अजूनकाही
१. भाजप पुढील पाच-दहा नव्हे, तर ५० वर्षांसाठी सत्तेवर आला आहे. हीच भावना कार्यकर्त्यांमध्ये असेल तरच देशात परिवर्तन शक्य आहे, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बोलून दाखवला आहे. कार्यकर्त्यांना आता आराम करण्याचा अधिकार नाही. देशात जर सकारात्मक बदल पाहायचे असतील तर न थकता, न थांबता ठरवलेल्या दिशेनं पुढे जावे लागेल, असंही ते म्हणाले.
अरे बापरे, फारच धडकी भरवता राव तुम्ही! गोरखपूरच्या घटनेसारख्या घटना होतच असतात, हे विधान बहुधा अशाच आत्मविश्वासातून आलं असणार. जनतेनं आपल्याला आता ५० वर्षांसाठी निवडलंय, याची खात्री असेल, तर कार्यकर्त्यांनी खरं तर पंचवीसेक वर्षं फक्त आराम आणि इनकमिंगची मोजदादच केली पाहिजे. प्रमोद महाजन नावाचे एक दिवंगत नेते होऊन गेले तुमच्या पक्षाचे. त्यांनाही, तुमच्याच पक्षाच्या, पण, तुमच्यापेक्षा खूपच बऱ्या राजवटीमुळे अख्खा भारत देश झगमगून निघाल्याचा भास व्हायला लागला होता… निवडणुकीत डोळयांसमोर काजवे चमकल्यावर झगमगाटाचा अन्वयार्थ त्यांना समजला होता.
.............................................................................................................................................
२. “ राज्यसभा निवडणुकीत तुम्ही भाजप अध्यक्ष अमित शहांच्या नाकावर टिच्चून विजय मिळवलात. आता तशीच कामगिरी विधानसभा निवडणुकीतही करा. भाजपला हरविण्याचे शिवधनुष्य स्वीकारा,’’ असे सांगत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोनिया गांधींचे प्रभावशाली राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे गुजरात विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रं सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमित शहा विरुद्ध अहमद पटेल या राजकीय व्यवस्थापनातील दोन धुरीणांमधील संघर्षांचा भाग दोन गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पटेल यांच्याबरोबर असलेल्या कथित मतभेदांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला.
राहुल यांनी गेल्या कित्येक महिन्यांमध्ये घेतलेला हा पहिला सेन्सिबल निर्णय असावा. पंतप्रधान आणि भाजपच्या पक्षाध्यक्षांसाठी गुजरात म्हणजे नाक आहे. ते कापून अपशकून करण्याचं अशक्यप्राय धाडस काँग्रेस करणार असेलच, तर ते फक्त पटेल यांच्या सूत्रचालनातच होऊ शकतं, याचं भान त्यांना त्या मानाने वेळेत आलेलं आहे. अर्थात, ही लढाई मुद्द्यांची नसून दोन्ही पक्षाच्या बदनाम व्यवस्थापकांमधली गुद्द्यांची लढाई आहे, हे काही फार चांगलं लक्षण म्हणता येणार नाही.
.............................................................................................................................................
३. सैन्याचं आधुनिकीकरण करण्याची गर्जना मोदी सरकारनं केली असली तरी प्रत्यक्षात या प्रयत्नांना हादरा बसला आहे. संरक्षण मंत्रालयानं भूदलासाठी ४४ हजार ‘लाईट मशिन गन’ खरेदीची निविदा रद्द केली असून दोन वर्षात तिसऱ्यांदा सैन्यानं शस्त्रास्त्र खरेदीचा प्रस्ताव रद्द केला आहे. मशिन गन खरेदीची निविदा सुमारे १३ हजार कोटी रुपयांची होती.
सैन्याचं आधुनिकीकरण याचा अर्थ शस्त्रास्त्र खरेदी असा कसा होतो? मोदी आणि इतर पंतप्रधानांमध्ये काही फरक आहे की नाही? दिवसाला चार सूट बदलत ते अहोरात्र परदेश दौरे करतात ते का सैन्याच्या अशा आधुनिकीकरणासाठी? ते सर्व देशांवर जरब बसवतायत. एकदा ती बसली की चीन असो वा पाकिस्तान, मुळात कोणीही आपल्याकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमतच करणार नाही. बाकीची किरकोळ खुसपटं सांभाळायला जेम्स बाँड डोवल आहेतच. लढाई या संकल्पनेचंच आधुनिकीकरण करतायत ते… त्यातून आपसूक सैन्याचं आधुनिकीकरण होऊन जातंच.
.............................................................................................................................................
४. छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याच्या गोशाळेतील जवळपास २०० गायींचा उपासमारीमुळे आणि योग्य वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला आहे. ही गोशाळा भाजपचे नेते हरिश वर्मा यांच्या मालकीची आहे. २०० गायींपैकी २७ गायींचा मृत्यू उपासमारीनं झाला असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. इतर गायींच्या मृत्यूमागील कारणाबद्दल अद्याप तरी कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात मुलं दगावली ती कशानं, याचं नेमकं कारण काय, हे सर्वोच्च न्यायालयानं विचारण्याची पाळी येते, ते ठीक आहे. शेवटी मुलंच आहेत ती! अशीही दगावत असतातच. पण, या तर पवित्र गोमाता आहेत. २०० गुणिले ३३ कोटी इतक्या देवांशीच संबंधित विषय आहे हा. इथं नेमकं उत्तर मिळालं पाहिजे. २७ गायी उपासमारीनं मेल्या असणार आणि बाकीच्या बहुधा शोकातिरेकानं गेल्या असणार. गायीच्या मांसाच्या नुसत्या संशयानं माणसं कापायला निघणारे माथेफिरू गोगुंड कुठे आहेत? २०० मातांच्या हत्येची काय शिक्षा देणार ते वर्माला?
.............................................................................................................................................
५. वाराणसी या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदारसंघातून बेपत्ता असल्याचं पोस्टर शहरात लावण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे पोस्टर कोण लावलं आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. लाचार, हताश काशीवासियांनी हे पोस्टर लावलं आहे, असं त्यावर लिहिलेलं आहे. पोलिस पोस्टर लावणाऱ्यांचा शोध घेत आहेत. ‘जाने वह कौन सा देस जहां तुम चले गए’, असं लिहिलेल्या पोस्टरवर मोदींचं छायाचित्र आहे. वाराणसीत यांना मत मागताना शेवटचं पाहिलं होतं. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे नाईलाजानं गुन्हा दाखल करावा लागत आहे, असं या पोस्टरवर लिहिलं आहे.
काशी के वासियों, लाइन में आओ… तुमच्या पुढे संसद आहे, देशवासी आहेत, अनेक घटनांमधले पीडित आहेत… त्या सगळ्यांनाही हाच प्रश्न पडलेला आहे… दोन ‘मन की बात’च्या प्रसारणांमधल्या काळात पंतप्रधान नेमके कुठे बेपत्ता असतात? ते जिथं कुठे असतील तिथं देशहिताचाच विचार त्यांच्या मनात असतो आणि ते श्वासोच्छवास आणि अन्य नैमित्तिक दैहिक आन्हिकेही देशहितासाठीच करत असतात, याबाबतीत मात्र कोणीही मनात संदेह बाळगू नये.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment