अजूनकाही
१. करण जोहरच्या आगामी ‘डियर जिंदगी’मध्येही अली जफर हा पाकिस्तानी कलाकार; त्याची भूमिका कायम राहणार.
म्हणजे या सिनेमाच्याही जाहिरातीचं कंत्राट मनसेलाच मिळणार तर!
२. संवेदनशील कारवाईची दृश्ये दाखवल्याच्या नावाखाली एनडीटीव्हीवर केंद्र सरकारची ‘ब्लॅकआउट’ कारवाई
अरेरे, फक्त एकच दिवस? उद्यापासून त्या देशद्रोही, फेक्युलर, फुर्रोगाम्यांची देशविघातक बडबड पुन्हा सुरू होणार? छ्या!! मोदी फारच मवाळैत बुवा! जरा पर्रीकरांकडून शिका म्हणावं काहीतरी.
३. भाजपवाले ना हिंदूंचे आहेत ना मुस्लिमांचे; ते आपल्या बापाचेही होऊ शकत नाहीत. त्यांना फक्त मतं मिळवायची आहेत : केजरीवालांची असभ्य टीका
केजरीवाल भाऊ, स्वपाय स्वमुखात घालण्याचा (फूट इन माउथ) रोग जडवून घेऊ नका… आता तुम्ही किती सडेतोड युक्तिवादाचा मुद्दा मांडलाय, हे कोणी पाहणारच नाही, सगळे ‘बाप’च डोक्यावर घेऊन नाचणार. फुकट गेला ना बार!!
४. लंडनचा तरुण चिंचपोकळीच्या गणपती मंडळाचे टी शर्ट घालून जगप्रदक्षिणा करणार
अरेरे, इतकी जबरदस्त बातमी थोडी उशिराने आली… पत्रकारितेतले सर्वोच्च पुरस्कार नुकतेच देऊन झाले… पुढच्या वर्षी चान्स पक्का आहे पण. आता हा तरुण सायकलवरून जिथे जाईल तिथे लोक त्याची वास्तपुस्त करण्याआधी त्याचं टी शर्ट पाहून त्याचीच विचारणा करणार – ‘कुठून घेतलं? कुणी दिलं?’ आपल्याकडच्या मंडळाची ख्याती जगभर पसरणार… वाजवा रे वाजवा!
५.वायूप्रदूषणाने श्वास कोंडलेल्या दिल्लीत दिवाळीत वाजलेल्या फटाक्यांवर क्रिकेटपटू गौतम गंभीरची जोरदार टीका; दिल्लीकरांचे कान उपटले.
बा गौतमा, क्रिकेटपटू आहेस ना तू? तरी इतकी सेन्सिबल आणि जनमानसाच्या विरोधात जाणारी भूमिका कशी घेतोस? घरचे, दारचे, आसपासचे सगळे लोक फुप्फुसं फुटून किंवा कान किटून मेले, तरी हरकत नाही, पण फटाके वाजवणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ते फार महान धार्मिक कृत्यही आहे. आता चीनमध्ये जन्मलेले फटाके दिव्यांच्या सणात कुठून घुसले, असे देशद्रोही प्रश्न विचारू नकोस. पुढच्या सीझनमध्ये हिरव्या जर्सीत खेळायचंय का?
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment