टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ममता बॅनर्जी, अमित शहा, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, न्या. प्रकाश टाटिया आणि अनिल गलगली
  • Mon , 21 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या ममता बॅनर्जी Mamata Banerjee नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah न्या. प्रकाश टाटिया Prakash Tatia अनिल गलगली Anil Galgali उद्धव ठाकरे Uddhav Thackeray

१. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दांत टीका करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या एका विधानानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘नरेंद्र मोदींना माझा पाठिंबा असला तरी मी अमित शहांच्या विरोधात आहे’, असं बॅनर्जींनी म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), नोटाबंदी अशा विविध मुद्द्यांवरून मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या ममता यांनी मोदींविरोधात नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसलं. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, ‘मी मोदींचं समर्थन करते, पण अमित शहांना माझा विरोध आहे. मी पंतप्रधानांना जबाबदार ठरवत नाही. मी त्यांना का जबाबदार ठरवावं? पण त्यांच्या पक्षानं जबाबदारीने वागले पाहिजे.’ ‘देशात हुकूमशाहीचं वातावरण असून एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरकारी कामात हस्तक्षेप करत आहेत’, असा दावा त्यांनी केला.

माझं मोदींना समर्थन आहे, पण शहांना विरोध आहे, अशी भूमिका म्हणजे मला एक मूर्ती डाव्या बाजूने छान वाटते, समोरून काही आवडत नाही, असं म्हणण्यासारखं आहे. मोदी-शहा अभिन्नत्वाला सुरुंग लावण्याचाच हा प्रकार आहे. अमित शहा हे मोदींना न विचारून, त्यांच्या आज्ञेविना, परवानगीविना सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप करत असतील का? या देशात मोदी आणि शहा अशी दोन वेगवेगळी सत्ताकेंद्रं आहेत, असा अपप्रचार करण्याचाच हा प्रयत्न आहे ममताबाईंचा.

.............................................................................................................................................

२. हिंदुत्वाबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या प्रखर भूमिकेतूनच हिंदुत्वाचा विचार देशात रुजला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या शिवसेना-भाजपला एकेकाळी जे लोक अस्पृश्य समजत होते, तेच आज सत्ता असल्यानं ‘आ गले लग जा’चा कार्यक्रम करत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तर एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याच्यामागे ठामपणे उभं राहणं, हे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य होतं, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाखतींचा दस्तावेज असलेल्या ‘एकवचनी’ या खासदार संजय राऊत यांच्या द्विखंडीय संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात हे नेते बोलत होते.

बाळासाहेब हे कसलेले राजकारणी होते, त्यामुळे लवचीक होते, याची असंख्य उदाहरणं त्यांच्या चरित्रात सापडतील. दरवेळी घेतलेली नवी भूमिका आधीच्या भूमिकेपेक्षा ठामपणे मांडण्याचं कसब त्यांना अवगत होतं. अन्यथा, संजय दत्तसारखा देशद्रोही एका रात्रीत उभरता सितारा बनला नसता. शिवसेना आणि भाजप यांच्याशी अनेकांनी घरोबा केला, तसा त्यांनीही सत्तेसाठी अनेकांशी पाट लावला आहे... ती ती विचारसरणी पटल्यामुळे त्या युती आणि आघाड्या झाल्या का? शिवसेना आणि भाजपशी सोयरिकी ही फक्त तात्कालिक सोय आहे, तो हिंदुत्वाच्या विचारधारेला दिलेला कौल वगैरे नाही.

.............................................................................................................................................

३. लिव्ह-इन रिलेशनशिप हे ‘अपवित्र नातं’ आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच राजस्थान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलं असतानाच, आता त्या राज्याच्या मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांनीही लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे एक प्रकारे ‘सामाजिक दहशतवाद’ आहे, असं विधान केलं आहे. पुढे कुणालाही कोणतीही सूचना न देता दोन लोक अशा प्रकारे एकत्र राहून समाजाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचं काम करतात. तसंच समाजातील वातावरण दूषित केलं जात आहे, असं ते म्हणाले. या संदर्भात कायदा करण्याची गरज असून ‘लिव्ह-इन’साठीही नोंदणी बंधनकारक करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘लिव्ह-इन’ हा सामाजिक दहशतवाद आहे. समाजाची प्रतिष्ठा धोक्यात आणणारी ही ‘संस्था’ आहे, असंही ते म्हणाले.

राजस्थान पंधराव्या शतकातून सोळाव्या शतकात आला, तर त्याचा मोठा सोहळा करता येईल ना साजरा? या देशात ‘नररत्नांची खाण’ या उपाधीला पात्र ठरण्यासाठी अनेक राज्यं आणि केंद्र सरकारमध्ये मोठी चढाओढ सुरू असली, तर या बाबतीत राजस्थानच्या पासंगालाही कोणी पुरणार नाही, यात शंका नाही. या मध्ययुगीन विचारसरणीचा देशभर सुरू असलेला प्रचार फलद्रूप होऊन सगळा देश हळुहळू राजस्थानच्या बरोबरीला जाईल, तेव्हाच तो पुण्यवान आणि पवित्र होईल, यात शंका नाही.

.............................................................................................................................................

४. राज्य सरकारच्या अखत्यारीतील सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा वापर पाककृती स्पर्धेसाठी करण्यात आला असून, नियम मोडणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, तसंच संबंधितांकडून व्यावसायिक भाडं वसूल करण्यात यावं, अशी मागणी माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मलबार हिलवरील सह्याद्री राज्य अतिथीगृहाचा वापर आणि बैठकांबाबत स्पष्ट शासन परिपत्रक असतानाही आयएएस वाइव्हज असोसिएशन या सनदी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेने त्याचा गैरवापर केला, असा आरोप गलगली यांनी केला आहे.

गलगली यांचे बोलविते धनी कोण आहेत, हे नीट तपासून पाहण्याची गरज आहे. ही पाककला स्पर्धा सनदी अधिकाऱ्यांमध्येच आयोजित करण्यात आली होती आणि त्यात एक अधिकारीच विजेते ठरले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या पत्नींना या अतिथीगृहाचा ‘लाभ’ मिळत राहिला, तर हळुहळू अशा स्पर्धा भरवून त्या सर्व प्रकारचं घरकाम यजमानांच्या गळ्यात मारतील, अशा भीतीपोटी आयएएस अधिकाऱ्यांनीच गलगली यांना, नेहमीच्या सवयीने, कागदपत्रं पुरवली असतील, अशी दाट शंका आहे.
.............................................................................................................................................

५. नोटाबंदीचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्यानंतर एकाएकी ‘पंतप्रधान जनधन योजने’तील खात्यांना महत्त्व प्राप्त झालं होतं. नोटाबंदीच्या पन्नास दिवसांत या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाल्यानं केंद्र सरकारचे डोळे विस्फारले होते. मात्र, नोटाबंदीनंतर केवळ सहा महिन्यांतच खात्यातील रकमेला पाय फुटले असून, १९ जुलै २०१७अखेर खात्यातील रकमेत दहा हजार कोटींची घट झाली आहे. एकीकडे रकमेत घट झाली असली तरी जानेवारी ते जुलै २०१७ या कालावधीत जनधन खात्यांमध्ये ३.२ कोटी खात्यांची भर पडली आहे. जानेवारीमध्ये २५.८ कोटींवर असणारी जनधनच्या खात्यांची संख्या आता २९.१ कोटींवर गेली आहे.

नोटबंदी ही अनपेक्षितपणे काळा पैसा पांढरा करून घेण्याची सर्वांत यशस्वी योजना ठरली आहे. की तसंच अपेक्षित होतं, कोण जाणे! भविष्यात पुन्हा लहरी महंमदाची लहर फिरून काही तसाच प्रसंग ओढवला तर हाताशी असावीत, म्हणून प्रत्येक शेठनं आपल्या चाकरांच्या नावे खाती उघडून ठेवली असणार. काळ्याचे पांढरे करण्याची इतकी सुलभ योजना दुसरी कुठून तयार होणार?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......