टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • आचार्य बालकृष्ण, बाबा रामदेव, योगी आदित्यनाथ, माविया अली, माणिक सरकार आणि उद्धव ठाकरे
  • Thu , 17 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या आचार्य बालकृष्ण Acharya Balkrishna बाबा रामदेव Baba Ramdev योगी आदित्यनाथ Yogi Adityanath माविया अली Maviya Ali माणिक सरकार Manik Sarkar उद्धव ठाकरे Uddhav Thackeray

१. आम्ही आधी मुस्लिम आहोत, त्यानंतर भारतीय, असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते माविया अली यांनी केलं आहे. अली यांच्या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची चिन्हं आहेत. उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा आणि राष्ट्रगीत म्हटलं जावं असा आदेशच काही दिवसांपूर्वी काढण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना माविया अली यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दोन्हीकडची दुकानं टिकून राहावीत, यासाठी अली यांच्यासारखे भडभुंजे असल्या लाह्या तडतडवतात आणि मग ‘बघा मुसलमान कसे आहेत ते’ असं म्हणून सरसकटीकरण करणाऱ्यांचं फावतं. जणू, कोणी प्रज्ञा, प्राची, आदित्यनाथ, अवैद्यनाथ किंवा इंद्रेश कुमार हेच जणू हिंदूंचे अधिकृत प्रतिनिधी असावेत, अशा थाटात माविया अलींच्या मापात सगळे मुस्लिम मोजले जातात. जगभरात कुठेही मुसलमान आधी मुसलमानच असते, नंतर त्या देशाचे नागरिक असते, तर मुळात ते इतक्या देशांमध्ये विभागले का असते आणि शिया-सुन्नीच्या लढाया आजवर कशाला चालल्या असत्या अलीमियाँ?  

.............................................................................................................................................

२. ईदच्या काळात रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांना रोखू शकत नसेन, तर राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू नका, असं सांगण्याचा कोणताही हक्क मला नाही, असं उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. आगामी काळात उत्तर प्रदेशात होणाऱ्या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विचार मांडले. कावड यात्रेच्या काळात सरकारकडून ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी माईक, डीजे आणि इतर वाद्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं की, प्रत्येक ठिकाणी माईकवर बंदी असेल, असा आदेश तुम्ही माझ्यासमक्ष मंजूर करा. यामधून कोणतीही जागा वगळू नका. कोणत्याही धर्मस्थळाचा आवाज संबंधित परिसराबाहेर गेलाच नाही पाहिजे, हे निश्चित करा. त्यानंतर या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी तुम्हाला शक्य आहे का, हे मला सांगा. ते शक्य नसेल तर मग कावड यात्रेवर लादण्यात आलेले निर्बंधही आम्ही मान्य करणार नाही. ही यात्रा नेहमीच्या पद्धतीनंच होईल.

आम्ही ईदचे रस्त्यावरचे नमाज बंद करणार नाही आणि कावड यात्राही बंद करणार नाही; आम्हाला मशिदीवरचे भोंगे काढायचे नाहीत, कारण त्यातूनच आम्हाला कावडयात्रेचा गोंगाट करायचा परवाना मिळतो, असा आदित्यनाथांच्या बोलण्याचा थेट अर्थ आहे. एक सर्वशक्तिमान मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना आदेश देतो, त्यांच्याशी बुद्धिबळ खेळत बसत नाही. यांची साधारण शक्ती आणि कुवत काय, हे गोरखपूरच्या प्रकरणातून स्पष्ट झालेलं आहेच. दुर्दैवानं, मुसलमानांमध्येही नमाज आणि भोंगे बंद करून हिंदूंना ऐरणीवर आणणारा नेता नाही. तिथं सगळे यांचेच भाऊ भरलेले आहेत.

.............................................................................................................................................

३. भारत-चीनमध्ये डोकलाम मुद्द्यावरून तणाव असतानाच योगगुरू रामदेव बाबा यांनी चीनवर ‘बहिष्कारास्त्र’ डागलं आहे. चीनला आर्थिकदृष्ट्या पराभूत करायचं असल्यास देशातील नागरिकांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालणं गरजेचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त पतंजली योगपीठात १०० फूट उंचावर तिरंगा फडकवण्यात आला. या कार्यक्रमात ते म्हणाले, ‘आक्रमक बाणा’ काय असतो ते चीनला समजू दे.

बाबा रामदेव, भारतीयांसाठी चीनही परदेश आणि नेपाळही परदेश. आम्ही चीनच्या मालावर बहिष्कार घालून पतंजलीचा तथाकथित स्वदेशी माल खरेदी करायचा, कशासाठी? पतंजलीचे नेपाळी मालक बाळकृष्ण यांची संपत्ती वाढवण्यासाठी? जिचा मालक नेपाळी ती कंपनी फार फार तर हिंदू असू शकते, ती स्वदेशी कशी? पुन्हा यांचा व्हिसाही खोटी कागदपत्रं देऊन मिळवलेला. म्हणजे ना देशी, ना प्रामाणिक. तिकडे खुद्द सरकार चीनबरोबर व्यापारी करार करत असताना, कंत्राटं देत असताना सामान्य जनतेनं चिनी मालावर बहिष्कार कशाला घालायचा?

.............................................................................................................................................

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणावर शिवसेनेनं नेहमीच्या खोचक शैलीत निशाणा साधला आहे. काश्मीरचा प्रश्न बंदुकीच्या धाकानं किंवा काश्मिरी लोकांवर टीका करून सुटणार नाही. त्यासाठी काश्मिरी लोकांना आपलं मानून जवळ केलं पाहिजे, या पंतप्रधानांच्या मुद्द्यावर ‘भारतीय सैनिकांनी आता हातामधील बंदुका खाली टाकून काश्मिरी लोकांना मिठ्या माराव्यात’, असा टोला शिवसेनेनं मोदींना लगावला. ‘काश्मिरातील ३७० कलम लगेच हटवून टाका. म्हणजे देशभरातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी कश्मीरात जातील व तेथील लोकांच्या गळाभेटी घेतील. सैनिकांनो, बंदुका मोडा व कश्मिरींना मिठ्या मारा. पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचे आम्ही स्वागत करीत आहोत,’ असं अग्रलेखात म्हटलं आहे.

काश्मीर प्रश्नाच्या सर्वांत उथळ आकलनाचा पुरस्कार इतकी वर्षं सातत्यानं जिंकल्याबद्दल या पक्षाचं नाव गिनीज बुकात नोंदवा, अशी सूचना नितेश राणे यांनी अजून कशी केली नाही? ३७० वं कलम रद्द करणं, चीनशी युद्ध करणं, गेलाबाजार पाकिस्तानशी युद्ध करणं, या इतक्या सोप्या गोष्टी असत्या, तर आपल्या ५६ इंची पंतप्रधानांनी त्या केल्या नसत्या का? सत्तेत येण्याआधी तेही हीच भाषा बोलत होते. देशाची सत्ता सांभाळताना, बहुमत असूनही असलं काही करता येत नाही, हे कळतं त्यांना. तुम्ही नाही का एन्रॉन समुद्रात बुडवायला निघाला होतात, मग रिबेकाबाईंनी भानावर आणलं... तसंच असतं हेही.

.............................................................................................................................................

५. स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेलं भाषण दूरदर्शन आणि आकाशवाणीनं प्रसारित करण्यास नकार दिल्याचा आरोप त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केला आहे. भाषणात बदल केल्याशिवाय ते प्रसारित करणार नसल्याचं संबंधित विभागानं म्हटल्याचं सरकार यांनी सांगितलं. केंद्र सरकारचं हे पाऊल लोकशाहीविरोधातील असहिष्णू पाऊल असल्याचं म्हटलं आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीचं नेतृत्व करणाऱ्या प्रसारभारतीनं या प्रकरणी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अहो तुम्ही कम्युनिस्ट, म्हणजे शंभर टक्के हिंस्त्र देशद्रोही. तुम्ही देशातले सगळ्यात गरीब आणि साधे मुख्यमंत्री असलात तरी तुमच्या राजवटीत कसे नृशंस अत्याचार सुरू आहेत आणि तरीही लोक तुम्हालाच दहशतीपोटी कसे वारंवार निवडून देत आहेत, याच्या कहाण्या उर्वरित भारतात प्रसृत होऊही लागल्या आहेत. मुळात तुम्हाला स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण करायची परवानगीच कोणी दिली, हा प्रश्न आहे. तुमचं भाषण देशद्रोहीच असणार, हे आमच्या दिव्यदृष्टीच्या मंत्रीणबाई ते न वाचताच सांगू शकतात (कोण रे कोण तो, लिहिता वाचता येतं ना त्यांना, असं विचारतोय).

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......