राष्ट्रजीवनातील समस्या
पडघम - देशकारण
दीनदयाळ उपाध्याय
  • पं. दीनदयाळ उपाध्याय आणि त्यांच्या ‘राष्ट्र चिन्तन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 16 August 2017
  • पडघम देशकारण पं. दीनदयाळ उपाध्याय Deendayal Upadhaya राष्ट्र चिन्तन Rashtra Chintan

पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष चालू असून २५ सप्टेंबर २०१७ रोजी त्याची सांगता होईल. त्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या वतीने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष १० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आहे. २६ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याविषयीचे प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना एक पुस्तिका देण्यात येईल. या पुस्तिकेत दीनदयाळ उपाध्याय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारांची माहिती असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकार तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च करून उपाध्याय यांची पुस्तके खरेदी करणार आहे. ही पुस्तके राज्यातील ग्रंथालयांना दिली जाणार आहेत.

‘राष्ट्र चिन्तन’ या छोट्या पुस्तकात उपाध्याय यांनी देशासमोरील आव्हानांचा प्रामुख्याने विचार केला आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नवा भारत’ घडवण्याचा जो संकल्प केला आहे, त्या भारताची रूपरेषा उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित आहे. त्यामुळे त्यांच्या ‘राष्ट्र चिन्तन’ या पुस्तकातील लेखांचे आजपासून ‘अक्षरनामा’वर क्रमश: पुनर्प्रकाशन केले जाणार आहे. त्यातील हा पहिला लेख...

.............................................................................................................................................

भारतात एकच संस्कृती नांदू शकते. अनेक संस्कृतींची घोषणा आमच्या देशाला छिन्नविच्छिन्न करून आमच्या जीवनाचा नाश करील म्हणून आज मुस्लिम लीगचा द्विसंस्कृतीवाद, काँग्रेसचा प्रच्छन्न द्विसंस्कृतीवाद आणि साम्यवाद्यांचा बहुसंस्कृतीवाद चालणार नाही. आजपर्यंत एकसंस्कृतीवादाला जातीय संबोधून लाथाडण्यात आले, पण आता काँग्रेसमधील विद्वानांना आपली चूक समजून आली आहे व ते सुद्धा एकसंस्कृतीवादाचा पुरस्कार करू लागले आहेत. याच भावनेच्या व विचारांच्या आधाराने भारताची एकता अभंग राहू शकेल आणि आपण आपल्या समोरील सारे प्रश्न सोडवू शकू.

मानवाला देशभक्तीची भावना इतर अनेक उपजत प्रवृत्तीप्रमाणे स्वभावत:च प्राप्त होत असते. परिस्थिती व वातावरण यांनी दबल्यामुळे काही वेळा सुप्त होऊन ती विलीनप्राय होत असते. जागृत व्यक्ति अस्पष्ट किंवा क्षीण भावनांपासून कार्याची प्रेरणा घेत नाहीत, तर आपल्या स्वप्नांनुसार देश निर्माण करण्याच्या ध्येयवादापासून प्रेरणा घेतात. भारतातील प्रत्येक देशभक्तासमोर असा ध्येयपथ आहे. आणि त्याला वाटते की, आपल्या मार्गानेच देशाचा उद्धार होणार आहे. जर सर्वांचा मार्ग एकच असता, सर्वांसमोर असलेले आदर्श भारताचे चित्र समान असते, तर वादाचा प्रश्न नव्हता. परंतु आज भिन्न भिन्न मार्गांनी देशाची उन्नति करण्याची इच्छा असलेले लोक दिसतात आणि प्रत्येकाला वाटते की, आपलाच मार्ग खरा आहे. कोणते आहेत हे मार्ग?

बाराकाईने पाहिले असता चार प्रमुख मार्ग दिसतात.

१) अर्थवादी, २) राजनीतीवादी, ३) संप्रदायवादी, ४) संस्कृतीवादी

अर्थवादी

या मार्गावर श्रद्धा ठेवणारे अर्थाला-संपत्तीला सर्वस्व मानतात. जगातील सर्व प्रकारच्या दुरवस्थेचे कारण अर्थस्वामित्व व सध्याची अर्थवितरण पद्धति आहे असे मानून त्यात सुधारणा करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजतात. “अर्थ” त्यांच्या डोळ्यासमोरचे एकमेव लक्ष्य आहे. साम्यवादी आणि समाजवादी हे या वर्गाचे लोक आहेत. त्यांच्या मताप्रमाणे भारताच्या राजनीतीची रचना अर्थनीतीच्या आधारावर झाली पाहिजे. त्यामुळे हे लोक संस्कृती आणि संप्रदाय (Religion) यांना अधिक महत्त्व देण्यास तयार नाहीत.

राजनीतीवादी

दुसरा गट आहे राजनीतीवाद्यांचा. हे लोक ‘राजनैतिक प्रभुत्व’ हेच सर्वस्व आहे असे मानून ते प्राप्त करण्याची इच्छा करतात. त्यामुळे राजकीय दृष्टीनेच हे संस्कृती, धर्म, संप्रदाय यांची व्याख्या करतात. अर्थवादी एकदम सर्व उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करावे, काहीही मोबदला दिल्याशिवाय जमीनदारी नष्ट करावी असे म्हणतात. तर हे राजनीतीवादी राजकीय कारणांमुळे असे करण्यास असमर्थ असतात. आपल्या राजनीतीसाठी फक्त यांना धर्म, संप्रदाय यांचे मूल्य वाटते, अन्यथा नाही. या वर्गातले बहुतेक लोक आज काँग्रेसमध्ये आहेत व त्यांच्या हाती राजकारणाची सर्व सूत्रे आहेत.

संप्रदायवादी

तिसरा वर्ग हा विशिष्ट संप्रदाय म्हणजेच सर्वस्व असे मानणारा आहे. परंतु याला धर्मनिष्ठ म्हणणे योग्य होणार नाही. कारण संप्रदाय, पंथ, मजहब यापेक्षा धर्म विशाल आहे. आपल्या संप्रदायाच्या मतानुसार देशाची राजनीती व अर्थनीती चालावी असे या वर्गाचे म्हणणे असते. जरी सध्या या वर्गाचा फारसा प्रभाव नसला तरी मुल्ला-मौलवी आणि कट्टर रूढीवादी यांच्या रूपाने हा वर्ग अस्तित्वात आहे.

संस्कृतीवादी

चौथा वर्ग संस्कृतीवादी आहे. या वर्गातील लोकांचा असा विश्वास आहे की, संस्कृती हाच भारताचा आत्मा आहे. त्यामुळे या संस्कृतीचे रक्षण आणि विकास करणे हे आपले कर्तव्य आहे. आपला सांस्कृतिक ऱ्हास झाला आणि आपण जर पश्चिमेप्रमाणे भोगप्रधान व अर्थप्रधान जीवन जगू लागलो तर निश्चितच आपले अस्तित्व संपेल. हा वर्ग भारतात फार मोठ्या संख्येमध्ये आहे. हे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि काही काँग्रेसमध्येही आहेत. हे संस्कृतीवादी लोक राजनीतीला केवळ संस्कृतीची सहाय्यक मानतात. परंतु राजनीतीला सांस्कृतिक निर्णय घेण्याचा अधिकार नाही असे त्यांना वाटते.

मार्गांची प्राचीनता

वरील चार वर्गांचे विवेचन आधुनिक शब्दांत केले असले, तरी फार प्राचीन काळापासून या चार प्रवृत्ती अस्तित्वात आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या त्या चार प्रवृत्ति होत. धर्म हा संस्कृतीचा, अर्थ हा भौतिक वैभवाचा, काम हा राजनैतिक आकांक्षांचा व मोक्ष हा पारलौकिक उन्नतीचा द्योतक आहे. आम्ही धर्म हा जीवनाचा मानदंड मानला, कारण त्यापासूनच तर इतर तिघांची प्राप्ती होते. म्हणून महाभारतकाळी जेव्हा धर्माची अवहेलना सुरू झाली तेव्हा महर्षि व्यासांनी हात उंचावून सांगितले –

ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चित् शृणोति माम्

धर्मात् अर्थश्च कामश्च स धर्म: किं न सेव्यते

अर्थ, काम आणि मोक्ष या तिघांची प्राप्ती धर्मामुळेच होते म्हणून धर्माची व्याख्या करताना

‘यतोभ्युदयनि:श्रेयसिद्धि: स धर्म:’ (ज्यामुळे ऐहिक व पारलौकिक उन्नति होते तो धर्म) असे म्हटले आहे. अर्थात् धर्म म्हणजे निश्चितपणे ‘रिलिजन’ नाही. ‘रिलिजन’ (Religion) साठी आपण ‘मत’ हा शब्द वापरतो. रिलिजन प्रत्येकासाठी भिन्न असू शकेल. रिलिजन हे मोक्ष, निर्वाण किंवा परमानन्द प्राप्तीचे साधन आहे, तर धर्म हा संपूर्ण समाजाचे धारण करतो, समाजाच्या सर्व अंगाचे पालन करतो म्हणून ‘धारणात् धर्मभित्याहु: धर्मो धारयते प्रज्ञा:’ अशी धर्माची व्याख्या केली आहे.

धर्मप्रधान भारतीय जीवन

आपले भारतीय जीवन धर्मप्रधान आहे. त्याचे प्रमुख कारण हेच आहे की, याच मार्गाने जीवनाचा अधिकात अधिक विकास होण्याची शक्यता आहे. जे जीवनाकडे आर्थिक दृष्टिकोनातून पाहतात, त्यांना आर्थिक समानता निर्माण करावयाची असेल, परंतु त्यामुळे ते व्यक्तीच्या राजकीय आणि आत्मिक प्रेरणांना संपूर्णपणे नष्ट करतात. जे केवळ राजकीय चष्म्यातून व्यक्तीकडे पाहतात, ते व्यक्तीला मताचा अधिकार देऊन त्याचे राजकीय व्यक्तित्व अबाधित राखण्याचा प्रयत्न करतात. परंतु आर्थिक आणि आत्मिक दृष्टिकोनाकडे डोळेझाक करतात. अर्थवादी हे व्यक्तीचे जीवना भोगप्रधान आहे असे मानत असतील, तर राजनीतीवादी त्याचे जीवन अधिकारप्रधान बनवतात. तिसऱ्या गटाचे लोक म्हणजे मतवादी लोक. हे पुष्कळसे अव्यावहारिक, गतिहीन आणि संकुचित विचाराचे असतात. पुष्कळ वेळेला हे लोक स्वत:ला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे अथवा पुस्तकाचे गुलाम समजतात. इतके की अनेकदा हे स्वत:चे सुद्धा रक्षण करू न शकल्याने पूर्णपणे नष्ट होतात. अर्थवादी, राजनीतीवादी आणि मतवादी या तिन्हींपेक्षा संस्कृतीप्रधान जीवनाचे वैशिष्ट्य हे की, या जीवनात जीवनाच्या मौलिक तत्त्वांवर भर दिला जात असूनही बाकीच्या बाह्य गोष्टीत प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेले असते. यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विकास होतो. संस्कृती ही विशिष्ट काळाशी अगर व्यक्तीशी जखडलेली नसते, तर ती स्वतंत्र आणि विकासमय जीवनाची मौलिक प्रवृत्ती आहे. त्या संस्कृतीलाच आम्ही ‘धर्म’ म्हटले आहे. म्हणून जेव्हा भारत हा धर्मप्रधान देश आहे असे म्हटले जाते, तेव्हा धर्माचा अर्थ मजहब, संप्रदाय, मत, रिलिजन असा न करता ‘संस्कृती’ हाच केला पाहिजे.

भारताची जगाला देणगी

भारताचा आत्मा ज्याला समजून घ्यावयाचा असेल, त्याने राजकीय अथवा अर्थनीतीच्या चष्म्यातून भारताकडे पाहून चालणार नाही. त्यासाठी सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. भारतीयत्वाची अभिव्यक्ती राजकारणामधून होत नसून, संस्कृतीद्वारा होत असते. संपूर्ण विश्वाला जर आम्ही कोणती गोष्ट शिकवू शकणार असू तर आमची सांस्कृतिक सहिष्णुता आणि आमच्या कर्तव्यप्रधान जीवनाची शिकवण हीच होय. राजकारण आणि अर्थनीती यांची शिकवण नाही. उलट या गोष्टीत आम्हालाच त्यांच्याकडून काही शिकावे लागेल. अर्थ आणि काम यांच्यातून भोग, अधिकार, असहिष्णुता इ. भावना प्रकट होत असतील तर धर्माच्या भावनेने भोगाऐवजी त्याग, अधिकाराऐवजी कर्तव्य आणि संकुचित असहिष्णुतेच्या जागी विशाल एकात्मता प्रकट केली जाते. आणि या गुणांमुळेच केवळ आम्ही जगासमोर अभिमानाने ताठ उभे राहू शकतो.

संघर्षाचा आधार

भारतीय जीवनाचे प्रमुख तत्त्व त्याची संस्कृती अर्थात धर्म असल्याने आपल्या इतिहासात जे जे संघर्ष झाले ते आपल्या संस्कृतीच्या संरक्षणासाठीच झाले. आणि या धर्माच्या आणि संस्कृतीच्या आधारावरच आम्ही जगात कीर्ती मिळविली. आम्ही मोठमोठ्या साम्राज्यांच्या निर्मितीला महत्त्व न देता, आमचे सांस्कृतिक जीवन पराभूत होऊ दिले नाही. आमचा मध्ययुगीन इतिहास पाहिला तर झालेली युद्धे ही संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठीच होती हे दिसून येईल. जरी कधी काळी त्यांना राजकीय स्वरूप आले असले तरी त्याचे कारण संस्कृती हेच होते. महाराणा प्रताप आणि रजपूत यांची शत्रूंशी झालेली युद्धे केवळ राजनैतिक स्वातंत्र्यासाठी नसून धार्मिक स्वातंत्र्यासाठी होती. छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेली हिंदुपदपादशाही ही गोब्राह्मणप्रतिपालनासाठी होती. शीख पंथाच्या गुरूंनी केलेली युद्धे धर्मरक्षणासाठीच होती. मात्र या सर्वांचा अर्थ असा समजण्याचे कारण नाही की, आम्हाला राजकारणाचे महत्त्व मुळीच वाटत नव्हते. किंवा राजकीय पारतंत्र्याचा आम्ही आनंदाने स्वीकार केला होता. परंतु हे मात्र सत्य आहे की, आम्ही आमच्या जीवनात राजकारणाला केवळ सुखाचे साधन मानतो, तर संस्कृतीला साक्षात जीवनच मानतो.

संस्कृतीचा संघर्ष

आजसुद्धा प्रमुख समस्या सांस्कृतिक आहेत असे दिसून येते. या समस्येचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे संस्कृतीलाच भारतीय जीवनाचे प्रमुख तत्त्व मानणे आणि दुसरा, हे मान्य करून त्या संस्कृतीचे रूप कोणते असावे ते निश्चित करणे. वरवर पाहता या दोन निराळ्या समस्या वाटत असल्या तरी मुळात ही एकच समस्या आहे. कारण संस्कृती हेच जीवनाचे प्रमुख आणि आवश्यक अंग आहे असे एकदा मान्य केल्यावर त्याच्या स्वरूपाबद्दल फारसे मतभेद किंवा झगडे उत्पन्न होत नाहीत. इतर तत्त्वांना अवास्तव महत्त्व देऊन त्यांच्यामध्ये संस्कृतीला बसवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा मतभेदाचा प्रश्न निर्माण होतो.

एकसंस्कृतीवादी

या दृष्टीने विचार केला तर भारतात आज एकसंस्कृतीवाद, द्विसंस्कृतीवाद आणि बहुसंस्कृतीवाद असे तीन मुख्य वर्ग आहेत. यापैकी पहिला जो एकसंस्कृतीवादी वर्ग आहे तो असे मानतो की, भारतात केवळ एकच संस्कृतीचे अर्थात भारतीय संस्कृतीचे अस्तित्व आहे. इतर संस्कृतींचे अस्तित्व त्याला मान्य नाही. किंवा जर अन्य संस्कृती थोड्या प्रमाणात कुठे असतील तर त्यांनी भारतीय संस्कृतीत विलीन व्हावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व आणि काँग्रेसमधील पुरुषोत्तम दास टंडन इ. काही लोक या वर्गात मोडतात.

द्विसंस्कृतीवादी

द्विसंस्कृतीवादी दोन प्रकारचे आहेत; एक स्पष्ट किंवा उघड द्विसंस्कृतीवादी व दुसरे प्रच्छन्न द्विसंस्कृतीवादी. पहिल्या वर्गातले लोक स्पष्टपणे असे मानतात की, भारताच्या दोन संस्कृती आहेत; किंवा दोन संस्कृतींचे वेगवेगळे अस्तित्व आपण टिकवू असे ते म्हणतात. भारतांतली मुस्लीम लीग याच मताची आहे. ती भारतात हिंदू व मुस्लीम अशा दोन संस्कृती आहेत असा आग्रह धरून म्हणते की, मुसलमान आपल्या संस्कृतीचे रक्षण अवश्य करतील. दोन संस्कृतींच्या आधारावरच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त समोर ठेवला. याचा अनुभव आम्ही गेल्या काही वर्षांत चांगलाच घेतला आहे. प्रच्छन्न द्विसंस्कृतीवादी जे आहेत ते बोलताना चुकीचे अगर योगायोगाने, एकसंस्कृति एकराष्ट्र, हाच सूर धरतात, परंतु प्रत्यक्ष व्यवहार करताना मात्र दोन संस्कृती मानून त्यांचा समन्वय घालण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. ते हे मान्य करतात की, येथे हिंदू आणि मुसलमान अशा दोन संस्कृती आहेत. पण यापुढे ते म्हणतात की, या दोघांची मिळून एक नवीन हिंदुस्थानी संस्कृती बनवली पाहिजे. ते अकबराला भारताचा राष्ट्रपुरुष मानतात. ‘नमस्ते’ आणि ‘सलामालेकुम’ यांचे काम “आदाब अर्ज”ने करणे त्यांना आवडते. हा वर्ग काँग्रेसमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. दोन संस्कृतींची मिळून एक भेसळ संस्कृती, खिचडी संस्कृती बनविण्याचा असफल प्रयत्न आतापर्यंत अनेक वेळा झाला आणि प्रत्येक वेळी त्याचा विध्वंसच झाला आहे. याचे वास्तविक कारण असे आहे की, जिला मुस्लिम संस्कृती असे म्हटले जाते, ती कोणत्या ‘मजहब’ची, संप्रदायाची संस्कृती नसून ती अनेक अभारतीय संस्कृतींचे एक कडबोळे मात्र आहे. तीत विदेशीपणा, विदेशी बीज असल्याने, तिचा भारतीय संस्कृतीशी मेळ बसणे केवळ कठीण नाही, तर संपूर्ण अशक्य आहे. यासाठी जर भारतात ‘एकसंस्कृती’ आणि ‘एकराष्ट्र’ हे तत्त्व मान्य करायचे असेल तर ती भारतीय संस्कृती अथवा भारतीय राष्ट्र – ज्यांत मुसलमानांचाही समावेश आहे – या व्यतिरिक्त अन्य कोणते असू शकत नाही.

बहुसंस्कृतीवादी

आपल्या देशात एक संस्कृती आणि द्विसंस्कृती याप्रमाणे बहुसंस्कृती मानणारेही काही लोक आहेत. असे मानणारे पुष्कळ लोक प्रत्येक प्रांताची निरनिराळी संस्कृती आहे असे मानतात. त्याचप्रमाणे या निरनिराळ्या संस्कृतीच्या आधारावर त्या प्रांतांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देऊन पुष्कळ अंशी प्रांताचे स्वतंत्र अस्तित्व मानतात. साम्यवादी, भाषावर प्रांतरचना करण्याचा आग्रह धरणारे लोक साधारणपणे या वर्गात मोडतात. हे लोक सर्व प्रांतांमधून भारतीय संस्कृतीच्या अक्षुष्ण प्रवाहाचे दर्शन करू शकत नाहीत.

संस्कृतीहून भिन्न जीवनधारा

वरील जे प्रमुख तीन वर्ग आहेत, त्यांचे मुख्य कारण म्हणजे द्विसंस्कृतीवादी आणि बहुसंस्कृतीवादी यांच्यासमोर संस्कृतीप्रधान जीवन नसून कोणते तरी राजकारण अथवा अर्थनीतीप्रधान जीवन आहे. मुस्लिम लीगने आपल्या अमूर्त तत्त्वांचा आधार मुस्लिम मजहब हाच मानून भिन्न मुस्लिम संस्कृती आणि अलग राष्ट्र यांची घोषणा देऊन त्याच आधारावर आपले कार्यक्रम इत्यादींची रचना केली. काँग्रेसचे जीवन आणि लक्ष्य राजकारणप्रधान असल्याने त्यांनी पारतंत्र्यात इंग्रजांशी लढण्यासाठी आणि स्वातंत्र्यात शासन चालविण्यासाठी सर्वांना एकत्रित उभे करण्याचा विचार केला. याचा परिणाम म्हणून अप्रत्यक्षपणे काँग्रेस द्विसंस्कृतीवादाचे भक्ष्य बनली. बहुसंस्कृतीवादी जे आहेत, ते सर्व लोक जीवन अर्थप्रधान आहे असे मानतात. त्यामुळे आर्थिक एकतेची अष्टौप्रहर काळजी करून सांस्कृतिक एकतेकडे दुर्लक्ष करतात.

एकराष्ट्र आणि एकसंस्कृती

केवळ एकसंस्कृतीवादी लोक असे आहेत की, ज्यांच्यासमोर एकराष्ट्र, एकसंस्कृती याशिवाय दुसरे ध्येय नाही. आणि आपण यापूर्वीच पाहिल्याप्रमाणे संस्कृती हाच भारताचा आत्मा असल्याने त्यांचे ध्येय जे जे भारतीय असेल त्याचे रक्षण आणि विकास करणे आहे. बाकीचे सर्व पश्चिमेचे अनुकरण करून, पुंजीवादाची कास धरून अथवा रशियाच्या पावलावर पाऊल ठेवून आर्थिक प्रजातंत्र किंवा राजकीय भाडंवलशाहीची निर्मिती करण्याचे मनसुबे करीत असतात. अर्थात यातले काही सदभावनेनेही करीत असतील. परंतु त्यांच्या या करण्याने भारतीय आत्म्याचा, भारतीयत्वाचा विनाश होण्यास मदत होत आहे. म्हणून आजची सर्वांत मोठी गरज कोणती असेल, तर ती ही की, “एकसंस्कृती-एकराष्ट्र” मानणाऱ्यांना सर्वांनी पूर्णपणे सहकार्य दिले पाहिजे. तरच आम्ही देशविभाजनासारख्या भावी दुर्घटनांपासून स्वत:चे रक्षण करून जगामध्ये गौरवाने आणि वैभवाने उभे राहू शकू.

.............................................................................................................................................

‘राष्ट्र चिन्तन’ या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या मूळ पुस्तकाचे प्रकाशन लखनौमधील राष्ट्रधर्म पुस्तक प्रकाशन या संस्थेने केलेले असून त्याचा मराठी अनुवाद भारतीय विचार साधना, नागपूर या संस्थेने प्रकाशित केला आहे. या पुस्तकावर प्रकाशन वर्ष दिलेले नसले तरी हे पुस्तक उपाध्याय यांच्या निधनानंतर म्हणजे १९६८नंतर प्रकाशित झाले असावे असे दिसते.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......