अजूनकाही
आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग कितीही बदलत चाललं असलं तरी आपला समाज त्या मानानं फारसा बदललेला नाही, हे अनेक सामाजिक समस्यांवरून सहज कळून येतं. आपण भौतिकदृष्ट्या कितीही प्रगती केली असली तरी रूढी, परंपरा यांच्या जोखडातून समाजाची सुटका झालेली नाही. मुलगी-मुलगा यांच्यात घरोघरी होणारा भेदभाव लक्षात घेता आपला समाज विचारानं किती बुरसटलेला आहे, याची सहज कल्पना येते. महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या राज्यात ही अवस्था आहे, तर मग उत्तर प्रदेश, बिहार आदी मागास राज्यांत तर विचारायलाच नको. दिग्दर्शक अश्विन तिवारी यांनी 'बरेली की बर्फी' या नवीन हिंदी चित्रपटात एका प्रेमकथेद्वारे हाच विषय अतिशय हसत-खेळत आणि 'गोड' पद्धतीनं मांडला आहे. कथा-पटकथा-संवाद, गाणी आणि कलाकारांचा अभिनय, यामुळे या 'बर्फी'ची रेसिपी मधुर आणि चवदार झाली आहे.
चित्रपटाच्या नावातूनच ही बरेली गावाची कथा असल्याचं स्पष्ट होतं. फार पूर्वी 'मेरा साया' या हिंदी चित्रपटातील 'झुमका गिरा रे बरेली की बाजार में' या गाण्यामुळे हे बरेली गाव तमाम चित्रपट रसिकांना माहीत झालं होतं. आणि आता 'बरेली की बर्फी' या नावामुळे ते नाव आणखीनच लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.
'बरेली की बर्फी'मध्ये पाहायला मिळते ती बरेलीत राहणाऱ्या बिट्टी मिश्रा (क्रिती सेनॉन) या एका युवतीची कथा. आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असलेली बिट्टी एक बिनधास्त युवती आहे. तिला आई-वडिलांनी मुलासारखं वाढवलं आहे. ती एवढी बिनधास्त आहे की, वडिलांनाही सिगारेट ऑफर करते. पाहायला आलेला एक तरुण तिला 'तू व्हर्जिन आहेस काय?’ असा प्रश्न विचारतो. तेव्हा तीही त्याला सडेतोड उत्तर देते. दोनदा साखरपुडा होऊनही बिट्टीचं लग्न मोडतं. यामुळे तिचं लग्न आता होणार तरी कसं, याची आई-वडिलांना चिंता लागून राहिलेली असते. लग्न जमत नसल्यामुळे होणारा आईचा वैताग लक्षात घेऊन बिट्टी घर सोडून निघून जायचं ठरवते. तशी चिट्ठी घरात ठेवून रेल्वे स्टेशनवर येते, मात्र गाडी येण्यास वेळ आहे हे लक्षात आल्यावर वेळ घालवण्यासाठी म्हणून ती बुक स्टॉलवर 'बरेली की बर्फी' नावाचं पुस्तक विकत घेते. आणि ते पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर तिच्या लक्षात येतं की, त्या पुस्तकाची नायिका आणि तिच्यात खूपच साम्य आहे. विशेषतः अशा नायिकेवरही प्रेम करणारे तरुण आहेत. त्यामुळे कुतूहल वाढून ती घरी परत येते आणि त्या लेखकाचा शोध घेण्याचं ठरवते.
हे पुस्तक एका प्रिंटिंग प्रेसचा चालक असणाऱ्या चिराग (आयुष्यमान खुराना) या तरुणानं आपल्या फसलेल्या प्रेमकहाणीवर लिहिलेलं असतं. मात्र आपल्या खऱ्या नावानं लिहिलं तर आपल्या प्रेयसीला त्रास होईल म्हणून या पुस्तकावर लेखक म्हणून तो 'प्रीतम विद्रोही' (राजकुमार राव) या आपल्या मित्राचं नाव टाकतो. लेखकाचा शोध घेत आलेली बिट्टी आधी चिरागला भेटते. तो तिला प्रीतमकुमार विद्रोहीशी भेट घालून देण्याचं मान्य करतो आणि त्याप्रमाणे तिची भेट घालून देतो. मात्र दरम्यानच्या काळात होणाऱ्या भेटीगाठीमुळे चिराग बिट्टीच्या प्रेमात पडतो, तर प्रत्यक्ष भेट झाल्यावर प्रीतमकुमार विद्रोही बिट्टीला आवडू लागतो. याच्याशी लग्न करण्यात वाईट काही नाही असं बिट्टीला वाटू लागतं. बिट्टीचे आई-वडील तर याचीच वाट पाहत असतात. त्यामुळे खरा लेखक असलेल्या चिरागची मात्र घालमेल होऊ लागते. आपण खोटं सांगून चूक केली अशी त्याची भावना होते. त्यानंतर अंतिम सत्य कसं उलगडतं आणि प्रेमाच्या या त्रिकोणात कोणाचा विजय होतो, हे शेवटी पडद्यावर पाहणंच संयुक्तिक ठरेल.
'बर्फी'ची प्रेमकथा साधी-सरळ आहे आणि ती तेवढ्याच सध्या-सरळ पद्धतीनं मांडण्यात आलेली आहे. 'बर्फी' नावाला अनुकूल ठरण्यासाठी बिट्टीच्या वडिलांचं 'मिठाई'चं दुकान दाखवणं, तसंच 'बरेली की बर्फी' हे पुस्तक लिहिणारा प्रिंटिंग प्रेसचा मालक दाखवणं, यातून लेखकाची कल्पकता दिसते. अतिशय मिश्किल आणि खुसखुशीत संवाद हे या प्रेमकथेचं फार मोठं गमक आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याची रंजकता वाढते. शिवाय कथेच्या शेवटचा अंदाज येत असला तरी त्यातील उत्सुकता कायम टिकून राहिली आहे. छोट्या-छोट्या प्रसंगात मिश्किल आणि मार्मिक संवादातून सामाजिक परिस्थितीवरही नेमकं भाष्य करण्यात आलं आहे. या त्रिकोणी प्रेमकथेत आपल्या हातातोंडाशी आलेला प्रेमाचा घास दुसराच हिरावून घेतोय, हे कळल्यानंतर चिडचिड आहे. मात्र कुठेही सूडाची भावना नाही. तरीही अंतिम विजय प्रेमाचाच हे वास्तव दिग्दर्शकानं सफाईनं सादर केलं आहे.
चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्या अभिनयामुळे या 'बर्फी' लज्जत आणखी वाढली आहे. क्रिती सेनॉननं बिनधास्त बिट्टीची भूमिका अतिशय समजून केली आहे. तिच्या अभिनयातील सहजपणा हा बिट्टीची व्यक्तिरेखा प्रभावी करण्यास खूप महत्त्वाचा ठरला आहे. आयुष्यमान खुराना यानेही चिरागच्या भूमिकेत सहानुभती मिळवून देणारा एक वेगळा 'आशिक' उभा केला आहे. मात्र सर्वांत कमाल केलीय ती राजकुमार रावनं. त्यानं प्रीतम कोहलीच्या भूमिकेत एकीकडे धांदरट, बावळट आणि दुसरीकडे तेवढाच 'रंगबाज' आणि 'डॅशिंग' अशा परस्परविरोधी भूमिका एकाच वेळी मोठ्या ताकदीनं साकारल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटात तोच जास्त भाव खाऊन जातो. सीमा पहावा आणि पंकज त्रिपाठी या दोघांनीही बिट्टीच्या आई-वडिलांच्या भूमिकेत खूप मजा आणली आहे.
रोचक कोहली यांनी संगीतबद्ध केलेली गाणी बर्फीच्या 'रुची'त भर घालतात. जावेद अख्तर यांच्या रोचक निवेदनातून ही प्रेमकथा सांगण्यात आली आहे. त्यामुळे ही 'बर्फी' आणखीनच चविष्ट झाली आहे!
लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment