लाडका शब्द. प्रबोधनाच्या पुढचा टप्पा. ‘प्रबोधन’ म्हणणं त्यांना काही तरी अपूर्ण वाटे. शब्द वापरण्यात डॉक्टर खूप काटेकोर.

या व्याख्यानानंतर मला एक नाद लागला- स्वतःला पडलेले प्रश्न डॉक्टरांना भेटून विचारायचा. ते प्रश्न कसेही असोत, डॉक्टरही त्याला गांभीर्यानं उत्तरं देत. त्या प्रश्नांभोवती चर्चा रंगवत. माझा अहं सुखावे. एवढा मोठा माणूस आपल्या प्रश्नांना गांभीर्यानं घेतो, हे मनोमन आवडे. या नादापायी मी ‘सत्याग्रही विचारधारा’चं ऑफिस सतत गाठी. तिथं रेंगाळत राही. राजन खान तेव्हा ‘सत्याग्रही…’चं संपादन करत. ते होते मायाळू, पण नुसती रिकामटेकडी चर्चा करणाऱ्या पोरांवर वसकत. मला म्हणाले, “काय रे नुस्त्या क्रांत्या करणाऱ्या बाता मारतोस; काही कामं करा की जरा. रिकामा वेळ घालवू नका. गमज्या मारू नका. आणखी एक- जरा वाचा की मूलभूत अशी पुस्तकं...” राजन खान आमच्यावर तडकत, तरी ‘सत्याग्रही…’वर जाण्याचा नाद चालूच राहिला. एकदा एक लेख लिहून राजन खानांकडे दिला. त्यांनी त्याची घनघोर चिरफाड केली. मी नाराज झालो. धसका घेतला की, आपल्याला लिहिताच येणार नाही यापुढे.

डॉक्टर ‘सत्याग्रही…’वर असले की, हमखास जायचो. संजय आवटे, विनोद शिरसाठ, सुगंध देशमुख, राजेंद्र अनभुले, असीम सरोदे यांपैकी कुणी बरोबर असेल, तर डॉक्टर जास्तच खुलत. संजय करमाळा तालुक्यातला. डॉक्टरांनी तिथून आमदारकीची निवडणूक लढवलेली. निवडणूक प्रचाराचे किस्से सांगताना डॉक्टर रंगून जात. विनोद पाथर्डी तालुक्यातला. हा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाग. डॉक्टरांनी इथून लोकसभा दोनदा लढवली. नगरचे मतदार कसे खट-हुशार, हे ऐकावं ते डॉक्टरांच्या तोंडून. सुगंध हा अकोले तालुक्यातला. मग मधुकर पिचड, आदिवासींचे प्रश्न यावर चर्चा नेत. असीमचे वडील गांधीवादी, सर्वोदयी. मग सर्वोदयी लोकांच्या गमतीजमती सांगत. त्यांच्या त्यागाबद्दल आदर ठेवून, त्यांच्या भाबडेपणामुळे काय भानगडी झाल्या, ते कथन करत. त्या वेळी ‘गांधीवाद’ आमच्यापुढे उलगडत जाई.

विश्लेषण करण्याची विलक्षण मेथड डॉक्टरांकडे आहे. भाई वैद्य, बाबा आमटे, अण्णा हजारे, बाबा आढाव, चंद्रशेखर या प्रत्येकाचं भेदक विश्लेषण डॉक्टरांकडून ऐकायला मिळे. भाईंनी चहा प्यायला कसं शिकवलं, तो किस्सा डॉक्टरांनी अनेकदा रंगवून सांगितला. बाबा आढावांची भाषण करण्याची पद्धत बाबांविषयी आदर व्यक्त करत मिमिक्रीसह ते साभिनय सांगत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचं यश आणि मर्यादाही ऐकाव्यात डॉक्टरांच्या चर्चेत. ‘डॉक्टरांना हाऊस ऑफ अॅनालिसिस’ म्हणत, ते प्रत्ययास येई.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर हे डॉक्टरांचे वीक पॉइंट असावेत. एकदा मला म्हणाले, “चंद्रशेखर परंदवडीत भारत यात्रा केंद्रात आलेत. तू येणार असशील तर चल. पुण्याच्या जवळच आहे. मी भेटणार आहे त्यांना.” मला संधीच दिसली. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर गेलो. चंद्रशेखर एका हॉलमध्ये बसलेले, समोर माणसांचा गराडा. माजी पंतप्रधानांचा असावा तसा ताफा सभोवताली होता. चंद्रशेखर रुबाबदार माणूस, नेता वाटले. चंद्रशेखरांचे धाकटे भाऊ शोभावेत असे डॉक्टर भासले तेव्हा मला. तशीच दाढी. तसाच डोक्यावरचा केसांचा कोंबडा. उभट चेहरा. दरारा वाटावा असा चेहर्यावरचा भाव. हा चेहरा हसल्यावर मायाळू वाटे. चंद्रशेखर आणि डॉक्टर दोघंही गावाकडची माणसं वाटली तेव्हा. त्या दोघांचा संवाद खूप जवळिकीचा वाटला. एका कुटुंबातली माणसं बोलतात, तसला. थोरल्या अन् धाकल्या भावातलं हितगूज चालावं तसा. परंदवडीहून परताना डॉक्टर भारावून त्यांच्या आणि चंद्रशेखर यांच्या संबंधाबद्दल बोलत होते. चंद्रशेखरांमध्ये जयप्रकाशांना शोधताहेत डॉक्टर, हे जाणवलं तेव्हा.

आज डॉक्टरांबद्दल लिहिताना मनात येतं की, १९६५ ते ८५ या काळात हा माणूस राज्यात विविध चळवळी-घडामोडींत केंद्रस्थानी होता. युक्रांदीयांचा तर हीरोच होता. युक्रांदचा प्रभाव ८५ नंतर ओसरला; तरी युक्रांदने घडवलेले अनेक जण लेखन, कला, चळवळी, शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान, शेती, पत्रकारिता, राजकारण, स्त्री चळवळी, पर्यावरण चळवळी, स्वयंसेवी संस्था अशा नानाविध क्षेत्रांत आत्मविश्वासानं काम करताना दिसतात. आपापल्या कामात योगदान देताना आढळतात. जातिमुक्त समाज, शेवटच्या माणसाला प्रतिष्ठा, स्त्री-पुरुष समता, आदर्श ग्रामजीवन, धार्मिक-आर्थिक-सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक संपूर्ण क्रांती हा युक्रांदचा अजेंडा घेऊन विविध क्षेत्रांत, विविध राजकीय पक्षांत युक्रांदीय ठसा उमटवताना दिसतात. त्या सर्वांवर डॉक्टरांची अमिट अशी छाप दिसते. ती माणसंही डॉक्टरांचं मोठेपण मान्य करतात. ‘आम्ही डॉक्टरांच्या वाटेनेच जात आहोत’, हे नोंदवतात.

हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर, नीलम गोऱ्हे, रत्नाकर महाजन, सुभाष लोमटे, अन्वर राजन हे आणि यांसारखे शेकडो युक्रांदीय राज्यात काम करत आहेत. युक्रांदचा अजेंडा पुढे नेत आहेत. डॉक्टरांच्या प्रभावाखालील अशी हजारो माणसं महाराष्ट्र घडवण्यात खारीचा वाटा आज उचलत आहेत.

डॉक्टर सार्वजनिक जीवनात पन्नास वर्षं अथक काम करत आहेत. आजही ते तरुण पोरं बघितली की, हरखून जातात. आईच्या मायेनं त्यांच्याशी बोलतात. त्यांच्यात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ संपूर्ण क्रांतीचं स्वप्न पेरण्याचा जीवापाड अट्टहास करतात. ‘सत्याग्रही…’च्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख एकदा म्हणाले होते, “डॉक्टर, तुम्ही ‘सत्याग्रही’ आणि आम्ही ‘सत्ताग्राही’!” या शब्दकोटीवर बालगंधर्व सभागृह खळखळून हसलं. पण मला वाटतं की, डॉक्टरांनी ‘सत्याग्रही’ आणि ‘सत्ताग्रही’ दोन्ही असायला हवं होतं का? त्यामुळे त्यांच्या ताकदीचा महाराष्ट्राला आणखी फायदा झाला असता, नाही का? तुम्हाला काय वाटतं?

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Wed , 23 August 2017

आतून आलेला पण भावुक


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......